मशिन मेंटेनन्स या लेखमालेअंतर्गत आपण आतापर्यंत तातडीची मदत, मशिन चालूच होत नाही. वंगण तेलाची पातळी समाधानकारक नसणे, तसेच वंगण तेलाचा दाब कमी असल्यास काय परिणाम होतात आणि चक निष्क्रिय असणे या समस्यांबद्दल तसेच टेलस्टॉकसंबंधी निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार केला होता. या लेखामध्ये आपण टरेट होम स्थानावर किंवा सुरक्षित स्थानावर नसणे (सेफ पोझिशन) आणि टरेट मोटरचे तापमान वाढणे या समस्येविषयी माहिती घेणार आहोत.
टरेटसाठी होम पोझिशन
टरेटचे काम आपणा सर्वांनाच माहिती आहे. समजा टरेट षट्कोनी आकाराचा असेल, तर प्रत्येक पृष्ठभागावर वेगवेगळी 6 टूल बसविलेली असतात. आपल्या गरजेप्रमाणे प्रत्येक टूल कार्यवस्तूसमोर येते आणि नेून दिलेले कार्य करते. यासाठी टरेट स्वतःच्या अक्षाभोवती फिरतो. का टरेट जर चक आणि टेलस्टॉक या दरम्यान कुठेही थांबवून फिरवला तर, एक तर तो कवर तरी धडकेल किंवा टेलस्टॉकवर धडकेल. हे टाळण्याकरता टरेटसाठी एक सुरक्षित जागा निवडली/ठरविली जाते, जेणेकरून टरेट कशावरही धडकणार नाही. यालाच आपण ’हो पोझिशन’ असे संबोधतो.
जर टरेट हो पोझिशनला असेल, तरच टरेट सुरक्षितपणे फिरू (इंडेक्स होऊ) शकतो. मात्र, काही लोक वेळेची बचत करण्यासाठी किंवा झटपट काम उरकण्यासाठी टरेट कुठेही थांबवून फिरविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, असे न करता टरेट हो पोझिशनला घेऊनच फिरवावा. टरेट इतर कुठल्याही ठिकाणी फिरणार नाही याबाबत अनेक कारखान्यांमध्ये खबरदारी घेतली असल्याचे पहावयास मिळते. जर टरेट मध्येच कुठेतरी असेल आणि टरेट इंडेक्सिंगचे बटन दाबले तर, ’टरेट नॉट इन होम पोझिशन’ म्हणजेच ’टरेट होम पोझिशनवर नाही’ असा संदेश मिळतो. अशावेळी सर्वात पहिल्यांदा टरेट होम पोझिशनला घ्यावा लागतो. टरेट होम पोझिशनला आल्यानंतरच तो फिरू (इंडेक्स) शकतो.
जेव्हा मशिन स्वयंचलित (ऑटोमॅटिक) स्थितीमध्ये (मोड) असते, तेव्हा टरेट आपोआपच हो पोझिशनला जातो. जेव्हा मशिन मॅन्युअल स्थितीमध्ये असते, तेव्हा वरील समस्या उद्भवतात.
मशिन मॅन्युअल स्थितीमध्ये असताना जेव्हा टूल बदलायचे असते, तेव्हा टरेट इंडेक्स करावा लागतो. त्यासाठी टरेट मॅन्युअली होम पोझिशनला नेऊन नंतरच तो फिरवावा (इंडेक्स) लागतो. किंबहुना टरेट तेव्हाच फिरतो.
जर टरेट धडकल्यामुळे त्याचे काही भाग खराब झाले असतील, तर त्याप्रमाणे तातडीने उपाययोजना करावी. मात्र अनेकदा वरिष्ठांचा रोष पत्करावा लागेल या भीतीने अशा घटना लपविल्या जातात. दुसरे कारण म्हणजे सेवा देणारी कंपनी मोफत सेवा देणार नाही अशी शक्यता वाटल्यामुळे ही माहिती लपविण्याकडे कल असतो. बिघाडाबाबत कोणतीही माहिती न लपविता पारदर्शकता पाळल्यास निश्चितपणे फायदाच होईल. यामुळे सेवा देणाऱ्या तंत्रज्ञाला समस्या आणि त्याचे कारण शोधण्यास मदतच होईल आणि वेळेचा अपव्यय टळेल. कंपनी आणि सेवासंस्था यामध्ये विेशासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.
