आपल्या डोळ्यांना न दिसणारे अतिसूक्ष्म व्यत्यय पाहण्यासाठी कुठल्यातरी अप्रत्यक्ष पद्धतीचा वापर करावा लागतो. ही पद्धत म्हणजे सूक्ष्मदर्शक. सूक्ष्मदर्शकामधून एकाच व्यक्तीला एका वेळी पाहता येते, मात्र प्रोफाईल प्रोजेक्टरच्या माध्यमातून एकावेळी सर्वांना समान अशी प्रतिमा/सावली दिसते आणि तिच्या बाह्यरेखेचे मापन करता येते.
’प्रोफाईल प्रोजेक्टर’ हा शब्द कधी कधी अजून एका प्रकारच्या यंत्रासाठी वापरला जातो. त्याला ’ऑप्टिकल कम्पॅरेटर’ म्हणतात. ’प्रोफाईल प्रोजेक्टर’ला ’शॅडोग्राफ’ असे देखील म्हटले जाते. ’शॅडो’ म्हणजे साध्या शब्दात सांगायचे झाले तर ’सावली’. हे यंत्र औद्योगिक उत्पादने तपासण्यासाठी वापरले जाते.
’प्रोफाईल प्रोजेक्टर’मध्ये प्रकाश आणि सावली या अगदी साध्या, मूलभूत वैज्ञानिक संकल्पनांचा वापर केलेला असतो. काही विशिष्ट प्रकारच्या दिव्याखाली (उदाहरणार्थ, घरगुती वापरातील पिवळा दिवा - incandescent lamp) आपण हात धरला, तर आपल्या हाताची सावली पडते. दिवा आणि जिथे सावली पडते तो पृष्ठभाग यामधील अंतर, पडलेली सावली किती कोरीव (शार्प) आहे हे ठरवते. कुठल्याही प्रकारचा जॉब, ज्याचे आकारमान/मिती (dimensions) तपासायच्या आहेत तो या यंत्रामार्फत सहज तपासता येतो.
उजेड पाडण्यासाठी दिवा (projection lamp) इथेही असतोच आणि सावली पाडण्यासाठी एक पृष्ठभाग म्हणून दुधी काच (glass screen) असते. फक्त एक छोटासा फरक इथे केलेला असतो, की दिवा आणि सावली जिथे पडणार आहे तो पृष्ठभाग याच्यामधील काही विशिष्ट अंतरात एक काचेचे भिंग (projection lens) बसवलेले असते. त्यानंतर दिवा आणि भिंग यांच्यामध्ये विशिष्ट अंतरावर जॉब ठेवायचा असतो. दिवा चालू करून भिंग आणि जॉब यांची अंतरे जुळवून घेतली की, त्या जॉबच्या सावलीची प्रतिमा काचेवर पडते. भिंगामुळे ही सावली प्रत्यक्ष जॉबपेक्षा अर्थातच मोठी दिसते.
ही मांडणी कशी असेल याची कल्पना येण्यासाठी आकृती क्र. 1 पाहू.
सर्वसाधारणपणे दिवा हा ’हॅलोजन’ प्रकारातला असतो. जवळ जवळ सूर्यप्रकाशाएवढा परंतु पिवळसर असा अतिशय तीव्र प्रकाश हा दिवा बाहेर फेकत असतो. प्रकाशाच्या काही विशिष्ट तरंगलांबी (wavelength) सोडल्यास इतर सर्व रंगछटा या दिव्यातून बाहेर पडतात. या वैशिष्ट्यपूर्ण दिव्याच्या प्रकाशाच्या, या विशिष्ट गुणधर्मामुळे जॉबची अतिशय कोरीव (शार्प) अशी सावली दुधी काचेवर पडते.
