टर्निंग फिक्श्चर - 2

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    08-Jun-2018   
Total Views |

Turning fixtures
 
मागील लेखात आपण काही टर्निंग फिक्श्चर्स, मँड्रेल आणि कॉलेट याविषयी माहिती घेतली. आता आपण टर्निंग फिक्श्चर्ससंबंधी अधिक माहिती घेणार आहोत.
 
कुठलीही कार्यवस्तू बनविताना तिच्यावर वेगवेगळे यंत्रण करावे लागते. उदाहरणार्थ, टर्निंग, मिलिंग, ड्रिलिंग, टॅपिंग इत्यादी. ही सर्व कामे एका ठराविक क्रमाने करावी लागतात. यालाच त्या कार्यवस्तूवरील प्रक्रिया म्हणतात. याचा यंत्रणकाम क्र.1, यंत्रणकाम क्र. 2 (Op No.1, Op.No. 2) असा क्रम ठरविला जातो. त्या कार्यवस्तूवर केले जाणारे पहिले यंत्रण सगळ्यात महत्त्वाचे असते. कारण त्यावेळेस कार्यवस्तूवर कुठलेच यंत्रण झालेले नसल्यामुळे आपण कार्यवस्तू कशी लोकेट करतो आणि पकडतो हे महत्त्वाचे असते. जेव्हा गोलाकार कार्यवस्तू असते तेव्हा ती पारंपरिक 3 जबड्याच्या चकमध्ये पकडता येते. हे आपण खालील उदाहरणात पाहू शकतो.

Fig 1  
 
Fig 2 - Mechanism No. 3 - Spray Gun
 
चित्र क्र.1 मध्ये असे दिसते की व्यास ‘क’ असलेली कार्यवस्तू आपण 3 जबड्याच्या चकमध्ये पकडू शकतो. या कार्यवस्तूवर कुठल्याही प्रकारचे यंत्रण झालेले नाही. म्हणून व्यास ‘क’वर कार्यवस्तू पकडून व्यास ‘ड’ चे यंत्रण करणे याला यंत्रणकाम क्र.1 असे म्हणतात. उरलेली यंत्रण प्रक्रिया योग्य प्रक्रिया वापरून अचूकपणे करणे सोपे जाते.
 
चित्र क्र. 2 मध्ये टर्निंग फिक्श्चर दाखविले आहे. हे आपण मागील अंकात (धातुकाम, मे 2018) विस्ताराने अभ्यासले आहे. चित्र क्र. 2 मध्ये दाखविलेल्या टर्निंग फिक्श्चरमध्ये ‘ब’ भोकाचे यंत्रण करायचे आहे. हे या कार्यवस्तूवरील तिसरे यंत्रण आहे.

Fig 3 - Mechanism No. 1 - Spray Gun 
 
आता आपण स्प्रे गनचे पहिले यंत्रण बघू. चित्र क्र. 3 मध्ये पिन 1 ही लोकेटिंग पिन आहे आणि पिन 2 ही ओरिएंटेशन पिन आहे. याचा अर्थ पिन 1 कार्यवस्तूमध्ये गुंतविल्यावर जर कार्यवस्तू घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरविली तर ती पिन 2 वर जाऊन टेकेल. चित्रात दाखविलेला स्विंग लॅच त्याच दिशेने फिरवून क्लॅम्पिंग स्क्रूने कार्यवस्तू क्लॅम्प केली जाते. यामध्ये स्प्रे गनवर असलेले छोटे भोक नियंत्रित (कंट्रोल्ड) आहे. या टर्निंग फिक्श्चरमध्ये (चित्र क्र. 4) आपण ‘अ’ भोकाचे यंत्रण करत आहोत आणि हे स्प्रे गनमधील पहिले यंत्रण असल्यामुळे कार्यवस्तू रेस्ट कशी करायची, लोकेट कशी करायची तसेच ती घट्ट कशी पकडायची (क्लॅम्प करायची) याचा सखोल विचार करावा लागतो. प्रत्येक कार्यवस्तूच्या पहिल्या ऑपरेशनच्या वेळेस हा विचार करावा लागतो. विशेषतः जर कार्यवस्तू कास्टिंग किंवा फोर्जिंग असेल तर विशेष कंट्रोल्ड पॅडचे नियोजन करावे लागते. याची जास्त सखोल माहिती आपण मिलिंग फिक्श्चरच्या केस स्टडीच्या वेळेस पाहू.
 
