ड्रिलिंग जिग : 7

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    23-May-2019   
Total Views |
 
 
‘धातुकाम’ जून 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखात तिरक्या पृष्ठभागावर ड्रिलिंग कसे केले जाते आणि यंत्रण अचूक तसेच योग्य प्रकारे कसे करायचे याविषयी जाणून घेतले. त्यासोबतच त्यासाठी आवश्यक असलेले काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले.
1. टूलिंगसाठी भोक केल्याशिवाय हे जिग बनविणे अशक्य आहे.
2. टूलिंग भोकाची स्थाननिश्चिती आरेखन करणार्‍याने केलीच पाहिजे.
3. कार्यवस्तुचा पृष्ठभाग तिरका असल्यामुळे बुशचा खालचा पृष्ठभागसुद्धा कार्यवस्तुच्या पृष्ठभागाला समांतर असा तिरका बनवावा लागतो.
4. कार्यवस्तुचा तिरका पृष्ठभाग आणि बुशचा तिरका पृष्ठभाग यामध्ये कमीतकमी अंतर ठेवणे अत्यावश्यक आहे. जर अंतर जास्त असेल, तर ड्रिल भरकटेल आणि कार्यवस्तू वाया जाईल.

3_2  H x W: 0 x 
 
या लेखामध्ये आपण फ्लॅट टॉप ड्रिल जिगचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारच्या जिगमध्ये बर्‍याच वेळेला गरज पडली तरच कार्यवस्तू क्लॅम्पच्या साहाय्याने पकडली जाते. या जिगमध्ये ती दोन भोकांमध्ये लोकेट केली आहे. तसेच ती जिग बटनवर ठेवलेली आहे. आपण या जिगच्या (चित्र क्र. 1) वेगवेगळ्या भागांचे कार्य पाहू.
1. जिग प्लेट
यामध्ये आपल्याला असे दिसते की, जिग प्लेटचा आकार वेडावाकडा आहे. जर आपण चौकोनी आकाराची प्लेट घेतली, तर तिचे वजन जास्त होईल. तसेच कर्मचार्‍याला प्रत्येक कार्यवस्तू करताना दोन वेळा जिग प्लेट उचलावी लागेल. त्यामुळे जिग प्लेटचे वजन शक्यतो कमीतकमी ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या प्लेटमध्ये ØD1, ØD2 आणि ØD3 अशी 3 भोके पाडलेली आहेत. ही भोकेसुद्धा वजन कमी करण्यासाठीच केली आहेत, हे आपल्या लक्षात येईल. जिग प्लेट ठेवण्यासाठी आणि उचलण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून दोन हँडलची सोय केलेली आहे. जिग प्लेटचा आकार लहान असल्यामुळे तिचे वजन मर्यादित आहे. शक्यतो हे वजन 12 ते 15 किलोग्रॅमपेक्षा जास्त नसावे, मात्र ही प्लेट उचलण्यास सोयीची असावी. अशा प्रकारची जिग प्लेट कधी वापरावयाची यासाठी पुढील निकष दिलेले आहेत.
• जेव्हा कार्यवस्तूचे वजन जास्त असते, कार्यवस्तू आकाराने मोठी असते किंवा हाताळण्यास गैरसोयीची असते तेव्हा अशा प्रकारची जिग प्लेट वापरली जाते. कारण कार्यवस्तुच्या मानाने ही जिग प्लेट हलकी, आकाराने सुटसुटीत तसेच हाताळण्यास सोयीची असते.
• जेव्हा लहान आकाराची भोके करावयाची असतात तेव्हा यंत्रणाचे बल कमी असल्याने लोकेटिंग पिन तुटण्याचा अथवा जिग प्लेटसह कार्यवस्तू फिरण्याचा धोका संभवत नाही.
• थ्रेडिंग असलेली भोके करावयाची असल्यास ही पद्धत वापरू नये, कारण आटे करताना किंवा टॅप वर काढताना कार्यवस्तू वर उचलण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो. कार्यवस्तू खराब होऊ शकते किंवा टॅप तुटू शकतो.
 
प्रथम जिग बटनसाठी लागणारी 6 भोके H7 मर्यादेत करून घेतली. ही सर्व 6 बटन जिग प्लेटमध्ये केलेल्या भोकात प्रेस फिट बसविल्यानंतर जिग बटनच्या पृष्ठभागाचे एकाच पातळीत ग्राइंडिंग केले. आता या जिग बटनवर जिग प्लेट ठेवून नंतर जिग प्लेटवरील सर्व महत्त्वाची भोके +/-0.01 मिमी. टॉलरन्समध्ये बनविली. अशा प्रकारे यंत्रण केल्यामुले सर्व महत्वाची भोके जिग बटनच्या पृष्ठभागाला लम्बरूप होतात.
• राउंड लोकेटिंग पिन आणि डायमंड लोकेटिंग पिन बसविण्यासाठी लागणारी भोके H7 मर्यादेत करून घेतली.
• कार्यवस्तूवरील 12 भोके करण्यासाठी जी बुश बसविली आहेत त्यासाठी जी भोके जिग प्लेटमध्ये करावी लागतात ती H7 मर्यादेत करून घेतली.
 
