कारखान्यामध्ये तयार झालेले उत्पादन ग्राहकाकडे सुस्थितीत जावे असे प्रत्येक कारखानदाराला वाटत असते, मात्र त्याचवेळी दुसरीकडे यासाठी आवश्यक असलेल्या आणि महत्त्वाच्या पॅकेजिंग घटकाला कारखानदार दुय्यम स्थान देतात, किंबहूना त्याकडे दुर्लक्ष करतात. अयोग्य पॅकेजिंगमुळे उत्पादन खराब (डॅमेज) होण्याचे, परिणामी ते ग्राहकाकडून नाकारले जाण्याची शक्यता असते, ही बाब अनेकवेळा कारखानदार लक्षात घेत नाहीत. त्यामुळे काहीवेळा मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
पॅकेजिंग विभागात भरपूर प्रकार (सेगमेंट) आहेत. उदाहरणार्थ, औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनांसाठी लागणारे पॅकेजिंग, FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुडसाठीचे पॅकेजिंग, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, यांत्रिकी विभागातील उत्पादने, द्रव पदार्थांचे पॅकेजिंग अशा निरनिराळ्या प्रकारच्या उत्पादनांसाठी विशिष्ट प्रकारचे पॅकेजिंग करावे लागते. FMCG उत्पादनांना A श्रेणीमध्ये गणले जाते, तर औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनांना C श्रेणीमध्ये गणले जाते. FMCG गटातील उत्पादन हे थेट ग्राहकाकडे जाणारे असल्यामुळे उत्पादन तयार होण्यापूर्वीच त्याचे आकर्षक पॅकेजिंग कसे करता येईल यावर अभ्यास केला जातो, जेणेकरून या पॅकेजिंगमुळे उत्पादनाची विक्री वाढेल. त्यामुळे FMCG उद्योगात पॅकेजिंग या विषयाला महत्त्वाचे स्थान आहे. याउलट औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनांचा विचार केला, तर हे उत्पादन थेट ग्राहकाला द्यायचे नसते, त्याची थेट जाहिरातदेखील करायची नसते. ही उत्पादने केवळ एकाच ठरलेल्या ग्राहकाला द्यावयाची असतात. त्यामुळे ग्राहक आणि उत्पादकदेखील पॅकेजिंगच्या दृष्टीने या उत्पादनांचा पाहिजे तितका विचार करताना दिसत नाहीत. (उदाहरणार्थ, उत्पादनाचा आकार, त्याचे मूल्य, त्यातील महत्त्वाचे भाग जपण्यासाठी कसे पॅकेजिंग करणे आवश्यक आहे इत्यादी.) केवळ योग्य पद्धतीने पॅकेजिंग न केल्यामुळे उत्पादन आणि तो प्रकल्प पूर्णपणे ढासळू शकतो. हे टाळण्यासाठी या लेखात आपण लघु मध्यम उद्योगातील पॅकेजिंगचे महत्त्व, फायदे, पॅकेजिंग न केल्यामुळे होणारे तोटे, पॅकेजिंगचे विविध प्रकार, पॅकेजिंगचे नवीन तंत्रज्ञान, याविषयी माहिती घेणार आहोत.
पॅकेजिंगमध्ये लाकडी पॅकेजिंग, प्लायवूड पॅकेजिंग, हेवी ड्युटी कॉरूगेशन, मेटल असे विविध प्रकार आहेत. यंत्रण केलेली वस्तू ही कास्टिंग किंवा फोर्जिंगमधून केलेली असते. त्यामुळे धुळीपासून आणि गंजण्यापासून तिचे संरक्षण करावे लागते. वस्तू गंजल्यास ती पूर्णपणे निकामी होते. अयोग्य पॅकेजिंगमुळे वस्तूवर खड्डे पडणे, चरे पडणे, भेगा येणे अशा विविध प्रकारे ती वस्तू खराब होते. ग्राहकाकडून असे उत्पादन नाकारले जाते, परिणामी त्यात उत्पादकाला मोठे नुकसान सहन करावे लागते. हे टाळण्यासाठी उत्पादनाचा अभ्यास करून, त्याला अनुरुप असे डिझाईन करून पॅकेजिंग करणे ही आता काळाची गरज बनत आहे. यामुळे उत्पादन नाकारले जाण्याचे प्रमाण निश्चितच नियंत्रित करता येते असा अनुभव आहे.
