अभियांत्रिकी ड्रॉईंग युक्त्या : 8

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    03-Sep-2018   
Total Views |

Engineering Drawing Tips: 8
 
मागील दोन-तीन लेखांपासून आपण आपल्याला माहीत असलेल्या कमांडचे आधुनिक स्वरूप समजावून घेत आलो आहोत. कमांडच्या अंतर्गत काही विशिष्ट गरजा असतात. त्या गरजा लक्षात घेऊन काम करत असताना, त्या सामावून घेतल्यामुळे त्यांच्या परिणामकारकतेमध्ये व्यापकता येते. त्यामुळेच या कमांड आधुनिक झाल्या आहेत, असे आपण म्हणू शकतो. या पूर्वीच्या लेखामध्ये आपण SUPERHATCH ही अशीच एक कमांड उदाहरणासह अभ्यासली आहे. छायाचित्र, चिन्हे, तसेच मानांकनावर आधारित आधीच तयार करून ठेवलेले ब्लॉक (BLOCK) या कमांडमध्ये आपण वापरतो. अक्षरांपेक्षा चित्रे परिणामकारक ठरत असल्यामुळे अक्षरे, शब्द किंवा टीप दर्शवून काढलेले आरेखन यापेक्षा वरीलप्रमाणे केलेले आरेखन हे ड्रॉईंग वाचणाऱ्यास निश्चितच समजण्यास सोपे जाते. परिणामी वेळेची बचत होते आणि आरेखनाचा नेमका परिणाम साध्य होतो. या लेखामध्ये आपण अशाच काही प्रकारच्या आधुनिक झालेल्या कमांड पाहणार आहोत.
 
ऑटो नंबरिंग
 
’धातुकाम’च्या ऑगस्ट 2018 मासिकामध्ये आपण जनरल ॲरेंजमेंट ड्रॉईंगसंबंधीचे उदाहरण पाहिले होते. त्याच उदाहरणाचा आपण या लेखात दाखला घेणार आहोत. या प्रकारच्या ड्रॉर्ईंगमध्ये अनेकविध घटकांचा अंतर्भाव असतो. जसे की, लेथ मशिन, ड्रिल मशिन, मिलिंग मशिन, ग्राईंडिंग मशिन इत्यादी प्रकारची मशिन दर्शविणारा प्रत्यक्ष कारखाना विभाग (शॉप फ्लोअर), तसेच कार्यालयीन विभाग, साहित्य ने-आण करण्याची पद्धती आणि त्याचे प्रकार यासंबंधीची विस्तृत माहिती या ड्रॉईंगमध्ये समाविष्ट केलेली असते. तसेच वास्तू (आर्किटेक्च्युअल) ड्रॉईंग आणि फॅब्रिकेशन ड्रॉर्ईंगमध्ये अनेकविध अँगल, बीम, कॉलम इत्यादीची सविस्तर माहिती असणे आवश्यक असते. त्याकरिता या सर्व बाबी समाविष्ट करून त्यांची एक सूची तयार करावी लागते, जेणेकरून ड्रॉर्ईंग अभ्यासल्यानंतर प्लँटबाबतची कल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. यासाठी या सर्व बाबींना त्यांच्या तपशिलासहीत अनुक्रमांक देणे सोयीचे होते, ज्यामुळे ते पद्धतशीरपणे त्या-त्या अनुक्रमांकानुसार त्याच्या योग्य जागी बसविताना सोपे जाते. हे क्रमांक देत असताना आपण मायन्याचा (Text) किंवा ’Balloons’ चा वापर करतो, जे तो मायना हलविला असता त्याबरोबर हालत नाहीत आणि त्याची जागा आहे तीच राहते. या सर्वांमुळे ड्रॉईंग तयार करणाऱ्याच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. सदर ड्रॉईंगमध्ये काही तपासणी न करता ते ग्राहकाकडे गेले तर, असे ड्रॉर्ईंग ग्राहकाच्या आकलनापलीकडे जाते. हा सर्व गोंधळ टाळण्यासाठी ऑटो नंबरिंग (Auto Numbering) ही कमांड वापरणे सोयीचे जाते.

