पारंपरिक सिलिंड्रिकल ग्राईंडिंग मशिनमध्ये एखाद्या कार्यवस्तूवर कंटूर आकाराचे ग्राईंडिंग करायचे असेल, तर ग्राईंडिंग व्हीलला आकार देण्यासाठी अनुरूप क्रशर असावा लागतो किंवा सी.एन.सी. मशिनवरील ड्रेसर असावा लागतो. यासाठी कारखान्यात सी.एन.सी. मशिन अथवा स्पेशल ड्रेसर लागतात, परंतु सी.एन.सी. मशिनचा पर्याय फारच खर्चिक ठरतो.
आमच्या कंपनीत पिनचे (चित्र क्र. 1) काम आले. यामध्ये कंटूर ग्राईंडिंग करण्याची आवश्यकता होती. कंटूर ग्राईंडिंग करण्यासाठी आम्ही सी.एन.सी. मशिनचा पर्याय बघितला, परंतु तो फारच खर्चिक असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पारंपरिक ग्राईंडिंग मशिनवर अशा प्रकारचे कंटूर कसे करायचे यासाठी आम्ही विचार केला.
ग्राईंडिंग व्हीलला अपेक्षित कंटूर आकार देण्यासाठी ड्रेसर व्हीलच्या अक्षाला एकाचवेळी समांतर आणि लंब दिशेने फिरणे गरजेचे होते. त्यासाठी उपलब्ध सिलिंड्रिकल ग्राईंडिंगवर प्रोफाईल ड्रेसिंग ॲटॅचमेंट (चित्र क्र. 2) करण्याचे ठरविले. ही ॲटॅचमेंट मशिनच्या टेबलवर पकडली जाते. त्यामध्ये दोन्ही दिशेला एकाच वेळी हालणाऱ्या कॉम्पोझिट स्लाईडचा उपयोग केला आहे. मुख्य स्लाईड व्हीलच्या अक्षाला समांतर असून, तिच्यावर त्याला लंब दिशेने हालणारी क्रॉस स्लाईड बसविली आहे. क्रॉस स्लाईडवर एका बाजूला छिन्नीच्या (चिझल) आकाराचा ट्रेसर आणि तसाच ड्रेसर असलेला ठोकळा बसविला आहे. या ठोकळ्याला स्प्रिंगने दाब दिलेला आहे. त्यामुळे ट्रेसर कार्यवस्तूच्या प्रोफाईलनुसार केलेल्या टेम्प्लेटच्या (चित्र क्र. 3) कायम संपर्कात राहतो. समांतर स्लाईड बॉल स्क्रूच्या साहाय्याने हाताने पुढे-मागे केली जाते, त्यावेळी क्रॉस स्लाईडवर बसविलेला ट्रेसर, स्प्रिंगच्या दाबामुळे टेम्प्लेटनुसार अपेक्षित मार्गात हालचाल करतो. त्याच ठोकळ्यावर ड्रेसर बसविला असल्याने तो टेम्प्लेट प्रोफाईलप्रमाणे व्हीलचेड्रेसिंग करतो.
हे काम करण्यासाठी 40 लाख रुपयांचे सी.एन.सी. ग्राईंडिंग मशिन न घेता काही हजार रुपयांत आम्हाला हवे ते प्रोफाईल करता आले.
ए.आर.परांडेकर हे यांत्रिकी अभियंते आहेत. त्यांनी किर्लोस्कर, कमिन्समध्ये विविध विभागांमध्ये 28 वर्षे काम केले आहे. सध्या ते तांत्रिक सल्लागार म्हणून काम करत आहेत.