अचूकतेचा ध्यास बेकर गेजेस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    01-Jul-2017   
Total Views |
 
Concerned neo-hippies and their global warming, i'll tell ya
 
सामान्य वर्कशॉपमध्ये दिसणारी डायल गेजेस, कॅलिपर्स, मायक्रोमीटर, ही मोजमाप साधने बनविणारी बेकर ही आपल्या देशातील एकमेव कंपनी आहे. स्वतः संशोधन करून आणि आवश्यक तेथे परदेशी सहकार्य वापरून, नवनवीन उत्पादने बाजारात आणणे येथे सतत चालू असते. इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने मोजणी करणारा LVDT प्रोब आणि त्याचा अँप्लिफायर हे त्याच पद्धतीने निर्माण झालेले उत्पादन आहे. सध्या ग्राहकाच्या गरजेनुसार त्या त्या यंत्रभागावर एकावेळी अनेक मोजमापे घेऊन ती संगणकाकडे पाठविणारी, एकोपयोगी मोजयंत्रे तयार करणे, हे बेकरचे नवे आधुनिक युगातले उत्पादन आहे. धातुकामच्या मोजमाप विशेषांकासाठी विशेष प्रयत्न करून आम्ही बाकिर बेकर यांची मुलाखत घेतली आहे. ती त्यांच्याच शब्दात वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
 
Production of electronic gauges
 
1962 मध्ये, खरेदी-विक्री व्यवसायात असलेल्या माझ्या वडिलांनी भारतात अभियांत्रिकी उत्पादन सुरू करण्याचा विचार केला आणि इंग्लंडमधील ’हॉर्स्टमन गेज अँड मेट्रॉलॉजी’ कंपनीच्या साहाय्याने ’हॉर्स्टमन इंडिया प्रायव्हेट’ (HIP) ही कंपनी स्थापन करून भारतात प्लेन आणि थ्रेड गेजचे उत्पादन सुरू केले. असे उत्पादन करणारी आमची पहिलीच भारतीय कंपनी होती, हे आम्हाला कंपनी सुरू केल्यानंतर समजले. या क्षेत्रात 10 वर्षे काम केल्यानंतर आमचा आत्मविेशास वाढला आणि 1972 मध्ये आम्ही इंग्लंडच्याच ’थॉमस मर्सर’ कंपनीबरोबर डायल, एअर आणि इलेक्ट्रॉनिक गेजेसचे उत्पादन सुरू केले. भारतात ही प्रणाली प्रथम आणण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. बाजारात प्रथम आणि एकमेव असल्याचा अभिमान आणि अचूक उत्पादन बनविण्याची आमची हातोटी आम्हाला सतत नवीन उत्पादने तयार करण्यासाठी उद्युक्त करत राहिली.
 
अहर्निश प्रयत्न करून आम्ही प्लेन प्लग गेजेस आणि थ्रेड गेजेस यांचे उत्पादन सुरू केले. तेव्हा आमच्याकडे 3-4 यंत्रे होती, त्यापैकी 1-2 स्वदेशी बनावटीचे लेथ आणि आयात केलेली ग्राईंडिंग मशिन्स होती. थ्रेड गेजेसची बाजारपेठ त्या काळी तशी लहान होती आणि सर्व गेजेस आयात केले जात असत. त्यामुळे आमची कंपनी सुरू झाल्यावर त्या काळी असलेल्या आयातीवरील सरकारी निर्बंधांचा एक प्रकारे आम्हाला फायदा झाला. आम्हाला बाजारपेठ मिळाली आणि बऱ्यापैकी व्यावसायिक उलाढाल करता आली. त्याकाळी भारतात धातूवर काम करण्याचे प्रमाण अगदीच कमी होते आणि त्यामुळे गेजेसची गरजही तशी कमीच होती. तरी आमचे उत्पादन वर्षाला काही हजारांत होते.

Testing lab at Baker Company 
 
जेव्हा आम्ही मेट्रॉलॉजीच्या क्षेत्रात इतर उत्पादने करण्याविषयी विचार करू लागलो तेव्हा गो/नो-गो गेजेससारख्या पास/नापास अशी माहिती देणाऱ्या उपकरणांपेक्षा प्रत्यक्ष मोजमापन करणाऱ्या उत्पादनांकडे वळण्याचा आम्ही विचार केला. ’थॉमस मर्सर’ या डायल गेज उत्पादनातील नामवंत इंग्लिश कंपनीबरोबर आम्ही डायल गेजेसचे उत्पादन सुरू केले. डायल गेजेसनंतर आम्ही एअर गेजेस आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक गेजेसचे उत्पादन आणि विक्री सुरू केली. अशा पद्धतीने यांत्रिक, हवेच्या दाबावर चालणारे आणि इलेक्ट्रॉनिक अशा सर्व प्रकारच्या उपकरणांचे उत्पादन भारतात सुरू झाले. सुरुवातीला आमच्याकडे मदत करण्यासाठी ’मर्सर’चे 1-2 अभियंते होते. आम्ही डायल गेजेसपासून सुरवात केली. साधारणपणे 10 ते 12 महिन्यानंतर आमचा पहिला डायल गेज तयार झाला. त्यानंतर आम्ही आमच्या कारखान्यात नवीन सुधारणा करण्यासाठी आणि नवीन रचना, विकास यासाठी काही जर्मन आणि स्विस कंपन्यांबरोबर तांत्रिक सहकार्य केले.
 
प्राथमिक गेजेसच्या उत्पादनावर प्रभुत्व मिळवत असतानाच आम्ही बाजारातील गरज लक्षात घेऊन विविध प्रकारची मोजमापन उपकरणे तयार करायला सुरुवात केली. त्यातील अपेक्षित अचूकता आणि उत्पादनातील काटेकोरपणा मिळवण्यासाठी आम्ही आमचा कारखाना अद्ययावत केला. आज आमच्याकडे स्पेशल सी.एन.सी. मशिनबरोबरच स्पेशल पर्पज मशिन्सही आहेत. त्यात एस.एम.एस.चे सी.एन.सी. थ्रेड ग्राईंडिंग मशिन, मोरी सिकीचे सी.एन.सी.टर्न मिल, वालीचे सी.एन.सी. गिअर हॉबिंग मशिनसारखी अत्याधुनिक यंत्रे आहेत. गेजचे दीर्घायुष्य आणि अपेक्षित दर्जाचा पृष्ठभाग मिळविण्यासाठी आवश्यक असलेली सरफेस ट्रिटमेंट तर आहेच, पण मुळातूनच त्याची गुणवत्ता वाढविणारा हीट ट्रिटमेंट प्लांटही आहे.

acme and sub acme thread gaje 
 
 
उपकरणांमधील विविधता
 
अभियांत्रिकी उत्पादनांच्या मोजमापनासाठी सर्व काही उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांमधून आज आम्ही मेकॅनिकल, डिजिटल; प्लंजर/लिव्हर असलेले डायल गेजेस, डेप्थ गेज, बोअर गेजसारखी सर्वोपयोगी उपकरणे तर बनवतोच, पण त्याचबरोबर टायर ट्रेड डेप्थ गेज, बॉलचा व्यास तपासणाऱ्या गेजसारखे विशिष्ट कामाला उपयोगी पडणारे गेजही तयार करतो. आमच्या विविध प्रकारच्या थ्रेड गेजेसमध्ये आम्ही मेट्रिक, युनिफाइड, जी श्रेणी, ॲक्मे, बट्रेस, ट्रॅपिझॉयडल, वन स्टार्ट, मल्टी स्टार्ट यांसारख्या अनेक प्रकारच्या थ्रेडसाठी गेजेस बनवतो.
 
थ्रेड गेजेस, प्लग गेजेसबरोबरच व्हर्नियर कॅलिपर, काही मिमी आकाराच्या जॉबपासून 1.1 मीटर अंतर्गत व्यास मोजणाऱ्या क्षमतेचे मायक्रोमीटर ही उपकरणेसुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. यांत्रिकी गेजेसबरोबरच आम्ही हवेच्या दाबावर चालणारी गेजेस तसेच इलेक्ट्रॉनिक गेजेसही बाजारात आणली आहेत.
 
