अतिशय कमी जागेत सुरुवात करून 12 वर्षामध्ये जागेचा विस्तार जवळजवळ 10 पट करणारी नाशिकमधील आमची ‘एन-ग्रेव्हटेक’ कंपनी 3 अक्षीय, 4 अक्षीय आणि 5 अक्षीय सी.एन.सी. एन्ग्रेव्हिंग आणि मायक्रोमिलिंग मशिनची निर्मिती करते. बाजारपेठेचा कल आणि मागणी यांचा अभ्यास करताना एन्ग्रेव्हिंग मशिनला अधिक मागणी असल्याचे आणि तुलनेने यामध्ये कमी उत्पादक असल्याने या बाजारपेठेसाठी आपण भक्कम आणि हमखास असा पर्याय उपलब्ध करून द्यावा असे आमच्या लक्षात आले.
निर्मितीमागील प्रेरणा
2005 मध्ये जॉब वर्क करणाऱ्यांसाठी आम्ही 3 अक्षीय सी.एन.सी. एन्ग्रेव्हिंग मशिनची निर्मिती करत होतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे बाजारपेठेतील या मशिनची वाढती मागणी आणि भारतातील सी.एन.सी. एन्ग्रेव्हिंग मशिन उत्पादकांची कमी संख्या बघता आम्ही या 3 अक्षीय सी.एन.सी. एन्ग्रेव्हिंग मशिनवर अधिक भर देण्याचे ठरविले. त्यासाठी आम्ही त्यामध्ये सुधारणा करत नवीन 3 अक्षीय सी.एन.सी. एन्ग्रेव्हिंग मॉडेल ‘इकॉनॉमिकल सिरीज’ म्हणून विकसित केले आहे.
• आमच्याकडे असलेल्या आधीच्या 3 अक्षीय सी.एन.सी. मॉडेलमध्ये स्टेपर मोटर होती. मात्र, ग्राहकाकडून आलेल्या मागणीमध्ये त्यांना अचूक हालचाली (प्रिसिजन मुव्हमेंट) हव्या होत्या. ग्राहकाची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन मॉडेलला सर्व्हो मोटर लावली आहे.
• आधीचे मशिन टेबलवर ठेवता येत होते. मात्र, नवीन मशिनचा बेस पूर्णपणे कास्टिंगमध्ये बनविलेला असल्यामुळे मशिनचे वजन वाढून त्याचा भक्कमपणा (स्टर्डीनेस) पूर्वीच्या मशिनच्या तुलनेत अधिक आहे. कारखान्यामध्ये मशिन ज्याठिकाणी ठेवले जाते, त्याच्या आजूबाजूला अवजड प्रेस, तसेच अवजड मशिन असतात. त्यामुळे त्या मशिनजवळ आमचे मशिन असेल तर त्याला कंपने (व्हायब्रेशन) येत होती. ती कंपने रोखण्यासाठी आम्हाला मशिनचा भक्कमपणा वाढविण्याची गरज भासली.
• नवीन 3 अक्षीय एन्ग्रेव्हिंग मशिनमध्ये कामाच्या टेबलचा उपलब्ध आकार 300 मिमी. X 300 मिमी., 400 मिमी. X 400 मिमी. आणि 600 मिमी. X 400 मिमी. असून या तीन प्रकारची मॉडेल आम्ही विकसित केली आहेत. नवीन मशिनवर एकाचवेळी एकसारख्या किंवा वेगवेगळ्या 6 कार्यवस्तू लावता येतात.
निर्मितीमधील आव्हाने
आम्ही जी नवीन उत्पादने विकसित करत होतो, ती आम्हाला ग्राहकांना परवडतील अशा किंमतीमध्ये उपलब्ध करून द्यायची होती. त्यामध्ये सर्व्हो मोटर, तसेच मशिनचे विविध भाग उच्च दर्जाचे वापरणे गरजेचे असल्यामुळे आमच्या मशिनची किंमत जास्त होत होती. ती किंमत कमी करण्यासाठी आम्ही अनेक बदल आणि संशोधन करून हे नवीन मशिन डिझाईन केले. मशिनची यांत्रिकी (मेकॅनिकल) व्यवस्था जेवढी सुलभ आणि सोपी असेल तेवढे ते मशिन भविष्यात चांगली कामगिरी करण्यास आणि टिकण्यास मदत होते, ही गोष्ट आमच्या लक्षात आली.
उत्पादाची (प्रॉडक्ट) वैशिष्ट्ये
1. वीज पुरवठा खंडित झाला तर मशिन जिथे थांबले होते, तिथून ते परत सुरू होते.
2. मशिनवर एकाचवेळी 6 एकसारख्या किंवा वेगवेगळ्या कार्यवस्तू लावता येतात.
