फाय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने 1970 मध्ये स्थापन केलेली ’फाय फाऊंडेशन’ ही एक सेवाभावी संस्था आहे. फाय ग्रुपचे चेअरमन उद्योगमहर्षी पंडितराव कुलकर्णी यांनी अत्यंत यशस्वी उद्योग चालविताना, समाजाला सर्व थरांमध्ये पुढे नेणार्या घटकांचे योगदान सर्वांसमोर यावे, त्याचा सन्मान व्हावा व त्यापासून इतरांना अशीच उच्च दर्जाची कामगिरी करण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने ही संस्था स्थापन केली. प्रत्येक वर्षी नामांकित तज्ज्ञांकडून अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास करून, अशा बक्षिसपात्र संस्था शोधल्या जातात. या महान कार्यातील सातत्यामुळे फाय फाऊंडेशनचे पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. प्रत्येक इम्टेक्समध्ये प्रदर्शित झालेल्या मशिन टूल्स आणि ॲक्सेसरीज उत्पादनांमधून उत्तम तांत्रिक व नाविन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या कंपन्यांना फाय फाऊंडेशनतर्फे सन्मानित केले जाते. या उपक्रमामुळे तंत्रज्ञानात दूरगामी परिणाम करणारे सकारात्मक घटक व नाविन्यपूर्ण कल्पनांना उभारी मिळते. 2017 या वर्षी झालेल्या या इम्टेक्समध्ये मशिन टूल्स व ॲक्सेसरीज या उत्पादनांमधून फाय फाऊंडेशन पुरस्कार मिळवणाऱ्या दहा उत्पादनांपैकी काही उत्पादनांची माहिती देणारा हा लेख.
कॅडेम टेक्नॉलॉजी - लीनवर्क्स क्लाउड
कॅडेम टेक्नॉलॉजी या कंपनीने विकसित केलेली ’लीनवर्क्स क्लाउड’ ही मशिन ट्रॅकिंग प्रणाली आहे. 24 x 7 वेळ मशिनमधून माहिती जमा करणारी ही प्रणाली आहे. या प्रणालीमुळे मशिन बंद असण्याचा काळ अचूक मोजला जातो आणि शॉप फ्लोअरवर होणाऱ्या चुका तत्क्षणी निदर्शनास येतात. या क्लाउडमुळे संबंधित अधिकाऱ्याला जिथे असेल तिथे, उत्पादनाची सर्व माहिती स्मार्ट फोन/टॅबवर वेळच्यावेळी मिळते. वेळेत त्याविषयी कृती झाल्यास मशिन उपलब्धता वाढू शकते. हे ॲप्लिकेशन विशेषकरून कामाचे खूप व्यग्र वेळापत्रक असणाऱ्या लघु-मध्यम उद्योजकांसाठी तयार करण्यात आले आहे. यातून मिळणारी माहिती क्लाउड सर्व्हरवर जमा होत असल्याने, ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी यंत्रांच्या प्रणालीत कोणताही मोठा बदल करावा लागत नाही तसेच कंपनीमध्येही कुठलीही खर्चिक IT उपकरणे बसवावी लागत नाहीत.
इलेक्ट्रोन्युमॅटिक्स अँड हायड्रॉलिक्स लिमिटेड-भारतीय बनावटीचे सीएनसी पॅकेज
सीएनसी मशिन्सचा कंट्रोलर हा बाहेरील प्रगत देशांकडून आयात केला जातो. भारतात अशी यंत्रणा बनवणे हे कौशल्याचे आणि जिकिरीचे काम आहे. इलेक्ट्रोन्युमॅटिक्स अँड हायड्रॉलिक्स लिमिटेड या कंपनीने बऱ्याच संशोधनानंतर हे पॅकेज विकसित केले आहे. यामध्ये कंट्रोलर, मोटर्स, ड्राइव्हज वगैरे सर्व भाग संपूर्णतः भारतीय बनावटीचे आहेत. नवीनतम तंत्रज्ञान वापरून टच स्क्रीन, रिअल टाइम ग्रफिकस वापरल्याने सर्व यंत्रणा ऑपरेटरच्या दृष्टीने वापरण्यास सोपी आहे. लहान उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या सर्व लेथ, व्हर्टिकल मशिन सेंटर व इतर मेटल कटिंग मशिन टूल्ससाठी हे पॅकेज उपयुक्त आहे. यामुळे परकीय चलनाची बचत तर होतेच, त्याचबरोबर भारतातील उत्पादन असल्याने सर्व्हिस देखील उत्तम व तत्परतेने मिळते.
मॅकपॉवर- व्ही 855 ट्विन हेड- उत्पादन प्रक्रियेतील वेळ वाचविण्यासाठी ट्विन हेड सिस्टिम
सायकल टाईम कमी करणे, उत्पादकता वाढविणे, उत्पादनक्षमता आणि नफा वाढविणे ही सर्व उद्दिष्टे गाठण्यासाठी उपलब्ध झालेले मॅकपॉवरचे ट्विन हेड मशिन. एक स्पिंडल असलेल्या मशिनवर एकावेळी एकाच जॉबचे यंत्रण होत असते. मॅकपॉवर कंपनीने तयार केलेल्या व्ही 855 ट्विन हेड मशिनमधील दोन स्पिंडलच्या काँबिनेशनमुळे एक ऑपरेटर एकावेळी दोन जॉब मशिनिंग करू शकतो. त्यामुळे तेवढ्याच कालावधीमध्ये जवळपास दुप्पट उत्पादन होते. दोन स्पिंडल, जास्त कटिंग, अधिक नफा यामुळे इतर अनेक फायदे होतात. उदाहरणार्थ, कमी जागा व्यापणारे मशिन असल्याने जागेची बचत.
सुनिता इंजिनीअरिंग V-CAM मशिन
सुनिता इंजिनीअरिंग या सतत 3 वर्षे FIE चे बक्षीस मिळविणाऱ्या कंपनीकडून यंदा V-CAM हे क्रांतिकारी सीएनसी एनग्रेव्हिंग आणि मिलिंग मशिन सादर केले गेले. तुमच्याकडे स्मार्ट फोन असेल तर जगात कुठूनही हे मशिन नियंत्रित करता येण्याची सोय हे या यंत्राचे वैशिष्ट्य आहे. सीएनसी यंत्रे मोबाईल फोनद्वारा चालविता येणारी ही एकमेव यंत्रणा असावी. मशिन टूल्सच्या क्षेत्रातील हे एक क्रांतिकारक वळण आहे असे म्हणावे लागेल, यामुळे भविष्यातील यंत्रे अधिक प्रगत होतील. यात विशेष प्रकारचे टाइल आर्किटेक्चर वापरल्यामुळे सीएनसी मशिन नियंत्रण अजून सोपे होत आहे.
अच्युत मेढेकर यांना उत्पादन आणि दर्जा नियंत्रण या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे.