टूल प्रीसेटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    01-Apr-2018   
Total Views |
संकल्पना

Tool Presetter
  
प्रीसेटर हे उपकरण टूलचे मोजमाप करण्यासाठी आणि टूल ऑफसेट सेट करण्यासाठी वापरतात. प्रीसेटर टूलवर ऑफ-लाईन पद्धतीने काम करते. पारंपरिक पद्धतीमध्ये सामान्यत: सी.एन.सी.मशिनवरच टूलची मापे घेतली जातात. या गोष्टीला एकतर बराच वेळ लागतो आणि शिवाय हे काम उत्पादन बंद ठेऊन करावे लागते. त्यामुळे मशिनचा डाऊन टाइम वाढतो. जो कोणत्याही उद्योगाला हानिकारक असतो. त्यामुळे प्रीसेटरच्या साहाय्याने आपण कामाचा वेग वाढवू शकतो. यंत्र प्रत्यक्ष उत्पादन करत असताना उत्पादनाचे कोणतेही नुकसान होऊ न देता टूलचे मोजमाप करुन ते प्रीसेटरवर सेट करु शकतो आणि मशिन जास्तीत जास्त उत्पादनासाठी वापरू शकतो. प्रीसेटरच्या संकल्पनेचा उगम होण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने यंत्रशाळेतील कामगार टूलचे मोजमाप करताना किंवा टूल सेट करताना 25 ते 30 मायक्रॉन जाडीचा कागदाचा तुकडा वापरत असत. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यवस्तूवर परावर्तित होणारा फरक (एरर) हा कमीतकमी 25 मायक्रॉनच्या आसपास असायचा.
 
प्रीसेटरमुळे हे काम आपण प्रतिमेवर प्रक्रिया (इमेज प्रोसेसिंग) करणाऱ्या एका छोट्या मशिनमार्फत करू शकतो. या मशिनमध्ये टूलची मोजमापे कमीतकमी 1 मायक्रॉनपर्यंत अचूकतेने मोजणारे खास कॅमेरे (चित्र क्र. 1) बसवलेले असतात. यामुळे आपण वेळेचा होणारा अपव्यय कमी करु शकतो. योग्य सेटिंगच्या कृतीमुळे आपण 100 टक्के योग्य व दर्जेदार यंत्रभाग बनवू शकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर अचूकतेने मोजून सेट केलेले टूल, मशिनचा वाढलेला उत्पादक वेळ आणि टूल प्रीसेटर टूलची जास्तीत जास्त मिळवलेली सेवा या तिन्हीच्या माध्यमातून आपण उद्योग अधिक किफायतशीर करू शकतो.

tool presetter 
 
जेव्हा टूलचा मोजमापाचा दर्जा आणि त्याच्या व्यवस्थापनाचा विषय येतो त्यावेळी प्रीसेटरचा वापर हा अपरिहार्य ठरतो. कोणताही उद्योजक सातत्याने कार्यपद्धतीच्या आवर्तन काळात (सायकल टाइम) सुधारणा करणे, मशिन बंद असणारा काळ कमी करणे आणि कार्यपद्धतीची पातळी उंचावणे, गुणवत्तापूर्ण उत्पादनाची निर्मिती करणे यावरच लक्ष्य केंद्रित करुन प्रयत्न करत असतो. उत्पादनाची सर्वोत्कृष्ट गुणवत्ता हे प्रत्येक उत्पादकाचे अंतिम लक्ष्य असते, आणि प्रीसेटरच्या साहाय्याने टूलचे अचूक मोजमाप मिळवून हे साध्य करता येऊ शकते.
 
टूल प्रीसेटरची काम करण्याची रीत
 
प्रीसेटरमध्ये लावलेल्या उच्च दर्जाच्या कॅमेऱ्याच्या मदतीने टूलवरील प्रकाश झोत पकडून इमेज प्रोसेसिंगच्या साहाय्याने कटिंग एजचे अचूक मोजमाप केले जाते. यासाठी ग्राहकाला पूर्ण स्वयंचलित किंवा अर्ध स्वयंचलित प्रीसेटर्स बाजारात उपलब्ध आहेत.
 