पर्यावरणपूरक असलेले पॅकेजिंग
वर सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व प्रकारचे पॅकेजिंग जरी करून देत असलो तरी, ज्यावेळेला एखादी विशिष्ट वस्तू आमच्याकडे येते, तेव्हा आम्ही ग्राहकाला हेवी ड्युटी कॉरूगेशन वापरण्यास सुचवितो. उदाहरणार्थ, एखाद्या मशिनमध्ये अनेक छोटे छोटे यंत्रभाग असतात. त्यांच्या पॅकेजिंगसाठी हेवी ड्युटी कॉरूगेशन पद्धती फायदेशीर ठरते. जेव्हा आपले उत्पादन निर्यात होत असते, तेव्हा त्याने निर्यात व्यापारातील सर्व निकष पार पाडणे अनिवार्य असते. त्याचबरोबर पर्यावरणपूरक पॅकेजिंग असणे हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. वर्षानुवर्षे लाकडाचा वापर करून जे पॅकेजिंग (वुडन पॅकेजिंग) तयार केले जाते, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात होती. याचा पर्यावरणावर होत असलेल्या दुष्परिणामांचा अभ्यास करून पॅकेजिंगसाठी हेवी ड्युटी कॉरूगेशन पद्धतीचा वापर करण्यावर सध्या भर दिला जात आहे. या पॅकेजिंग पद्धतीतही झाडांचा वापर केला जातो, पण त्यासाठी विशेष प्रकारचे लाकूड असणार्या झाडांचे वृक्षारोपण केले जाते. त्या झाडाच्या लाकडापासून कागद तयार करून मग त्याचे बॉक्स केले जातात.
उत्पादनाचा अभ्यास आणि पॅकेजिंगचे डिझाईन
वस्तूचे योग्य पॅकेजिंग करण्यासाठी वस्तूबाबतची आवश्यक ती माहिती पॅकेजिंग करणार्याला पुरविणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, ही वस्तू देशात की परदेशातील ग्राहकाकडे जाणार आहे, वजन, आकार, कार्यवस्तूच्या कडा किती धारदार (शार्प एज) आहेत, त्याचा पृष्ठभाग कुठल्या दर्जाच्या फिनिशचा असणार आहे, एका बॉक्समध्ये किंवा एका कंटेनरमध्ये किती वस्तू बसवायच्या आहेत, वस्तूचा प्रवास काळ (ट्रान्झिट पिरियड) काय आहे, किती दिवसांनी पॅकेजिंग उघडले जाणार आहे, ते लाईनवर केव्हा जाणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती उत्पादकाने आम्हाला देणे आवश्यक असते. तसेच त्या वस्तूची 3D फाईल दिली तर अभ्यास करणे सोपे जाते. यामुळे वस्तू समजून घेऊन आणि ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊन अचूक मापे घेऊन बॉक्सचे डिझाईन तयार करता येते. हे करताना एक बॉक्स साधारण किती वजन सहन करू शकतो, 20 फूट कंटेनरमध्ये असे किती बॉक्स बसू शकतात, बॉक्सची लिफ्टिंग क्षमता किती ठेवायची, बॉक्सचा स्टॅटिक आणि डायनॅमिक लोड किती असला पाहिजे, वस्तूसाठी किती सपोर्ट लागणार आहे, त्याचे ओरिएंटेशन कसे असले पाहिजे, त्याच्या हालचाली कशा आहेत, पॉईंट लोड कुठे पाहिजे, हाताळणी करण्यासाठी कशा प्रकारचे उपकरण वापरायचे आहे इत्यादी. अशा सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. यासाठी 3D मॉडेलची फाईल अतिशय फायदेशीर ठरते. बॉक्सच्या आतमध्ये दुभाजक (सेप्रेटर किंवा कंपार्टमेंट) ठेवावे लागतात, जेणेकरून वेगवेगळे भाग (पार्ट) एकमेकांना घासले जात नाहीत. ही विशेष खबरदारी पॅकेजिंगमध्ये घेणे आवश्यक असते.
