मशिनची दुरुस्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    09-May-2018   
Total Views |

Repair of the machine
 
सी.एन.सी. मशिनची किंवा पारंपरिक मशिनची किंमत नेहमीच जास्त असते. काही सी.एन.सी. मशिनची किंमत तर कोटींमध्ये असते. सी.एन.सी. मशिनचे फायदे म्हणजे त्यातून मिळणारी उत्पादकता आणि तयार होणाऱ्या उत्पादनांची गुणवत्ता आणि अचूकता जास्त असते. मशिन जोपर्यंत सुरळीतपणे चालते तोपर्यंत सर्व काही छान असते, परंतु जेव्हा मशिनमध्ये काही बिघाड होतो आणि त्यातील खरा दोष लक्षात येत नाही तेव्हा मात्र कंपनीला फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. परिणामी उत्पादनातही अडथळा निर्माण होतो. मशिनबरोबर पुरविल्या जाणाऱ्या मशिन दुरुस्तीच्या तक्त्यांमध्ये साधारणपणे मशिन दुरुस्तीविषयक प्राथमिक सूचना दिलेल्या असतात. परंतु जर काही किचकट, अवघड बिघाड झाले, तर त्या तक्त्यांचा मर्यादित उपयोग होतो. असे बिघाड दुरुस्त करण्यासाठी मशिनच्या कार्यपद्धतीची सखोल माहिती असणे गरजेचे असते.
 
सी.एन.सी. मशिनमध्ये यांत्रिक, विद्युत यांत्रिक, हायड्रॉलिक, न्युमॅटिक आणि संगणक इत्यादी सर्व प्रकारच्या अभियांत्रिकी शाखांचा वापर केलेला असतो.
 
त्यामुळे दुरुस्ती किंवा देखभाल करणाऱ्या अभियंत्याला या सर्व शाखांची किमान ओळख असणे आवश्यक असते. एका कंपनीत मशिनमधील बिघाडाचे योग्य निदान योग्य वेळेत झाल्यामुळे कंपनीचे 5 लाख रुपये वाचले. त्याशिवाय मशिनही बंद ठेवावे लागले नाही. ते कसे शक्य झाले, याबाबत आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
 
केस स्टडी
 
एका कंपनीने 450 टनाचे, 4 मीटर रुंद प्लेटवर काम करता येईल असे एक हायड्रॉलिक बेंडिंग प्रेस बसविले आहे. काही वर्षे मशिन विनाबिघाड, विनातक्रार सुरळीतपणे चालू होते. सहा महिन्यांपूर्वी मशिनमध्ये ’रॅम’ खाली येताना तो सरळ न येता तिरका होऊन येत होता आणि अडकत होता.
 
या प्रेसमध्ये दट्ट्याच्या (पिस्टन) हालचाली दोन हायड्रॉलिक सर्व्हो व्हॉल्व्हच्या मदतीने सिन्क्रोनाईज केलेल्या असतात. मशिनच्या स्थितीची (पोझिशनची) माहिती लिनिअर स्केलवरून घेतली जाते. दोन्हीतील फरक (विसंगती) सी.एन.सी. नियंत्रकाला (कंट्रोलर) पुरविला जातो. सी.एन.सी. नियंत्रक अशा रीतीने व्हॉल्व्ह थ्रॉटल करतो की, त्यामुळे ऑईलचा प्रवाह आणि वेग नियंत्रित होतो. त्याबरोबरच प्रेसच्या दोन्ही बाजू सिन्क्रोनाईज हालचाल करतात. दुरुस्तीसाठी आलेल्या तंत्रज्ञाने पुढील प्राथमिक चाचण्या केल्या.
 
• हायड्रॉलिक पंप योग्य रीतीने चालतो आहे का?
 
• योग्य दाब निर्माण होतो आहे का?
 
• फिल्टर भरलेले आहेत की नाहीत इत्यादी.
 
या सर्व गोष्टी योग्य रीतीने चालू आहेत, याची खात्री झाल्यावर प्रेसच्या उत्पादकाच्या दुरुस्ती करणाऱ्या अभियंत्याला बोलविण्यात आले. त्या अभियंत्याने तर्कशुद्ध पद्धतीने कोणत्याही अधिक तपासण्या न करता ’दोन्हीपैकी एक सर्व्हो व्हॉल्व्ह बिघडली असल्याचे आणि ती दुरुस्त होत नसल्याने बदलावी लागेल’, असे सांगितले. कंपनीने त्या उत्पादकाला नव्या व्हॉल्व्हची किंमत कळविण्यास सांगितले तेव्हा, ’तशी व्हॉल्व्ह सध्या उपलब्ध नसल्यामुळे त्या व्हॉल्व्हची नवीन आवृत्ती मिळेल’, असे सांगितले.
 