साधारण 15 वर्षांपूर्वी, विविध उपकरणानंतर आम्ही LVDT प्रोब्ज हे नवीन उत्पादन सुरू केले. हे आमच्यापुढे फार मोठे आव्हान होते, कारण हे डायल गेजच्या तुलनेत अतिशय वरच्या दर्जाची अचूकता मोजणारे उपकरण होते. त्यासाठी आम्हाला यंत्रसामुग्री आणि कारखान्यात मोठी गुंतवणूक करावी लागली. यात क्लँपिंगच्या अगदी जवळपर्यंत टर्निंग करू शकणाऱ्या स्लाईडिंग हेड ऑटोमॅटसारख्या मशिनचा समावेश होता. आम्ही या प्रकारचे प्रोबचे भाग आयात करत असल्यामुळे आम्हाला त्यांची जोडणी, कॅलिब्रेशन याची माहिती झाली होती आणि भाग दुरुस्त करता येत होते. त्यामुळे त्या भागांचे उत्पादन करण्यासाठी लागणारा आत्मविेशास आमच्याकडे होता. त्यामुळे आम्ही यातील भागांच्या आरेखनाचे (drawing) काम सुरू केले. अनेक चुकांमधून शिकत शिकत शेवटी ते करण्यात आम्हाला यश मिळाले आणि ही गोष्ट आम्हाला मोठे समाधान देऊन गेली. हे मोठे आव्हानात्मक काम होते त्यासाठी लागणारा अँप्लिफायरसुद्धा आम्ही आमच्या कारखान्यातच बनवला. सध्या आम्ही अ‍ॅनालॉग प्रोब्ज बनवतो. हे प्रोब्ज संपूर्णपणे आमचेच असतात आणि ते निर्यातही केले जातात. (आम्ही जपानला प्रोब निर्यात करू शकतो, ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.) आता आम्ही प्रोब्जच्या बाजारपेठेचा एक हिस्सा मिळवण्यात यशस्वी झालो आहोत. आम्ही केवळ मोजमाप यंत्र आणि लिमिट गेजेसच नाही, तर पूर्ण अथवा अर्ध स्वयंचलित गेजिंग मशिन्ससुद्धा बनवितो. ग्राहकाने त्याच्या भागाचे ड्रॉईंग आणि एक नमुना भाग दिला, तर त्यासाठी लागणाऱ्या गेजिंग मशिनची कल्पना, आरेखन, उत्पादन, जोडणी, तपासणी आणि मशिनची चाचणी घेऊन शेवटी ते मशिन ग्राहकाकडे गेल्यावर ग्राहकाच्या प्रॉडक्शन लाईनमध्ये त्याचा अंतर्भाव केला जातो. अशाप्रकारे ग्राहकाला अपेक्षित ती अचूकतेची पातळी मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
 
lvdt probes and electronic gadgets
 
 
आमच्या दीर्घ अनुभवाचा फायदा उद्योजकांना उपलब्ध करून देण्यासाठी, आमच्या कारखान्यातील दोन्ही विभागामध्ये कॅलिब्रेशन करण्याची अद्ययावत सुविधा तयार केली आहे. NABLच्या ISO/IEC 17025 प्रमाणे प्रमाणित असलेल्या या प्रयोगशाळांमध्ये IBB लेसर ट्विनचेक, कार्ल झेसचा हॉरिझाँटल मायक्रोस्कोप, टॅलीसर्फचा सरफेस ॲनालायझर यासारखी अत्याधुनिक उपकरणे आहेत. या उपकरणांची अचूकता वेळोवेळी आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय मानक संस्थेकडून तपासली जाते.