वस्तू तयार झाल्यानंतर वॉशिंग, क्लिनिंग, ऑईल डिपिंग, अतिरिक्त ऑईल काढून घेणे या सर्व प्रक्रिया केल्या जातात. हे करत असताना कुठेही मोकळ्या हातांनी कार्यवस्तूला स्पर्श करायचा नसतो. हातात योग्य ते हातमोजे घालूनच त्या वस्तूला हात लावायचा असतो, हे तत्व पाळले गेले पाहिजे. (कारण हाताचा घाम वस्तूला प्रदूषित करू शकतो.) ऑईलिंग झाल्यानंतर ती वस्तू VCI (व्होलाटाईल करोजन इनहिबिटर) पिशवीमध्ये हवाबंद (सील) केली जाते. हवाबंद करताना आतील हवा बाहेर काढणे गरजेचे असते. वस्तूच्या आकारापेक्षा पिशवी थोडीशी आकाराने मोठी घ्यावी लागते, कारण काही वस्तूंच्या कडा धारदार असतात. या कडांमुळे त्याचा स्पर्श झाला तरी ती पिशवी फाटू शकते. त्यानंतर डिझाईन केलेल्या बॉक्समध्ये ती वस्तू एका विशिष्ट पद्धतीने ठेवली जाते. (चित्र क्र. 1) वस्तूचे यंत्रण झाल्यानंतर त्यावर अँटी रस्ट ऑईल लावणे गरजेचे असते. यामुळे वस्तूचे धुळीपासून संरक्षण होते. या सर्व बाबींचा विचार करून योग्य पॅकेजिंग करावे लागते.
कुठले प्लॅस्टिक वापरायचे
समजा, एखादे उत्पादन परदेशात पाठवायचे आहे. त्यासाठी 45 दिवसांचा प्रवास काळ आहे. उत्पादकाकडे जेव्हा उत्पादन तयार होते, तिथपासून ते त्याला पॅकेजिंग करून ते ग्राहकाकडे पाठवणे हे 45 दिवसांमध्ये शक्य होत नाही. हे सर्व उत्पादन गोदामांमध्ये ठेवून नंतर पुढे पाठवले जाते. काहीवेळा बॉक्स खोलल्यानंतर कमीत कमी 60 दिवस ते 120 दिवसांचा प्रवास काळ आवश्यक असतो.
LDPE - लो डेन्सिटी ’पॉलिइथिलीन’ हा प्लॅस्टिकचा एक प्रकार आहे. ही पिशवी तयार करत असताना VCIच्या मास्टरबॅचशी कॉम्बिनेशन करून तशा प्रकारची पिशवी पॅकेजिंगसाठी निवडावी लागते, कारण त्यामुळे उत्पादन गंजण्यापासून सुरक्षित राहू शकते. अँटी रस्ट ऑईलप्रमाणे VCI देखील आवश्यक तेवढ्या जाडीचे निवडले जाणे गरजेचे असते. काहीवेळा चुकीची बॅग निवडली जाते, त्यामुळे काही काळानंतर त्या उत्पादनावर गंज यायला सुरुवात होते. RP ऑईल लावून झाल्यावर उत्पादन VCI पिशवीत बंद करून बॉक्समध्ये ठेवण्यात येते.
विविध प्रकारच्या पॅकेजिंग पद्धतींची तुलना
लाकडी बंद बॉक्स आणि क्रेटेड बॉक्स (चित्र क्र. 2,3) एकाच प्रकारात येतात तर, कॉरूगेटेड बॉक्स त्यापेक्षा वेगळ्या प्रकारात मोडतात.
• किंमत - पॅकेजिंगमध्ये पारंपरिक लाकडी बंद बॉक्स किंवा क्रेटेड बॉक्स, प्लायवूड पाईनवुडचा बॉक्स आणि हेवी ड्युटी कॉरूगेशन हे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. लाकडी बॉक्स, क्रेटेड बॉक्स आणि प्लायवूड बॉक्स याच्यांमध्ये तुलना केली असता, क्रेटेड बॉक्स स्वस्त असतात, त्याच्यापेक्षा बंद बॉक्स थोडेसे महाग असतात. हेवी ड्युटी कॉरूगेशन बॉक्सची लाकडी, प्लायवूड बॉक्सशी तुलना केल्यास लाकडी बॉक्सपेक्षा या कॉरूगेटेड बॉक्सची किंमत 10 ते 15 टक्क्यांनी कमी असते.
• वजन - कॉरूगेटेड बॉक्स लाकडी बॉक्सपेक्षा वजनाला 20 ते 25 टक्क्यांनी कमी असतात. त्याच्यामध्ये आपण अधिक वजनाच्या वस्तू टाकू शकतो. वजनाने हे बॉक्स हलके असल्यामुळे वाहतुकीमधील खर्चदेखील कमी येतो. कॉरूगेटेड बॉक्स केवळ एका माणसाद्वारे उचलता येतो. त्यामध्ये नुकसान होत नाही आणि खर्चदेखील कमी येतो. याउलट लाकडी बॉक्स उचलण्यासाठी एकापेक्षा अधिक माणसे लागतात. त्यामध्ये बॉक्स खराब होण्याचे प्रमाणदेखील जास्त असते आणि खर्चही अधिक येतो.