Reference diagram showing the details of the column
 
चित्र क्र. 1 नुसार आपण ड्रॉर्ईंगमधील विविध घटकांना अनुक्रमांक देऊ शकतो.
 
‘ऑटो नंबरिंग’ ही कमांड कशी वापरावी यासंबंधीचे निर्देश खालील टप्प्यानुसार अधोरेखित केले आहेत.
 
• एक्सप्रेस टूलमध्ये ‘ऑटो नंबरिंग’ ही स्वतंत्र टॅब आहे. ती निवडावी किंवा कमांड लाईनमध्ये ’tcount’ असे टाईप करावे.
• ज्याला आपल्याला अनुक्रमांक द्यावयाचा आहे ती मायन्याची ओळ निवडावी.
• जेथून क्रमांक सुरुवात करायचा आहे (उदाहरणार्थ, 1 ते 10 असे क्रमांक द्यावयाचे असतील तर, तिथे 1 टाईप करावे.) तेथून पुढील क्रमांक याप्रमाणे ते-ते मायने (टीप) निवडत जाऊ त्याप्रमाणे तो 1, 2, 3, ........10 असे क्रमांक आपोआपच घेत जाईल.
• तसेच ते क्रमांक आधी, नंतर असेही आपण देऊ शकतो. परंतु शक्यतो आपण ते प्रथमच देत असतो आणि त्यानंतर त्याची माहिती देणारी टीप असते.
 
अशाप्रकारे आपण ‘ऑटो नंबरिंग’ ही कमांड प्रत्यक्षात आणू शकतो.
 
ऑटो नंबरिंग कमांडमुळे होणारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
 
• आधीच उपलब्ध असलेल्या मायन्याला, टीपला आपण अनुक्रमांक देऊ शकतो.
• अनुक्रमांक त्याच्याशी एकरूप होत असल्यामुळे टीप आणि क्रमांक एकत्र राहतात.
• आपल्याला हवा तसा अनुक्रमांक फक्त ती टीप अथवा तो मायना निवडत जाऊन त्या अनुषंगाने देता येतो.
• एकच काम पुन्हा पुन्हा करणे टाळता येते आणि त्यामुळे वेळेची बचत होते.
• अशा प्रकारच्या ड्रॉर्ईंगमध्ये यामुळे सुसूत्रता येते.
• क्लिष्टता टाळता येते. त्याबरोबरच आपण केलेली ‘प्लँट’ची किंवा फॅब्रिकेशन स्ट्रक्चरची मांडणी ही फेरपडताळणी केल्यासरशी ही कमांड वापरता-वापरता आपल्या नजरेखालून जाते. त्यात आवश्यक तो बदलही आपण सरतेशेवटी या कमांडच्या माध्यमातून अगदी सहज आणि पटकन घडवून आणू शकतो.
 
आपण अभ्यासत असलेल्या या काहीशा वेगळ्या धाटणीच्या परंतु नेहमी वापरत असलेल्या कमांडमुळे ड्रॉर्ईंग तयार करताना त्याचे आरेखन हे सहज साध्य होईल. त्याबरोबरच आपल्या कार्यशैलीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आढळून येईल. ज्याद्वारे आपला वेळ वाचेल, तसेच नेमकी परिणामकारकता साध्य करता येईल. अशाच प्रकारच्या इतर काही आधुनिक कमांड आपण पुढील लेखात पाहणार आहोत.
 
9823389389
अमित घोले यांत्रिकी अभियंते असून त्यांनी ॲटलास कॉपको, इमर्सन इनोव्हेशन सेंटर, थायसन क्रूप अशा मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये डिझाईन विभागात अनेक वर्षे काम केल्यानंतर ’इमॅजिका टेक्नोसॉफ्ट’ या इंजिनिअरिंग डिझाईन सोल्युशन आणि कॉर्पोरेट प्रशिक्षण देणाऱ्या कन्सल्टन्सीची स्थापना केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@