3. Z अक्षाच्या गतिक (डायनॅमिक) संतुलनासाठी ब्रेक मोटरचा वापर करण्यात आलेला आहे.
4. USB पेन ड्राईव्ह किंवा LAN वापरून सहजतेने प्रोग्रॅम कॉपी करता येतो.
5. विविध प्रकारच्या CAD-CAM सॉफ्टवेअरशी सुसंगत.
3 अक्षीय सी.एन.सी. एन्ग्रेव्हिंग मशिनवर यंत्रण सुरू असतानाचा व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील QR कोड आपल्या मोबाईलवर स्कॅन करा.
केस स्टडी
एका दागिने डिझाईन करणाऱ्या ग्राहकाने 3 अक्षीय सी.एन.सी. एन्ग्रेव्हिंग मशिनचा वापर करून आपल्या उत्पादनासाठी लागणाऱ्या वेळेत बचत करून उत्पादकतेमध्ये वाढ केली. याबाबत आपण माहिती घेऊ.
जुनी पद्धत
पूर्वी दागिन्यांचे डिझाईन ग्राहकाच्या मनातील संकल्पनेनुसार कागदावर काढले जायचे. त्यानंतर कारागीर त्या डिझाईनप्रमाणे मटेरियलवर हाताने आकार देऊन प्रत्यक्ष डाय मोल्ड बनवायचे. ही कामे मॅन्युअली केली जात असल्यामुळे कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत होती, त्याशिवाय या प्रक्रियेत जास्तीचा वेळही खर्च होत होता. तुलनेत उत्पादन मात्र कमी मिळत होते. पूर्वी एका डिझाईनसाठी एक दिवस लागत होता.
नवीन पद्धत
जुन्या पद्धतीमध्ये लागणारा जास्तीचा वेळ आणि कमी उत्पादकता या दोन समस्यांवर विचार करता या ग्राहकाने दागिन्यांचे डाय मोल्ड तयार करण्यासाठी 3 अक्षीय सी.एन.सी. एन्ग्रेव्हिंग मशिनचा वापर करण्याचे ठरविले. हे मशिन हाताळण्यास अतिशय सुलभ आणि सोपे आहे. पूर्वी ज्या कामासाठी कुशल मनुष्यबळाची गरज होती, ती नवीन पद्धतीमध्ये उअऊ-उअच सॉफ्टवेअरचा वापर करून कमी केली. यामध्ये टूलचे आयुष्यदेखील चांगले मिळत आहे. या मशिनच्या वापरामुळे वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होत असून, केवळ 5 ते 6 तासांमध्ये एक डिझाईन पूर्ण होऊ लागले आहे. नवीन मशिनच्या वापरामुळे या ग्राहकाला उत्पादकतेमध्येदेखील मोठा फायदा होत आहे. पूर्वीच्या तुलनेत उत्पादकतेमध्ये अंदाजे 3 पटींनी वाढ झाली.
उपलब्ध पर्याय
गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेसाठी आमचे उत्पादन परिपक्व झाले आहे आणि उत्पादनांचा गट चार प्रकारांत सुव्यवस्थित करण्यात आला आहे.
• डेस्कस्टॉप मालिका : टेबलवर ठेवता येणारा हलका द्विमितीय आणि त्रिमितीय सी.एन.सी. एन्ग्रेव्हर
• इको मालिका : उत्पादनातील सर्वात किफायतशीर पण अतिशय शक्तीशाली 3 अक्षीय सी.एन.सी. एन्ग्रेव्हिंग मशिन, त्याबरोबर पाहिजे तशी 4 अक्षीय ॲटॅचमेंट येते.
• प्रो मालिका : चांगली अचूकता आणि पृष्ठभागाचा नितळपणा आवश्यक असलेल्या ग्राहकांकरिता योग्य असे व्यावसायिक 3 अक्षीय मायक्रोमिलिंग आणि एन्ग्रेव्हिंग मशिन
• प्रिसिजन मालिका : मजबूत पाया असलेले अत्यंत अचूक मायक्रोमिलिंग आणि एन्ग्रेव्हिंग मशिन. अचूकता आणि मजबूतपणा हवा असलेल्या ग्राहकांसाठी अधिक उपयुक्त.
3 अक्षीय सी.एन.सी. एन्ग्रेव्हिंग, मायक्रोमिलिंग मशिन हे डाय मोल्डसाठी उपयुक्त मशिन आहे. यामध्ये उच्च प्रिसिजन असलेली कामे कार्यक्षमतेने होतात. ऑटोमोबाईल उद्योग, फोर्जिंग, प्लास्टिक, दागिने निर्मिती, छपाई आणि पॅकेजिंग उद्योग, टेक्स्टाईल, घड्याळ, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल, फुटवेअर अशा बऱ्याच उद्योगांमध्ये या मशिनचा वापर होतो.