एखाद्या भागाचे एकापेक्षा जास्त पॅरामीटर्स तपासणारे गेजिंग तंत्र म्हणजे ’मल्टी गेजिंग सोल्युशन्स’हे त्या शब्दांवरूनच लक्षात येते. कारखान्यात तयार होणारे उत्पादन योग्य दर्जाचे बनले आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक असते. हे तपासण्यासाठी योग्य ते साधन असणेही गरजेचे असते. कमीत कमी वेळात अचूक तपासणी होण्यासाठी खालील निकषांपैकी जर एक किंवा जास्त निकष लागू होत असतील तर मल्टी गेजिंग या पर्यायाची निवड केली जाते.
मल्टी गेजिंग निकष
• मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन
• महत्त्वाचे सर्व पॅरामीटर्स तपासण्यासाठी लागणारा जास्त वेळ
• अति महत्त्वाचे (क्रिटिकल) उत्पादन
• महत्त्वाचे सर्व पॅरामीटर्स तपासण्यासाठी एकापेक्षा जास्त गेजेसची गरज
• तपासणीसाठी लागणारे जास्त मनुष्यबळ
• भागाची ट्रेसेबिलिटी आवश्यक
• मोजमापानंतर स्वीकृत (OK)/ अस्वीकृत (NOT OK)/ग्रेडिंग/ सिलेक्टिव्ह ॲसेम्ब्ली व्यवस्थितपणे वेगळे करण्याची गरज
• पूर्ण खात्रीसाठी मार्किंग करणे आवश्यक
• ट्रेसेबिलिटीसाठी स्कॅनिंग भागाला 2D मार्क
• महत्त्वाचे भाग तपासण्यासाठी CMM ची आवश्यकता असेल आणि त्याला लागणारा वेळ तसेच त्याची उपलब्धता यांचा अभाव
• अंतिम ग्राहकाला योग्य माहितीसह (डेटा) सतत स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोल (SPC) आवश्यक.
वर दिल्याप्रमाणे परिस्थिती असेल तर मल्टी गेजिंगचा वापर केला जातो.
आदर्श प्रक्रिया
हे गेजिंग युनिट प्रत्येक गरजेचा विचार करून (टेलर मेड) दिले जाते. त्यामुळे आपली नेमकी गरज व्यवस्थित समजून घेणारा आणि ऐकण्याची तयारी असलेला भागीदार/सहयोगी शोधणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठीची आदर्श प्रक्रिया साधारणपणे खालीलप्रमाणे असावी.
• भागाचे चित्र (ड्रॉईंग) गेज उत्पादकाला देणे.
• मल्टी गेजिंगमध्ये ज्या पॅरामीटर्सचा समावेश करण्याची गरज आहे त्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण करणे,
1. अत्यावश्यक पॅरामीटर्स
2. इतर ऐच्छिक पॅरामीटर्स
• जे शक्य असतील आणि किफायतशीर असतील तर समाविष्ट करण्यात येतील.
• उत्पादनाच्या प्रक्रियेची चर्चा करणे.
• उत्पादनाच्या कोणत्या टप्प्यात गेज वापरले जाईल ते ठरविणे.
• गेजकडून असलेल्या महत्त्वाच्या अपेक्षा
जेव्हा भांडवली गुंतवणूक करून आपण एखादे उपकरण घेतो तेव्हा, आपल्याला त्यात सगळ्या अपेक्षित गोष्टी किंवा वैशिष्ट्ये हवी असतात. समाविष्ट केलेल्या प्रत्येक वैशिष्ट्याबरोबर किंमत सुद्धा वाढत जाते, हे आपल्याला माहीत आहेच. जेव्हा उपकरण हातात येते तेव्हा जर मुख्य गरजा त्यातून पूर्ण होत नसतील आणि काही वैशिष्ट्ये त्यात समाविष्ट नसतील तर ग्राहक असमाधानी असतो.
