इक्वेटरद्वारा मशिनजवळ तपासणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    07-Aug-2018   
Total Views |

Inspection near machine by equator
 
’किशन ऑटोपार्टस् प्रा.लि’, ही गुजरात राज्यातील राजकोट येथील कंपनी आहे. ही कंपनी कार, कॉम्प्रेसर, अवजड औद्योगिक वाहने, ट्रॅक्टर, सागरी इंजिन आणि अर्थ मूव्हर यांचे उत्पादन करणाऱ्या मोठ्या कंपन्यांना कनेक्टिंग रॉडचा पुरवठा करते. कनेक्टिंग रॉडचे उत्पादन करणाऱ्या जगातील अग्रगण्य कंपन्यांच्या यादीमध्ये या कंपनीचे नाव आहे.
 
आव्हान
 
1. अधिक कार्यक्षमतेने उच्च गुणवत्तेच्या कनेक्टिंग रॉडच्या उत्पादन खर्चात आणि मोजमापनाच्या वेळेत बचत करणे.
2. तापमानातील बदलाचा गुणवत्तेवर कोणताही परिणाम होऊ न देणे.
 
जुनी पद्धत
 
’किशन ऑटोपार्टस् प्रा. लि.’ कंपनीमध्ये मागील अनेक वर्षांपासून व्यास, गोलाकारिता (सर्क्युलॅरिटी), बाक (बेंड) आणि पीळ (ट्विस्ट) मोजण्यासाठी एअर गेजचा वापर केला जात होता. 360 प्रकारच्या वेगवेगळ्या कनेक्टिंग रॉडपैकी प्रत्येकासाठी 3 ते 4 वेगवेगळे गेज तयार केले जात होते. अवजड कामासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या कनेक्टिंग रॉडचे 100% मोजमापन करावे लागत असे. हे हार्ड गेज 10,000 वेळा वापर होईपर्यंत टिकतात, असा कंपनीचा अनुभव आहे. प्रत्येक वेगवेगळ्या कनेक्टिंग रॉडसाठी लागणाऱ्या 4 पैकी 3 गेजची किंमत 6,000 रुपये, तर डिस्प्लेची किंमत 30,000 रुपये, शिवाय बाक आणि पीळ मोजणाऱ्या चौथ्या गेजची किंमत 3,00,000 रुपये असते. त्यात अशा एका अती महत्त्वाच्या भागाचा समावेश आहे, जो वारंवार खराब होतो. त्यामुळे तो बदलावा लागतो.
 
प्रत्येक एअर गेजच्या संपूर्ण मोजमापन प्रक्रियेसाठी 120 सेकंद एवढा वेळ लागतो. म्हणजेच चार तपासण्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक भागामागे संपूर्ण प्रक्रियेला 8 मिनिटे एवढा कालावधी लागतो. या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत असल्यामुळे या कंपनीला अधिक जलद गतीने मोजमापन करणाऱ्या पद्धतीची गरज होती.
 
उपाय
 
बहुगुणी आणि तापमानात बदल झाला तरी मापात कोणतेही बदल न होऊ देणारी यंत्रणा निवडणे हे या कंपनीपुढील आव्हान होते. तसेच यंत्रणेमध्ये शोधक्षमता (ट्रेसेबिलिटी) असली पाहिजे, उत्पादनक्षमता वाढली पाहिजे, या कंपनीच्या गरजा होत्या. यासाठी कंपनीने ‘रेनिशॉ इक्वेटर फ्लेक्झिबल गेजिंग कंपॅरेटर’ खरेदी केला.
 
equator   
 
इक्वेटर कसे काम करतो?
 
ज्या कार्यवस्तूंचे मोजमापन करावयाचे आहे, त्याची आदर्श (मास्टर) कार्यवस्तू को-ऑर्डिनेट मेजरिंग मशिनवर (सी.एम.एम.) ठेवून मोजमापांची नोंद केली जाते. ही मोजमापे इक्वेटरमध्ये संग्रहित केली जातात. (इक्वेटर कसा काम करतो हे पाहण्यासाठी सोबतचा QR कोड मोबाईलवर स्कॅन करा.)
 
