टूल वापराबाबत काही मानकं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरविले आहेत. त्यानुसार देश - विदेशातील अनेक टूल बनविणाऱ्या कंपन्या आपापली उत्पादने आपल्या कॅटलॉग्जद्वारा बाजारपेठेत सादर करत असतात. अर्थातच अशा कॅटलॉग्जमध्ये ते प्रमाणीत उत्पादने दाखवतात. अनुभवानुसार तसेच एका विशिष्ट शास्त्रानुसार कोणत्या गोष्टी कशा साठवायच्या/साठवणुकीची पद्धत (स्टॉकिंग पॅटर्न) यांचे ठोकताळे ठरविले जातात.
उदाहरणार्थ, कार्बाईड एंड मिल्स पाहिली तर 4, 6, 8,10 व्यास, 12, 16, 20 व्यास अथवा इन्सर्ट असणारी एंड मिल्स 25, 32, 40 व्यास अशी साठवणुकीची पद्धत (स्टॉकिंग पॅटर्न) असते.
मोठे कटर पाहिले तर, 50, 63, 80, 100 व्यास, 125, 160, 200, 250, 315 अशी साठवणुकीची पद्धत असते.
बोल्टस्बाबत पाहिले तर, M3, M4, M5, M6, M8, M10, M12 ,M16, M18, M20 असे साठवणुकीचे प्रकार असतात.
हे सर्व 1877 मध्ये फ्रेंच मिलिटरी इंजिनिअर, कर्नल चार्लस रेनार्डने ’प्रेफर्ड स्टॉकिंग पॅटर्न’ या नावाने संशोधन करून ठरविले होते. 1952 साली त्याला ISO-3 या नंबरने जागतिक मान्यता मिळाली आहे.
मिलिटरीच्या अनेक विविध प्रकार व आकारमानामुळे हाताळण्यास त्रासदायक ठरणाऱ्या साठ्यावर रेनार्डने हा तोडगा काढला. अशा प्रकारच्या साठ्यामुळे कारखान्यातील सर्व प्रकारची कामे होऊ शकतात, हे या संशोधनाने सिद्ध केले आहे.
उदाहरणार्थ, जर पहिला आकार 10 असेल, तर 100 पर्यंत पुढील आकार हा 5 √ 10 ने गुणून (म्हणजेच 1.58) असा तयार होतो. 10, 16, 25, 40, 63, 100 अशा 6 आकारात संपूर्ण 1 ते 100 करिता सुटसुटीत साठवणुकीची पद्धत ठरवलेली असते. त्यापेक्षाही सुक्ष्म आकार व विभागणीसाठी 10 √ 10 हे गुणोत्तर वापरले जाते.
कारखान्यात वापरात असलेल्या ड्रॉईंग पेपर, ड्रॉईंग पेन आणि एनव्हलपसाठीसुद्धा असेच मानक आहेत.
जसे आकारांसाठी तसेच, टूलच्या कर्तन (कटिंग) भूमितीवरून वर्गवारी ठरली आहे व त्यालाही ISO ने मान्यता दिली आहे. टूल एकत्रितपणे साठविण्यासाठी सुलभता असावी व त्याबरोबरच ते वापरण्यास सोयीचे जावे, म्हणून ॲप्रोच अँगल व कटिंग रेक यावरून मानक ठरवले आहेत. (तक्ता क्र. 1 पहा)
हे सांगण्याचा मुद्दा असा की, बाजारात उपलब्ध असलेले आकार वापरून, शॉपमधील सर्व कामे करता येतात. (उदाहरणाद्वारे समजावून घेऊ, आपल्याकडे नोटाबदलीच्या काळात 100 नंतर एकदम 2000 ची नोट आल्यामुळे जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, ती आठवली तर ही परिस्थिती लक्षात येईल. चलनासाठी प्रचलित पॅटर्न 1-2-5 हाच आहे. त्याला 1-2-5 सिरीज असेही संबोधले जाते. म्हणजे प्रत्येक पुढचा क्रमांक हा एकदा 2 व एकदा 2.5 अशा अंकाने गुणून पुढील नंबर ठरतो.
