अभियांत्रिकी ड्रॉईंग युक्त्या - 6

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    04-Jul-2018   
Total Views |

Engineering Drawing Tips - 6
 
मागील लेखात आपण Group, Break at point आणि Join या काहीशा निराळ्या धाटणीच्या कमांड बघितल्या. निरनिराळ्या भागांची जोडणी (ॲसेम्ब्ली), ती इतर भागांपेक्षा वेगळी आहे हे सहजगत्या दर्शविण्यासाठी Group कमांडचा वापर कसा करता येतो, हे आपण पाहिले. तसेच असलेल्या भागाच्या अगदी प्रत्येक रेषेचासुद्धा चपखल उपयोग करून घेत पुन्हा पुन्हा नवीन भाग काढण्यासाठीचा वेळ कसा वाचवता येईल हे Break at point या कमांडच्या आधारे समजावून घेतले. एखादे फीचर आपण बाद (Delete) केल्यानंतर उर्वरित रेषांना एकसंध करण्यासाठी Join ही कमांड वापरली. ज्यायोगे Trim, Extend यांसारख्या कमांडला फाटा देत तो वेळ वाचवला.
 
या लेखात आपण अशाच काही कमांड बघणार आहोत, ज्यामुळे आपण आपला वेळ तर वाचवूच, पण त्याचबरोबर त्यातील क्लिष्टताही कमी करण्याचा प्रयत्न करू.
 
Text to MText (text to multi-line text) :
 
ड्रॉईंग तयार केल्यानंतर आपण त्या भागांना मापे देतो. त्यानंतर काही उल्लेखनीय आणि अत्यावश्यक अशा सूचना देतो. तसेच भागासंबंधीच्या इतर तांत्रिक बाबी आपण त्या ड्रॉईंग शीटमध्ये समाविष्ट करत असतो. जेणेकरून तो भाग उत्पादनयोग्य होईल. ड्रॉईंगचा अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्ष कारखान्यात काम करणारा आणि मशिनवर त्या भागाला मूर्त स्वरूप देणारा कामगार तो समजून घेवून तयार करू शकेल.
 
त्यासाठी खाली उदाहरणादाखल दिलेल्या प्रमाणित (स्टँडर्ड) सूचना बघूया.
 
1. ALL DIMENSION ARE IN MM.
2. UNLESS OTHERWISE SPECIFIED FILET RADIUS 2.5
3. MATERIAL SPECIFICATION.
4. ALL SHARP EDGES HAVE TO BE REMOVED.
 
बऱ्याच कंपन्यांबरोबर काम केल्यानंतर असे लक्षात आले की, या विशिष्ट सूचना/ टिप्पणी देत असताना त्यामध्ये विसंगती आढळून येते. त्यामुळे चुकीचा अर्थ लागू शकतो आणि चुकीचे उत्पादन होण्याचीही दाट शक्यता असते. याचा प्रत्यय मला एका कंपनीमध्ये काम करत असताना आला. त्या कंपनीमध्ये ड्रॉईंग तयार करताना वेळेची मर्यादा आखून दिलेली होती. त्यामुळे ड्रॉईंग लवकरात लवकर पूर्ण करून देणे ही काम करणाऱ्याची प्राथमिक जबाबदारी होती. ड्रॉईंग करत असताना खाडाखोड, फेरबद हे ओघाने आलेच. घाईघाईमध्ये एखादा भाग बाद करताना त्यातील काही सूचनाही खोडल्या गेल्या. ड्रॉईंग तयार झाले आणि ते गडबडीत तपासले गेले. त्यानंतर ते अनुमतीसाठी
 (ॲप्रूव्हल) पाठवण्यात आले. वरिष्ठांनाही कमी वेळ असल्याने त्यांनीह फार तपशिलात न जाता त्याला अनुमती दिली.
 
