वाहन उद्योगामध्ये (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री) काम करत असताना दोन गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. एक म्हणजे कारखान्यातील अपघात विरहित उत्पादन आणि दुसरी म्हणजे ऊर्जेची बचत. यासाठी अनेकजण आपल्या कंपन्यांमध्ये योग्य त्या सुधारणा करत असतात. त्यातील एका सुधारणेविषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
समस्या
आमच्या कंपनीमध्ये दोन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम चालते. रात्रपाळीमध्ये जेव्हा एअर कॉम्प्रेसर बंद व्हायचा, त्यावेळी मॅनिप्युलेटरच्या हवेचा पुरवठाही बंद होत असे. तेव्हा त्याचे हुक (टॅकल) आपोआप खाली यायचे. सकाळच्या पाळीमध्ये हवेचा पुरवठा चालू केल्यानंतर मॅनिप्युलेटरचे हुक आपोआप वर जायला लागायचे. त्यामुळे हुकला लागून असलेल्या वस्तू उदाहरणार्थ, ट्रॉली, गाडी, ऑपरेटरच्या शर्टची बाही त्यामध्ये अडकून अपघात होण्याच्या शक्यता जास्त असायच्या. असे अनेक अपघात आम्ही अनुभवले आहेत. त्यामुळे मॅनिप्युलेटरचे हुक आम्हाला बांधून ठेवावे लागत असे.
वरील समस्या प्रामुख्याने सुरक्षिततेच्या संदर्भातील होती, तर दुसरी समस्या ही बचतीबाबत होती. मॅनिप्युलेटरच्या सर्किटमध्ये एक प्रिसिजन बॅलन्सिंग व्हॉल्व्ह असतो. त्या व्हॉल्व्हला 0.3 मायक्रॉन व्यासाचे भोक असते. त्यातून सातत्याने हवेची गळती होऊन ती वाया जात होती.
कारखान्यात दाबयुक्त हवा, डिझेल, पाणी, ऑईल, पेट्रोल इत्यादीपेक्षा सर्वात जास्त वीज एअर कॉम्प्रेसर चालविण्यासाठी खर्च होत असते. कारखान्यात तयार होणाऱ्या दाबयुक्त हवेतील सामान्यतः 30% हवा वेगवेगळ्या गळत्यांमुळे वाया जात असे. अपघात टाळणे आणि गळती थांबविणे या दोन्ही गोष्टींवर उपाय करण्यासाठी आजवर केलेल्या कामाच्या अनुभवाचा फायदा झालाच, त्याबरोबरच पूर्वी अनेक न्युमॅटिक सर्किट बनविल्यामुळे मॅनिप्युलेटरमध्ये पुढील सुधारणा करण्यास मदत झाली.
नवीन पद्धत
सुधारित पद्धतीमध्ये पायलट 3/2” ऑपरेटेड व्हॉल्व्ह आणि 1/4” लॉक अप व्हॉल्व्ह समाविष्ट केला आहे. सुधारित पद्धतीमध्ये हवेचा दाब बंद झाल्यास लॉक अप व्हॉल्व्ह 3/2” या पायलट व्हॉल्व्हचा पुरवठा बंद करून तो व्हॉल्व्ह सिलिंडरला आहे त्या ठिकाणी लॉक करतो. सकाळी हवेचा पुरवठा सुरू झाल्यानंतर सिलिंडर मोकळा होतो, परंतु तो एका ठिकाणी स्थिर राहतो. हे त्याच सर्किटमध्ये समाविष्ट करून मॅनिप्युलेटर अपघातविरहित केला. तसेच मॅनिप्युलेटरमधून वाया जाणाऱ्या हवेची बचत झाली.
फायदे
1. मॅनिप्युलेटरचे हुक बांधून ठेवावे लागत नाही.
2. अपघाताची शक्यता टळली.
3. हवेची मोठ्या प्रमाणात बचत झाली.
0 7756854258
दिलीप पाटील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत मेकॅनिक म्हणून काम करत आहेत. त्यांना न्युमॅटिक आणि हायड्रॉलिक क्षेत्राचा ३२ वर्षांचा अनुभव आहे.