संदर्भ स्थाने (रेफरन्स पोझिशन्स)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    05-Sep-2017   
Total Views |

Reference positions
 
कोणत्याही प्रकारच्या सी.एन.सी. मशिनवरती टूलची हालचाल निरनिराळ्या दिशेने काटकोनात होत असते. टूलची हालचाल ज्या अक्षावर होते, त्याला मशिनचा मुख्य अक्ष समजले जाते. टूलच्या होणाऱ्या हालचालीचे अंतर समजावे यासाठी या अक्षाकरिता एक ठराविक संदर्भ स्थान (रेफरन्स पोझिशन) असणे आवश्यक असते. सी.एन.सी. मशिनवर याकरिता मशिन शून्य स्थान (झिरो पोझिशन) व टूल संदर्भ स्थान अशी दोन वेगवेगळी संदर्भ स्थाने ठराविक ठिकाणी निश्चित केलेली (फिक्स) असतात व जॉबवरील एक बिंदू (पॉईंट) ’वर्क शून्य स्थान’ म्हणून घ्यावा लागतो. हे तिन्ही संदर्भ स्थान ठराविक अक्षराने ओळखले जातात.
 
मशिन शून्य स्थान (मशिन झिरो पोझिशन) (M)
 
सी.एन.सी. मशिनवरती ठराविक ठिकाणी सर्व अक्षाकरिता एक मशिन शून्य स्थान ठरविले जाते. हे मशिन शून्य स्थान ’M’ या अक्षराने ओळखले जाते. या मशिन शून्य स्थानावरती त्या मशिनवरील सर्व अक्षाचे कोऑर्डिनेटस शून्य असतात. मशिन चालू केल्यानंतर सी.एन.सी. मशिनवर असलेल्या सर्व अक्षाची हालचाल ’M’ पासूनच होत असते आणि त्यांचे सध्याचे स्थान संगणकाच्या पडद्यावर सतत दिसत असते. मशिनवर कोणत्याही बिंदूंचे कोऑर्डिनेटस काढण्यासाठी या ’M’ चा संदर्भ घेतला जातो. हे स्थान मशिनच्या उत्पादकाद्वारे ठरवले जाते.
 
सी.एन.सी. लेथ मशिन
 
सी.एन.सी. लेथ मशिनवर X अक्षासाठी (क्रॉस फीड) स्पिंडलचा मध्य व Z अक्षासाठी (लाँगिटयुडिनल फीड) स्पिंडलचे किंवा चकचे सर्वात बाहेरचे टोक याचा छेदबिंदू (चित्र क्र.1) म्हणजे ’M’ होय.

Cnc Lathe machine
 
सी.एन.सी. मिलिंग मशिन
 
सी.एन.सी. मिलिंग मशिनवर X अक्षासाठी (लाँगिटयुडिनल फीड) मशिनच्या टेबलची डाव्या बाजूची कड, Y अक्षासाठी (क्रॉस फीड) टेबलची बाहेरील कड व Z अक्षासाठी (व्हर्टिकल फीड) टेबलचा वरील पृष्ठभाग यांचा छेदबिंदू म्हणजे ’M’ त्याचप्रमाणे काही मशिनवर X अक्षासाठी टेबलची उजव्या बाजूची कडसुद्धा मशिन शून्य स्थानावर ठेवली जाते. काही मशिनवर X आणि Y अक्षांसाठी टेबलाचा मध्यबिंदू हाच ’M’ असतो. (चित्र क्र. 2)

Fig 2
 
वर्क झिरो पोझिशन (W)
 
सी.एन.सी. मशिनवरती कोणत्याही जॉबसाठी प्रोग्रॅम तयार करताना प्रथम ऑपरेशननुसार टूल मार्ग तयार करून जॉबवरील सर्व बिंदूंचे कोऑर्डिनेटस काढावे लागतात. हा एक मूळ बिंदू (ओरिजनल पॉईंट) गृहित धरला जातो. या मूळ बिंदूवर त्या मशिनवरील सर्व अक्ष एकमेकांस छेदत असल्याने कार्यवस्तूच्या (जॉब) या मूळ बिंदूवर सर्व अक्षाचे कोऑर्डिनेटस शून्य असतात. या मूळ बिंदूलाच ’वर्क झिरो पोझिशन’ असे म्हणतात. ही वर्क झिरो पोझिशन ’W’ या अक्षराने ओळखली जाते. मशिन चालू केल्यानंतर सी.एन.सी. मशिनवर टूलची हालचाल नेहमी मशिन शून्य स्थानानुसार (’M’) होत असते. ही टूलची हालचाल ’W’नुसार होण्यासाठी ’W’चे ’M’ पासून असलेले सर्व अक्षाचे अंतर घेऊन टूलचे सर्व अक्षाचे ऑफसेट ’M’ नुसार सेट केले जातात.
 