बऱ्याचवेळा मशिन स्वयंचलित स्थितीमध्येच वापरले जाते. अशा वेळेस कामगाराची चूक क्वचितच असते. बहुतांशी ही मशिनचीच समस्या असण्याची शक्यता जास्त असते. सेवा देणाऱ्या तंत्रज्ञाबरोबर जर मशिनवर काम करणाऱ्या कामगाराने सहभाग घेतला तर त्या कर्मचाऱ्याचा आणि पर्यायाने कंपनीचा फायदाच होईल.
टरेट मोटरचे तापमान वाढणे (ओव्हर हीटिंग)
टरेट मोटरच्या सर्किटमध्ये एक थर्मल स्विच बसविलेला असतो. जेव्हा टरेट मोटरचे तापमान एका ठराविक पातळीच्या वर जाते तेव्हा कंट्रोल पॅनेलवर संदेश येतो. अशावेळी जेव्हा टरेट फिरण्यासाठी आपण आदेश देतो, पण टरेट मात्र फिरत नाही. असे झाल्यास ताबडतोब काम थांबवावे, नाहीतर टरेट मोटरचे नुकसान होईल. मोटरचे तापमान वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे, कदाचित दोनच फेज चालू असतील. अर्थात दोन फेजवर मोटर काही फिरणार नाही पण त्या मोटरची कॉईल मात्र गरम होईल. त्या स्थितीत जर पुन्हा पुन्हा टरेट फिरण्याचा आदेश दिला तर वर सांगितल्याप्रमाणे मोटर खराब होईल. असे होऊ नये म्हणून संदेश देण्याची व्यवस्था केलेली आहे.
टरेट मोटरचे तापमान वाढण्याची कारणे
1. थर्मल स्विचमध्ये दोष असू शकतो.
2. विद्युत पुरवठा करणारी तार (केबल) खराब असू शकते.
3. मोटर सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजन केलेला सर्किट ब्रेकर (MPCB) खराब झालेला असू शकतो.
4. टरेट मोटर खराब झालेली असू शकते. मोटरचे तापमान वाढण्यामागे यांत्रिक कारणसुद्धा असू शकते. गिअर बॉक्स ठप्प (जॅम) होऊ शकतो. याबद्दलची कुठल्याही प्रकारची सूचना कंट्रोल पॅनेलकडून येत नाही. अशा वेळेस गिअर बॉक्स फिरत नाही, पण मोटर तिला फिरवण्याचा प्रयत्न करत असते. यामुळे मोटरची कॉईल तापते, जे मोटरसाठी हानिकारक आहे. टरेटची हालचाल सहज होते का अडखळत होते हे कळण्यास काहीच मार्ग नसतो. काही वेळेस आवाजावरून कळू शकते की, टरेट फिरण्यामध्ये काहीतरी अडचण आहे. त्याचप्रमाणे ‘टरेट इंडेक्सिंग ॲबॉर्ट’ असा संदेश मिळतो. जर कोणी टरेट जबरदस्तीने फिरवण्याचा प्रयत्न केला तर, ‘एनकोडिंग’ केल्यामुळे सिग्नल बदलत नाही आणि संदेश कायम राहतो. जर टरेट फिरत असेल तर मात्र सिग्नल बदलतो आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडते.
यासाठीच कामगाराने मशिनवर काम करत असताना सदैव सतर्क असले पाहिजे. असे म्हटले जाते की, ’मशिनशी संवाद करा. याचाच अर्थ मशिनशी बोला आणि मशिन काय बोलते ते ऐका.’ मशिनची स्लाईड, टरेट अथवा हालचाल करणारे भाग आवाज करत असतील तर त्यावर त्वरित उपाययोजना करावी.
नारायण मूर्ती ’मायक्रोमॅटिक मशिन टूल्स प्रा. लि.’चे सर्व्हिस व्यवस्थापक आहेत. त्यांना मशिन मेंटेनन्समधील प्रदीर्घ अनुभव आहे.