मिलिंग फिक्श्चर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    26-Oct-2018   
Total Views |
मागील महिन्यातील लेखात आपण हॉरिझाँटल मिलिंग मशिनवरील फिक्श्चर कसे काम करते ते पाहिले आहे. या लेखात आपण व्हर्टिकल मिलिंग मशिनवर फिक्श्चर कसे काम करते आणि अनेक कार्यवस्तू (स्ट्रिंग मिलिंग) एकाच फिक्श्चरवर कशा बनवाव्यात याविषयी माहिती घेणार आहोत.

a
चित्र क्र. 1 मध्ये स्ट्रिंग मिलिंग होणारी कार्यवस्तू दाखविली आहे, तर चित्र क्र. 2 मध्ये यासाठीचे फिक्श्चर दाखविले आहे. आपल्याला कार्यवस्तूवर खाच (स्लॉट) ‘W’ करायची आहे. यासाठी प्रथम आपल्याला ही कार्यवस्तू तयार करण्याची प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे.

a
1. प्रथम चकमध्ये बार पकडून Ø d पाहिजे त्या लांबीचा बनविला आणि त्याच स्थितीत फेस F बनविला. हे दोन्ही एकाच सेटिंगमध्ये केल्यामुळे F आणि Ø d हे एकमेकास लंबरूप मिळाले.
2. चकमध्ये Ø d पकडून Ø D आणि त्याच्या लांबीचे यंत्रण करून घेतले. त्यामुळे दोन्ही व्यास समकेंद्रित मिळाले.
3. चित्र क्र. 1 मध्ये दाखविलेली कार्यवस्तू Ø d वर पकडली आणि फेस F वर ठेवली.
4. या प्रक्रियेमुळे ही खाच कार्यवस्तुदृतथचऊङस्तूच्या मध्यभागी करता आली.

a 
चित्र क्र. 3 मध्ये बेस प्लेटला दोन खाचेमध्ये स्क्रूच्या साहाय्याने दोन टेनन बसविलेले आहेत. मागील लेखात निर्देश केल्याप्रमाणे टेननमुळे फिक्श्चर मशिनच्या टेबलला समांतर बसते.
चित्र क्र. 4 मध्ये सेटिंग पीस दाखविला आहे. याच्या साहाय्याने कटर योग्य ठिकाणी सेट करता येतो. त्यामुळे योग्य ठिकाणी खाच करता येते.

a
चित्र क्र. 5 मध्ये आर्बरमध्ये एंडमिल कसे पकडायचे असते ते दाखविले आहे. आर्बरच्या आतील व्यासावरील टेपर कॉलेटशी जुळणारे असते. कॅप नट घट्ट केल्यामुळे आर्बरमध्ये एंडमिल घट्ट पकडले जाते. मात्र यासाठी पॅरलल शँक एंडमिल वापरावे लागते.

