कोणत्याही लेथ मशिनवर यंत्रण (मशिनिंग) करायची कार्यवस्तू ही ढोबळमानाने दंडगोलाकार असते. अशा आकाराच्या कार्यवस्तू पकडायला 3 जॉ असलेला समरुप (सिमेट्रिकल) चक हा अगदी योग्य पर्याय ठरतो, मात्र जेव्ह एखाद्या कार्यवस्तूचा आकार गोल किंवा समरुप नसतो तेव्हा ती कार्यवस्तू अगदी सहजपणे आणि बिनचूकपणे पकडण्यासाठी जे फिक्श्चर वापरायचे असेल त्याची रचना ठरवताना (डिझाईन) त्या अभियंत्यापुढे खरे आव्हान असते. ज्यावेळी भारतीय बाजारपेठेमध्ये सी.एन.सी. लेथचा वापर वाढू लागला, त्यावेळी अशा अनियमित कार्यवस्तू पकडण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशा फिक्श्चरचे उत्पादन करून पुरवठा करणाऱ्या उद्योजकांची चणचण भासू लागली. याच काळात बाजारपेठेतील हे आव्हान अचूकपणे हेरून आम्ही म्हणजे ‘ओंकार इंजिनिअरिंग’ या उद्योगाने पुण्यामध्ये आपले पाय रोवले आणि नंतरच्या काळात आपले स्थान बळकट केले.
सुरुवातीला हाताने घट्ट करायच्या चक्सरोबरच तेलशक्तीवर चालणारे (हायड्रॉलिक पॉवर) चक्स बनवून विकायला सुरुवात केली, मात्र ग्राहक तेवढ्यावरच संतुष्ट नव्हता. त्यांना अनियमित किंवा ओबडधोबड आकाराच्या कार्यवस्तू (नॉन- सिमेट्रिकल जॉब) लेथ मशिनवर यंत्रण करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण चक्स हवे होते. आम्ही अशी आव्हाने स्वीकारून केवळ असे चक्स डिझाईन करून थांबलो नाही तर ते बनवून, ग्राहकांकडे जाऊन यशस्वीदेखील केले. त्यामुळे ग्राहकांचे काम एकदम सोपे आणि किफायतशीर झाले व आम्ही कमी वेळात आणि हमखास ‘सोल्युशन’ देणारे मानले जावू लागलो.
उद्योगाची व्याप्ती वाढत असताना सी.एन.सी. लेथवरील चक्स आणि त्याचे सुटे भाग याबरोबरच हायड्रॉलिक सिलिंडर्स,हायड्रॉलिक पॉवरपॅक्स, एच.एम.सी. मशिनवर लागणारी फिक्श्चर्स यशस्वीपणे पुरवून त्या क्षेत्रामध्येदेखील स्थान बळकट केले आहे.
वेगवेगळ्या टर्निंगची फिक्श्चर्स
45० एल्बोच्या यंत्रणासाठीचा सी.एन.सी.वरील चक
सोबतच्या चित्र क्र. 1 मधील कार्यवस्तू लेथ मशिनवर असलेल्या 3 अथवा 4 जॉ असलेल्या चकमध्ये पकडून अक्षाशी समकेंद्री (कॉन्सेन्ट्रिक) फिरवता येणे शक्य नव्हते. त्यामुळे पुढील सर्व कार्यपद्धती अतिशय क्लिष्ट होऊन खर्चिक होत होती. या कार्यवस्तूच्या दोन्ही अक्षावरील यंत्रण काम करण्यासाठी त्याचे फिक्श्चर बनवताना कोणती आव्हाने आली ते पुढीलप्रमाणे.
कार्यवस्तू मशिनवर चढवताना किंवा उतरवताना कामगाराला अतिशय सोपे व सुटसुटीत असायला पाहिजे.
कार्यवस्तू कमीतकमी वेळात व श्रमात सातत्याने योग्य जागी स्थिरावणे.
कार्यवस्तूच्या दोन अक्षामध्ये असणारी परस्परसंबंधित मोजमापे सातत्याने अपेक्षित टॉलरन्समध्ये मिळवणे.
यंत्रणामुळे येणाऱ्या दाबामधून (फोर्स) येणाऱ्या प्रतिक्रिया पेलण्यास समर्थ असणे.
