कारखान्यात काम करत असताना येणाऱ्या अडचणींवर काम करणारी माणसेच उपाय शोधत असतात. अशा उपायांना ’धातुकाम’ मासिकामध्ये कायमच प्राधान्य दिले जाते. आम्ही आयोजित केलेल्या स्पर्धेनिमित्ताने आलेल्या सुधारणांना या सदरामध्ये प्रसिद्धी देण्यात येत आहे. त्यापैकीच ही एक सुधारणा.
समस्या
आमच्या कंपनीत टर्निंग मशिनमध्ये टेलस्टॉक वापरले जाते. मशिन चालू असताना त्यामधून निघालेले शीतक (कुलंट) आणि बर हे घटक टेलस्टॉक क्विलमध्ये जाऊन क्विल गंजत होते. त्यामुळे कार्यवस्तूवर टर्निंग प्रक्रिया करताना अडचण येत होती. तसेच ग्राहकांना पुरविलेल्या कार्यवस्तूंच्या आकारामध्ये फरक येत असल्यामुळे ग्राहकांकडून तक्रारी येत होत्या.
टेलस्टॉकच्या क्विलमध्ये जेव्हा रिव्हॉल्विंग सेंटर लावून काम केले जाते, तेव्हा क्विलच्या आतमध्ये असलेल्या कचऱ्याचा बारीक कण, गंजसुद्धा कार्यवस्तू एकाच अक्षाभोवती फिरविण्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. बारीक कण आणि गंजामुळे (चित्र क्र. 1) कार्यवस्तूवर टर्निंग करताना अडचणी येत होत्या. त्याचा उत्पादनावर तर परिणाम होत होताच, पण त्याबरोबरच आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत होते. अनेकदा काही केसमध्ये क्विलही बदलावे लागत होते.
कामाची प्रचलित पद्धत
टेलस्टॉकमध्ये बर आणि शीतक जाऊ नये म्हणून अनेकजण त्यामध्ये कापडाचे तुकडे (कॉटन वेस्ट) टाकत होते. मात्र, कापडाचे तुकडे शीतक जास्त शोषून घेत असल्यामुळे समस्या अधिकच वाढत होती.
उपाययोजना
शीतक आणि बरमुळे क्विल गंजत होते. त्यासाठी आम्ही टेफ्लॉनची एक कॅप (चित्र क्र. 2) तयार केली. ही कॅप क्विलच्या तोंडावर बसविली, ज्यामुळे क्विलमध्ये शीतक आणि बर जाणे पूर्णपणे बंद झाले.
फायदे
1. क्विलचे आयुष्य सुधारले.
2. अपेक्षित उत्पादन मिळू लागले.
3. क्विलमध्ये शीतक आणि बर जाणे पूर्णपणे बंद झाले.
4. मशिनच्या देखभालीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला.
5. ही सुधारणा करण्यापूर्वी सुमारे 10% कार्यवस्तू रिजेक्ट होत होत्या, मात्र सुधारणेनंतर हे रिजेक्शन पूर्णपणे थांबले.
अफरोज शेख यांत्रिकी अभियंते असून गेल्या 3 वर्षांपासून ते ’एस मायक्रोमॅटिक मशिन टूल’, औरंगाबाद येथे सर्व्हिस इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.