ट्रेकसोन स्लाईडवे लायनर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    10-Dec-2018   
Total Views |
 
ouf
सर्वच मशिनमध्ये कार्यवस्तू किंवा टूल यांची पुढे मागे हालचाल होणे हे मुख्य कार्य असते. या प्रक्रियेवरच हव्या असलेल्या स्वरुपात कार्यवस्तुंची निर्मिती होत असते. कार्यवस्तुची निर्मिती ज्याप्रमाणे कामगार, मशिनवरील नियंत्रण, प्रोग्रॅम आणि टूलची क्षमता यांवर अवलंबून असते, त्याचप्रमाणे ती स्लाईड आणि गाईडवे पुढे मागे होण्याच्या क्रियेवरही अवलंबून असते. मशिनमधील पुढे मागे हलणाऱ्या भागांपैकी एक स्थिर, तर दुसरा त्यावर सरकणारा गाईड असतो. या सततच्या क्रियेमुळे दोन भागांमध्ये घर्षण होते. ते कमी व्हावे यासाठी वंगण वापरले जाते. वंगण वापरणे खर्चिक तर असतेच, पण त्याशिवाय त्याची वारंवार देखभाल करणेदेखील आवश्यक असते. यावर प्रभावी उपाय म्हणून आमच्या कंपनीने ‘ट्रेकसोन स्लाईडवे लायनर’ तयार केले. या लायनरच्या वापरामुळे वारंवार होणारा वंगणाचा खर्च कमी करण्यास मदत झाली, तसेच कार्यवस्तू बिघडण्याचा धोकादेखील कमी झाला.

ट्रेकसोन लायनर काय आहे?


ouf

ट्रेकसोन फ्लॉरॉमेटॅलिक लायनर मशिनमधील सरकणाऱ्या भागावर (चित्र क्र. 1) चिकटवला जातो. असे केल्यामुळे मशिनवरील स्थिर भाग आणि सरकणाऱ्या भागामध्ये घर्षण होत नाही. हे लायनर मशिन टूल, ट्रान्सफर लाईन आणि कमी अधिक वेगात चालणाऱ्या भागात वापरता येते. आम्ही तयार केलेल्या लायनरची रासायनिक प्रक्रिया केलेली बाजू काळ्या रंगाची असते. ही बाजू सरकणाऱ्या भागावर चिकटविली जाते, तर लायनरची दुसरी बाजू स्वतः वंगण म्हणून कार्य करते. ती स्थिर भागावर घासली जाते. ही बाजू घर्षण विरोधक, उष्णता विरोधक, तसेच रासायनिक प्रक्रियारोधक केलेली असते.

कल्पना कशी सुचली?
आमच्याकडे एका ग्राहकाकडून लायनर बेअरिंगच्या नमुन्यांबद्दल विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर अशा प्रकारचे लायनर बनविण्याची कल्पना आम्हाला सुचली. आम्हाला रिव्हर्स इंजिनिअरिंग संकल्पना वापरून सुरुवात करायची होती. ग्राहकाची मागणी योग्यप्रकारे पूर्ण व्हावी यासाठी आम्ही उत्पादनाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि आकर्षक स्वरूप (ॲस्थेटिक ॲपिअरन्स) आदी निकष समोर ठेवून, उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या वेगवेगळ्या श्रेणींची चाचणी घेतली. त्यानंतर आम्ही स्पेशल पर्पज मशिनची (एस.पी.एम.) खरेदी केली. या एस.पी.एम.वर अनेक चाचण्या घेतल्यानंतर ते सेट करण्यात आले.

हे लायनर सी.एन.सी. मशिन आणि व्ही.एम.सी. मशिनच्या हालचाल करणाऱ्या भागात लावले जातात. सुरुवातीला आम्ही हे लायनर आयात करत होतो. हे लायनर PTFE आणि ब्राँझचे होते. आम्ही आमच्या कंपनीत PTFEचे स्कायव्हिंग (बाजारात मिळणाऱ्या स्टँडर्ड जाडीच्या PTFE च्या शीटमधून कमी जाडीचे पातळ शीट तयार करणे.) करत होतो. त्यावेळी असा विचार आला की, हे लायनर आयात करण्यापेक्षा त्यासाठी काही तरी दुसरा पर्याय शोधणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आमच्याकडे आधीपासूनच उपलब्ध होते. त्यामुळे आम्ही मोल्डिंग करून स्कायव्हिंग करण्यास सुरुवात केली.