1, 2, 5, 10
20, 50, 100
200, 500, 1000
असा नोटांचा किंवा चलनाचा क्रमांक असावा हा आंतरराष्ट्रीय मानक आहे.)
या गोष्टी एकदा लक्षात घेतल्या की, उपलब्ध असलेले आकार वापरून काम सुलभ करता येऊ शकते. त्यामुळे कारखान्यात साधनांच्या अभावी होणारा गोंधळही कमी करता येईल.
असे सूत्र स्वीकारल्यानंतरही आपणास अशा कॅटलॉग प्रकारापेक्षा वेगळे काही हाताशी असल्यास अधिक सोयीचे होईल असे वाटते आणि तिथेच (स्पेशल) टूलिंगचा उगम होतो.
येथे आपण अशा प्रकारच्या स्पेशल टूलिंगची गरज का निर्माण होते आणि त्याची उपयुक्तता याविषयी माहिती पाहणार आहोत. केवळ लेथसाठी लागणारी काही स्पेशल टूलिंगविषयी आपण जाणून घेऊ.
उदाहरण-1
अनेकदा असे दिसून येते की, टूल स्टेशन्सला काही मर्यादा आहेत. विशेषत: ज्याठिकाणी लिनिअर टूलिंग वापरले जाते, तेव्हा अनेकदा ही अडचण भासते. टूल संख्या मर्यादीत व काम पूर्ण करण्यास जास्त टूल्सची आवश्यकता अशी परिस्थिती निर्माण होते. अशावेळी एकाच ठिकाणी दोन टूल्स बसवून ही समस्या दूर करता येऊ शकते.
चित्र क्र.1 मध्ये असे दिसते की एकाच बारवर एका बाजूस टर्निंग इन्सर्ट लावली आहे व त्याच बारवर विरूद्ध दिशेला एक थ्रेडिंग इन्सर्ट लावली आहे. एकदा टर्निंग इन्सर्ट असलेली बाजू आपले काम करेल तर, नंतर स्पिंडल रोटेशन बदलून थ्रेडिंग इन्सर्ट काम करेल.
उदाहरण-2
चित्र. क्र 2 मध्ये वेळ वाचविणे या हेतूने स्पेशल टूलिंग तयार केले आहे. बोअरिंग टूल 20 H7 बोअर केल्यानंतर मागच्या इन्सर्टने 34 मिमी व्यासाचा फेस तयार होतो व त्याचवेळी आतील कोन (CHAMFER) वेगळ्या इन्सर्टने तयार होतो.
एका पासमध्ये सगळी कामे होत असल्याने वेळेची बचत होते व उत्पादन वाढल्याने प्रति पीसची किंमत कमी होते.
याच पद्धतीने या बोअर व फेससाठी 19.5 मिमी व्यासाचे रफिंग टूल हे चित्र क्र. 3 मध्ये दाखवले आहे.
उदाहरण - 3
बोअर झाल्यावर मागच्या बाजूचा फेस करण्यासाठी हे टूल वापरल्याने वेळेची बचत होते व अधिक चांगली काटकोन निर्मिती होते. (चित्र क्र. 4)
येथे सी.एन.सी. लेथच्या स्पिंडलमध्ये आर्बर धरून त्यावर वेगवेगळ्या दिशेने फिरणारे कटर लावले आहेत. तसेच फिक्श्चरवरती क्रँकशाफ्ट बसवून रफिंगचे काम अगदी सोप्या पद्धतीने कोणतेही महागडे मशिन न वापरता अगदी स्वस्तात केले आहे. (चित्र क्र. 5)
अशा पद्धतीने गरजेच्या वेळी आणि उत्पादनाची किंमत जर किफायतशीर ठेवायची असेल, तर अनेक स्पेशल टूल्स वापरता येतात. परंतु शक्य तेथे उपलब्ध टूल्स वापरावीत. उत्पादन वाढवायचे असल्यास स्पेशल टूल्स वापरावीत. हे सूत्र कायम मनात असणे गरजेचे आहे.
दत्ता घोलबा ‘मानस इंजिनिअरिंग’ कंपनीचे संस्थापक संचालक असून, 44 वर्षांपासून कटिंग टूल्स या विषयाशी निगडित कार्य करत आहेत.