माहितीच्या हस्तांतरणासाठी (डेटा ट्रान्स्फर) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उदा: तुम्ही कोणतीही माहिती पुढे कळविण्यासाठी संगणक जाळ्याचा (LAN) उपयोग करू शकता. कोणत्याही टूलची माहिती QR कोड वापरून पुढे पाठवू शकता. तसेच RFID (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) वापरुनही प्रीसेटरमधील माहितीचे हस्तांतरण प्रॉडक्शन मशिनवर करता येते. ग्राहक त्यांच्या उत्पादन कार्यपद्धतीला सोयीचे असे माहिती हस्तांतरणाचे पर्याय वापरू शकतात.
Getting information using QR codes 
 
प्रीसेटरची प्रमुख वैशिष्ट्ये
 
• भक्कम आणि स्थिर सांगाडा
• प्रतिमेवर प्रक्रिया (इमेज प्रोसेसिंग) करणारे तंत्रज्ञान
• सेटिंग करावयाचे टूल पकडण्यासाठीचा स्पिंडल
• झेड आणि एक्स अक्षांचे ड्राईव्ह
• परावर्तित होणारा प्रकाश झोत व त्याचा दर्जा
 
नॉन-कॉन्टॅक्ट प्रीसेटर आणि कॉन्टॅक्ट पद्धतीच्या प्रीसेटरची तुलना
 
नॉन-कॉन्टॅक्ट प्रकारचे प्रीसेटर प्रामुख्याने प्रोब प्रणालीच्या मदतीने काम करतात. टूलचा कटिंग एज पॉइंट ट्रेस करण्यासाठी आणि त्याद्वारे टूलची उंची आणि व्यास निश्चित करण्यासाठी प्रोब प्रणालीचा वापर केला जातो. प्रोबचा कटिंग एजशी होणारा सूक्ष्म संपर्क अत्यंत महत्त्चाचा असल्यामुळे त्याचा वापर करताना नियंत्रित वातावरणात ते वापरले जातात.
 
कॉन्टॅक्ट पद्धतीच्या मोजमापन पद्धती वाजवी दरात उपलब्ध असून त्या दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात. अशा प्रकारच्या मोजमापन पद्धती या पारंपरिक पद्धती समजल्या जातात. कारण ऑपरेटरच्या कौशल्यावर त्यांची अचूकता अवलंबून असते.
 
नॉन-कॉन्टॅक्ट पद्धतीच्या प्रीसेटरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मोजण्यासाठीच्या टूलला होणाऱ्या नुकसानीची शक्यता पूर्णपणे टळते. कॉन्टॅक्ट पद्धतीचा प्रीसेटर वापरताना टूलच्या धार असलेल्या कडेचे नुकसान होऊ शकते आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या कार्यपद्धतीची खालावलेली उत्पादकता व वाढलेले रिजेक्शन हे ओघानेच आले.
 
टॅक्टाईल मोजमापन पद्धतीपेक्षा ऑप्टिक मोजमापन पद्धतीमध्ये तुम्हाला दृश्य स्वरुपात असणारे चित्र अतिशय स्वच्छ व समजायला सोपे असते. प्रतिमेवर प्रक्रिया करावयाचे तंत्रज्ञान टास्क बटनच्या साहाय्याने आपल्याला समजायला व हाताळायला सोपी असलेली प्रणाली (इंटरफेस) उपलब्ध करुन देते. कुणीही कामगार सर्वसामान्य टूलचे मोजमापाचे व सेटिंगचे काम अतिशय सुलभतेने करु शकतो.
 
भविष्यात 3D स्कॅनिंग वापरून कार्यवस्तू आणि टूल यांच्या 3D प्रतिमा घेऊन सेटिंग करणे. अशा तंत्राने काम केले जाईल. ’झोलर’चे 3D तपासणी करणारे सहा अक्ष असलेले मशिन ऑप्टिकल मोजमापाच्या अचूकतेबरोबरच उच्च दर्जाचे CNC स्वयंचलनही उपलब्ध करून देते.

When measuring tools using a presenter 
 
प्रीसेटर हा उत्पादकतेची पातळी कशी उंचावतो?.
 