आता जॉबची तपासणी कशी करतात ते पाहू. जॉब ठेवण्यासाठी X आणि Y दिशेत स्क्रूचा वापर करून पुढे-मागे होणारी एक छोटीशी रचना इथे केलेली असते. सर्वसाधारणपणे, जॉब तपासण्यासाठी तीन प्रकारची मापने वापरली जातात, सरळ रेषेतील (लिनिअर), वक्र (सर्क्युलर) आणि कोनीय (अँग्युलर). काचेच्या पृष्ठभागावर पडणारी सावली बघत बघत, X आणि Y स्क्रू फिरवून आपल्याला हव्या त्या जागी जॉबची सावली आणली जाते. शक्यतो ही जागा म्हणजे काचेच्या पृष्ठभागावर एकमेकांना बरोबर मध्यभागी आणि अचूक काटकोनात छेदणाऱ्या दोन रेषा असतात. त्या रेषांचा छेदबिंदू हा शून्य बिंदू (रेफ्रन्स पॉईंट) कल्पून जॉबचा जो भाग मोजायचा आहे तो तिथे आणून ठेवतात. ती जागा एकदा कायम केली की X आणि Y रचनेला जोडलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये (डि.आर.ओ. - डिजिटल रीड आऊट) किंवा स्क्रूला जोडलेल्या रेषा/आकड्यांच्या गोल चकतीवर शून्य करून घेतात. मोजमापाच्या दुसऱ्या बिंदूपर्यंत जाण्यासाठी X आणि Y स्क्रूचा वापर करून जॉब पुढे-मागे केला जातो. भिंगामुळे जॉब मोठा दिसत असल्याने मोजमाप घेताना जास्तीत जास्त अचूकता आणता येते.
प्रोफाईल प्रोजेक्टर या यंत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा जॉब तपासता येतो. केवळ धातूचा नव्हे तर अगदी प्लास्टिक, रबर किंवा कागदसुद्धा यात तपासता येतो. भिंग हा या यंत्राचा आत्मा आहे. स्क्रीनचा आकार आणि भिंग या दोन मुख्य घटकांवर प्रोफाईल प्रोजेक्टरची किंमत ठरते.
कोनीय मोजमापे घेणे
डि.आर.ओ. एकक न वापरता कोनीय मोजमापे कशी घ्यावीत, हे आता पाहू या. आपली मानक प्रणाली कोनीय मोजमापांच्यासाठी सर्वांत कमी माप 1’ व्हर्निअर देते. पडदा 3600 तून फिरतो. त्यावर परिघापर्यंत 10 मोजणाऱ्या अंशांच्या खुणा असतात. तसेच काचेवर काटकोनात खुणा असतात. पडद्यावर उजव्या कोपऱ्यात नॉब असतो. संपूर्ण स्क्रीनची काच फिरवण्यासाठी नॉबचा उपयोग केला जातो.
आकृती क्र. 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे 'V' नॉचच्या तळाशी असलेला कोन अंशात मोजण्यासाठीचे एक उदाहरण बघूया.
1. पडद्याच्या अंशाचे स्केल शून्यला सेट झालेले आहे, याची खात्री करा. तसे सेट झालेले नसेल तर, नॉबच्या मदतीने पडदा फिरवा
2. जॉब अशा प्रकारे ठेवा की 'V' चा तळ बरोबर काटकोनातील रेषांच्या मध्यबिंदूशी जुळेल. तसेच 'V'च्या तळाची एक रेषा पडद्याच्या उभ्या किंवा आडव्या रेषेशी जुळेल अशी ठेवा. या उदाहरणासाठी आपण मतफ नॉचची उजवी बाजू पडद्याच्या उभ्या रेषेशी जुळवली आहे आणि त्याच वेळी मतफ चा तळ काटकोनातील रेषांच्या मध्यबिंदूशी जुळवला आहे.
3. मूलभूत काटकोन रेषा सेट केल्यानंतर तीच उभी रेष 'V' च्या दुसऱ्या बाजूशी जुळेपर्यंत पडदा डावीकडे फिरवा. (आकृती 3) ही व्हर्निअर प्रमापी आपल्याला कमीत कमी माप 1' देते, त्यामुळे प्रत्येक रेष 1' दाखवते. व्हर्निअर स्केलवरील कोणती रेषा पडद्यावरच्या मुख्य अंशाच्या स्केलला स्पर्श करत आहे, ते काळजीपूर्वक पहा. या उदाहरणात आपण म्हणू शकतो की 34' दाखवणारी रेषा मुख्य अंशाच्या स्केलला स्पर्श करते आहे. तसेच, आपण 620 पूर्ण केले आहेत, याचेही निरीक्षण करा. अशा प्रकारे, या कृतीतून आपल्याला एकत्रित माप 62034' असे मिळाले आहे. त्यामुळे 'V'च्या दोन बाजूंमधील कोन 62034' आहे.
उपेंद्र गाडगीळ ओपेल इंडिया या कंपनीचे भागीदार आहेत.