सॉफ्ट जॉ बोअरिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    30-Jul-2017   
Total Views |
प्रत्यक्ष कार्य आणि त्यामागील शास्त्रीय बैठक
कामगाराने चालविण्याचा लेथ, एनसी, सी.एन.सी. आणि मल्टिटास्किंग मशिन वापरून केलेल्या टर्निंगमध्ये कार्यवस्तूला चकच्या कठीण (हार्ड) जॉमध्ये पकडून पहिल्या बाजूचे टर्निंग केले जाते. टर्निंग केलेली कार्यवस्तूची बाजू सॉफ्ट जॉमध्ये पकडून दुसऱ्या बाजूचे टर्निंग केले जाते.
एखादी कार्यवस्तू कठीण जॉमध्ये पकडूनही सर्व काम करता येते पण अशावेळी कठीण जॉमध्ये पकडल्याचे व्रण/घट्टे तयार यंत्रभागावर येणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असते. कामगाराने हाताने चालवण्याचा लेथ (मॅन्युअल लेथ), एनसी, सी.एन.सी. आणि मल्टिटास्किंग मशिन यांच्यावर दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी कार्यवस्तू सॉफ्ट जॉमध्ये पकडण्यामागे खालील उद्देश असतात.
 
1. कार्यवस्तूवरील योग्य पकड
2. आखूड लांबीच्या अथवा कमी जाडी असलेल्या (थिन वॉल) कार्यवस्तूची पकड
3. कार्यवस्तू वारंवार अचूकतेने पकडण्याची गरज
4. पहिल्या टप्प्यात यंत्रण केलेले भाग ट्रू लावण्याची गरज
वरील सर्व उद्देश पूर्ण करण्यासाठी चकच्या क्लॅम्पिंगच्या बारीक-सारीक घटकांकडे लक्ष देणे आवश्यक असते. उदाहरणार्थ,
 
1. चकच्या बेस जॉची त्याच्या गाईडमधील हालचाल
बेस जॉ आणि त्याचा चकच्या बॉडीमधील बेस जॉ गाईड यांच्यामध्ये नेहमीच किंचित क्लिअरन्स असल्याने थोडी स्वैर हालचाल असते. आपल्या परिभाषेत H7/h6 फिट म्हणजे गाईड आणि बेस जॉ यांच्यामध्ये साधारणतः 20/30 μ इतका क्लिअरन्स असतो. सामान्य स्थितीमध्ये हे अभियंत्याच्या किंवा ऑपरेटरच्या ध्यानात येत नाही. परंतु याचा परिणाम यंत्रभाग पकडण्यावर दिसून येतो. हा क्लिअरन्स नव्या कोऱ्या चकमध्येसुद्धा असतो आणि चकचा जसजसा वापर होईल तसतसा तो वाढत जातो. सॉफ्ट जॉ बोअरिंग प्रक्रियेतून या समस्येवर उत्तर मिळते.
 
2. सॉफ्ट जॉ बोअरिंगचे माप आणि यंत्रण केलेली कार्यवस्तू यांच्यातील संबंध
उत्तम आणि दीर्घकाळ परिणाम मिळण्यासाठी जॉचे बोअरिंग किती करायचे ते अतिशय महत्त्वाचे असते. प्रत्येक धातूमध्ये थोडी लवचिकता (इलॅस्टिसिटी) आणि दाब सहन करण्याची क्षमता असते, हे सर्वश्रुत आहे. कमी जाडीची (थिन वॉल) कार्यवस्तू पकडण्याच्या बलामुळे दाबली जाते. क्लॅम्पची पकड सुटल्यानंतरही कार्यवस्तूचा अंतिम व्यास योग्य असला पाहिजे, यासाठी आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक असते.
 
जॉचा स्पिंडलकडील भाग हा त्याचा आतला भाग आणि त्याच्या विरुद्ध दिशेचा भाग म्हणजे बाहेरचा/तोंडाचा भाग असे आपण म्हणू या. सर्वसाधारणपणे जॉच्या तोंडाचा व्यास कार्यवस्तू पकडण्याच्या व्यासापेक्षा 0.2/0.3 मिमी. कमी ठेवला जातो. असे केल्याने जॉचे आयुष्य भरपूर वाढते. जॉचा आतला व्यास कार्यवस्तूच्या व्यासापेक्षा 0.1/0.15 मिमी. इतका अधिक ठेवला जातो. जॉचा व्यास बाहेरच्या भागातून आतल्या भागाकडे जाताना किंचित वाढत जातो. याने चक बेस जॉ गाईड स्लॉट आणि बेस जॉ यांच्यातील क्लिअरन्सची भरपाई केली जाते. (चक बराच काळ वापरल्यानंतर हे अंतर वाढते आणि काही मर्यादेनंतर त्यात पुनः वेल्डिंगने धातू भरून व कर्तन करून त्याची पुनर्रचना करावी लागते.)
 