टूलरूममध्ये ब्रँडेड प्रीसेटर वापरण्याचे महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे -
 
• मशिनच्या अनुत्पादक काळात झालेली घट
• उत्पादन क्षमतेत वाढ
• टूलच्या वापराचे इष्टतमीकरण (ऑप्टीमायझेशन)
• अस्वीकृत (रिजेक्टेड) भागांच्या प्रमाणात घट
• उंचावलेला उत्पादनाचा दर्जा
• ढोबळ मानाने सर्वच स्तरांवर उंचावलेली उत्पादकता

Information via network from Tool Presenter 
Sample of preset savings 
 
प्रीसेटरमधील मोजमापनाच्या अचूकतेवर परिणाम करणारे घटक
 
अतिशय उच्च गुणवत्ता असलेला स्पिंडल आणि हत्यारधारक हे अर्थातच महत्त्वाचे घटक आहेत. जर टूल योग्य पद्धतीने पकडले गेले नाही तर मोजमापनात फरक येतो आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे चुकीच्या सेटिंगमुळे अपव्यय किंवा रिजेक्शन वाढते. याशिवाय प्रॉडक्टची गुणवत्ता, मोजमापासाठी वापरलेले खास कॅमेरे, परावर्तित प्रकाशझोत हे घटकदेखील मोजमापनाचे आणि दृश्य कार्यपद्धतीचे यश जोखण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. ब्रँडेड प्रॉडक्ट, भक्कम आणि स्थिर सांगाडा, स्पिंडल आणि मशिनचे दर्जेदार कॅलिब्रेशन हा अचूक प्रीसेटिंगचा पाया आहे.
 
योग्य प्रीसेटर निवडण्याला साहाय्यभूत होणारे निकष
 
नवीन प्रीसेटर खरेदी करतेवेळी अनेक महत्त्वाचे निकष डोळ्यासमोर ठेवावे लागतात. आपण जर स्वतःलाच काही नेमके आणि महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले तर आपल्या गरजांनुसार आपल्यासमोर चपखल पर्याय येतील.
 
आपण आपल्या उत्पादनात कोणकोणती टूल वापरता? आपण स्वत: टूलचे उत्पादन करता की आपल्याकडे असलेल्या यंत्रसामुग्रीवर आपणाला टूल सेट करायचे आहे? आपल्या टूलवर काही विशेष असे आकार किंवा भूमिती आहे का? उदा: हॉब कटर्स, हेलिकल टूल किंवा श्रिंक फिट करुन बसवलेले टूल?
 
आपल्याला आपला प्रीसेटर हा सी.एन.सी. मशिनच्या अगदी जवळ पाहिजे की आपल्याकडे नियंत्रित वातावरण असलेली इन्स्पेक्शन रुम आहे? प्रीसेटरवर कामगारानेच टूल सेटिंग करावयाचे आहे की उत्पादनाच्या गरजा संपूर्णपणे स्वयंचलित पर्यायाकडूनच भागवून पाहिजेत?
 
सारांश
 
अशा अनेक तोडग्यांचा उपयोग करुन उपभोक्ता त्यांच्या भविष्यातल्या गरजा भागवायची तरतूद करू शकतो. ब्रँडेड प्रीसेटर फक्त एखाद दुसऱ्या मशिनसाठी उपाय पुरवीत नाहीत तर आपल्या संपूर्ण उत्पादन कार्यपद्धतीचे इष्टतमीकरण करण्यासाठी मदत करतात. भरवशाच्या उत्पादन कार्यपद्धती, त्यांचे लिखित स्वरुपातील कागदपत्र आणि ट्रेसेबिलिटी या ग्राहकाच्या सध्याच्या काटेकोर गरजा भागविण्यासाठी प्रीसेटर महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
 
महत्त्वाचा भाग असा की इंडस्ट्री 4.0 हा केवळ मोठ्या उद्योगांचाच विषय राहिला नाही तर लघु आणि मध्यम उद्योगांना जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर एक कळीचा मुद्दा बनला आहे. ब्रँडेड प्रीसेटरच्या साहाय्याने लघु उद्योजकासह कोणताही उपभोक्ता त्याच्याकडे शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण माहितीचा ठेवा निर्माण करुन स्वयंचलन प्रक्रिया सुरु करू शकतो. आणि अशा गोष्टीत केलेल्या गुंतवणुकीचा परतावा कमी अवधीत मिळू शकतो. (तक्ता क्र.1)
 
प्रीसेटरवर टूलचे सेटिंग ऑफ-लाईन पद्धतीने होत असल्याने (ते सी.एन.सी. मशिनच्या टूल मॅगेझिनमध्ये बसवण्यापूर्वी) मशिन बंद राहण्याच्या कालावधीत बचत होते.
 
