सी. एन. सी. मशिन मेंटेनन्स या लेखमालेत आपण आत्तापर्यंत मशिन चालूच होत नाही, वंगण तेलाची पातळी समाधानकारक नसणे, तसेच वंगण तेलाचा दाब कमी असल्यास काय परिणाम होतात, चक निष्क्रिय असणे या समस्यांबद्दल तसेच टेलस्टॉकसंबंधी निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार केला. या लेखात आपण ’टरेट इंडेक्स ॲबॉर्टेड’ असा संदेश मशिनच्या पॅनेलवर आला तर काय करावे याबाबत माहिती पाहू.
टरेट इंडेक्स ॲबॉर्टेड
टरेटचे काम आपल्याला माहीतच आहे. याच्या खाचांमध्ये वेगवेगळी टूल बसविलेली असतात. आपल्या गरजेप्रमाणे प्रत्येक टूल कार्यवस्तूसमोर येते आणि नेमून दिलेले कार्य करते. यासाठी टरेट स्वतःच्या अक्षाभोवती फिरतो. आता समजा आपण टरेटला फिरण्याची आज्ञा दिली तरीसुद्धा हा टरेट फिरत नाही (इंडेक्स होत नाही). अशावेळेस बऱ्याच वेळेला टरेट क्लॅम्प झालेला नसतो. स्वयंचलित (ऑटो) सायकल थांबते, कारण तसा इंटरलॉक मशिनच्या प्रणालीमध्ये दिलेला आहे. सायकल थांबली नाही तर अपघात होईल. जेव्हा टरेट क्लॅम्प झालेला नसेल तेव्हा तशी सूचना स्क्रीनवर येते, आणि योग्य काळजी घेता येते. यामध्ये विविध कारणे आहेत.
• टरेटचा MPCB ट्रिप झालेला असू शकतो.
• विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांची जोडणी. करणारे भाग सैल झालेले असू शकतात.
• टरेट मोटर किंवा टरेट एनकोडरमधील विद्युत जोडणी सैल असू शकते.
• टरेटला विद्युत पुरवठा करणारी तार तसेच फीडबॅक देणारी तार खराब झालेली अथवा जळलेली असू शकते.
• टरेटमध्ये बसवलेली बेअरिंग खराब होवू शकतात.
यामध्ये बहुतांश समस्या या विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिक समस्या आहेत. टरेटमध्ये बसविलेली बेअरिंग खराब होणे, हा एकच यांत्रिक दोष होऊ शकतो. हा दोष दोन कारणांनी होतो.
1. बऱ्याच दिवसात प्रतिबंधात्मक देखभाल न केल्याने बेअरिंग खराब होतात
2. जर टरेट धडकला असेल किंवा अपघात झाला असेल, तर बेअरिंग खराब होतात अथवा तुटतात.
गिअरचे दाते जागेवरून हलल्यामुळे टरेटचा अक्ष योग्य त्या जागी येऊ शकत नाही. जेव्हा टरेट धडकून अपघात होतो तेव्हा हा प्रसंग लपविण्याचा प्रयत्न केला जातो, हे मशिनच्या बाबतीत अतिशय गंभीर आहे. अपघात झाला की लगेच मशिनचे भाग खराब झालेत का, हे तपासणे अतिशय गरजेचे आहे. टरेटची तपासणी केली पाहिजे. गरज पडल्यास कुशल कामगाराकडून टरेट उघडून पाहणी करणे आवश्यक आहे. खराब झालेले भाग बदलून नवीन भाग टाकणे आवश्यक आहे. गरज पडल्यास कंपनीच्या सेवा देणाऱ्या तंत्रज्ञाला पाचारण करावे, काहीही न लपवता घडलेल्या प्रसंगाची इत्यंभूत माहिती द्यावी.
तक्ता क्र. 1 मध्ये समस्या, कारणे आणि उपाय दिलेले आहेत.
नारायण मूर्ती ’मायक्रोमॅटिक मशिन टूल्स प्रा. लि.’चे सर्व्हिस व्यवस्थापक आहेत. त्यांना मशिन मेंटेनन्समधील प्रदीर्घ अनुभव आहे.