झेड म्हणजे’झीरो डिफेक्ट, झीरो इफेक्ट’ असलेले उत्पादन
”मी आपल्या देशातील तरुणांना आणि छोट्या उद्योजकांना अशी आग्रहाची विनंती करतो की, आपण आपल्या कामात किमान दोन बाबतीत तरी अजिबात तडजोड करू नका. आपण अशा वस्तू निर्माण करा ज्यात शून्य दोष (झीरो डिफेक्ट) असतील आणि त्यांच्या निर्मिती प्रक्रियेमुळे पर्यावरणावर शून्य परिणाम (झीरो इफेक्ट) होईल.”-पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्यांचा ‘मेक इन इंडिया’ हा संदेश प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सरकारी स्तरावर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कशाप्रकारे साहाय्य आणि प्रोत्साहन दिले जाईल हे बारकाईने पाहायचे असल्यास https://www.zed.org.in/ या वेबसाईटवर माहिती मिळेल.
जर कोणत्याही देशाची सातत्याने प्रगती होताना दिसली, तर त्यात उत्पादन क्षेत्राचा सिंहाचा वाटा असतो, हे आपल्याला जपान, कोरिया,चीन या देशांच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसते. त्यासाठी आपल्या देशात पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. उत्पादन क्षेत्राला अनुकूल असे औद्योगिक धोरण बनवण्यासाठी सरकारतर्फे तीन मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले गेले.
1. भारतात व्यवसाय करणे सुलभ व्हावे
2. स्रोत सामग्री (कच्चा माल), यंत्रभाग आणि सेवा यांच्या गुणवत्तेविषयी विेशासार्हता हवी
3. कार्यक्षम मानव संसाधने उपलब्ध असावी.
याला मूर्त स्वरूप देण्यासाठी क्यूसीआय आणि एमएसएमई मंत्रालय यांनी आखलेल्या संयुक्त योजनेचे नाव आहे, ’झेड - झीरो
डिफेक्ट - झीरो इफेक्ट’
या उपक्रमाच्या अंतर्गत औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना ’झेड’ प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र त्या कंपनीच्या उत्पादनात शून्य दोष आहेत आणि त्यांच्या निर्मितीमुळे पर्यावरणावर शून्य (नकारात्मक) परिणाम झाला आहे, याची हमी देईल. हे प्रमाणपत्र मिळालेल्या कंपन्यांचा माल विकत घेण्यात परदेशी किंवा देशातील कंपन्यांना एक वेगळीच विेशासार्हता वाटेल.
दृष्टिकोन
भारत हे संपूर्ण जगाला वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा करणारे अग्रगण्य राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाने उत्पादनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ही योजना राबवणे.‘मेक इन इंडिया’ या मूलमंत्राचा पाठपुरावा करून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे.
उद्देश
• भारतात एक उत्कृष्ट दर्जाची औद्योगिक संस्कृती विकसित करणे.
• ग्राहकलक्षी दृष्टिकोन आवश्यक
• निर्माण केलेली कोणतीही वस्तू अपेक्षेनुसारच बनली पाहिजे
• गुणवत्तेच्या आधारावर शून्य अस्वीकृती
• कोणत्याही प्रकारची नासाडी/अपव्यय न होता नैसर्गिक तसेच अन्य सर्व संसाधनांचा पुरेपूर उपयोग
• निर्मिती प्रक्रियेत योग्य काळजी घेतल्याने हवा, पाणी व पर्यावरण यांचे शून्य प्रदूषण आपल्या औद्योगिक क्षेत्रात आयएसओ (कार्यपद्धती),
बीआयएस (गुणवत्ता) आणि सीईई (ऊर्जा कार्यक्षमता) अशी प्रमाणपत्रे आधीपासूनच प्रचलित असताना, हे नवे झेड प्रमाणपत्र कशासाठी असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. गुणवत्ता, उत्पादकता, ऊर्जा कार्यक्षमता, पर्यावरण उपशमन(मिटिगेशन), आर्थिक पत, मानव संसाधन, डिझाईन अशा उत्पादन आणि त्याची प्रक्रिया यांच्या सर्व पैलूंचे समग्र मूल्यांकन आणि प्रमाणन करणारे झेड हे एकमेव विेशासार्ह प्रमाणपत्र आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे मूल्यांकन करण्यासाठी 50 निरनिराळे पॅरामीटर निश्चित केले आहेत. प्रमाणपत्र देण्यासाठी झेड मॅच्युरिटी असेसमेंट मॉडेल विकसित केले आहे. सुरक्षा क्षेत्रातील वस्तूंसाठी 25 पॅरामीटर असलेले एक अतिरिक्त डिफेन्स असेसमेंट मॉडेलही विकसित केलेले आहे. ही प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू केल्याने उद्योगातील कार्यक्षमता वाढेल, संसाधनांची नासाडी कमी होईल आणि गुणवत्तेविषयीची जाणीव निर्माण होईल.
झेड प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया
1. नोंदणी (रजिस्ट्रेशन) https://www.zed.org.in या वेब पोर्टलवर विनाशुल्क नाव नोंदणी
2. ऑनलाईन स्वयं-मूल्यांकन (सेल्फ - असेसमेंट) - याच पोर्टलवर एका चेक लिस्टद्वारे स्वतःच्या उद्योगाचे मूल्यांकन स्वतःच करायचे असते.
3. डेस्कटॉप मूल्यांकन- यानंतर क्यूसीआय त्यांचा एक निष्णात प्रतिनिधी पाठवून निरनिराळ्या निकषांवर कंपनीचे मूल्यांकन करेल. यात समाधानकारक कामगिरी दिसली, तर ऑनसाईट मूल्यांकनाची शिफारस केली जाईल.