थोडक्यात म्हणजे जॉचा आकार कार्यवस्तूपेक्षा 0.1/0.15 मिमी. इतका लहान ठेवल्याने व तो निमुळता केल्याने जॉचे आयुष्य पुष्कळ वाढते आणि कमीत कमी रन आऊट असलेले यंत्रभाग बनवण्यात मदत होते. कमी दाबात कार्यवस्तूचा जास्तीत-जास्त पृष्ठभाग दृढपणे पकडला गेल्याने हे शक्य होते.
वर सांगितल्यानुसार काम केल्यास आपण अगदी 2 मिमी. इतक्या कमी जाडीच्या (वॉशरसारख्या) यंत्रभागांच्या यंत्रणासाठी हे
जॉ वापरू शकतो.
 
 
कार्यवस्तूच्या व्यासापेक्षा जॉचे बोअर 0.1 मिमी. इतके कमी आणि बोअरचा निमुळतेपणा 20 मिमी. लांबीमध्ये 0.1/0.15 मिमी. असा ठेवला असता, कोणतीही कार्यवस्तू यंत्रणादरम्यान चकमधून निसटून बाहेर उडणार नाही.
यंत्रचित्र उदाहरण (चित्र क्र. 1)
कार्यवस्तू - Ø 48.0 मिमी.
पकडण्याची लांबी - 29.5 मिमी.
जॉ बोअरची मापे - बाहेरच्या तोंडावर -
Ø 47.90 / Ø 47.80 मिमी.
आतल्या तोंडावर(29.5 मिमी. खोलीवर) -
Ø 48.10 /Ø 48.20 मिमी.

fghfghgh_1  H x 
 
 
क्लॅम्पिंग करताना दिसणारा परिणाम
हे काम मॅन्युअल लेथमध्ये करताना कंपाऊंड स्लाईडवर डायल गेज बसवून करता येते. जॉचे पुढचे तोंड Ø 48 मिमीवर कार्यवस्तू पकडते. बेस जॉ आणि बेस जॉ गाईड यांच्यातील क्लिअरन्समुळे आणि पकडबलाद्वारे जॉ गाईडमध्ये होणाऱ्या जॉच्या हालचालीमुळे, जॉ खाली खेचले जातात. त्यामुळे Ø 48.1 मिमीचे बोअर चकच्या केंद्राकडे खेचले जाते तर जॉचा बाहेरचा भाग चकच्या केंद्र रेषेपासून बाहेर उघडतो आणि कार्यवस्तू पकडली जाते. त्याचवेळी कार्यवस्तू जॉच्या फेसवर कडी स्वरूपात टेकते. या स्थितीमध्ये चकच्या क्लॅम्पिंग सिलिंडरचा कमी दाब वापरूनही कार्यवस्तू दृढपणे पकडली जाते.
जॉचा बाहेरील व्यास थोडा कमी ठेवला असल्याने काही हजार यंत्रभागांचे यंत्रण केल्यानंतरही तो Ø 48.1 मिमी (यंत्रभागाच्या मूळ Ø 48 मिमीपेक्षा अधिक) होणार नाही.
सॉफ्ट जॉ बोअर करताना केलेली ही लहानशी कृती रनआऊट नियंत्रित करते, उत्तम पकड देते आणि कार्यवस्तूचा जवळजवळ 100% पृष्ठभाग पकडते.
 
 
वॉशरसारख्या कमी जाडीच्या यंत्रभागांसाठी
फेस अंडरकट आणि 80 फेस रिलिफ असलेला Ø 24.9 x 2.5 खोल बोअरिंग केलेला जॉ वापरून यंत्रण केलेला Ø 25x3xh14 बोअर वॉशर (चित्र क्र. 2)
यामुळे जॉ सेट आणि यंत्रभाग यांची सर्वोत्तम कामगिरी मिळते.
fghfghghdfxb_1
 
 
प्रदीप खरे ’फाय फाऊंडेशन’ पुरस्काराचे विजेते आहेत. त्यांना औद्योगिक क्षेत्रातील 50 वर्षांचा अनुभव आहे.
नवीन माहिती, अनुभव, ज्ञान, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.
या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते.
@@AUTHORINFO_V1@@