 
 
त्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या जागी इक्वेटर ठेवून, तयार होणाऱ्या कार्यवस्तू इक्वेटरच्या प्रोबच्या साहाय्याने तपासल्या जातात. नोंदल्या गेलेल्या मोजमापांची इक्वेटरमधील आदर्श मोजमापांशी तुलना होते आणि आपल्याला प्रत्यक्ष मोजमापे तसेच अपेक्षित मोजमापांशी केलेली तुलना असे दोन्ही अहवाल (रिपोर्ट) उपलब्ध होतात. तापमानानुसार आदर्श कार्यवस्तूमध्ये होणारे अपेक्षित बदलही इक्वेटर समजून घेत असल्याने तो संदर्भ घेऊन काय मोजमाप असावे याचाही अहवाल इथे मिळू शकतो.
 
इक्वेटरला दिलेली माहिती ही आदर्श कार्यवस्तू 200 से. तापमानात किमान 2 तास ठेवून त्याची सी.एम.एम.मध्ये घेतलेली मापे इक्वेटरला पुरविली जातात. तेव्हाच्या प्रत्यक्ष मापांमधील फरकही इक्वेटरला पुरविलेला असतो. त्यामुळे शॉप फ्लोअरवर उपलब्ध तापमानात जेव्हा कार्यवस्तू तपासली जाते तेव्हा साठवलेल्या माहितीचा वापर करून कार्यवस्तूची 200 से. तापमानात काय मापे असतील याची माहिती इक्वेटरमधून मिळते.
 
अंमलबजावणी नंतरचे फायदे
 
हा कंपॅरेटर वापरल्यानंतर प्रक्रियेत तात्काळ सुधारणा होत असल्याचे दिसून आले. हा कंपॅरेटर राजकोट (गुजरात) येथे वापरला जातो. इथले तापमान 400 से. पर्यंत वर जाते आणि 190 से. पर्यंत खाली येते. तापमानामध्ये एवढा मोठा फरक होत असतानाही या इक्वेटर प्रणालीमधून सातत्यपूर्ण निकाल मिळत आहेत. हे साध्य करण्यासाठी दर 3 तासांनी किंवा तापमानात दखल घेण्याइतका बदल झालेला दिसल्यावर ‘री-मास्टरिंग’ करण्यात येते. अशा पद्धतीने यंत्रणेचे ‘रिझिरोइंग’ (सर्व किंमती पुन्हा ’शून्य’ करणे) केल्यामुळे मोजमापांवरील तापमानवाढीचा परिणाम काढून टाकला जातो आणि खात्रीलायक दर्जाचे भाग मिळतात. ’आदर्श कार्यवस्तू’, मशिनजवळ उत्पादन होणाऱ्या भागांभोवती असणाऱ्या तापमानाच्या परिस्थितीमध्येच ठेवली जाते. जर आजूबाजूचे तापमान अचानक बदलले आणि भागाचे मोजमाप मर्यादेच्या बाहेर बदलले गेले, तर कर्मचारी ’आदर्श कार्यवस्तू’चे पुन्हा मोजमापन करून यंत्रणा ‘रिसेट’ करतो.
 
कंपॅरेटरच्या वापरानंतर मोजमापन खर्चात आणि वेळेत 80 टक्क्यांहून अधिक बचत होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच कारखान्यातील तापमानात 210 से. इतका मोठा बदल होऊनही इक्वेटरच्या विशेष कंपॅरेटर पद्धतीमुळे मोजमापनावर कोणताही परिणाम झाला नाही.
 
कंपॅरेटरमध्ये ’आदर्श कार्यवस्तू’ म्हणून याच कंपनीतील सी.एम.एम.वर कॅलिब्रेट केलेले भाग वापरण्यात आले.
 
आता या कंपनीतील शॉप फ्लोअरवर कनेक्टिंग रॉडच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या मोजमापनासाठी बहुआयामी इक्वेटरचा वापर केला जात आहे. सध्या प्रति कनेक्टिंग रॉडसाठी सर्वसाधारणपणे लागणारा 55 सेकंदांचा वेळ हा पूर्वीच्या पद्धतीने लागणाऱ्या वेळेपेक्षा खूपच कमी आहे.
 
कर्मचारी एका इक्वेटर मशिनचा वापर अनेक वेगवेगळ्या भागांसाठी करू शकतो. सर्व अपेक्षित मोजमापे एकाचवेळी करून ताबडतोब स्वीकृत/अस्वीकृत हा निकाल तर देतोच, पण त्याबरोबर त्या भागाच्या सर्व मोजमापनांचा अहवालसुद्धा देतो.
 