आता ते ड्रॉईंग कारखान्यामध्ये तयार होण्याकरिता दिले गेले. मशिनवर काम करणाऱ्या कामगारांनी दिलेल्या ड्रॉईंगप्रमाणे भाग तयार केला. तो भाग ग्राहकाकडे पाठवण्यात आला. त्याने तो भाग ज्या ठिकाणी बसणार होता त्याठिकाणी बसवला, परंतु ज्यावेळी त्याचे प्रेशर टेस्टिंग झाले, तेव्हा त्या भागातून उच्च दाबातील पाणी बाहेर आले आणि त्यामुळे बाजूचे काही भाग खराब झाले. हे का झाले याची तपासणी करताना ड्रॉईंगमधील फिलेट वेल्डिंगबद्दलची आवश्यक सूचना फेरबदल करताना खोडली गेल्याची चूक लक्षात आली. झालेल्या नुकसानीला ड्रॉईंगमधील चूक कारणीभूत आहे हे समजले. तेव्हा येथून पुढे अशी काही चूक होऊ नये म्हणून उपाय योजणे क्रमप्राप्त झाले. विचारांती मला या सूचना सहजासहजी खोडता न येण्यासाठीची युक्ती सापडली. ती म्हणजे या सर्व सूचनांचे एकत्रीकरण करणे, हा त्यातल्या त्यात एकदम सोपा उपाय होता. यासाठी TXT2MTXT या कमांडचा पर्याय सुचला. हा पर्याय कसा वापरावा आणि त्याचे फायदे काय होतात हे आपण पाहू.
  
• TXT2MTXT हा पर्याय Express tools श्री मधून निवडावा अथवा कमांड लाईनमध्ये टाईप केल्यासही तो पर्याय वापरता येईल.
• आवश्यक असलेल्या सर्व सूचना निवडाव्यात.
• आणि Enter बटन दाबावे.
• याबरोबरच वेगवेगळी असणारी ही वाक्ये म्हणजेच सूचना या एकत्रित होतील. यासाठी तुम्ही ब्लॉकही तयार करू शकता आणि या कमांडने होणारा बदल घडवून आणू शकता. परंतु प्रत्येक वेळी ब्लॉक तयार करणे जिकिरीचे होऊ शकते. त्यासाठी हा अगदी सोपा परंतु महत्त्वाचा पर्याय आपल्याजवळ उपलब्ध आहे.
 
यामुळे होणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे खालीलप्रमाणे:
 
• वर उल्लेख केलेल्या उदाहरणाप्रमाणे सूचना बाद होण्याची संभावना कमी असते.
• अगदी बाद झाली तरी ते एकत्रित असल्यामुळे सहज लक्षात येऊ शकते.
• एकत्रित असलेल्या सूचनांमध्ये बदल घडवताना तो बदल घडवणे सोपे जाते. कारण या टिपांचा एकमेकांशी संबंध असू शकतो आणि तो एकदम पडताळणे सोपे जाते.
• दोन सूचनांच्या वाक्यातील अंतर प्रमाणीकरणासाठी वेगळी व्यवस्था करावी लागत नाही.
 
TCIRCLE
 
सूचना कशी लिहावी, त्याचा एकत्रित असण्याचा परिणाम आणि दुष्परिणाम याविषयी आपण वरील कमांडमध्ये पाहिले. आता टेक्स्ट म्हणजेच ड्रॉईंगमध्ये आवश्यक असलेला मजकूर ठळकपणे कसा दर्शविता येईल हे बघू.
 
वर उल्लेख केल्याप्रमाणे एखाद्या फ्लोअर लॅनमध्ये किंवा लेआऊटमध्ये काही शब्द उदाहरणार्थ, ENTRANCE, EXIT,
WALKWAY इत्यादी ड्रॉईंग वाचणाऱ्याला स्पष्टपणे अधोरेखित करण्यासाठी त्याच्या भोवती वर्तुळ, आयत किंवा विशिष्ट आकार काढून तो शब्द ठळकपणे दर्शविला जातो. असे दर्शविण्यासाठी आपण तो आकार काढून त्याला त्या शब्दाशी एकरूप करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो कधी मोठा तर कधी अपुरा होतो. त्यामध्ये तो शब्द बसत नाही किंवा तो आकार मोठा होतो. हा सर्व गोंधळ टाळण्यासाठी TCIRCLE ही कमांड आहे. TCIRCLE या कमांडचा वापर कसा करावा हे आपण पाहू.