सी.एन.सी. लेथ मशिन

Cnc Lathe machine
 
सी.एन.सी. लेथ मशिनवरती टूलचे Z अक्षाचे ऑफसेट सेट करण्यासाठी टूलचा बिंदू कार्यवस्तूच्या फेसला व X अक्षाचे ऑफसेटसेट करण्यासाठी टूलचा बिंदू जॉबच्या व्यासावरती स्पर्श (टच) करून त्या बिंदूचे ’W’ नुसार येणारे कोऑर्डिनेटस आणि प्रत्येक टूलच्या नोजची त्रिज्या भूमिती (रेडियस जॉमेट्री) ऑफसेट पेजवरती भरले जाते. (चित्र क्र. 3)
 
सी.एन.सी. मिलिंग मशिन
 
सी.एन.सी. मिलिंग मशिनवरती टूलचे ऑफसेट सेट करण्यासाठी ’W’चे ’M’ पासून येणारे सर्व अक्षाचे अंतर वर्क ऑफसेट पेजवरती G-54 ते G-59 या 6 सांकेतिक शब्दापैकी (कोड) एका सांकेतिक शब्दामध्ये भरून तो शब्द प्रोग्रॅममध्ये वापरला जातो किंवा सिमेन्स कंट्रोलमध्ये सर्व अक्षाचे हे अंतर वर्क ऑफसेट पेजवरती भरून तो ऑफसेट नंबर D अक्षराच्या साहाय्याने प्रोग्रॅममध्ये वापरला जातो. (चित्र क्र. 4)

Fig 4
 
टूल संदर्भ स्थान (टूल रेफरन्स पोझिशन) (T)
  
सी.एन.सी. मशिनवर टूल बदलण्यासाठी एका ठराविक ठिकाणी टूल न्यावे लागते. यालाच टूल संदर्भ स्थान (टूल रेफरन्स पोझिशन) म्हणतात. ते ’T’ अक्षराने ओळखले जाते. ’T’ हे ’M’ पासून सर्व अक्षाकरिता ठराविक अंतरावर असते. टूलची हालचाल होत असताना आणि ’T’ वर टूल असताना या ’T’ चे ’M’ पासून असलेले सर्व अक्षाचे कोऑर्डिनेटस झिरो दिसत असतात, म्हणून प्रत्येकवेळी मशिन चालू केल्यानंतर टूल असलेल्या ठिकाणापासून ’T’वर टूल न्यावे लागते. ’T’वर पोहचल्यानंतर ’T’चे ’M’ पासून असलेले सर्व अक्षाचे कोऑर्डिनेटस पडद्यावरती दिसतात. कोणतेही सीएनसी मशिन चालू केल्यानंतर टूल हे रेफरन्स पोझिशनला असले तरीसुद्धा टूलत्या रेफरन्स पोझिशनपासून सर्व अक्षाकरिता लांब घेऊन परत ’T’ वर टूल नेल्यानंतरच त्या मशिनवर पुढील काम करता येते. सी.एन. सी. मशिनवर काम करताना जॉब व टूल बदलण्यासाठी अडचण येऊ नये, अशा पद्धतीने टेबल किंवा चकपासून ’T’ लांब ठेवले जाते. काही सीएनसी मशिनवर ’T’साठी ठराविक स्थान ठरविलेले असते.
 
सी.एन.सी. लेथ मशिन
  
सी.एन.सी. लेथ मशिनवरती X अक्षाकरिता (क्रॉस फीड) स्पिंडलच्या सेंटरपासून जास्तीत-जास्त लांब बाहेरील बाजूस आणि Z अक्षाकरिता (लाँगीटयुडीनल फीड) जास्तीत-जास्त टेलस्टॉककडील बाजूस ’T’ ठेवले जाते.
 
सी.एन.सी. मिलिंग मशिन
 
सीएनसी मशिनवरती X अक्षाकरिता (लाँगीटयुडीनल फीड) जास्तीत-जास्त डाव्या किंवा उजव्या बाजूस, Y अक्षाकरिता (क्रॉस फीड) जास्तीत-जास्त कॉलमकडील बाजूस आणि Z अक्षाकरिता (व्हर्टिकल फीड) जास्तीत-जास्त वरील बाजूस टूल संदर्भ स्थान ठेवले जाते.
 
अविनाश लडगे सी.एन.सी.-व्ही.एम.सी. प्रोग्रामिंग आणि आँपरेटिंग या पुस्तकाचे लेखक असून, औ. प्र. संस्था (आय.टी.आय.) कोल्हापूर येथे मशिनिस्ट व्यवसायासाठी शिल्प निदेशक या पदावर काम करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@