कौशल्यात वाढ गरजेची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    05-Aug-2017   
Total Views |
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येत आहे. स्वयंचलन हा सध्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय होत आहे. मागील दशकापर्यंत स्वयंचलन फक्त मोठ्या कंपन्यांपर्यंतच मर्यादित होते, मात्र आता अगदी लघु-मध्यम कंपन्यासुद्धा प्रक्रिया किंवा यंत्रांच्या स्वयंचलनासाठी कटिबद्ध झाल्या आहेत. व्यवसायातील वाढलेली स्पर्धा व मनुष्यबळाच्या येणाऱ्या मर्यादा ही यामागील मुख्य कारणे आहेत.
 fvfgfgf_1  H x
 
जर उद्योजक मशिन उत्पादक असेल, तर बाजारातील स्पर्धेमुळे उत्पादाची किंमत कमी करण्याची गरज भासते. तो जर एखाद्या कंपनीसाठी जॉब वर्क करत असेल तर दिवसेंदिवस त्याला ग्राहकाला कमी किंमतीत काम करून द्यावे लागत आहे. माणसे टिकवण्यासाठी पगारवाढ गरजेची असल्यामुळे तो खर्चही वाढतच चालला आहे. या सर्वांचा सुवर्णमध्य गाठण्यासाठी स्वयंचलनाची नितांत आवश्यकता असते आणि म्हणूनच सध्या लघु-मध्यम उद्योजकसुद्धा स्वयंचलनाबद्दल गंभीरपणे विचार करताना दिसतात. आत्यंतिक गरज असूनदेखील लघु-मध्यम कंपन्यांना खरेतर स्वयंचलनासाठीचा खर्च परवडत नाही, या मानसिकतेमुळे तो खर्च टाळला जातो.

fvfgfgf_1  H x
 
 
स्वयंचलन हे दोन विभागात विभागलेले आहे.
1. स्वस्तातील स्वयंचलन (Low Cost Automation)
2. महागडे स्वयंचलन (High Cost Automation))
बहुतेक लघु-मध्यम उद्योगांमध्ये स्वस्तातील स्वयंचलन करून गुणवत्ता व उत्पादकता वाढवता येते. प्रत्येक ठिकाणी खूप खर्च करण्याची गरज नसते, मात्र यासाठी कारखान्यात सर्जनशील (creative) आणि नवीन विचार करण्यास पूरक वातावरण असणे जरुरीचे असते. कारखान्यात बरीच वर्षे काम करणाऱ्या तंत्रज्ञांना थोड्या प्रशिक्षणाची गरज असते. स्वस्तातील स्वयंचलन करण्यासाठी, बाहेरचा सल्लागार/विशेषज्ञ नेमणे किंवा आहे त्या लोकांचे कौशल्य वाढवून त्यांच्याकडून आवश्यक त्या सुधारणा करून घेणे असे दोन पर्याय असतात. यात बाहेरचा सल्लागार हा पर्याय खर्चिक आणि अवलंबित्व वाढवणारा असल्याने त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे आपल्या विेशासू तंत्रज्ञांचे कौशल्य वाढवून त्यांचा यामधील सहभाग वाढवणे हे जास्त सयुक्तिक ठरते.
 
 
TAACT : औद्योगिक स्वयंचलनाचे प्रशिक्षण देणारी संस्था
नाशिकमधील ’टेक्नोक्रॅट्स कंट्रोल सिस्टिम्स प्रा. लि.’ या स्वयंचलनामध्ये काम करणाऱ्या संस्थेने TAACT (Technocrat's Academy of Automation and Control Technology) नावाने औद्योगिक स्वयंचलनाचे प्रशिक्षण देणे 10 वर्षांपूर्वी सुरू केले. TAACT चे पालकत्व असलेली ’टेक्नोक्रॅट्स’ कंपनी मागील 20 वर्षांपासून स्वयंचलनामध्येच काम करते. विविध मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसोबत यंत्र आणि प्रक्रिया स्वयंचलनाची कामे करताना जो काही अनुभव आला, त्याचा फायदा TAACT मधील स्वयंचलन विषयक अभ्यासक्रम तयार करताना झाला. ’टेक्नोक्रॅट्स’सुद्धा मध्यम आकाराची कंपनी असल्याने, लघु-मध्यम उद्योजकांना स्वयंचलन करताना काय आव्हाने असू शकतात हे लक्षात घेतले गेले आणि ’ऑटोमेशन इंजिनिअर’ ही कल्पना उदयास आली.

fvfgfgfrhfghgh_1 &nb
ऑटोमेशन इंजिनिअर
’ऑटोमेशन इंजिनिअर’ म्हणजे अशी व्यक्ती ज्याला इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिकी आणि इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रातील महत्त्वाच्या उत्पादन आणि तंत्रज्ञान यांबद्दल ज्ञान आणि माहिती आहे आणि जो कमी खर्चातील स्वयंचलनासाठी विचार आणि अंमलबजावणी करेल असा तंत्रज्ञ होय. आज लघु-मध्यम उद्योजक अशी व्यक्ती बाहेरून कामावर घेऊ शकत नाही, कारण ते परवडणारे नाही. त्यामुळे त्यांच्याकडील इंग्रजी कळणाऱ्या आणि ड्रॉईंग वाचू शकणाऱ्या इंजिनिअर अथवा वरिष्ठ कामगारालासुद्धा या संदर्भातील प्रशिक्षण देऊन घरचाच ’ऑटोमेशन इंजिनिअर’ तयार करता येईल, या कल्पनेतून हा अभ्यासक्रम तयार झाला.
 