Multi-gauging and sawing system 
 
उत्पादन निर्मितीमधील आव्हाने
 
सध्या आम्ही दरमहा सुमारे 30,000 थ्रेड गेजेस बनवतो आणि त्यांची अचूकता 1 मायक्रॉन आणि 1.5 मायक्रॉन इतकी असते.सुरुवातीपासूनच आम्हाला परदेशातील उत्पादकांशी खूपच स्पर्धा करावी लागली. आम्ही सुरुवात केली तेव्हा प्रामुख्याने स्वित्झर्लंड आणि इंग्लंडमध्ये आमचे मोठे स्पर्धक होते. सध्या थ्रेड गेजेसची फारशी आयात केली जात नाही. आम्ही थ्रेड गेजेसमध्ये मागील 55 वर्षांपासून आहोत, मात्र थ्रेड गेजेस बनविणारे इतरही उत्पादक भारतात आहेत. मोजमाप यंत्राच्या बाजारपेठेत माझ्या मते, आमचा 20% वाटा आहे. पूर्वी जपानमधून आणि आता चीनमधून मोठ्या प्रमाणावर मोजमाप उपकरणांची आयात केली जात आहे. दर्जेदार उत्पादनांचा विचार केला, तर आमची स्पर्धा जपानमध्ये बनविलेल्या उत्पादनांशी आहे. पूर्वी आमच्याशी स्पर्धा करणारे भारतीय उत्पादक नव्हते, पण आता बऱ्याच स्थानिक उत्पादकांशी स्पर्धा करावी लागते. जपान, जर्मनी आणि अमेरिकेच्या उत्पादनांचा दर्जा गाठण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या दर्जाशी स्पर्धा करणे आणि त्यामध्ये यशस्वी होणे हेच आमचे ध्येय आहे, पण त्यासाठी आम्हाला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.
 
आमच्या संशोधन आणि विकास विभागाने विकसित केलेली अनेक उत्पादने आम्ही बाजारपेठेत आणली आहेत. ’थॉमस मर्सर लिमिटेड’ बरोबर काम करताना आम्ही शिकलेल्या गोष्टी आणि मागील अनेक वर्षांचा आमचा अनुभव आम्हाला नवीन डायल गेजेस विकसित करताना फार उपयोगी पडतो.

While working on the jig boring machine 
 
पुढची दिशा
 
आम्ही दरवर्षी 1,00,000 डायल गेजेसच्या उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मायक्रोमीटर आणि कॅलिपरच्याबाबत सांगायचे झाले, तर आमची क्षमता बरीच असली तरी आम्ही टप्प्याटप्प्याने पावले उचलत आहोत. सध्या आम्ही दरवर्षी सुमारे 25,000 मायक्रोमीटर आणि 22,000 कॅलिपर बनवतो. आमची उत्पादन क्षमता याहीपेक्षा अधिक आहे. गेजिंग मशिनचे उत्पादन सुरू केल्यामुळे यापुढे आमची वाढ झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मशिनमधली आव्हाने गेजिंग उपकरणांच्या मानाने बरीच वेगळी असणार आहेत. गेजिंग मशिन्समध्ये मोठ्या प्रमाणात डिझाईन आणि डेव्हलपमेंटचे काम करावे लागते. आमचा एक संपूर्ण विभाग फक्त कल्पना, रचना आणि विकास यावर काम करत आहे.
 
आम्ही मेजरिंग आणि गेजिंग उपकरणांची कंपनी सुरू केली तेव्हा आमच्यापुढे त्यावेळी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देऊन भारतीय बनावटीचा ब्रँड प्रस्थापित करण्याचे आव्हान होते. आता 55 वर्षांनंतर चीनसारख्या देशांना टक्कर देण्याचे आमच्यापुढे आव्हान आहे. प्रतिस्पर्धी बदलले पण परदेशी उत्पादनांशी टक्कर देणे चालूच आहे.
 
बाकीर बेकर हे बेकर गेजेस इंडिया प्रा. लि. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. आज वेगवेगळ्या प्रकारच्या गेजेस आणि इन्स्ट्रुमेंट्स उत्पादनात ही कंपनी गेजेस आणि अचूक मोजमाप उपकरणांचे उत्पादन करणारी अग्रगण्य भारतीय कंपनी आहे.
@@AUTHORINFO_V1@@