Fig : 1 
 
• TCIRCLE ही कमांड, कमांड लाईनमध्ये टाईप करावी.
• काढलेला शब्द, अक्षर किंवा वाक्य निवडावे.
• त्याच्याभोवतीचा आकार निश्चित करावा. जसे की वर्तुळ, आयत किंवा स्लॉट इत्यादी. (चित्र क्र. 1)
• त्या आकारातील आणि शब्दातील अंतर ठरवावे.
• नंतर ENTER बटन दाबावे. TCIRCLE कमांडमुळे होणारे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फायदे खालीलप्रमाणे आहेत.
• विशिष्ट आकार त्या शब्दाच्या मापात काढण्याची आवश्यकता भासत नाही.
• शब्दाच्या लांबीप्रमाणे तो आकार आपोआप तयार होतो.
• तो आकार शब्दाच्या भोवती बसविण्याची गरज नाही.
• एवढी किचकट प्रक्रिया टाळून ही कमांड वापरून आणि त्यातील उपपर्याय निवडून सुलभता साधता येते.
• यामुळे वेळ तर नक्कीच वाचतो.
• क्लिष्टता कमी होते.
 
TORIENT
 
ड्रॉईंग काढून झाले तरी त्याला मापे देणे, त्यासंबंधीची तांत्रिक माहिती देणे, तसेच ग्राहकाच्या मानांकनानुसार त्यात योग्य तो बदल करणे किती आवश्यक आहे हे आपण पाहिले. त्याचप्रमाणे ड्रॉईंग वाचनीय आणि उत्पादनयोग्य असणे हे ड्रॉईंग बनविणाऱ्याचे मुख्य काम असते. अशाच काही गरजांपैकी एक म्हणजे, एखाद्या अक्षराला, शब्दाला किंवा वाक्याला आहे त्याच ठिकाणी ठेवून म्हणजे त्याची जागा न बदलता विशिष्ट कोनात फिरविण्यासाठीची गरज असते. जेणेकरून ते सहज वाचता येईल. याकरिता TORIENT या कमांडचा उपयोग करता येईल. ही कमांड कशी वापरावी यासंबंधीचे विश्लेषण पुढीलप्रमाणे,
 
• TORIENT ही कमांड, कमांड लाईनमध्ये टाईप करावी.
• काढलेला शब्द, अक्षर किंवा वाक्य निवडावे.
• त्याला ज्या रेषेचा आधार घेऊन त्या विशिष्ट कोनात फिरवायचे आहे ती निवडावी किंवा हवा असलेला कोन निवडण्याचीही मुभा आहे.
• नंतर ENTER बटन दाबावे. TORIENT या कमांडमुळे होणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे खालीलप्रमाणे आहेत.
• शब्दाला, अक्षराला किंवा वाक्याला जागा न बदलताही कोनात फिरवता येते.
• हवा असलेला कोनही देता येतो किंवा अगोदरच ड्रॉईंगमध्ये काढलेल्या रेषेचा आधार घेऊन तो कोन साधता येतो.
• ROTATE ही कमांड देऊन अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. त्याला असलेला योग्य पर्याय म्हणजे TORIENT ही कमांड होय.
 
या लेखात आपण text to mtext,TCIRCLE आणि TORIENT अशा आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण कमांड अभ्यासल्या. यामुळे होणारे फायदे म्हणजे वेळेची बचत, तसेच क्लिष्टता यांना प्रयत्नपूर्वक फाटा देता येतो आणि आवश्यक असलेला परिणाम साध्य करता येतो. या कमांड वापरताना आपल्याला भरपूर प्रमाणात सरावाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर या कमांडमधील उपपर्याय आपल्याला पाहिजे असलेल्या ठिकाणी वापरण्यासाठीचा सृजन दृष्टिकोन असणे आवश्यक आहे.
 
पुढील लेखामध्ये आपण इतर काही कमांड पाहणार आहोत, ज्यामुळे आधुनिकता, वेळेची बचत साधता येईल.
 
अमित घोले यांत्रिकी अभियंते असून त्यांनी ॲटलास कॉपको, इमर्सन इनोव्हेशन सेंटर, थायसन क्रूप अशा मल्टीनॅशनल कंपन्यांध्ये डिझाईन विभागात अनेक वर्षे काम केल्यानंतर ’इमॅजिका टेक्नोसॉफ्ट’ या इंजिनिअरिंग डिझाईन सोल्युशन आणि कॉर्पोरेट प्रशिक्षण देणाऱ्या कन्सल्टन्सीची स्थापना केली आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@