केस स्टडी
 
पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या संजय टूल्स या उद्योगामध्ये ’झोलर’कंपनीचे "स्माईल 400" हे टूल प्रीसेटरचे मॉडेल वापरात आहे. तेथील अॅप्लिकेशन इंजिनिअर रविंद्र शेडगे हे प्रीसेटरचे मॉडेल खरेदी करताना व नंतर त्या मॉडेलने दिलेल्या सेवेबद्दल असे सांगतात की, ’झोलर’चा प्रीसेटर विकत घेण्यापूर्वी आम्ही ज्या उपकरणावर टूल सेट करायचो त्याचे अचूक रिडिंग आम्हाला प्रत्यक्ष जॉबवर मिळायचे नाही. काहीतरी तफावत यायची. याचे प्रमुख कारण म्हणजे ते टूल प्रीसेटरवर बसवल्यानंतर येणारा रन-आउट. शिवाय त्या उपकरणावर वेगवेगळ्या आकाराच्या प्रोफाईल सेट करायला मर्यादा यायच्या.
 
Table
 
’झोलर’च्या प्रीसेटरची बरीच वैशिष्ट्ये आमच्या कानावर आलेली होती. आम्ही प्रत्यक्ष ’झोलर’च्या शोरुममध्ये जाऊन तेथील उपकरणावर 4-5 वेगवेगळी टूल सेट करुन आणली व त्यांची कामगिरी प्रत्यक्ष जॉबवर बघितली. ’झोलर’कडून देखील आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यातूनच त्यांच्या उत्पादनावर आमचा विेशास दृढ होत गेला. आणि ’झोलर’चा प्रीसेटर घ्यायचे पक्के ठरवले.
 
संजय टूल्समधील प्रीसेटरवर तपासल्या जाणाऱ्या टूलपैकी काही प्रातिनिधिक टूल चित्र क्र.5 मध्ये दाखवले आहेत.

Pic5 
 
प्रीसेटरवर वरच्या बाजूला बसवलेल्या 90 अंशामध्ये फिरणाऱ्या कॅमेऱ्यामुळे वेगवेगळ्या प्रोफाईल असलेल्या टूलच्या प्रोफाईल अचूकपणे तपासता येतात. शिवाय त्यावर बसवलेल्या LED च्या प्रकाशझोतामुळे एखाद्या टूलला रन-आऊट असल्यास व्यासाच्या दोन्ही बाजूने तपासून निर्धारित केला जातो. रन-आऊट तपासण्यासाठी वेगळा प्रोग्रॅम प्रीसेटरमध्ये आहे.अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या टूलचे कॅड ड्रॉईंग उपलब्ध असल्यास ते सिस्टिममध्ये लोड करता येते व त्या ड्रॉईंगसोबत प्रत्यक्ष टूलची तुलना केली जाते.
 
या प्रीसेटरवर टूल सेट केल्यावर त्याचा अहवाल तयार करायची सोय आहे. शिवाय ’झोलर’चे नाव अग्रगण्य असल्याचे या अहवालाला बाजारपेठेत खूप विेशासार्हता आहे. आम्ही अशा अहवालाची रेकॉर्डस आमच्या संग्रही ठेवत असल्याने आमच्या ग्राहकाचा आमच्यावरील भरोसा वाढला आहे.
 
प्रीसेटरचे एकंदरीत कामकाज कसे चालते याचा वाचकाला अंदाज येण्याच्या दृष्टीने संजय टूल्स या कंपनीतील ’झोलर’च्या स्माईल 400 या प्रीसेटरच्या मॉडेलवर एक नाविन्यपूर्ण टूल तपासल्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी सोबतचा QR Code मोबाईलवर स्कॅन करून पहा.
 
 
 
अमित साळुंखे यांना इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमधील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी प्रीसेटिंग अँड इन्स्पेक्शन मशीनमध्ये जवळपास 9 वर्षे काम केले आहे. सध्या ते झोलरच्या जनरल मॅनेजर पदावर काम करीत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@