Mechanism No. 1 - Spray Gun
 
याच कार्यवस्तूचे दुसरे ऑपरेशन आपण चित्र क्र. 5 मध्ये दाखविलेल्या खास थ्रेडेड मँड्रेलवर धरून करत आहोत.
 
Mechanism No. 2 - Spray Gun
 
या कार्यवस्तूची पहिली तीनही ऑपरेशन साध्या लेथ मशिनवर केली जात आहेत. आपल्याला कल्पना आहेच की, लेथ मशिन वापरणे हे अतिशय किफायतशीर आहे. कारण इतर मशिनच्या मानाने हे स्वस्त मशिन आहे. ही कार्यवस्तू वेडीवाकडी असूनसुद्धा याची पहिली तीनही ऑपरेशन टर्निंग फिक्श्चरच्या साहाय्याने केली जात आहेत. हेच फिक्श्चर डिझाईन करणाऱ्याचे कौशल्य आहे.
 
टर्निंग फिक्श्चर
 
Turning fixtures
 
एका कार्यवस्तूसाठी केलेले टर्निंग फिक्श्चर चित्र क्र. 6 मध्ये दाखवले आहे. या कार्यवस्तूवर एक मोठे भोक आणि एक पृष्ठभाग यांचे यंत्रण करायचे आहे. या कार्यवस्तूवर असलेले भोक टेलस्टॉकमध्ये ड्रिल बसवून करता येते. पृष्ठभाग टूल पोस्टवर टूल बसवून करता येईल. ही कार्यवस्तू रेस्टिंग ब्रॅकेटवर ठेवलेली (रेस्ट केलेली) आहे. आता आपण या फिक्श्चरच्या महत्त्वाच्या भागांचे परीक्षण करू.
 
मागे-पुढे होणारा ’व्ही’ ब्लॉक
 
समोरच्या बाजूने एक मागे पुढे होणारा ’व्ही’ ब्लॉक बसवलेला आहे. हा ’व्ही’ ब्लॉक गाईड केलेला आहे. ही ॲसेम्ब्ली डॉवेल केलेली आहे. या ’व्ही’ ब्लॉकची दोन कार्ये आहेत.
 
1. जेव्हा हा ’व्ही’ ब्लॉक, नर्ल स्क्रू ’S’ च्या साहाय्याने कार्यवस्तूकडे ढकलला जातो, तेव्हा कार्यवस्तू रेस्टिंग ब्रॅकेटवर अलगद क्लॅम्प केली जाते. या स्क्रूने कार्यवस्तू मर्यादित बलाने क्लॅम्प केली जाते किंबहुना करावी.
 
2. हा ’व्ही’ ब्लॉक कार्यवस्तूला लेथच्या अक्षाशी समकेंद्रित करतो.
 
जर ’व्ही’ ब्लॉकच्याऐवजी फक्त सपाट प्लेट दिली तर कार्यवस्तू लेथच्या अक्षाशी समकेंद्रित होणार नाही.
 
स्ट्रॅप क्लॅम्प
 
दोन्ही बाजूला दोन स्ट्रॅप क्लॅम्प दिलेले आहेत. मुख्यत्वे यांनी कार्यवस्तू घट्ट पकडली जाते. स्ट्रॅप क्लॅम्प कसे काम करतो हे आपण आधीच्या अंकात जाणून घेतले आहेच. टर्निंग फिक्श्चर हे ठराविक RPM ने फिरत असल्यामुळे जर कार्यवस्तू घट्ट पकडली नाही तर ती निसटून अपघात होण्याची शक्यता आहे.
 
