ऑटो गेजिंगमधील नियंत्रक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    12-May-2018   
Total Views |
 
ou
पुण्याजवळील तळेगाव येथील औद्योगिक वसाहतीत आमच्या ‘व्हर्सा कंट्रोल्स’ या लघु उद्योगाची 2002 साली सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही तापमान संवेदक (टेम्परेचर सेन्सर), आर्द्रता संवेदक (ह्युमिडिटी सेन्सर), लोड सेल्स, डिजिटल रीडआऊट (डी.आर.ओ.) सारख्या भागांचे उत्पादन घेत होतो. 2004 साली औरंगाबाद येथील ‘मायक्रॉनिक्स’ कंपनीसाठी तपासणी यंत्रणेमधील पहिले उत्पादन डी.आर.ओ.च्या रुपात तयार केले. त्याकाळी ते विक्रमी वेळात म्हणजेच 45 दिवसांत तयार करण्यात आले होते. त्यानंतर मात्र आम्ही तपासणी व्यवस्थेसाठी लागणाऱ्या गेजिंग यंत्रणेवर आमचे सर्व लक्ष केंद्रित केले. 2013 साली पहिले ‘ऑक्टागेज’ नावाचे उत्पादन विकसित करून आम्ही ते निर्यात केले.

सध्या आमच्या या लघु उद्योगात मुख्यतः यंत्रणाद्वारे तयार केलेल्या यंत्रभागाच्या स्वयंचलित मोजमापन उपकरणांना जोडले जाणारे तपासणीचे डिस्प्ले आणि त्याला आवश्यक असणारी इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा डिझाईन करून बनवितो. या यंत्रणेचे कामकाज प्रामुख्याने लिनिअर व्हेरीएबल डिफरन्शिअल ट्रान्सफॉर्मर (एल.व्ही.डी.टी.) तंत्रज्ञान आणि पिझो तंत्रज्ञान यांवर आधारित असते. यामध्ये मोजमापन उपकरणापासून मिळणारे एका दिशेतील (लिनिअर) हालचालीचे संदेश एके ठिकाणी स्वीकारले जातात आणि त्यावर योग्य ती प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ग्राहकाच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या बहुविध (मल्टीपल) पैलूंमध्ये त्यांचे रूपांतर केले जाते. मशिनवर लावलेल्या डिस्प्लेवर या सर्व गोष्टी तिथे काम करणाऱ्या कामगाराला अगदी सहज दिसू शकतात.



ou

वरील संकल्पनेवर आधारित ‘न्यूगेज’ नावाचे उत्पाद (चित्र क्र. 1) आम्ही 2016 साली विकसित करून, आयात होणाऱ्या उत्पादाला देशी पर्याय उपलब्ध केला. ‘हिरो मोटर्स’ कंपनीमध्ये हे उत्पाद प्रथम वापरण्यात आले. जर्मन कंपनीकडून आयात होणाऱ्या एका उपकरणाला न्यूगेजने समर्थ पर्याय दिला. जिथे हवेच्या दाबावर चालणारी तपासणी उपकरणे (न्युमॅटिक गेज) वापरली जातात, तिथे न्यूगेज अतिशय चपखल काम करते. या लेखामध्ये वाचकांसाठी आम्ही या ‘न्यूगेज’ उत्पादनाची संकल्पना, रचना आणि त्याचा वापर याबद्दल थोडक्यात माहिती
देत आहोत.


‘सिस्टिम ऑन चिप’ (एस.ओ.सी.) या तंत्रज्ञानावर न्यूगेज विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये डिजिटल, ॲनालॉग, मिश्र संदेश, रेडिओ फ्रिक्वेन्सीची कार्ये एकत्रित हाताळली जातात. यामध्ये संगणक न वापरता संगणकासारखे कार्य केले जाते. संगणकाचा वापर टाळल्यामुळे त्यामध्ये व्हायरस शिरून संपूर्ण यंत्रणा बिघडवून टाकणे, हार्ड डिस्क क्रॅश होणे अशा संभाव्य गोष्टींची शक्यता यामुळे नाहीशी होते.

ou


चित्र क्र. 2 मध्ये आराखड्याच्या स्वरुपात एका स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेची रचना मांडलेली आहे. यामध्ये न्यूगेजला जोडलेली वेगवेगळी वर्क स्टेशन आणि त्याठिकाणी होणारी कार्ये थोडक्यात मांडली आहेत.