a

a
आता आपण चित्र क्र 6 मध्ये दाखविलेल्या फिक्श्चरच्या वेगवेगळ्या भागांचे कार्य आणि परस्परसंबंध पाहू.
A. फिक्श्चरच्या बेसप्लेटला दोन U खाचा दिलेल्या आहेत. यामध्ये T बोल्ट टाकून नटच्या साहाय्याने टेबलवर फिक्श्चर घट्ट पकडता येईल किंवा T नट टाकून स्टड आणि नटच्या साहाय्यानेसुद्धा फिक्श्चर पकडता येते.
B. भाग क्रमांक 1 (सपोर्ट प्लेट) : आधार देण्याचे कार्य करते. जेव्हा आपण सर्व पाचही कार्यवस्तू उजवीकडील हेक्स स्क्रूने घट्ट पकडतो तेव्हा निर्माण होणारे बल 5 कार्यवस्तुंना तसेच 5 ‘V’ ब्लॉकना डावीकडे ढकलण्याचे कार्य करते, तेव्हा शेवटचा 'V' ब्लॉक या प्लेटवर जाऊन टेकतो आणि थांबतो.
C. भाग क्रमांक 2 ('V' ब्लॉक) : कार्यवस्तू जेव्हा 'V' ब्लॉकमध्ये पकडली जाते, तेव्हा कार्यवस्तू बरोबर सेंटरमध्ये पकडली जाते आणि त्यामुळे कार्यवस्तुच्या बरोबर सेंटरमध्ये खाच करता येते. यावरील कार्यरत असलेल्या बलामुळे आणि वारंवार वापरामुळे होणारी झीज कमी करण्यासाठी हा 'V' ब्लॉक पूर्ण किंवा फक्त पृष्ठभाग कठीण (केस हार्ड) केलेला असतो. 'V' ब्लॉक सपाट भागाने कार्यवस्तू घट्ट पकडण्याचे कार्यही करतो. 'V' ब्लॉक त्याच्या उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये भाग क्रमांक 3 मध्ये गाईड केला जातो. त्यामुळे सर्व 'V' ब्लॉकचे केंद्रबिंदू एका सरळ रेषेत राहतात, यालाच स्ट्रिंग असे म्हणतात. तसेच हेक्स स्क्रूने क्लॅम्प करताना निर्माण झालेल्या बलामुळे तो उचलला जात नाही.
D. भाग क्रमांक 3 (गाईड प्लेट) : या गाईड प्लेट 'V' ब्लॉकच्या दोन्ही बाजूस बसविलेल्या आहेत. 'V' ब्लॉक मागे पुढे होताना त्यांना गाईड करणे हे या गाईड ब्लॉकचे महत्त्वाचे कार्य आहे.
E. भाग क्रमांक 4 आणि 5 (थ्रस्ट प्लेट आणि क्लॅम्प स्क्रू) : हे दोन्ही भाग एकमेकांत क्रॉस पिनच्या साहाय्याने बसविलेले आहेत. स्क्रूच्या पुढच्या भागाचा व्यास आणि पॅडचा आतील व्यास यामध्ये क्लिअरन्स असल्यामुळे 10 ते 15 अंशापर्यंत (चित्र क्र. 7) प्लेट हलू शकते. त्यामुळे स्क्रूच्या पुढे दिलेले पॅड ज्या पृष्ठभागावर आपण क्लॅम्प करत आहोत तो पृष्ठभाग काही प्रमाणात बरोबर नसला तरी पॅड स्वतःला त्याप्रमाणे जुळवून घेते. यामुळे परिणामकारक क्लॅम्पिंग होते. जेव्हा स्क्रू मागे घेतला जातो, तेव्हा भाग क्रमांक 4 म्हणजेच थ्रस्ट प्लेट (पॅड) स्क्रूबरोबर मागे येते आणि कार्यवस्तू सहजपणे 'V' ब्लॉकमधून बाहेर काढता येते. पॅडचा आतील भाग आणि बाहेरचा सपाट भाग हा फ्लेम हार्ड (40 ते 45 RC) केला जातो. तसेच स्क्रूचा स्फेरिकल भागसुद्धा असाच कठीण केला जातो.

a
फिक्श्चरचा वापर
एकाच सेटिंगमध्ये 5 कार्यवस्तू तयार होत असल्यामुळे उत्पादकता वाढते, तसेच क्लॅम्पिंग आणि डीक्लॅम्पिंगसाठी कमी वेळ लागतो. त्यामुळे अशा प्रकारचे फिक्श्चर अतिशय किफायतशीर ठरते. मिलिंग झाल्यावर फिक्श्चरवर पडलेल्या चिप ब्रशने काळजीपूर्वक साफ कराव्यात आणि नंतरच नवीन कार्यवस्तू लोड कराव्यात. हाताने किंवा हवा मारून चिप दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे.
जेव्हा कार्यवस्तूचे मिलिंग पूर्ण होते तेव्हा त्याला बर येते. या बरमुळे हाताला दुखापत होण्याची शक्यता असते, म्हणून कार्यवस्तू हाताळताना हातमोजे घालणे आवश्यक आहे.
मिलिंग फिक्श्चर बनविण्यासाठी पुढील गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
1. मिलिंग मशिनचा प्रकार, मशिनची कंपनी, मशिनचे मॉडेल.
2. T खाचेचे माप.
3. T खाचेमधील अंतर.
4. टेबलचा आकार आणि त्याची मापे.
5. फिक्श्चर कोणत्या वेगवेगळ्या मशिनवर वापरावयाचे आहे.
6 टेबलचा ट्रॅव्हल तिन्ही दिशांना किती आहे हे माहिती असणे आवश्यक आहे.
एकाच प्रकारच्या अनेक कार्यवस्तू अचूकतेने यंत्रण करण्यासाठी उपयुक्त अशा फिक्श्चरची माहिती आपण या लेखात घेतली. पुढील अंकात आपण अजून काही वेगळ्या प्रकारच्या फिक्श्चरची माहिती घेणार आहोत.
@@AUTHORINFO_V1@@