रेस्टिंग ब्रॅकेट
 
कर्तनाचे मुख्य बल या ब्रॅकेटवर येत असल्याने हे मजबूत असावे लागते. हे ब्रॅकेट स्क्रूच्या साहाय्याने बसवून डॉवेल करावे लागते. यामुळे कार्यवस्तूवर होणारे भोक कार्यवस्तूच्या केंद्रभागी होते. डॉवेलमुळे हे ब्रॅकेट हलत नाही. या रेस्टिंग ब्रॅकेटला दोन्ही बाजूला मोठी चँफर मारलेली दिसतात. याचे कारण याचे कोपरे मुख्य गोल प्लेटच्या (फिक्श्चरच्या) बाहेर येऊ नयेत. सुरक्षेचा विचार करता हे आवश्यक आहे.
 
सेटिंग पीस
 
कार्यवस्तूची जाडी ’T’ मिळविण्याकरता, फेसिंग टूल याच्या पृष्ठभागावर स्पर्श करून कट घेतल्यास आपल्याला कार्यवस्तूची पाहिजे तेवढी जाडी मिळविता येते. बऱ्याच वेळेस हे माप ’T’ मापापेक्षा 3 मिमीने कमी ठेवतात. टूल सेट करताना या सेटिंग पीसवर 3 मिमीची फिलर ठेवतात व त्याला स्पर्श करून टूल सेट करतात.
 
गोल प्लेट
 
या गोल प्लेटवर मध्यभागी एक भोक केलेले आहे. रेस्टिंग ब्रॅकेट आणि ’व्ही’ ब्लॉक ॲसेम्ब्ली हे दोन्ही भाग या भोकाच्या केंद्राभोवती समप्रमाणात/मध्यवर्ती बसवलेले आहेत. फिक्श्चरचा कुठलाही भाग या गोल प्लेटच्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. या प्लेटच्या बाहेरच्या व्यासावर एक खाच (ग्रूव्ह) केलेली असते. ही खाच आणि केंद्रस्थानी असलेले भोक समकेंद्रित असतात. जेव्हा हे फिक्श्चर मशिनवर बसवतात तेव्हा हे व्यवस्थित बसले आहे की नाही हे डायल गेजच्या साहाय्याने बघण्यात येते. या प्लेटचा स्पिंडलच्या बाजूचा व्यास, क्लॅम्पिंग स्क्रूची भोके आणि PCD ही मापे ॲडाप्टर प्लेटनुसार असतात.
 
संतुलन वजन (बॅलन्स वेट)
 
या फिक्श्चरमध्ये आपल्याला हे स्पष्ट दिसते की, बरेच वजन फिक्श्चरच्या एका भागात केंद्रित झालेले आहे. (रेस्टिंग ब्रॅकेट + 2 स्ट्रॅप क्लॅम्प). त्यामुळे असंतुलन निर्माण होते. हे फिक्श्चर संतुलित करणे आवश्यक आहे. यासाठी विरुद्ध बाजूस वजन लावतात. यालाच संतुलन वजन असे म्हणतात. यामुळे मशिनचा स्पिंडल सुस्थितीत राहतो. मशिनचे आयुर्मान वाढते.
 
ॲडाप्टर प्लेट
 
ही प्लेट चित्र क्र. 5 मध्ये दिसत नाही. पण एखाद्या विभागात प्रमाणित 2 - 3 ॲडाप्टर प्लेट करून ठेवलेल्या असतात. या प्लेटच्या एका बाजूला स्पिंडलप्रमाणे सगळी मापे असतात आणि दुसऱ्या बाजूस आवश्यक असलेली प्रमाणित मापे असतात. या दुसऱ्या बाजूवर फिक्श्चर बसते. नवीन टर्निंग फिक्श्चर बनवताना या ॲडाप्टर प्लेटच्या दुसऱ्या बाजूची मापे विचारात घ्यावी लागतात.
 