सी.एन.सी. मशिन : सी.एन.सी. मशिनवर प्रत्यक्ष यंत्रण प्रक्रिया आणि त्याचबरोबर कार्यवस्तुची वेगवेगळ्या निकषांवर अपेक्षित असलेली तपासणी होते. तुलनात्मक मोजमाप (कंपॅरेटिव्ह मेजरमेंट), तसेच ड्रॉईंगबरोबर तुलना करून दिलेल्या टॉलरन्समध्ये कार्यवस्तू आहे की नाही हे सांगितले जाते. यामुळे प्रत्यक्ष यंत्रणावेळी तयार झालेली कार्यवस्तू स्वीकृत आहे की टाकाऊ हे वेळीच समजते. येथून एकूण उत्पादन केलेल्या कार्यवस्तू, तपासलेल्या कार्यवस्तू, त्यातील स्वीकृत किती, दुरुस्तीसाठी किती आणि टाकाऊ किती याचे सर्व संदेश ठराविक पल्समार्फत न्यूगेजला दिले जातात आणि न्यूगेजकडून वेगवेगळे आदेश वेगवेगळ्या ठिकाणी ग्राहकाच्या गरजेनुसार दिले जातात. यापैकी काही आदेश मशिनच्या नियंत्रकाकडे, काही रोबोकडे आणि काही माहिती संग्रहित करण्यासाठी दिले जातात.

रोबो : मशिनवर प्रत्येक आवर्तन (सायकल) पूर्ण झाल्याचे संदेश घेऊन यंत्रण झालेली कार्यवस्तू उचलून तपासणीसाठी देणे आणि यंत्रण करावयाची कार्यवस्तू योग्य मशिनवर लावणे हे आदेश न्यूगेजमार्फत रोबोला दिले जातात. एवढेच नाही तर तपासणी झाल्यानंतर स्वीकृत आणि टाकाऊ कार्यवस्तू ठरवून दिलेल्या जागी ठेवण्याचे आदेशदेखील त्यात समाविष्ट असतात.
 
गँट्री : एखाद्या बहुउत्पाद (मल्टी प्रॉडक्ट) सेटअपवर एकापेक्षा जास्त मशिनवर स्वयंचलनाद्वारे यंत्रण प्रक्रिया होत असेल, तर एका मशिनवरून दुसऱ्या मशिनवर योग्य त्या कार्यवस्तू योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी नेण्याचे आदेशदेखील या रचनेतून देता येतात.
• मार्किंग मशिन आणि बारकोड रीडर : तयार केलेली कार्यवस्तू तपासणीतून स्वीकृत असल्याचे संदेश मिळाल्यानंतर तिचा ओळख नंबर (आयडेंटिफिकेशन नंबर) आणि गरजेनुसार तपासणीचे आकडे, त्या कार्यवस्तूवर कोरण्याचे आणि त्यावरून बारकोड निर्माण करण्याचे आदेश न्यूगेजकडून दिले जातात.
 
मध्यवर्ती सर्व्हर : प्रत्येक कार्यवस्तुच्या तपासणीच्या वेळी मिळालेले संदेश सर्व्हरकडे पाठविले जातात. त्यानंतर त्याचे निरनिराळ्या पद्धतीने विश्लेषण करून ग्राहकाच्या गरजेनुसार प्रक्रिया क्षमतेच्या (प्रोसेस कॅपॅबिलिटी) निरनिराळ्या निकषांवर माहितीचे रूपांतर केले जाते. होणाऱ्या उत्पादनाचा वरचेवर मागोवा घेणे किंवा ग्राहकाकडून विक्रीपश्चात येणाऱ्या तक्रारींचे योग्य विश्‍लेषण करण्याच्या दृष्टीने समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी ही सर्व माहिती संग्रहित करून ठेवण्याचे आणि योग्य वेळी ती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने न्यूगेज आपले काम बिनचूक आणि तंतोतंत करते. या संकल्पनेने बनविलेले आमचे सुरुवातीचे उत्पादन ‘ज्योती सी.एन.सी.’ कंपनीने बनविलेल्या सी.एन.सी. मशिनवर (चित्र क्र. 3) बसविले आहे.