 
TAACT मध्ये विविध मोड्युल्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक ऑटोमेशन. यामध्ये स्विच गिअर, सेन्सर, कंट्रोलर, केबल निवड, स्टार्टर अशासारख्या आवश्यक गोष्टींबद्दल ज्ञान आणि निवड करण्याच्या संकेतांची माहिती दिली जाते. मोटर आणि ए.सी. ड्राईव्ह मोड्युलमध्ये मोटरची निवड, त्याचे इन्स्टॉलेशन, त्याची टेस्टिंग प्रक्रिया आणि स्टार्टिंगची प्रोसेस इत्यादी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. कमी खर्चातील स्वयंचलनासाठी आवश्यक असे 'Basic PLC Programming Training'’ एका मोड्युलद्वारे शिकविले जाते. ही सर्व मोड्युल 5-5 दिवसांची असतात व दर महिन्यात ही मोड्युल एकदातरी ठेवली जातात. या सर्व मोड्युलमध्ये वर्गात बसून शिकण्याबरोबरच प्रात्यक्षिक शिक्षणही असते. TAACT मध्ये मुख्यत्वे 4 प्रकारे प्रशिक्षण चालते.
 
 
अ) कॉर्पोरेट प्रशिक्षण : TAACT चे शिक्षक एका कंपनीत जाऊन आवश्यक असलेल्या मोड्युल्सचे प्रशिक्षण देतात. यासाठी सहज हलवता येण्यासारखे प्रशिक्षणसंच वापरले जातात.
ब) नवीन अभियंत्यांचे प्रशिक्षण : TAACT मध्ये येवून तरुण अभियंते 2 महिन्यांचे पूर्ण वेळ प्रशिक्षण घेऊन अधिकृत ऑटोमेशन इंजिनियर बनतात.
क) औद्योगिक तंत्रज्ञ प्रशिक्षण : यात वेगवेगळ्या कंपन्यामधून निवडक तंत्रज्ञ TAACT मध्ये 5 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी येतात. त्यांच्या गरजेनुसार व योग्यतेनुसार मोड्युल निवडले जाते.
ड) औद्योगिक मोड्युलर प्रशिक्षण : यात कंपनीमधील अनुभवी लोकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. मुख्यत्वे अर्थिंग/शिल्डिंग, उर्जाबचत, ट्रबल शूटिंग ऑफ ऑटेमेटेड सिस्टिम, डिजिटल कम्युनिकेशन अशा स्वरूपातील विषयांवर प्रशिक्षण दिले जाते.
 
 
स्वयंचलन प्रकल्प
TAACT च्या प्रशिक्षणाअंतर्गत कन्व्हेअर बेल्टचे स्वयंचलन करण्यात आले. एका औषध कंपनीतील हे स्वयंचलन आहे. या कंपनीमध्ये तयार होणारे मलम एका बॉक्समध्ये पॅक करायचे होते. मात्र प्रत्येकी 20 पॅक्सचे एक बॉक्स अशी व्यवस्था त्यांनी आखून दिली होती. त्यासाठी कन्व्हेअर बेल्टचे ऑटोमेशन करण्यात आले. त्यासाठी एक सर्किट डायग्राम तयार करण्यात आली. P1 हे बटन दाबून कन्व्हेअर बेल्ट सुरू करण्यात येतो. इंडक्टिव्ह प्रॉक्झिमिटी सेन्सर PX 1 हा ऑब्जेक्ट सेन्स करतो आणि काऊंटरला 20 पॅक्स मोजण्याबाबतचा सिग्नल देण्यात येतो. जर खालील तीनपैकी एक जरी शक्यता आली तर कन्व्हेअर बेल्ट काम थांबवितो.
 
 
1. कन्व्हेअर सुरू झाल्यानंतर 10 सेकंदामध्ये ऑब्जेक्ट सेन्स झाला नाही तर किंवा दोन ऑब्जेक्टमधील सेन्सिंग टाईम हा 10 सेकंदापेक्षा जास्त असेल,
2. मोटर ओव्हरलोड झाली,
3. काऊंट व्हॅल्यू 20 ला पोहोचली.
वरील तीन पैकी कोणत्याही एका कारणामुळे मोटर थांबली तर L1 दिवा पेटतो. अशावेळी कन्व्हेअर पुन्हा सुरू करण्यासाठी ऑपरेटरला P3 आणि त्यानंतर P1 हे बटन प्रेस करावे लागते. कन्व्हेअर बेल्टच्या साध्या थांबण्यासाठी ऑपरेटरला P2 हे बटन प्रेस करावे लागते. कन्व्हेअरच्या शेवटी त्यांचे पॅकिंग सेंटर आहे. यामुळे मलमाचे पॅक्स मोजण्यात आणि एरर मोजण्यातला वेळ याठिकाणी वाचतो.
 
 
TAACT चा उद्देश हा इंडस्ट्रीला त्यांच्या अभियंते आणि तंत्रज्ञ यांच्या कौशल्यामध्ये भर घालून भविष्यातील स्वयंचलनासाठी तयार करणे हा आहे. ’शिकणे’ हा ’टेक्नोक्रॅट्सचा’ जिव्हाळ्याचा विषय असल्याने सर्व प्रशिक्षण मोड्युल प्रशिक्षणार्थींच्या सूचना आणि इंडस्ट्रीची गरज यांचा विचार करून सातत्याने सुधारली जातात. आज TAACT महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि ठाणे या तीन ठिकाणी हा उपक्रम चालवते. पुढे जाऊन Cll, उद्योजकांच्या संघटना यांच्यामार्फतही हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न चालू आहेत.
 
 
अमर वैद्य हे TAACT शी संलग्न असलेल्या टेक्नोक्रॅट्स कंट्रोल सिस्टिम प्रा. लि. या कंपनीचे संचालक आहेत. 
@@AUTHORINFO_V1@@