आपल्या कारखान्यात येणाऱ्या अनेक समस्यांवर अनेकदा आपल्याच लोकांकडून उत्तर शोधले जाते. या समस्या एकतर उत्पादनाशी किंवा प्रक्रियेशी संबंधित असतात. समस्या नेमकी कशामध्ये आहे याची निश्चिती झाली की, त्यावर उपाय शोधणे सोपे असते. ‘फ्युएल इन्स्ट्रुमेन्ट्स अँड इंजिनिअर्स प्रा. लि.’ (FIE) या आमच्या कंपनीत मोठ्या संख्येने कार्यवस्तूंचे उत्पादन केले जाते. मोठ्या संख्येने उत्पादन केले जात असतानाच येणाऱ्या लहान लहान समस्यादेखील मोठा परिणाम करणाऱ्या होत्या. या लेखात अशाच एका समस्येवर कारखान्यातच उत्तर कसे शोधले गेले याविषयी माहिती देण्यात आली आहे.
समस्या
FIE मध्ये ॲल्युमिनिअमच्या छोट्या (20 मिमी. व्यास) कार्यवस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. या उत्पादनाचा वेग दर 3 सेकंदाला 1 कार्यवस्तू असा आहे. एका महिन्यात एकंदर 11 लाख कार्यवस्तू बनविण्याची कंपनीची क्षमता आहे. इतक्या प्रचंड प्रमाणावर उत्पादन होत असताना आम्हाला विविध छोट्या छोट्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. यापैकी एक समस्या कार्यवस्तुंच्या पृष्ठीय फिनिशसंबंधीची होती.
ॲल्युमिनिअम धातूवर काम करताना येणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे ॲल्युमिनिअमपासून बनविलेल्या कार्यवस्तू हाताळत असताना त्या वेड्यावाकड्या होतात किंवा त्यावर खड्डे/चरे पडतात.
जुनी पद्धत
आमच्याकडे 8 यंत्रण स्थानके असलेल्या रोटरी मशिनवर कार्यवस्तुंची निर्मिती केली जाते. ऑटो फीडरद्वारा मशिनला कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो. दर 3 सेकंदला 1 या गतीने बाहेर पडणाऱ्या तयार कार्यवस्तू एका बिनमध्ये गोळा केल्या जात असताना त्या एकमेकांवर आपटत असल्यामुळे, तपासणीदरम्यान त्यांच्यावर खड्डे/चरे असल्याचे निदर्शनास येत होते. यावर उपाय म्हणून कार्यवस्तू गोळा होताना रबर, स्पंज अशा काही नरम वस्तुंचा उपयोग यापूर्वी केला जात होता. परंतु मशिनमधून बाहेर पडणाऱ्या कार्यवस्तुंची संख्या अधिक असल्याने, हे उपाय म्हणावे तितके प्रभावी ठरले नाहीत.
नवीन पद्धत
सातत्याने केले जाणारे प्रयत्न आणि नवनवीन यांच्याद्वारे या समस्येवर कंपनीमध्येच अगदी साधा परंतु परिणामकारक उपाय शोधला गेला. सर्व तयार झालेल्या कार्यवस्तू ज्या बिनमध्ये गोळा केल्या जातात, त्या बिनमध्ये आधीपासूनच पाणी भरण्यात यावे असे ठरले. त्यामुळे तयार झालेली कार्यवस्तू, पाण्याने भरलेल्या बिनमध्ये पडताक्षणी (चित्र क्र. 1) पाण्यामधील विरोधी बलामुळे तिचा खाली पडण्याचा वेग कमी होतो आणि या कार्यवस्तू पाण्यामध्ये एकमेकांवर हळूवारपणे पडतात. कार्यवस्तू एकामागोमाग बाहेर पडत असताना बिन सतत गोलाकार फिरते राहील, अशी व्यवस्था केली. यामुळे मशिनमधून आधी बाहेर पडलेली कार्यवस्तू आणि तिच्या पाठोपाठ येणारी दुसरी कार्यवस्तू एकमेकांवर पडत नाहीत. या अतिशय छोट्या सुधारणेमुळे कार्यवस्तूच्या पृष्ठीय फिनिशसंबंधीची समस्या परिणामकारकपणे सुटली.
फायदे
कार्यवस्तुंच्या रिजेक्शनचे प्रमाण कमी झाले. सुधारणेपूर्वी रिजेक्शनचे प्रमाण 1 टक्का इतके होते, ते कमी होऊन 0.3 टक्क्यांवर आले.
कोणताही अतिरिक्त खर्च न करता, उपलब्ध संसाधनांचा कल्पक वापर करून येणाऱ्या समस्येवर कसे उपाय योधता येतात, याचे चांगले उदाहरण म्हणून या सुधारणेकडे पाहता येईल. लघु मध्यम उद्योगातील कारखानदाराने आणि तेथील कामगाराने संशोधनाची आणि सातत्याने प्रयोग करण्याची कास धरल्यास त्याचे निश्चित चांगले परिणाम पाहायला मिळतात.