ouf

निर्मितीमधील आव्हाने

सी.एन.सी. मशिनचे यंत्रभाग फार कमी टॉलरन्सचे असतात. त्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धतीने PTFE चे स्कायव्हिंग करायचो. त्याऐवजी अधिक अचूकतेसाठी कंपनीमध्येच एस.पी.एम. विकसित केले. मात्र, लायनर विविध आकारात असल्यामुळे प्रत्येकवेळी एस.पी.एम. मशिनचा गिअर बदलावा लागत होता. यावर उपाय म्हणून आम्ही कंपनीमध्येच गिअरबॉक्स डिझाईन केले. यामध्ये 0.5 मिमी.पासून ते 3 मिमी. जाडीपर्यंतचे लायनर उत्पादित करता येऊ लागले. यासाठी केवळ गिअर बॉक्समधील गिअरचे गुणोत्तर बदलले की, ग्राहकाच्या मागणीनुसार पाहिजे त्या जाडीच्या लायनरचे उत्पादन करण्यास मदत झाली.



लायनरचे प्रकार

ouf


ट्रेकसोन लायनरचे स्टँडर्ड आणि हेवी ड्युटी असे दोन प्रकार आहेत. तक्ता क्र. 1 मध्ये त्यांचे भौतिक गुणधर्म दिले आहेत. स्टँडर्ड लायनर हे सर्वसाधारणपणे कमी आणि मध्यम हालचाल होणाऱ्या भागांच्या ठिकाणी वापरले जातात. हेवी ड्युटी लायनरचा उपयोग अधिक वापर असलेल्या आणि अधिक भार असलेल्या ठिकाणी केला जातो. हे लायनर 1.0, 1.5, 2.0, 2.5 आणि 3.0 मिमी. जाडीत आणि 305 मिमी. रुंदीमध्ये उपलब्ध आहेत. शिवाय ग्राहकांच्या मागणीनुसार आवश्यक रुंदी असलेले लायनर बनवून दिले जातात. लायनरच्या रंगामध्ये दोन प्रकार आहेत. जे लायनर चिकटवले जाते त्याचा रसायन लावण्यात येणारा भाग काळा, तर वरचा भाग हिरव्या रंगाचा (चित्र क्र. 3) असतो. न चिकटवले जाणारे लायनर हायड्रॉलिक आणि न्युमॅटिक सीलसाठी वापरण्यात येतात. याच्या दोन्ही बाजू हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात. (चित्र क्र. 3)


ouf


गुणधर्म
• घर्षणाचा गुणांक अपवादात्मकरीत्या कमी.
• उत्कृष्ट झीज प्रतिरोधन.
• उत्कृष्ट चिकट विरोधी (अँटिस्टिक) गुणधर्म.
• सेल्फ ल्युब्रिकेटिंग.
• उत्तम काँप्रेसिव्ह क्षमता.
• कठीण, टिकाऊ आणि लवचिक.
• स्थिर तसेच गतीशील स्थितीत समान घर्षण.

लायनर वापरण्याची पद्धत
ज्यावेळी सी.एन.सी. मशिनची निर्मिती केली जाते, त्याचवेळी त्याचे टूलपोस्ट किंवा इतर ठिकाणी किती जाडीचे लायनर बसवायचे आहे हे निश्चित केले जाते. त्याप्रमाणे त्या भागांचे यंत्रण केले जाते आणि त्याप्रमाणे लागणाऱ्या लायनरची मागणी आमच्याकडे केली जाते. जर मशिन वापरणार्‍यांना आधीपासून वापरत असलेल्या मशिनमध्ये लायनर बसवायचे असतील, तर अशावेळी मशिनचे संबंधित भाग आवश्यक तेवढे घासून त्या ठिकाणी लायनर बसविता येतात.