त्यामुळे दोन्ही सर्व्हो व्हॉल्व्ह त्यांच्या बसविण्याच्या बेस प्लेटसह बदलाव्या लागतील. त्याची किंमत 5 लाख रुपये असल्याचे सांगितले गेले. खर्च करण्यापूर्वी ही समस्या अभ्यासण्यासाठी माझ्याकडे देण्यात आली. मशिनमधील दोष शोधण्याची एक पद्धत असते. मशिनबरोबर दिलेल्या देखभाल पुस्तिकेत (मेंटेनन्स मॅन्युअल) मशिनचे इलेक्ट्रिकल सर्किट, मेकॅनिकल गिअर ट्रेन, सब-ॲसेम्ब्लीची योजनाबद्ध (स्किमॅटिक) माहिती दिलेली असते. देखभाल करणाऱ्या अभियंत्याला (मेंटेनन्स इंजिनिअर) सर्किटमध्ये वापरली जाणारी चिन्हे (सिम्बॉल) आणि सर्किटवरून मशिन काम कसे करते, याचे ज्ञान असणे आवश्यक असते.
 
हा दोष शोधण्यात प्रथम निरनिराळे सोलेनॉईड व्हॉल्व्ह सर्किटमध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रेसच्या अप, फास्ट डाऊन, प्रेसिंग या सायकलमध्ये चालू, बंद (ऑन, ऑफ) होतात. याची खात्री करून घेतली.

Representative hydraulic circuit of press 
 
चित्र क्र.1 मध्ये सिलिंडरकडे ऑईल जाण्याचा मार्ग लाल रंगात आणि टँककडे येणारा परतीचा मार्ग निळ्या रंगात दाखविला आहे. या मार्गात येणाऱ्या आणि त्याच्याशी संबंधित अशा सर्व व्हॉल्व तपासण्याचे ठरविले. हे करत असताना रॅमला धरून ठेवणारी (रॅम होल्डिंग) एका बाजूचा व्हॉल्व उघडण्यात आला. तो चांगल्या अवस्थेत होता. त्यानंतर दुसऱ्या बाजूचा व्हॉल्व्ह तपासणीसाठी उघडून पाहिला असता असे लक्षात आले की, त्याच्यातील एक ’O’ रिंग कापली गेली आहे. तसेच, त्या ’O’ रिंगचा एक तुकडा व्हॉल्व्हच्या छिद्रात अडकल्यामुळे व्हॉल्व्हचे काम व्यवस्थित होत नव्हते. म्हणून ती ’O’ रिंग बदलण्यात आली आणि व्हॉल्व्ह पूर्णपणे व्यवस्थित करून पुन्हा बसविण्यात आला. वरवर पाहता ही दुरुस्ती छोटीशी वाटत असली तरी, ती अतिशय महत्त्वाची ठरली. या दुरुस्तीनंतर हा प्रेस गेले सहा महिने विनातक्रार काम करत आहे. बदललेल्या ’O’ रिंगची किंमत 20 रुपये होती. याचा अर्थ असा की, 5 लाख रुपयांचा संभाव्य खर्च बारकाईने लक्ष घातल्यामुळे शून्यावर आला.

Press bedding machine 
 
या लेखांच्या मालिकेत मी अशीच आणखी काही उदाहरणे आपल्यासमोर मासिकाद्वारे मांडणार आहे. यामागचा हेतू हा, मध्यम आकाराच्या उद्योगात दुरुस्ती तंत्रज्ञांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे आणि देखभाल (दुरुस्ती) विभागाची योग्य रचना (मांडणी - उभारणी) करणे गरजेचे आहे, हे सांगण्याचा आहे. या लेखमालिकेच्या पुढील लेखात आपण लघु उद्योगामध्ये मशिन चालकाने मशिनच्या दुरुस्तीमध्ये काय भूमिका बजावायची असते, याची माहिती घेऊ.
 
अनिल गुप्ते इलेक्ट्रिकल अभियंते असून, त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील 53 वर्षांचा अनुभव आहे. टाटा मोटर्समधील मेंटेनन्स आणि प्रोजेक्टस् संबंधित प्लांट इंजिनिअरिंगमधील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून सध्या ते तांत्रिक सल्लागार म्हणून काम करतात.
@@AUTHORINFO_V1@@