• मजबूतपणा - याबाबतीत हेवी कॉरूगेटेड बॉक्स (चित्र क्र. 4, 5) लाकडी बॉक्ससारखेच आहेत.
जेव्हा लाकडी बंद बॉक्स किंवा क्रेटेड बॉक्सची विल्हेवाट लावायची असते तेव्हा ते त्रासदायक ठरते. खिळे तोडणे, बॉक्स फोडून काढणे अशा अनेक पद्धतीचे कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी पैसेदेखील मोजावे लागतात. त्याऐवजी हेवी ड्युटी कॉरूगेशन बॉक्स हे 100 टक्के पुनर्वापर करण्यायोग्य (रिसायकलेबल) आहेत. वापरलेले बॉक्स प्रति किलो 10 ते 15 रुपये दराने बाजारात विकले जातात. हेवी ड्युटी कॉरूगेशन बॉक्स थेट किंवा लगेच डॅमेज होण्याची शक्यता खूपच कमी असते. प्रवासामध्ये (ट्रान्स्पोर्टेशन) योग्य काळजी घेतली गेली नाही, तरच हे बॉक्स खराब होतात अन्यथा नाही. काही ठिकाणी परिस्थिती उत्पादकाच्या नियंत्रणात नसते. उदाहरणार्थ, बॉक्स तयार झाला, त्यामध्ये वस्तू पॅक केली, वस्तूंसह त्या बॉक्सचे ट्रकमध्ये लोडिंग केले. इथपर्यंत गोष्टी उत्पादकाच्या नियंत्रणात असतात. मात्र प्रवासात किंवा अनलोडिंगच्यावेळी पुरेशा सुविधा उपलब्ध नसतील तर कदाचित पॅकेजिंग खराब होण्याची शक्यता असते. बॉक्स डिझाईन करताना योग्य काळजी घेतली तर ट्रकच्या उंचीवरून हे बॉक्स खाली पडले तरी बॉक्स खराब होत नाहीत.


• स्टोरेज किंवा जागा - आपल्याकडे स्टोरेजसाठी 1000 स्के. फूट जागा असेल, तर त्यामध्ये साधारणतः 50 ते 100 लाकडी बॉक्स बसतात. मात्र तेवढ्याच जागेत कमीतकमी 500 ते 600 कॉरूगेटेड बॉक्स व्यवस्थित बसविले जातात. कारण त्याची घडी घालता येत असल्याने जागा कमी लागते.
केस स्टडी
एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे एक उत्पादन आमच्याकडे पॅकेजिंगसाठी आलेले होते. यापूर्वी लाकडी बॉक्समध्ये त्याचे पॅकेजिंग केले जायचे. एका बॉक्समध्ये जास्तीत जास्त वजन गेले पाहिजे, असे त्या ग्राहकाचे म्हणणे होते. त्यामुळे बॉक्समध्ये वस्तू कशाही भरल्या जात होत्या. अयोग्य पद्धतीमुळे एकाच बॉक्समध्ये जास्त वस्तू भरल्या गेल्याने त्यांचे हेड खराब (डॅमेज) होत होते. मोठ्या प्रमाणात वस्तू खराब झाल्याने त्यांचा संपूर्ण कंटेनरच रिजेक्ट झाला होता. हा ग्राहक नंतर आमच्याकडे आला. आम्ही त्यांना योग्य प्रकारे कॉरूगेशनमध्ये एक डिझाईन देऊन, प्रत्येक वस्तूसाठी मध्यभागी दुभाजक (सेपरेटर/पार्टिशन) (चित्र क्र. 6) दिल्यामुळे ते भाग एकमेकांना घासण्याची शक्यता नाहीशी झाली. तसेच वस्तू गंजण्याबाबतची अडचणदेखील पूर्णपणे नाहीशी झाली. रिजेक्शनचा धोका पूर्णपणे नाहीसा झाला.