Adapter plate and Chuk
 
चित्र क्र. 7 मध्ये ॲडाप्टर प्लेट आणि चक दाखवलेला आहे. आता आपल्या लक्षात येईल की, ॲडाप्टर प्लेट मशिन स्पिंडलवर बसते आणि दुसऱ्या बाजूने चक अथवा फिक्श्चर बसते. चित्र क्र. 8 मध्ये ॲडाप्टर प्लेट कशी दिसते ते कळेल. शक्यतो कमीत कमी वेळा या ॲडाप्टर प्लेटची काढ घाल करावी. जर ॲडाप्टर प्लेट वारंवार बदलली तर मशिनचा स्पिंडल नोज खराब होण्याची शक्यता आहे.
 
Adapter plate
 
फिक्श्चरच्या मागच्या बाजूची मापे ॲडाप्टर प्लेटप्रमाणे असावीत, त्यामुळे ॲडाप्टर प्लेटवर फिक्श्चर व्यवस्थित बसते.
 
ज्या लेथच्या स्पिंडलला थ्रेडिंग असते त्या प्रकारच्या स्पिंडलवर बसणारी ॲडाप्टर प्लेट आपण बघितली. चित्र क्र. 9 मध्ये थ्रेडेड स्पिंडल दाखवला आहे.
 
Machine spidel nose threaded type
 
आता आपण अजून एका प्रकारच्या स्पिंडलवर बसणाऱ्या ॲडाप्टर प्लेटचा विचार करूया. (लेथ स्पिंडल नोज टाईप 1 साईज नं 8.) चित्र क्र. 10 मध्ये अशा प्रकारचा स्पिंडल दिसत आहे.
 
Tyape A1
 
या प्रकारच्या स्पिंडल नोजला टेपर असते. या टेपरवर ॲडाप्टर प्लेटचे टेपर बसते. त्यामुळे ॲडाप्टर प्लेट आणि स्पिंडल एककेंद्रित होतात. स्पिंडलचे टेपर 70 7' 30'' असल्यामुळे (सेल्फ लॉकिंग टेपर) ॲडाप्टर प्लेट स्पिंडलवर चपखल बसते. ती काढण्यासाठी ॲडाप्टर प्लेटवर एक्स्ट्रॅक्शन भोके दिलेली असतात. ही दोन थ्रेडेड भोके समोरासमोर केलेली असतात. या भोकामध्ये स्क्रू टाकून त्याच्या साहाय्याने घट्ट बसलेली ॲडाप्टर प्लेट सहज काढता येते. ॲडाप्टर प्लेट स्पिंडलवर बसवण्यासाठी काऊंटरबोअर असलेली भोके दिलेली असतात. चित्र क्र. 11 मध्ये स्पिंडल आणि ॲडाप्टर प्लेट यांची ॲसेम्ब्ली दाखवली आहे.
Length Spindle Nose Type 1 Size No.8. 
 
स्पिंडलवर एक ड्राईव्हिंग बटन दिलेले असते आणि त्याचप्रमाणे त्याला पूरक असे भोक ॲडाप्टर प्लेटवर दिलेले असते. नावाप्रमाणे या बटणाचा उपयोग स्पिंडलचा टॉर्क पुढे पाठवण्यासाठी होतो. ॲडाप्टर प्लेटशिवाय आपण टर्निंग फिक्श्चरचा विचारच करू शकत नाही.
पुढील अंकामध्ये आपण मिलिंग फिक्श्चरसंबधी माहिती घेऊ.
 
अजित देशपांडे यांना जिग्ज आणि फिक्श्चर्समधील जवळपास 36 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर, ग्रीव्हज् लोम्बार्डिनी लि., टाटा मोटर्स अशा विविध कंपन्यांत काम केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अतिथी प्राध्यापक आहेत.
@@AUTHORINFO_V1@@