आपण मागील लेखात जिग्स आणि फिक्श्चर्समध्ये वारंवार वापरण्यात येणाऱ्या भागांसंबंधी माहिती घेतली. अजून काही नेहमी वापरण्यात येणारे महत्त्वाचे भाग आपण या लेखामध्ये पाहूया. जे भाग वारंवार वापरले जातात त्याचे प्रमाणीकरण (स्टँडर्डलायझेशन) केल्यास खालील फायदे होतात.
1. आरेखन (डिझाईन) करण्यात एक प्रकारची सुसूत्रता, शिस्त येते. नवीन इंजिनिअरला सुद्धा आरेखन करणे सोपे जाते. पण जर प्रमाणीकरण करण्यात दुर्लक्ष झाले तर मात्र व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमाप्रमाणे एकच भाग वेगवेगळ्या प्रकारे आरेखन केला जातो व त्यामुळे विविधता वाढते, याचा परिणाम वस्तुसाठा (इन्व्हेन्टरी) वाढण्यात होतो. तसेच आरेखन जास्त वेळ घेते व जास्त खर्चिक होते.
2. प्रमाणित भाग एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बनवून भांडारात ठेवू शकतो. मोठ्या प्रमाणात हे भाग बनवल्यामुळे ते स्वस्तात मिळतात आणि हवे तेव्हा उपलब्ध होतात.
3. यामुळे देखभालीचा दर्जा सुधारतो. ती जास्त त्वरित करता येते कारण खराब झालेले भाग तातडीने बदलू शकतो व देखभालीचा खर्च व लागणारा वेळ सुद्धा कमी होतो.
वारंवार लागणारे भाग
• स्प्रिंग प्लंजर
• जॅक (खाली वर होणारा आधार)
• आय बोल्ट-लिफ्टर्स
• टॉमी स्क्रू व थ्रस्ट पॅड
• स्क्रू व पाम ग्रिप
• नर्ल नॉब/नट
• पक्के आधार - कास्टिंग व फोर्जिंगसाठी
• कठीण गुंडी (हार्ड बटण)
स्प्रिंग प्लंजर
याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो.
1. भाग लोकेट करण्यासाठी केला जातो.
2. भाग ढकलण्यासाठी होतो
3. भाग ढकलून बाहेर काढण्यासाठी होतो
4. खाचेत (त ग्रूव्ह,डिम्पल) अडकवण्यासाठी होतो.
चित्र क्र. 1अ पिन टाइप स्प्रिंग प्लंजर दाखवला आहे. मागच्या बाजूला सेट स्क्रू 1 या आकड्याने दर्शवलेला आहे. हा स्क्रू मागे पुढे करून पिनचे बल कमी जास्त करता येते.
M8 च्या प्लंजरमुळे 7 ते 29 N इतके बल मिळते व ती पिन 3 मिमी पर्यंत मागे पुढे होते.
M16 च्या प्लंजरमुळे 45ते 100 N इतके बल मिळते व ती पिन 5 मिमी पर्यंत मागे पुढे होते.
चित्र क्र.1ब मध्ये बॉल टाइप प्लंजर दाखवला आहे. या प्रकारच्या प्लंजरमध्ये स्प्रिंगमुळे बॉलवर निर्माण होणारे बल बदलता येत नाही.
चित्र क्र. 2 मध्ये हा प्लंजर कशा प्रकारे बसवला जातो व कार्य करतो हे आपल्या लक्षात येईल. प्लंजरचा बॉल दोन ग्रूव्हमध्ये अडकतो व त्यामुळे शाफ्ट मागे पुढे होतो पण ठराविक ठिकाणी आल्यावर थांबतो. याचा अंदाज वापरणाऱ्याला येतो. मोटारींच्या गिअर बॉक्समध्येसुद्धा अशा प्रकारची जुळणी केलेली असते.
अॅसेम्ब्ली फिक्श्चरमध्ये बुश प्रेस करताना बुश पायलट डायमीटरवर पकडून ठेवण्यासाठीसुद्धा अशा प्रकारच्या प्लंजरचा उपयोग
केला जातो.
जॅक / खाली वर होणारा आधार
याचा उपयोग जिग्स व फिक्श्चरमध्ये फार मोठ्या प्रमाणात केला जातो. याचे वेगवेगळ्या प्रकारे आरेखन करता येते. त्यातलाच एक प्रातिनिधिक प्रकार दाखवला आहे व तत्वतः तो कशा प्रकारे कार्य करतो ते पाहूया.