4. ऑनसाईट (कार्यस्थळावरील) मूल्यांकन-दोन तज्ज्ञांकरवी कंपनीच्या कार्यस्थळावर मूल्यांकन केले जाईल. यापैकी एक पर्यावरणाचे तज्ज्ञ असतील तर दुसरे त्या उत्पादन क्षेत्रातील जाणकार असतील. सुरक्षा संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मूल्यांकनासाठी येणाऱ्या तज्ज्ञाला त्या उत्पादनाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असेल. या मूल्यांकनाच्या अहवालानुसार विशिष्ट रेटिंगचे प्रमाणपत्र दिले जाईल.
उदाहरणार्थ, असे समजा की, एका कंपनीचे 35 निकषांवर मूल्यांकन केले गेले. त्यातील 18 निकषांमध्ये 1 ते 5 या मोजपट्टीवर 5 गुण मिळाले. 12 निकषांमध्ये 4 गुण आणि 5 निकषांमध्ये 3 गुण मिळाले. तर 18X5 + 12 X 4 + 5 X 3 असे एकंदर 153 गुण होतील. त्याला 35 ने भाग दिल्यावर 4.37 असे उत्तर येईल. याचा अर्थ असा की, या कंपनीला 5 पैकी 4.37 गुण मिळाले आहेत.
क्यूसीआयने नियुक्त केलेल्या एजन्सीद्वारा एजन्सीदिलेली रेटिंग तक्ता क्र.1 मध्ये दिल्याप्रमाणे असतील.
समजा एखाद्या कंपनीचे रेटिंग कांस्य किंवा रौप्य आहे आणि त्यांना आपले रेटिंग सुधारायची इच्छा आहे. अशा कंपन्यांना क्यूसीआयतर्फे सल्ला आणि मार्गदर्शन घेता येईल.त्यानंतर या कंपन्या स्वतःचे पुनर्मूल्यांकन करून घेऊ शकतील. वर उल्लेख केलेल्या पोर्टलवर विविध उद्योगक्षेत्रात उत्पादन करणाऱ्या आणि झेड प्रमाणपत्र मिळालेल्या 30-35 कंपन्यांची यादी पाहायला मिळेल.
याची अंमलबजावणी करण्यासाठी तक्ता क्र.1 मध्ये दाखवल्यानुसार व्यवस्था केली आहे. क्यूसीआय आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांच्यामधला दुवा म्हणून एका बाजूने प्रशिक्षक आणि सल्लागार यांचे गट काम करतील, तर दुसऱ्या बाजूने मान्यताप्राप्त एजन्सीमार्फत या उद्योगांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल. या सर्व कामावर भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे नियंत्रण असेल.
Z प्रमाणपत्राचे फायदे
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या संस्था/कंपन्यांना पुढील लाभ मिळतील.
• कर्ज मिळण्यात सुलभता - भारत सरकारने झेड प्रमाणपत्र योजनेत सहभागी होणाऱ्या पहिल्या 22,222 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगसंस्थांना आर्थिक साहाय्य (सबसिडी) म्हणून एकंदर 491 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन सेल्फ-असेसमेंट विनाशुल्क असेल. डेस्क टॉप असेसमेंट, साईट असेसमेंट, री-असेसमेंट आणि डिफेन्स असेसमेंट यांच्यासाठी 50 ते 80 टक्के सवलत दिली जाईल.
• विश्र्वासार्ह व्हेन्डर्सची उपलब्धता - भारतामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक परदेशी कंपन्यांना झेड प्रमाणपत्र मिळालेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांबरोबर काम करण्यात आत्मविेशास वाटेल.
• पर्यावरणाचे रक्षण - हे प्रमाणपत्र मिळालेल्या उद्योगसंस्था जबाबदार उत्पादक असतील.
• पुरस्कार व बक्षिसे - उत्तम दर्जाची कामगिरी करणाऱ्या उद्योगसंस्थांना क्यूसीआय आणि एमएसएमईतर्फे पुरस्कृत केले जाईल.
• सर्वोत्तम कार्यपद्धती - हे प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सामोरे जावे लागेल आणि त्या स्तरावर टिकाव
लागण्यासाठी सर्वोत्तम कार्यपद्धती विकसित केली जाईल.
• प्रतिष्ठा आणि ब्रँड निर्मिती - हे प्रमाणपत्र मिळालेल्या कंपन्यांना एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त होईल.
प्रारंभी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या अंतर्गत येणाऱ्या 25 उद्योगक्षेत्रांमध्ये झेड प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहित केले जाईल. त्यासाठी आवश्यक प्रचार, प्रसार आणि साहाय्य देण्यात येईल. चांगल्या दर्जाची कामगिरी करून दाखवणाऱ्या उद्योजकांना पुरस्कार दिले जातील आणि त्यांच्या यशाच्या कहाण्या प्रसिद्ध केल्या जातील. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा प्राप्त करणे हे लक्ष्य ठेवून या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आवश्यक मार्गदर्शन दिले जाईल. उच्च दर्जाचे काम करणाऱ्या कारखान्यांना भेट दिली जाईल. त्यातून सर्वोत्तम कार्यपद्धती अवलंबण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळवता येईल. परदेशी कंपन्या अथवा गुंतवणुकदारांबरोबर तांत्रिक ज्ञान शेअर करण्याचे करार करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
सुभाष फडके दिल्ली IIT चे अभियंता आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराथी भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. तंत्रविषयक पुस्तके, ऑपरेटिंग मॅन्युअल्स, लेख अनुवाद तसेच 11 वी 12वी च्या विज्ञान शाखेची पाठ्यपुस्तके त्यांनी लिहिली आहेत.