नवीन तंत्र-खिळे विरहित पॅकेजिंग
पॅकेजिंगमध्ये आणखी एक नवीन प्रकार आलेला आहे, खिळा नसलेला (नेललेस) प्लायवूड बॉक्स. पॅकेजिंगमध्ये कुठेच खिळे वापरले जात नाही. याला पूर्णपणे मेटलची प्रोफाईल असते. या मेटल प्रोफाईलला प्लायवूडवर प्रेस केले जाते. त्याच्यामध्ये खिळे वापरले जात नाहीत किंवा हॅमरिंगही केले जात नाही, तर या प्रोफाईलला असलेल्या धारदार कडा (शार्प एज) ग्रूव्हमध्ये दाबल्या जातात. उदाहरणार्थ, चित्र क्र. 7 मध्ये दाखविलेल्या बॉक्सला 6 बाजू आहेत. कडांवर जे कोन आहेत त्याच्यावर दाब दिला जातो. मेटलला एक ग्रूव्ह दिलेली असते. त्या ग्रूव्हमध्ये घालून, मेटल त्याला प्रेस करून तो आतमध्ये जातो. हा बॉक्स खोलण्यासाठी, हाताळणीसाठी सोपा आणि सुलभ आहे. त्याचे फोल्डिंग आणि अनफोल्डिंगदेखील सुलभतेने होते. या प्रकारात वस्तूचे पॅकिंग आणि अनपॅकिंग करणे अतिशय सोपे असते, तसेच ते लाकडी किंवा कॉरूगेटेड बॉक्सप्रमाणे ते दणकटदेखील असतात. हे बॉक्स साधारणतः कमीतकमी 100 ग्रॅमपासून ते 4-5 टनापर्यंत वजनाच्या उत्पादनाच्या डिझाईननुसार बनविले जातात. परदेशात हे तंत्रज्ञान सध्या मोठ्या प्रमाणात वापरले जात असून, ते सध्या भारतामध्ये यायला लागले आहे.

मशिन आणि त्याच्या भागांसाठी कमीतकमी 500 ते 800 किलो वजनाचा एक बॉक्स असणे गरजेचे आहे. कारण त्याला विविध प्रकारच्या मानवी आणि यांत्रिक हाताळणीतून जावे लागते, वेगवेगळ्या परिस्थितीतून त्याची वाहतूक होत असते. मशिनच्या आकारानुसार मोठ्या आकाराच्या साधनांसाठी (इन्स्ट्रुमेंट) साधारणतः त्यांच्या आकारानुसार 4,5,6,8 मीटर ते 10 मीटर लांबीचे बॉक्स तयार करतो. तर 1 ते 2 टन वजनाच्या कार्यवस्तूसाठी हेवी ड्युटी कॉरूगेशन पद्धतीचा बॉक्स आम्ही पॅकेजिंगसाठी वापरतो.
निर्यातयोग्य पॅकेजिंग
काही वेळा निर्यातीसाठी पाठविण्याच्या वस्तू 6 महिन्याहून अधिक काळापर्यंत गंजविरहित राहणे आवश्यक असते. अशावेळी आधी उल्लेख केलेली VCI किंवा LDPE पिशवी पुरेशी सुरक्षित नसते.अशावेळी ॲल्युमिनियमचे थर दिलेली VCI पिशवी वापरली जाते. (चित्र क्र. 8) ॲल्युमिनियम आर्द्रतेला उत्तम विरोध करत असल्याने, त्याचा बाहेरून थर दिलेली VCI अथवा LPDE पिशवी उत्तम काम करते.
धातूच्या वस्तू ऑईलमध्ये बुडवून काढल्यावर अशा ALU-VCI पिशवीत ठेवल्या जातात आणि पिशवीतील हवा पंपाने बाहेर काढून ती पिशवी हवाबंद केली जाते. पिशवीला चुकून एखादे छिद्र असेल अथवा हाताळणीत पिशवी फाटली तर अधिक सुरक्षिततेसाठी पिशवीत सिलिका जेलची पुडीही ठेवलेली असते. बॉक्सचा आकार, वस्तूंची संख्या, आर्द्रतेची पातळी आणि किती काळ वस्तू बॉक्समध्ये राहणे अपेक्षित आहे यावर पिशवीची जाडी आणि सिलिका जेलचे प्रमाण ठरविले जाते.
लाकूड कीटकांमुळे बाधित होण्याची शक्यता असल्याने निर्यातीसाठी वापरले जाणारे लाकूड रासायनिक प्रक्रिया (मेथिल ब्रोमाईड वायू) अथवा हीट ट्रीटमेंट करूनच वापरले जाते. या प्रक्रिया क्लिष्ट असतात. काही देशात रासायनिक प्रक्रियेवर बंदीच आहे. प्लायवूड किंवा योग्य कॉरूगेटेड मटेरियलला अशा प्रक्रियांची गरज नसल्याने, आता जगभर प्लायवूड किंवा योग्य कॉरूगेटेडचे बॉक्स वापरण्याला प्राधान्य दिले जात आहे.
वाणिज्य पदवीधर असलेले निलेश उबाळे गेली 10 वर्षे पॅकेजिंग क्षेत्रात काम करीत आहेत. 3 आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर आता ते ‘इंडस्ट्रियल पॅकर्स’ या कंपनीत विपणन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आहेत.