बाजारातील सध्याचे ट्रेंड जाणून घेण्यासाठी आणि वेळेप्रमाणे ’अपडेट’ राहण्यासाठी ’उद्यम प्रकाशनतर्फे’, विनीत साठे आणि दीपक देवधर या संचालकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. दरम्यान यामध्ये सहभागी झालेल्या आणि भेट दिलेल्या काही लोकांशी संवाद साधून, या प्रदर्शनाचा असलेला कल आणि त्याची दिशा याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
इम्टेक्स 2017 हे दरवर्षी होणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन बंगळुरुमध्ये 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाले. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या तोडीस तोड असलेल्या या प्रदर्शनात 66,000 स्क्वेअर मीटर जागेत 6 हॉलमध्ये 23 देशांतील सुमारे 750 हून अधिक, यंत्रउद्योगाशी संबंधित उत्पादकांनी आपापली उत्पादने मांडली होती. या प्रदर्शनासाठी हॉल क्रमांक 4 हा 17,500 स्क्वेअर मीटर आकाराचा भव्य हॉल कमी वेळात उभारुन सुसज्ज करण्यात आला. प्रदर्शनाच्या संयोजकांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. या प्रदर्शनासाठी एक तात्पुरता हॉलदेखील उभारण्यात आला होता. 8 दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाला एकूण 75,440 लोकांनी भेट दिली.

1946 पासून भारतात मशिन टूल व्यवसायाची मोट बांधणारी IMTMA (इंडियन मशिन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) ही संस्था हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करीत असते. तंत्रज्ञान विषयक जागतिक पातळीवरील घडामोडी, नवीन उत्पादने, तंत्र इत्यादी जाणून घेण्याची ही संधी असल्याने, भारतातील बहुसंख्य उद्योजक या प्रदर्शनास भेट देतात. या वर्षी इम्टेक्स आणि टूल टेक असे दोन विभाग या प्रदर्शनात होते. मशिनिंग विषयक सर्व काही या प्रदर्शनात उपलब्ध होते. त्यात नेहमीच्या सेंटर लेथपासून ते रोबोच्या सहाय्याने पूर्णपणे स्वयंचलित असे एचएमसी, व्हीएमसी टर्नमिल, पूर्ण स्वयंचलित असलेल्या मशिनिंग सेलपर्यंत सर्व काही मांडले होते. टूल टेक विभागात असंख्य प्रकारची अद्ययावत टूल्स, विविध प्रकारची शीतके (कूलंट), फिल्टरेशन करण्याच्या नवीन पद्धती उद्योजकांना त्यांच्या कामात सुधारणा सुचविण्यासाठी सज्ज होत्या. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला आवश्यक असणारे मार्गदर्शन आणि माहिती या प्रदर्शनातून नक्कीच मिळत होती. जागतिक बाजारपेठेत कोणत्या कंपन्या आहेत, कोणते टूलिंग सध्या चालू आहे, नवीन कॅडकॅम सॉफ्टवेअर कोणते आहेत, मल्टीगेजिंगच्या काय कल्पना आहेत, मशिनच्या किंमती काय आहेत, त्यांची माहितीपत्रके, नवीन जॉब तपासणी पद्धत, रोबो, ऑटोमेशन व अभियांत्रिकीचे असंख्य प्रकार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सर्व उद्योजक येत असल्याने त्यांच्याशी होणारा संवाद, या सर्व गोष्टी एकाच छताखाली आणि जवळून पाहायला/करायला मिळत असल्याने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हे प्रदर्शन एक पर्वणी होती. IMTMA ने जाहीर केल्याप्रमाणे यंदा एकूण 18,989 कोटी रुपये किंमतीच्या मशिन्स आणि टूल्सच्या विचारणा झाल्या तर 1,670 कोटी रुपयांची मागणी नोंदवली गेली.