ou


अशाप्रकारच्या इतर उत्पादांच्या रचनेत वेगवेगळे डिस्प्ले, कन्व्हर्टर आणि फिल्टर यांच्या वापरामुळे जमिनीवर किंवा मशिनवर व्यापली जाणारी जागा सुमारे 20-25 स्क्वेअर फूटच्या आसपास असते. त्या तुलनेत न्यूगेजने व्यापलेली जागा जेमतेम 2-3 स्क्वेअर फूट एवढीच असते.

न्यूगेज हे आजच्या काळाला साजेशा इंडस्ट्री 4.0 च्या संकल्पनेत चपखल बसणारे उपकरण ठरले आहे. यामध्ये दोन आकडी म्हणजे जास्तीतजास्त 99 प्रकारच्या आज्ञावली साठवून ठेवता येतात. शिवाय कार्यवस्तुंची माहिती, मोजमापाची माहिती केवळ ती आज्ञावली पडद्यावर मागवून त्वरित पाहता येण्याची सुलभता आणि लवचिकतादेखील आहे. एखादी अधिकृत व्यक्ती गरजेनुसार काही गणिती समीकरणे त्यामध्ये टाकून स्वत:ची छोटीशी आज्ञावलीदेखील तयार करू शकते. स्वयंचलित आवर्तन (ऑटो सायकल) किंवा मोजमापन आवर्तन (मेजरमेंट सायकल) अशा आज्ञा देऊन एकाचवेळी किंवा एकापाठोपाठच्या मोजण्या न्यूगेजमार्फत सहज शक्य होतात.


ou

केवळ आमची उत्पादनेच दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण नाहीत, तर ती त्या पातळीवर नेण्यासाठी आमचा कारखानादेखील त्याच तोडीचा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्लॅस्टिक किंवा सिंथेटिक कपड्याच्या वापरामुळे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या शरीरामध्ये स्थितिक प्रभार (स्टॅटिक चार्ज) वरचेवर निर्माण होत असतात आणि ते जमिनीमार्फत वाहून नेले जातात आणि डिस्चार्ज होतात. असे डिस्चार्ज जर वापरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामार्फत झाले तर ते उपकरण तात्पुरते किंवा कायमस्वरुपी नादुरुस्त होऊ शकते.
 
दुर्दैवाने बऱ्याचवेळा ते नुकसान दृश्य स्वरुपात नसते किंवा लक्षात येत नाही. परंतु त्याचे दूरगामी परिणाम उपकरणांच्या अनियंत्रित आणि बेभरवशाच्या कार्यात होऊ शकतात. हे टाळण्यासाठी संपूर्ण कारखान्यात अँटिस्टॅटिक फ्लोअरिंग सुचविले जाते. आम्ही अभिमानाने सांगतो की, फ्लोअरिंगच्या खालून संपूर्णपणे तांब्याच्या पट्ट्यांची जाळी बसवून तिचे एक कनेक्शन प्लँटच्या बाहेर काढून त्याचे अर्थिंग करून आमचा संपूर्ण कारखाना अँटिस्टॅटिक केला आहे. (चित्र क्र. 4)

ou

आमच्या या उपकरणाला 2016 साठीचा ‘पारखे’ पुरस्कार मिळाला आहे. सुमारे 200 ग्राहक आज हे उपकरण वापरत असून, त्यापैकी पुणे येथील ‘भारत फोर्ज’ कंपनीमध्ये पुरविलेली न्यूगेज यशस्वीपणे कार्यरत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@