Measurement of connecting rod by equator
 
 शोधक्षमता आणि वाढीव उत्पादनक्षमता
 
आदर्श कार्यवस्तू सी.एम.एम.वर कॅलिब्रेट केली जात असल्यामुळे गुणवत्तेची खात्री देण्यासाठी गरजेची असलेली शोधक्षमता त्या ’आदर्श कार्यवस्तू’ला मिळते. परंतु तापमानातील बदल लक्षणीय असल्यामुळे हे सी.एम.एम. कंपनीमधील तापमान नियंत्रित खोलीतच वापरावे लागते.
 
इक्वेटरमुळे ‘किशन’ला कोणत्याही परिस्थितीत खात्रीशीर अचूकता शॉप फ्लोअरपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे. हे साध्य करण्यासाठी आवश्यक असणारे आणखी एक स्कॅनिंगची क्षमता असलेले सी.एम.एम. खरेदी करण्याची गरज इक्वेटरमुळे राहिलेली नाही.
त्यामुळेच या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शांतीलाल चांगेला या इक्वेटर आणि सी.एम.एम.बाबत समाधानी आहेत. ते असे नमूद करतात की, ’इक्वेटर आणि सी.एम.एम. हे खऱ्या अर्थाने एकमेकांना पूरक आहेत. एकामुळे शोधक्षमता असलेली मान्यताप्राप्त अचूकता मिळते, तर दुसऱ्यामुळे तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता मिळते.’
 
मोजमापनाच्या खर्चात बचत
 
केवळ लागणारा वेळ आणि तापमानातील बदलाला यशस्वीरीत्या तोंड देण्याची क्षमता हेच या कंपनीच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न नव्हते, तर मोजमापनासाठी होणारा खर्च ही त्याहूनही जास्त महत्त्वाची समस्या होती. त्यांनी इक्वेटर यंत्रणेने मोजता येतील असे वेगवेगळे 77 कनेक्टिंग रॉड निवडले. त्यांचे कर्मचारी दररोज 10 तासांच्या पाळीत ही यंत्रणा वापरून 500 भागांचे मोजमापन करतात. सर्व 77 प्रकारच्या कनेक्टिंग रॉडसाठी या कंपनीने हार्ड गेजमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरविले असते, तर त्यांना 2.3 कोटी रुपये इतकी गुंतवणूक फक्त गेजसाठी करावी लागली असती. त्याशिवाय या गेजला ठेवण्यासाठी जागा आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारे कुशल कर्मचारी आणि गेजचा वापर करताना होणारा खर्च त्याशिवाय वेगळाच झाला असता.
 
‘किशन’ची प्रगती
 
शांतीलाल चांगेला यांनी ही कंपनी 1988 मध्ये सुरू केली. सध्या ते दरमहा 360 प्रकारच्या 50,000 कनेक्टिंग रॉडचे उत्पादन करतात. ’किशन’च्या उत्पादनांपैकी 90% उत्पादनांची प्रमुख औद्योगिक आणि विकसित देशांमध्ये निर्यात केली जाते. त्यांच्याच फोर्जिंग कारखान्यात बनविलेल्या कच्च्या मालापासून ते संपूर्ण यंत्रण केलेले कनेक्टिंग रॉड 60-90 दिवसांत बनविणे हे त्यांचे वैशिष्टय आहे. चांगेला म्हणतात, ’आमच्यासाठी गुणवत्ता अतिशय महत्त्वाची आहे. आम्ही सातत्याने 100% गुणवत्ता गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, पण त्याबरोबरच कार्यक्षमता वाढवून होणारी बचत ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. इक्वेटर गेजिंग यंत्रणा आणल्यामुळे उत्पादनांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात उंचावली आहे. कारण या यंत्रणेमुळे कंपनीला 100% उत्पादनांची तपासणी सहजपणे आणि जलद गतीने करणे शक्य झाले आहे. तसेच सर्व उत्पादनांवर आनंदाने 100% गुणवत्तेची खात्री देता येत आहे.’
 
यांत्रिकी अभियंते असलेले श्रीपाद शौचे ’रेनिशॉ’ कंपनीमध्ये व्यवसाय विकास व्यवस्थापक आहेत. यापूर्वी त्यांनी ’रेनिशॉ’मध्ये विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना यांत्रिकी क्षेत्रातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
@@AUTHORINFO_V1@@