इतर देशांत नजीकच्या काळात भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात जे तंत्रज्ञान मांडण्यात आले तेच तंत्रज्ञान इम्टेक्स 2017 मध्येदेखील मांडण्यात आले होते. नवीन तंत्रज्ञान केवळ विकसित देशांपुरतेच मर्यादित न राहता अतिशय वेगाने त्याचा प्रवास भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये होत आहे, ही बाब या निमित्ताने अधोरेखित झाली. उदाहरणार्थ, एएमटीने बाजारात आणलेली बिल्झ कंपनीची कंपनरोधक उत्पादने (अँटी व्हायब्रेशन सोल्युशन्स). हे जर्मन उत्पादन असून, या संकल्पनेबाबत जाणून घेण्यासाठी अनेक लोक इच्छुक होते. हे उत्पादन काही दिवसांपूर्वी EMO हॅनोव्हरमध्ये, मांडण्यात आले होते. त्यानंतर लगेचच ते आपल्याकडे इम्टेक्समध्ये मांडण्यात आले. तसेच यापूर्वीच्या प्रदर्शनामध्ये मांडण्यात येणाऱ्या मशिनच्या आकारावर काही मर्यादा होत्या पण त्याला छेद देत यंदा मोठ्या आकाराच्या मशिन्सदेखील मांडण्यात आल्या होत्या.
IMTMAच्या अविनाश खरे यांच्या मते, व्हिजिटर्स आणि एक्झिबिटर्स यांची संख्या या दृष्टीने हे प्रदर्शन आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रदर्शन होते. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय मोठ्या संख्येने सामान्य जनता, विद्यार्थी वर्गापासून ते मोठमोठ्या उद्योगांचे धुरीण या प्रदर्शनाला भेट देत होते. आताच्या प्रदर्शनात मोठ्या आकाराच्या मशिन अधिक संख्येने मांडल्या गेल्या हे या प्रदर्शनाचे वेगळेपण नमूद करावे लागेल. मोठया संख्येने नामवंत ब्रँड या प्रदर्शनात उपस्थित असल्याने भारतीय उद्योगधंद्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वाचे होते. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांच्या तुलनेत भारतीय प्रदर्शनात नवनवीन इनोव्हेशन्सचा सहभाग म्हणावा तितका केला जात नाही अशी आतापर्यंतची स्थिती होती, मात्र इम्टेक्स 2017 हे प्रदर्शन याला अपवाद ठरले. काही महिन्यांपूर्वी शिकागो आणि इतर काही आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये जे काही तंत्रज्ञान मांडले गेले, तेच तंत्रज्ञान या वर्षीच्या इम्टेक्समध्ये आपल्या देशात मांडले गेले. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मांडले जाणारे उत्पादन आणि भारतीय प्रदर्शनात मांडले जाणारे उत्पादन यांतील वेळ हा महत्त्वाचा घटक यानिमित्ताने पुसला गेला.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सध्या जगामध्ये इंडस्ट्री 4.0 बाबत चर्चा सुरू आहे. या संकल्पनेबाबतही काही उद्योजकांनी आपले उत्पादन या प्रदर्शनात मांडले होते. याचाच अर्थ असा की, परदेशातून अतिशय वेगाने नवनवीन तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन आपल्या देशामध्ये प्रवास करत असल्याचे स्पष्ट होत आहे. इंडस्ट्री 4.0 शिवाय ऑटोमेशन, रोबोटिक ऑटोमेशन, loT यातही भारतीय उत्पादने आणि भारतीय कंपन्या दिसत असल्याने, त्याही दिवसेंदिवस अधिक ’टेक्नोसॅव्ही’ होत असल्याचे या प्रदर्शनाच्या निमित्ताने जाणवले.
सेटकोच्या राजेश मंडलिक यांना यावेळी टेक्नॉलॉजिकल ट्रेंडच्या दृष्टीने उत्पादकांचा 3 ॲक्सिस मशिनकडून 5 ॲक्सिस मशिनकडे जाण्याचा कल अधिक दिसला. ते म्हणाले, ’ज्योती सीएनसी आणि बीएफडब्ल्यूने याला प्राधान्य दिले होते. डीएमजी तर पहिल्यापासूनच यामध्येच काम करते. सहभागाच्या दृष्टीने सांगायचे झाले तर, आपल्याकडे बऱ्यापैकी मशिन तैवानहून आयात होत असली तरी, या प्रदर्शनात तैवानचा सहभाग कमी होता. दुसरी एक गोष्ट म्हणजे, यावर्षी प्रदर्शनात स्टेपटिक या कंपनीने जॉर्ज फिशरच्या मशिनवर चांगला स्पिंडल दाखविला होता. स्टॉलवर प्रत्यक्ष अपघात घडवून दाखवला जात होता आणि तरीही स्पिंडलला काही होत नव्हते. (इतर वेळेला विमानांचा अपघात झाल्यानंतर साधारणतः त्यामधील ब्लॅक बॉक्सच्या आधारे अपघाताचे कारण शोधले जाते. तसे स्पिंडलमध्ये स्पिंडल फेल होताना काय अडचण होती किंवा कशामुळे अपघात झाला याबाबत माहिती मिळत नाही. दोन वर्षांपूर्वी अशा पद्धतीचा प्रयत्न डीएमजीने केला होता.) तसेच रोबो किंवा रोबोटिक्स हे तंत्र अधिक प्रमाणात पुढे येत असल्याचेही प्रकर्षाने जाणवले. त्याचबरोबर मशिनमधील परस्परसंवाद (इंटरकनेक्टिव्हिटी), तसेच पिक अँड प्लेस सिस्टिमसारख्या मटेरिअल हँडलिंग सिस्टिम अशा उत्पादकता वाढविणारे पर्यायही प्रदर्शनात बघता आले. ग्राईंड मास्टरच्या स्टॉलवरती फेटलिंगसारख्या क्रूड ऑपरेशनसाठी रोबोच्यामध्ये स्पिंडल बसवून फेटलिंगचे टेक्निक डेव्हलप केले ते चांगले होते. हा वेगळा जॉब त्या ठिकाणी पहायला मिळाला’.
’इंस्टिट्युट ऑफ ॲप्लाईड रिसर्च’चे व्ही. व्ही. मुजुमदार यांच्या निरीक्षणानुसार यावर्षीच्या प्रदर्शनात जर्मन कंपन्यांचा सहभाग मागील काही प्रदर्शनांच्या तुलनेत अधिक होता. तर दुसऱ्या बाजूला स्विस, चीन, कोरिया या देशांचा सहभाग त्या मानाने कमी होता. यंदाच्या प्रदर्शनात भारतीय उत्पादने संख्येने अधिक होती आणि गुणवत्तेच्या दृष्टीने ती प्रदर्शनात चांगल्या प्रकारे मांडण्यात आली होती. त्याचप्रमाणे टूल टेक विभागामध्ये छोटे कारखानदार किंवा लघु-मध्यम उद्योजकांकडून चांगल्यापैकी उत्पादने मांडली होती. विशेषत: व्हाईसेस आणि चक्स यांचे विविध प्रकार बघायला मिळाले.

कुदळे इंन्स्ट्रुमेंटसच्या अरुण कुदळेंना, नेहमीपेक्षा यावर्षीचा प्रतिसाद चांगला असल्याचे जाणवले. त्यांच्या मते ’मंदीचे सावट असतानाही मोठ्या प्रमाणात लोक नवीन तंत्रज्ञान पहायला येत असल्याचे दिसले. इन्स्पेक्शन आणि क्वालिटी कंट्रोल या विभागात या वेळेलादेखील परदेशी उत्पादकांचा सहभाग वाढताच होता. ही मंडळी या प्रदर्शनाच्या निमित्ताने भारतात येत आहेत हे स्पष्ट होते. तसेच येताना ते युरोपात विकले जाणारे नवनवीन तंत्रज्ञान सोबत घेऊन येतात. (’खरे तर आजही त्याची किंमत आपल्या उद्योजकासाठी जास्तच असल्याने देशीकरणाला खरोखरच खूप वाव आहे असे माझे मत आहे. मात्र फक्त ’कॉपी’ होऊ नये, शेवटी तंत्रज्ञान हे कोणा एकाच्या मालकीचे नसते. त्यामुळे आमच्या उद्योजकांनी उत्पादन तयार करण्याचे त्यांचे कौशल्य वापरून, दोन दशकांपूर्वी असलेली देशीकरणाची लाट पुन्हा परत आणावी यावे असे मला वाटते.’- अरुण कुदळे).
ॲक्युरेटच्या विक्रम साळुंके यांना मोजणी तंत्रज्ञानाशी निगडित डाटा बेसशी जोडलेल्या प्रणाली मोठ्या प्रमाणात आलेल्या दिसल्या. ’विशेष म्हणजे त्यांच्याकडील तंत्रज्ञान आणि आपल्याकडील तंत्रज्ञान यांमधील दरी मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याचे दिसले. भारतीय कंपन्यांनी सादर केलेले तंत्रज्ञान हे देखील आधुनिक तंत्रज्ञान होते. मोजणी तंत्रज्ञानाला आता IT ची जोड मिळाल्याने ॲक्चुअल टूल प्रिसेटर ते सीएमएम हे सगळे डेटाबेसशी कनेक्टेड होते. यात कुठेही मानवी चुकीला जागा नसल्याने हा डेटा अधिक अचूक आणि अधिक वेगाने हाताळता येतो. आम्हीसुद्धा काही नवीन मशिन लाँच केली. त्यामधील एका शॉप फ्लोअर फ्रेंडली मशिनमध्ये एअर बेअरिंगची रिप्लेसमेंट आम्ही निडल बेअरिंगने करून ते मशिन थेट शॉप फ्लोअरवर इन्स्टॉल केले. हा एक भाग होता. दुसरे म्हणजे, काँटॅक्ट आणि नॉन काँटॅक्ट असे मल्टी सेन्सरचे मशिन पहिल्यांदा आम्ही यावेळेला दाखविले.’

नवीन मशिन किंवा तंत्रज्ञान सादर करण्यासाठी उच्च दर्जाचे व्यासपीठ म्हणून अनेक कंपन्या या प्रदर्शनाकडे एक संधी म्हणून पहात असल्याचे निदर्शनास आले. ज्योती सीएनसीने इम्टेक्स प्रदर्शनात यंदा 6 नवीन मशिन्स सादर केली. यामध्ये टॅकयॉन (Tachyon) श्रेणीमधील हाय स्पीड ड्रिल टॅप सेंटर्स पहायला मिळाली. यंदाच्या प्रदर्शनात ज्योती सीएनसीने सादर केलेल्या MTX CNC मल्टीटास्किंग मशिनला फाय फाऊंडेशन पारितोषिकदेखील मिळाले आहे.
एलएमडब्ल्यू कंपनीने इम्टेक्समध्ये 10 नवीन मशिन्स मांडली होती. यामध्ये एकाच वेळी 5 अक्षामध्ये मशिनिंग करू शकणारे, अंगभूत ट्रुनिअन टेबल असणारे व्हीएमसी मशिन होते. यासोबतच एलएमडब्ल्यूने उच्च कार्यक्षमतेचे (हाय परफॉर्मन्स) दोन स्पिंडल असलेले व्हीएमसी मशिन आणि अधिक वेगाने (हाय स्पीड) ड्रिल टॅप करणारी JV श्रेणीमधील मशिन्स या प्रदर्शनात ठेवली होती.
’बीएफडब्ल्यू’ने यंदा एक्स्ट्रॉन (XTRON) श्रेणीमधील बहुपयोगी व्हीएमसी मशिन सादर केले होते. त्याचबरोबर कमीतकमी जागा व्यापणारी ऑर्बिटर सीएनसी लेथही प्रदर्शनात ठेवली होती. PRIMA 55 एचएमसी तसेच PL-360 दोन चकर टर्निंग मशिन हेही ’बीएफडब्ल्यू’च्या स्टॉलचे आकर्षण होते.
डी एम जी मोरी या वर्षाला 10,000 हून अधिक यंत्रे तयार करणाऱ्या आणि विमाननिर्मिती उद्योगासाठी सर्वाधिक यंत्रे तयार करणाऱ्या कंपनीने यंदा तंत्रज्ञानातील नवीन संशोधन केलेली अनेक उत्पादने मांडली होती. त्यात DMCV मालिकेतील थर्ड जनरेशन व्हीएमसीचा समावेश होता. यातील ड्राईव्ह आणि गाईड वेजचे तापमान कमी ठेवण्याच्या व्यवस्थेमुळे या मशिनमध्ये होणारे काम जास्तीत जास्त अचूक असते.
एचएमटी या आद्य भारतीय यंत्रोत्पादन करणाऱ्या कंपनीने पुनःपदार्पण करीत तीन नवीन मशिन्स यावेळी सादर केली. त्यातील GGM250 हे गिअर ग्राईंडिंग करणारे मशिन तर जगात तशा प्रकारचे प्रथमच तयार केलेले असल्याने त्याच्या स्वामित्व अधिकारासाठी त्यानी अर्ज केला आहे.
उद्यम टीम