चित्र क्र. 3 अ मध्ये नेहमी वापरला जाणारा एक प्रकारचा वर खाली होणारा आधार दाखवला आहे. जेव्हा 5 नंबरचा स्क्रू ढिला केला जातो तेव्हा 1 नंबरने दाखवलेल्या स्प्रिंगच्या बलामुळे 2 नंबरची मागेपुढे होणारी पिन उजवीकडे ढकलली जाते, त्यामुळे 7 नंबरची आधार देणारी पिन खाली येते. जेव्हा कार्यवस्तू फिक्श्चरवर पक्क्या आधारावर ठेवली जाते तेव्हा 7 नंबरची आधार देणारी पिन खालीच असते. जेव्हा 5 नंबरच्या स्क्रूने 2 नंबरची पिन पुढे ढकलली जाते तेव्हा स्प्रिंग दाबली जाते, तसेच 7 नंबरची आधार देणारी पिन वर सरकते व कार्यवस्तूला जाऊन टेकते व आधार देते. हेच याचे कार्य आहे. चित्र क्र.3 ब पहा. 6 नंबरचा डॉग पॉइंट स्क्रू हा 2 नंबरच्या मागे पुढे होणाऱ्या पिनच्या खाचेत (slot) मध्ये बसत असल्याने ही पिन स्वतःभोवती फिरु शकत नाही व त्यामुळे 7 नंबरची आधार देणारी पिन व्यवस्थितपणे वर आणि खाली सरकते. जर ही 2 नंबरची पिन फिरली तर आधार देणारी पिन चांगल्या प्रकारे वर-खाली होणार नाही. बऱ्याच वेळेला यंत्रण करताना येणाऱ्या हत्यारांच्या बलामुळे कार्यवस्तू दबते अथवा वेडीवाकडी होते. अशा वेळेस तिला आधार दिल्यास कार्यवस्तूचे यंत्रण चांगल्या प्रकारे होते.
चित्र क्र. 4 अ, 4 ब मध्ये अशा प्रकारची आणखी काही आरेखन (डिझाईन) दाखवलेली आहेत. त्याचा जरूर अभ्यास करावा. आपण आपल्या गरजेप्रमाणे पाहिजे तसे आरेखन करू शकतो. पण जर आपण याचे प्रमाणीकरण केले तर त्याचा निश्चितच वर नमूद केल्याप्रमाणे फायदाच होईल.
आय बोल्ट-लिफ्टर
या प्रकारचे लिफ्टर हे मध्यम प्रकारची जिग्स व फिक्श्चर्स उचलण्यासाठी वापरतात. आपण जर सुरक्षेचा विचार केला तर जड वस्तू स्थलांतर करण्यात जर योग्य काळजी घेतली नाही तर प्रचंड धोका असतो. आणि म्हणूनच योग्य लिफ्टर्सचा उपयोग करण्याचा आग्रह हा कर्मचारी व व्यवस्थापन या दोघांनीही धरावा. अन्यथा नको त्या परिस्थितीचा सामना करावा लागेल.
चित्र क्र. 5 अ मध्ये अशा प्रकारचा आय बोल्ट लिफ्टर दिसत आहे. हा लिफ्टर फोर्जिंग प्रक्रियेने बनवलेला असतो. प्रत्येक लिफ्टरवर तो किती वजन उचलू शकतो हे नमूद केलेले असते.
उदाहरणार्थ M10 चा लिफ्टर 230 kg वजन उचलू शकतो तसेच M24 चा लिफ्टर 2000 kg वजन उचलू शकतो. ज्या वजनासाठी याची शिफारस केली आहे त्यापेक्षा जास्त वजन उचलणे हा गुन्हाच आहे.
चित्र. क्र. 5 ब मध्ये या लिफ्टर्सचा उपयोग कसा करायचा हे दर्शविले आहे. वर्षातून एकदा या सर्व साधनांची मान्यताप्राप्त संस्थांकडून तपासणी करावी लागते व तसे प्रमाणपत्र संग्रही ठेवावे लागते. जर तपासण्याची तारीख होऊन गेली असेल तर अशी साधने वापरू नयेत. दुर्लक्ष करून वापरली तर होणाऱ्या परिणामास सामोरे जावे लागेल.
टॉमी स्क्रू व थ्रस्ट पॅड (चित्र. क्र 6 अ,6 ब)
यामध्ये वेगवेगळ्या भागांची जोडणी केलेली असते. टॉमी (एक छोटी दांडी), खास बनवलेला स्क्रू व थ्रस्ट पॅड अशा भागांनी हा बनवलेला असतो. थ्रस्ट पॅड हे स्क्रूवर पिन किंवा सरक्लिपच्या साहाय्याने बसवलेले असते व हे स्क्रूवर मुक्तपणे हलत असते आणि यामुळेच कार्यवस्तू परिणामकारकपणे घट्ट पकडली जाते.
अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्क्रू च्या आकाराचे (D1) व वेगवेगळ्या लांबीचे (I5) असे हे भाग तयार करून ठेवता येतील व गरजेप्रमाणे वापरता येतील. हा स्क्रू हाताने वापरायचा असतो व त्यामुळे कार्यवस्तू मर्यादित बलाने पकडली जाते.
स्क्रू व पाम ग्रिप (चित्र. क्र 7 अ,7 ब, 7क)
पाम ग्रिप अॅल्युमिनियम किंवा प्लॅस्टिकच्या बनवलेल्या असतात. स्क्रूच्या मापाप्रमाणे त्या एकमेकांमध्ये बसतील असे यंत्रण करून तयार भाग भांडारात ठेवलेले असतात. पाम ग्रिप हा भाग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कामगाराच्या हाताला टॉमीप्रमाणे पाम ग्रिप बोचत नाही. प्रमाणित बलापेक्षा जास्त बलाने कार्यवस्तू कधीही आवळली जात नाही. टॉमीला मात्र पाईप लावून जास्त बल लावले जाऊ शकते, ज्यामुळे कदाचित कार्यवस्तू खराब होऊ शकते.
नर्ल नॉब / नट
चित्र. क्र 8 अ व 8 ब मध्ये हा भाग दाखविला आहे. यामध्ये सुद्धा स्क्रू बसवून कार्यवस्तू पकडता येईल. यामध्येसुद्धा प्रमाणाबाहेर बल लावता येणार नाही. पण जर वारंवारिता जास्त असेल तर मात्र कर्मचाऱ्याच्या बोटांना हुळहुळल्यासारखे जाणवेल व त्रास होईल.
वरील 3 प्रकारच्या पद्धतीत- टॉमी स्क्रू, पाम ग्रिप, नर्ल नॉब / नट या सगळ्याच पद्धती गरजेप्रमाणे वापरल्या जातात. एक खास फायदा असा की पान्याचा वापर नसल्यामुळे कार्यवस्तू पकडण्याच्या वेळेत बचत होते.
पक्के आधार - कास्टिंग व फोर्जिंग साठी: (चित्र क्र. 9)
साधारणपणे कार्यवस्तूवर पहिले यंत्रण करताना या प्रकारचे आधार वापरले जातात. अशा प्रकारच्या आधाराचा वरील पृष्ठभाग खडबडीत (डायमंड सरेशन) असतो. जेव्हा कार्यवस्तू पकडली जाते तेव्हा या खडबडीत पृष्ठभागामुळे ती घट्ट पकड घेते व त्यामुळे ती हलू शकत नाही. हे भाग हार्ड केलेले असतात.
कठीण गुंडी (हार्ड बटन) (चित्र क्र. 10)
अशा प्रकारच्या हार्ड बटनचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेषतः इन्स्पेक्शन फिक्श्चरला जवळ जवळ 100% अशा प्रकारची बटन लावलेली असतात. फिक्श्चरची तळातील प्लेट नरम असल्याने, खालचा पृष्ठभाग खराब झाल्यास इन्स्पेक्शन फिक्श्चरचे कॅलिब्रेशन बरोबर होत नाही. ही बटन वापरल्यामुळे पृष्ठभागाचे संरक्षण होते. स्क्रूच्या साहाय्याने तळाच्या प्लेटला खालच्या बाजूस ही बटन बसविली जातात.
लिफ्टिंग हँडल
लिफ्टिंग हँडल्स वजनाने कमी असलेल्या फिक्श्चरसाठी वापरली जातात. चित्र. क्र.11 अ मध्ये धातूचे हँडल दाखविले आहे, जे दोन स्क्रू व वॉशरच्या साहाय्याने बसविले जाते.याची उंची (h) व लांबी (l)ठरविताना कामगाराची बोटे आतमध्ये सहजपणे जातील अशी
ठेवलेली असते.
चित्र क्र. 11 ब मध्ये प्लॅस्टिकचे हँडल दाखविलेले आहे. हे बहुतेकवेळा काळ्या रंगाचे असते. प्लॅस्टिकचे असल्यामुळे हाताला इजा होण्याचा धोका कमी असतो. दोन्ही प्रकारची हँडल्स टेम्प्लेट, हाताने ठेवायच्या जिग प्लेट, छोटी इन्स्पेक्शन फिक्श्चर इत्यादी वस्तूंसाठी वापरली जातात.
अजित देशपांडे यांना जिग्ज आणि फिक्श्चर्स या क्षेत्रातील जवळपास 36 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर, ग्रीव्हज् लोम्बार्डिनी लि., टाटा मोटर्स अशा विविध कंपन्यांत काम केले आहे. विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तसेच ARAI येथे ते अतिथी प्राध्यापक आहेत.