ट्रेकसोन लायनर वापरण्याची पद्धत

ट्रेकसोन लायनर वापरण्याची विशिष्ट तांत्रिक पद्धत आहे.
• ज्या भागावर हे लायनर चिकटवायचे आहे ती बाजू पूर्णपणे यंत्रण केलेली असावी.
• लायनर चिकटवायच्या भागाचा पृष्ठीय (सरफेस) फिनिश Ra = 1.6 ते 6 मायक्रॉन, तर सपाटपणा (फ्लॅटनेस) 0.01 ते 0.02 मिमी. असावा.
• त्या भागावरील खराब झालेला भाग ॲडेझिव्ह भरून पॉलिश केलेला असावा.
• खराब झालेला भाग स्वच्छ करण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलचा वापर करण्याऐवजी ट्रायक्लोरोइथेलिन, पॅराक्लोरोइथेलिन किंवा ॲसिटोनचा वापर करावा.
• मशिनच्या ज्या भागावर लायनर चिकटवायचे आहे, त्यासाठी अराल्डाईट किंवा लॉकटाईट असे ठराविक चिकट द्रव वापरावे.
• लायनर ज्या भागावर लावायचे आहे, तो भाग प्रथम स्वच्छ आणि कोरडा करून घ्यावा त्यानंतर त्यावर अराल्डाईट किंवा लॉकटाईट रसायनाचा 0.05 ते 0.1 मिमी.चा लेप लावून ही ॲसेम्ब्ली सुरक्षित ठिकाणी ठेवावी.
• अरल्डाईट किंवा लॉकटाईट रसायन लावण्याची विशिष्ट पद्धत आहे. लायनरवरील काळ्या भागावर आडवे आणि ज्या भागावर लायनर चिकटवायचे आहे त्या भागावर वरील रसायनाच्या उभ्या पद्धतीने रेषा माराव्यात. हे रसायन 0.2 किलो/चौ.मी. या प्रमाणात लावावे. रसायन लावल्यानंतर दोन्ही भाग साधारण 2 मिनिटे उघडे ठेवल्यानंतर एका बाजूने लायनर चिकटवत जावे. यानंतर लायनर व्यवस्थित बसण्यासाठी त्यावर 24 तासांसाठी 200 ग्रॅम/चौ.सेमी. वजनाचा दाब द्यावा. यानंतर लायनरचा बाहेरील भाग पॉलिश पेपरने स्वच्छ करावा.

ट्रेकसोन लायनर वापरण्याचे फायदे

1. स्थिर आणि सरकणाऱ्या भागावर कमीतकमी घर्षण, वेळ आणि विजेची बचत.
2. स्थिर आणि सरकणारा भाग थेट संपर्कात येत नाही.
3. धक्के/कंपने (व्हायब्रेशन) बसत नाही. यामुळे कार्यवस्तुची अचूकता मिळण्यास मदत होते.
4. गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते.
5. मशिनचे आयुष्य वाढते.
6. मशिनचा मूळ गाईडवे झिजत नाही. (सुरक्षित राहतात.)

केस स्टडी
आमचे ग्राहक असलेल्या स्टँडर्ड फ्युरोमर्स प्रा. लि. कंपनीत 6 सी.एन.सी. मशिनवर दोन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रभागांचे उत्पादन केले जाते. मध्यंतरीच्या काळात काही मशिनवर उत्पादनादरम्यान अडचणी येऊ लागल्या. यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम झाला. तसेच प्रत्येक पाळीत यंत्रभागाला वंगण करावे लागत होते. वारंवार येणाऱ्या या अडचणींमुळे कामगारही त्रस्त होऊ लागले होते. सखोल अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की, वारंवार घर्षणामुळे मशिनचे भाग खराब होत आहेत. त्याचा परिणाम उत्पादन आणि गुणवत्तेवर होत आहे. यावर उपाय म्हणून, जानेवारी 2018 मध्ये 6 पैकी 2 मशिनवर लायनर टाकण्याचा निर्णय घेतला. ‘हिंदुस्थान नायलॉन’ कंपनीकडून ट्रेकसोन लायनरची खरेदी करून या ग्राहकाने कंपनीच्या मार्गदर्शनानुसार मशिनवर लायनर बसविले. त्यानंतर साधारण महिनाभर मशिनच्या कामगिरीची नोंद ठेवली. हे लायनर वापरल्यामुळे कार्यवस्तुच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ झाली. त्याशिवाय वंगणावर होणारा खर्च वाचला, तसेच मशिनच्या देखभालीसाठी होणाऱ्या खर्चातही बचत होण्यास मदत झाली. लायनर लावल्यामुळे झालेले फायदे तक्ता क्र. 2 आणि 3 मध्ये दिले आहेत.




ouf

ouf


लायनर बेअरिंगची मागणी आमच्याकडे आल्यानंतर ते परदेशातून मागविण्याऐवजी स्वतःच तयार करावे, असा विचार समोर आला आणि ते आव्हान आम्ही स्वीकारले. अनेक गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आम्ही 2009-10 मध्ये ट्रेकसोन लायनरची निर्मिती करत हे उत्पादन बाजारात आणले. सुरुवातीला आम्हाला याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता, मात्र 2014 पासून आमच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. आज आमचे लायनर अमेरिकेतही निर्यात केले जातात.
@@AUTHORINFO_V1@@