स्टिअरिंग हाऊसिंगच्या यंत्रणाचे फिक्श्चर
एका नामांकित कंपनीच्या पुरवठादारालास्टिअरिंग हाऊसिंग तयार करून देण्याची ऑर्डर मिळाली होती. या हाऊसिंगच्या रचनेमुळे ते सहजपणे पकडणे अवघड व अशक्य होते. त्यावेळी त्या पुरवठादाराच्या पाहण्यात परदेशामध्ये (UK) एका खास मशिनच्या स्पिंडलवर बसवण्यात आलेले फिक्श्चर पाहण्यात आले होते. त्याकाळी ते मशिन जर आयात करायचे असा विचारकेला असता, तरी त्याची किंमत सुमारे पावणे दोन कोटी रुपये एवढी होती. अशा परिस्थितीत त्याला ही ऑर्डर फायदेशीर ठरणारी नव्हती. पूर्वीच्या ओळखीतून त्याने आम्हाला या हाऊसिंगसाठी लागणारे फिक्श्चर डिझाईन करून व बनवून देण्याबद्दल विचारणा केली.
3-2-1 या तत्त्वाचा काटेकोरपणे वापर करत हे फिक्श्चर (चित्र क्र. 3) अतिशय अल्पावधीत केवळ 85 हजार रुपयांमध्ये बनवून व त्या पुरवठादाराच्या आवारात त्याच्या मशिनवर यशस्वी करुन दिले.
त्या पुरवठादाराकडे वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येण्याजोग्या अनेक प्रकारच्या हाऊसिंगची वारंवार गरज होती. साहजिकच त्यासाठी वेगवेगळी फिक्श्चर्सदेखील वरचेवर लागणार होते. ही संधी ओळखून आम्ही केलेल्या सुरुवातीच्या हाऊसिंगच्या फिक्श्चरच्या डिझाईनमध्ये योग्य त्या सुधारणा व बदल करून त्याची किंमत नियंत्रणात येईल असे धोरण ठरवले. परिणाम म्हणून सुमारे 8-9 वर्षानंतरदेखील अशी फिक्श्चर्स जवळपास सुरुवातीच्याच किंमतीत आम्ही पुरवत आहोत.
3) स्टेटर हाऊसिंगच्या यंत्रणाचे फिक्श्चर
आमच्या एका महत्त्वाच्या ग्राहकाकडून त्यांच्या स्टेटर हाऊसिंगसाठी भरवशाचे फिक्श्चर बनवण्यासाठी गळ घातली गेली. हे हाऊसिंग अतिशय नाजूक होते. त्यामुळे त्याला सर्व बाजूने मशिनिंग करायचे नव्हते, मात्र मशिनिंग न केलेल्या भागाशी मशिनिंगचे इंटर-रिलेशन खूप काटेकोर होते. तसेच त्याच्या अक्षीय मापामध्येदेखील खूप नियंत्रण आवश्यक होते. या सर्व गरजांचा साकल्याने विचार केल्यावर होनिंग ऑपरेशनच्या क्विलला जशी एक्सपांडिंग मँड्रिलची रचना असते तशी संकल्पना वापरून फिक्श्चरचे डिझाईन (चित्र क्र.4) बनवले गेले. या फिक्श्चरची चाचणी घेताना पहिल्याच प्रयत्नात गुणवत्तेचे सर्व निकष दिलेल्या पातळीमध्ये आले. शिवाय हे वापरायला इतके सुटसुटीत होते, की कामगाराला कुठलाच त्रास नव्हता. पुढे पुढे अशा प्रकारच्या कठीण किंवा आव्हानात्मक फिक्श्चरचे खात्रीशीर पुरवठादार म्हणजे ‘ओंकार इंजिनिअरिंग’ असेच समीकरण होऊन गेले.
फिक्श्चर यशस्वी झाल्यानंतर याचा इतका गवगवा झाला, की त्या जनसेट बनवणाऱ्या कंपनीचे परदेशातील भागीदार किंवा ग्राहक जेव्हा आम्हाला भेट द्यायला येतात तेव्हा आवर्जून फिक्श्चरच्या या संकल्पनेचे कौतुक तर करतातच, पण त्याचे फोटोदेखील काढून घेऊन जातात.
यांत्रिकी अभियंता असलेले अजय पुरोहित यांनी 20 वर्षे विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांनी 2004 साली ’ओंकार इंजिनिअरिंग’ कंपनी सुरू केली. मागणीनुसार फिक्श्चर्स तयार करणारी कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे.