प्रेस वारंवार जॅम होणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    04-Aug-2018   
Total Views |

Tons of press
 
एका मध्यम आकाराच्या कंपनीमध्ये सिंगल ॲक्शन, इक्सेंट्रिक ड्रिव्हन, 4 पॉईंट आणि 4 कॉलम असलेला 500 टन क्षमतेचा पॉवर प्रेस होता. वाहन उद्योगासाठी लागणारे पत्र्याचे भाग या प्रेसमध्ये ‘ड्रॉ’ केले जात होते. हा प्रेस वारंवार जॅम होत होता. तो जॅम झाल्यामुळे साहजिकच सर्व काम ठप्प पडत होते. काम परत सुरू करण्यासाठी प्रत्येकवेळी टाय रॉड सैल करून जॅम झालला प्रेस मोकळा (रिलीज) करावा लागत होता. वारंवार ही अडचण येत असल्यामुळे चालू कामात अडथळा तर येत होताच, त्याशिवाय जास्तीचा वेळ खर्च होऊन आर्थिकदृष्ट्या या कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागत होते. ही अडचण कशामुळे येत आहे आणि त्यावर कायमस्वरुपी काय तोडगा काढावा अशी विचारणा या क्षेत्रातील सल्लागाराकडे करण्यात आली.
 
सल्लागार या कंपनीमध्ये आले आणि त्यांनी प्रेसचे निरीक्षण केले. प्रेस कोणत्या कारणामुळे जॅम होत असावा याचा अंदाज येण्यासाठी प्रेसची देखभाल करणारा अभियंता आणि ऑपरेटर या दोघांकडे प्रेसच्या कामगिरी आणि कार्यक्षमतेबाबत काही प्रश्न विचारले.
 
1. प्रश्न - प्रेस ओव्हरलोड झाल्यास सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना आहेत?
उत्तर - ओव्हरलोडपासून प्रेसचे संरक्षण करण्यासाठी हायड्रॉलिक प्रणाली आहे.
2. प्रश्न - प्रेस कधी जॅम होतो? प्रेसवर कार्यवस्तूचे सेटिंग सुरू असताना की प्रेसचे उत्पादन चालू असताना?
उत्तर - उत्पादन चालू असताना प्रेस जॅम होतो.
3. प्रश्न - काही कार्यवस्तूसाठी रॅम क्रँक स्क्रूमध्ये जास्त खाली घ्यावा लागतो अशावेळी प्रेस जॅम होतो की, सर्वसाधारण सेटिंग करून उत्पादन (प्रॉडक्शन) करताना प्रेस जॅम होतो ?
उत्तर - सर्वसाधारण सेटिंग असतानाही प्रेस जॅम होतो.
4. प्रश्न - कंपनीमध्ये अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो का आणि त्याचवेळेला जॅमिंग होते का?
उत्तर - कंपनीमध्ये बऱ्याचवेळा विद्युत पुरवठा खंडित होत असतो, मात्र त्यावेळेला प्रेस जॅम होणे ही समस्या येत नाही.
5. प्रश्न - हायड्रॉलिक आणि न्युमॅटिक यांपैकी कोणत्या प्रकारचा क्लच आणि ब्रेक वापरला जातो?
उत्तर - न्युमॅटिक.
6. प्रश्न - कॉम्प्रेसर वारंवार ‘ट्रिप’ होतो का?
उत्तर - हो. कॉम्प्रेसर वारंवार ‘ट्रिप’ होतो. हा रेसिप्रोकेटिंग पिस्टन प्रकारचा कॉम्प्रेसर असून 25 वर्षे जुना असल्यामुळे तो कोणत्याही कारणामुळे वारंवार ‘ट्रिप’ होतो.
7. प्रश्न - जेव्हा कॉम्प्रेसर ’ट्रिप’ होतो, त्यावेळेला जॅमिंगची समस्या येते का?
उत्तर - हो. कॉम्प्रेसर ’ट्रिप’ झाल्यानंतर अनेकदा प्रेस जॅम होतो.
8. प्रश्न - प्रेसवरील एअर प्रेशर स्विच किती व्हॅल्यूवर सेट केलेला आहे?
उत्तर - एअर प्रेशर स्विच 2.5 किग्रॅ/सेमी2 या व्हॅल्यूवर सेट केलेला होता. जेव्हा दाब (प्रेशर) या व्हॅल्यूपेक्षा कमी व्हायचा तेव्हा प्रेस जागीच थांबत होता, मात्र एअर प्रेशर स्विचमध्ये बिघाड असल्याकारणाने बऱ्याच दिवसांपासून तो बायपास केला आहे.
9. प्रश्न - जेव्हा प्रेस जॅम होतो तेव्हा स्ट्रोक इंडिकेटर हा तंतोतंत बॉटम डेड सेंटर (बी.डी.सी.) स्थानावर असतो का?
उत्तर - माहीत नाही, कारण मागील बऱ्याच दिवसांपासून स्ट्रोक इंडिकेटर काम करीत नाही.
 
Drawing of press system
 
विश्लेषण
मेकॅनिकल प्रेस हा क्रँक/इक्सेंट्रिक तत्वावर (मेकॅनिझमवर) काम करतो, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे.
 
प्रेसच्या इलेक्ट्रिक मोटरमधून निर्माण झालेली वर्तुळाकार हालचाल (रोटरी मोशन) क्लच आणि ब्रेक युनिटमधून पुढे क्रँककडे हस्तांतरित (ट्रान्समिट) केली जाते, ज्यामुळे रॅमची पुढे-मागे हालचाल (रेसिप्रोकेटिंग मूव्हमेंट) होते. रॅमला क्रँकद्वारे मिळणारी ऊर्जा ठराविकच (फिक्स्ड्) असते. जेव्हा रॅम बी.डी.सी. स्थानावर येतो तेव्हा मेकॅनिकल प्रेसमधील बल (फोर्स) वाढलेले असते, म्हणजेच त्याची टनेजमधील क्षमता वाढलेली असते. बी.डी.सी. स्थानाच्या अगोदर 12 ते 15 मिमीवर हा भार प्रेसच्या रेटेड क्षमतेच्या जवळपास असतो. स्ट्रोक आणि क्रँक अँगलमध्ये ‘सिन्युसॉयडल’ नाते असते. आलेख क्र. 1 मध्ये असे दिसून येईल की, रॅमने क्रँक अँगल 80० आणि 100० मध्ये (क्रँकचे 20० रोटेशन) पार केलेले (ट्रॅव्हल) उभे सरळ अंतर 15 सेमी आहे तर, रॅमने क्रँक अँगल 160० आणि 180० मध्ये (क्रँकचे 20० रोटेशन) पार केलेले उभे सरळ अंतर अंदाजे 1.5 सेमी आहे.
 
Article 1
 
जर, प्रेस 750t-cm ला इतक्या ऊर्जेसाठी डिझाईन केलेला असेल तर, पुढील सूत्र लागू पडते.
 
Table -2
 
15 सेमी अंतर ठराविक वेळेत विस्थापित करताना निर्माण झालेले टनेज
’T1’ = 750 / 15 = 50 T.
 
1.5 सेमी अंतर तेवढ्याच वेळेत विस्थापित करताना निर्माण झालेले टनेज
’T2’ = 750 / 1.5 = 500 T.
 
जेव्हा हालचालीच्या दिशेमध्ये खालच्या ते वरच्या असा बदल होतो, तेव्हा काही क्षणासाठी प्रवास झालेले अंतर ’शून्य’ असते. त्याठिकाणी निर्माण झालेले बल खूप जास्त असते. म्हणूनच कार्यवस्तूचे प्रेसिंग चालू असताना प्रेस बी.डी.सी. स्थानावर कधीच थांबवत नाहीत. तो बहुदा बी.डी.सी. स्थानाच्या अलीकडे किंवा पलीकडे 15 मिमी अंतरावर थांबवतात. प्रेसच्या कंट्रोल सर्किटमधून याची निश्चिती करता येते. प्रेस काही कारणामुळे थांबला असेल, तर तो परत चालू होण्यासाठी प्रचंड बल लागते. मोटर आणि क्लच इतक्या क्षमतेच्या बलासाठी सक्षम नसल्यामुळे प्रेस सुरू होत नाही. यालाच प्रेस जॅम झाला आहे असे म्हणतात.
 
वरील प्रश्नोत्तरातील आठवा प्रश्न फार महत्त्वाचा होता. या कंपनीतील क्लच न्युमॅटिक दाबाद्वारे काम करीत होता. कॉम्प्रेसर थांबला की, दाबदेखील कमी होत होता. अशा परिस्थितीत जेव्हा प्रेस कार्यवस्तूला बी.डी.सी. स्थानावर प्रेस करू लागतो तेव्हा क्लचने पूर्ण क्षमतेने पॉवर हस्तांतरित करणे गरजेचे असते. मात्र कमी दाबाच्या हवेमुळे ते शक्य होत नव्हते. त्यामुळे क्लच स्लिप होऊन प्रेस बी.डी.सी. स्थानावर जॅम होत होता.
 
जेव्हा हवेचा दाब 2.5 किग्रॅ/सेमी2 या व्हॅल्युच्या खाली जातो, तेव्हा प्रेशर स्विचद्वारे सर्वसाधारणपणे बी.डी.सी. स्थानाच्या अलीकडे किंवा पलीकडे प्रेस तात्काळ थांबविला जातो. मात्र या केसमध्ये एअर प्रेशर स्विच कामच करीत नव्हता. त्यामुळे प्रेस जॅम होत होता. जेव्हा प्रेशर स्विच कार्यरत असतो, तेव्हा ज्या दाबाला क्लच स्लिप व्हायला लागतो त्याच्या आधीच तो प्रेस बंद करतो. सर्किटमधील कॅम स्विच बी.डी.सी. भागात प्रेस बंद होणार नाही याची काळजी घेतो. त्याने प्रेस जॅम होण्याचे टळते.
 
सल्लागाराने देखभाल अभियंत्याला नवीन प्रेशर स्विच आणून जोडण्याचा सल्ला दिला. नवीन प्रेशर स्विच बसविल्यापासून प्रेस जॅम होणे ही समस्या पूर्णपणे बंद झाली.
 
अनिल गुप्ते इलेक्ट्रिकल अभियंते असून, त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील 53 वर्षांचा अनुभव आहे. टाटा मोटर्समधील मेंटेनन्स आणि प्रोजेक्टस् संबंधित प्लांट इंजिनिअरिंगमधील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून, सध्या ते तांत्रिक सल्लागार म्हणून काम करतात.
@@AUTHORINFO_V1@@