• उत्पादन तपासणीसाठी सध्या लागणारा वेळ? भविष्यात किती वेळात ते काम होणे अपेक्षित आहे? याचा ताळेबंद
• संकल्पनेचे ड्रॉइंग मिळविणे.
• गेज उत्पादकाबरोबर तांत्रिक बाबींवर काम करणे.
• आवश्यक असलेले पॅरामीटर्स तपासण्याच्या सर्व उपलब्ध पर्यायांचा सुरुवातीला विचार करणे. एका सेटअपमध्ये कमीतकमी गेजिंग स्टेशन असण्याचे मार्ग शोधणे.
• जर गेज तांत्रिक अपेक्षा पूर्ण करत असेल तर कोटेशन घेणे
• व्यावसायिक बाबी : याचे खोलात स्पष्टीकरण करण्याची गरज नाही, मात्र पुरवठ्याची व्याप्ती व्यवस्थितपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. (आणि तुलना करत असाल तर व्यवस्थितपणे तुलना करणे गरजेचे आहे.) कारण एकाच संकल्पना चित्रातील पॅरामीटर्स तपासायचे असतील तरी वापरल्या जाणार्या पद्धती वेगेवगळ्या असल्यामुळे गेज उत्पादकांचे पर्याय पुरवठादारागणिक बदलतात.
• गेज उत्पादकाचा इतिहास/ पोर्शभूमी किती महत्त्वाची आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. हे भांडवली उपकरण असल्यामुळे तुमचे त्या भागाचे उत्पादन सुरू आहे तोवर ते चालणे अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या सहयोग्याला प्रदीर्घ अनुभव आहे, ज्याच्याकडे सर्व्हिस सेट-अप आहे, बॅक-अप सपोर्ट आहे आणि या स्पर्धात्मक जगात पुढच्या दशकात टिकून राहण्याची ज्याची खात्री आहे, असा सहयोगी निवडणे अतिशय महत्त्वाचे आहे.
• मागणी नोंदवण्यापूर्वी, उत्पादन मान्य करण्याच्या निकषांबद्दल संमती घेणे.
• उत्पादन पाठवण्यापूर्वी पुरवठादाराकडेच चाचण्या आणि तपासण्या घेणे हा मान्यता प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असला पाहिजे. त्यामुळे नंतरच्या समस्या टाळता येतात. पुरवठादाराची कितीही इच्छा असली तरीही दुर्दैवाने तो ग्राहकाच्या कारखान्यात येऊन सर्व समस्यांचे निवारण करू शकेलच असे नाही.
• गेजिंगच्या सर्वसाधारण सोल्युशनमध्ये तक्ता क्र. 1 मध्ये दिलेल्या मुख्य गोष्टींचा अंतर्भाव असतो. तक्ता क्र. 1 मध्ये दिलेला फ्लो चार्ट हा केवळ मल्टी गेजिंग कसे काम करते हे समजण्यासाठी दिलेला आहे.
मल्टी गेजिंग सोल्युशनचे फायदे
• सर्व पॅरामीटर्स तपासण्यासाठी साधारणपणे एकच तपासनीस/ तपासणी यंत्रणा पुरेशी असते.
• मोजमापासाठी कमी वेळ लागतो.
• माहितीची (डेटा) स्वयंचलित पद्धतीने नोंद (रेकॉर्डिंग) होते.
• ऑनलाईन SPC अभ्यास.
• भागाची ट्रेसेबिलिटी कायम ठेवता येते.
• स्वीकृत (OK) भागांसाठी मार्किंगचे इंटरफेसिंग करता येते.
• स्वीकृत /अस्वीकृत भाग स्वयंचलित पद्धतीने वेगळे करणे शक्य होते.
• तपासनीसाच्या कौशल्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही (बहुतेक सर्व वेळेला).
मल्टी गेजिंग यशस्वी करण्यासाठी निवडलेल्या सहयोग्याबरोबर एकत्रित काम करणे महत्त्वाचे आहे.
अभय हंचनाळ मायक्रॉनिक्स गेजेस प्रा. लि. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.