2. राउंड लोकेटिंग पिन
कार्यवस्तुच्या भोकाचा आकार Ø36 H7 या मर्यादेत आहे. त्यामुळे राउंड लोकेटिंग पिनचा व्यास Ø36 f8 असा नियंत्रित केलेला आहे. या पिनच्या जिग प्लेटच्या बाहेर असलेली लांबी किती ठेवावी यासाठी पुढे दिल्याप्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे.
• रेस्ट बटनचा पृष्ठभाग कार्यवस्तुच्या पृष्ठभागाच्या थोडा वर असताना, (साधारणपणे 5 मिमी.) राउंड लोकेटिंग पिन सर्वसाधारणपणे व्यासाएवढी भोकाच्या आत गेलेली पाहिजे. या जिगच्या बाबतीत ती 30 मिमी.पर्यंत आत असली पाहिजे.
• राउंड लोकेटिंग पिन कार्यवस्तूमध्ये साधारणपणे अर्ध्या व्यासाएवढी आत गेल्यानंतरच डायमंड पिन कार्यवस्तूमध्ये असलेल्या भोकात जायला सुरुवात झाली पाहिजे. म्हणजेच राउंड पिन डायमंड पिनपेक्षा जास्त लांब असणे गरजेचे आहे. यामुळे जिग प्लेट कार्यवस्तूमध्ये योग्य प्रकारे बसविणे सोपे जाते.
• राउंड लोकेटिंग पिन आणि डायमंड पिन यांना मोठे चॅम्फर (3X300) दिल्यामुळे कार्यवस्तुची काढघाल सहजपणे होते. कर्मचार्‍याला थकवा जाणवत नाही.
 
या जिग प्लेटमध्ये राउंड लोकेटिंग पिन प्रेस फिट बसविली आहे. त्यामुळे ती पूर्ण कठीण (हार्ड) केली तरी चालेल, परंतु जर राउंड लोकेटिंग पिन नट किंवा स्क्रूच्या साहाय्याने बसविली तर मात्र केसहार्ड करावी लागते.
 
3. डायमंड लोकेटिंग पिन
कार्यवस्तुच्या भोकाचा आकार Ø32 H7 असा आहे. त्यामुळे डायमंड लोकेटिंग पिनचा व्यास Ø32 f8 असा नियंत्रित केलेला आहे. कार्यवस्तुची काढघाल सुलभपणे होण्यासाठी डायमंड लोकेटिंग पिन देणे आवश्यक आहे.
 
या जिग प्लेटमध्ये डायमंड लोकेटिंग पिन प्रेस फिट बसविली आहे, त्यामुळे ती पूर्ण कठीण केली तरी चालेल. जर डायमंड लोकेटिंग पिन नट किंवा स्क्रूच्या साहाय्याने बसविली, तर मात्र केसहार्ड करावी लागते. वर सुचविल्याप्रमाणे डायमंड लोकेटिंग पिनची लांबी राउंड लोकेटिंग पिनपेक्षा कमी ठेवावी.
 
4. जिग बटन
जिग बटन हे पूर्ण कठीण केलेले असते आणि जिग प्लेटमध्ये प्रेस फिट बसविलेले असते. या जिग प्लेटमध्ये 6 जिग बटन वापरली आहेत. ही सर्व बटन जिग प्लेटमध्ये प्रेस फिट बसविल्यानंतर जिग बटनच्या पृष्ठभागाचे एकाच पातळीत ग्राइंडिंग केले जाते. या जिग बटनऐवजी रेस्ट पॅडचा वापर केला तरी चालेल, किंबहुना रेस्ट पॅडलाच प्राधान्य द्यावे. जिग बटन ही एक पर्यायी व्यवस्था म्हणून दर्शविली आहे.
 
5. हेडलेस जिग बुश
या कार्यवस्तूमध्ये 12 भोके एकाच मापाची आहेत. त्यामुळे सर्व बुश एकाच आकाराची आहेत. ही सर्व जिग बुश पूर्ण कठीण केलेली आहेत आणि ती प्रेस फिट बसविलेली आहेत. ही बुश प्रमाणित केलेली असतात. त्यामुळे एखादे बुश खराब झाल्यास तात्काळ बदलता येते. (संदर्भ: IS 666-1 : Jig Bushes, Part I: Headed and Headless Jig Bushes) या ठिकाणी लाइनर बुश आणि रिन्युएबल स्लिप बुशचासुद्धा वापर करता येईल.
 
6. हँडल
वेगवेगळ्या प्रकारची तयार हँडल बाजारामध्ये विकत मिळतात. ही बार किंवा पाइपमधून बनविलेली असतात. सहसा ही हँडल स्क्रूच्या साहाय्याने बसवितात. आपल्या गरजेप्रमाणे हँडलची निवड करून वापरावे. दोन हँडलच्या वापरामुळे जिग प्लेटचा वापर सहजपणे करता येतो. हँडल बसविताना जिग प्लेटच्या आकाराचा आणि वजनाचा विचार करावा.
आता क्लॅम्प करण्याचीसुद्धा सुविधा असलेला लोकेटर कसा बनविता येईल ते पाहू. (चित्र क्र. 2)

3_3  H x W: 0 x 
 
लोकेटर
चित्र क्र. 2 मधील लोकेटर कार्यवस्तूमध्ये Ø36 H7 या व्यासावर लोकेट केलेला आहे. लोकेटरचा व्यास Ø36 -0.2 मिमी. असा नियंत्रित करावा. त्यामुळे कार्यवस्तू बर्‍यापैकी लोकेट होईल, पण ती अचूक लोकेट होण्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे. चित्र क्र. 2 मध्ये एक सरकणारी पिन आपल्याला दिसत आहे. अशा 3 सरकत्या पिन केंद्रबिंदूपासून समान कोनात (1200) बसविलेल्या आहेत. कार्यवस्तुच्या आत लोकेटर शिरून जिग प्लेट कार्यवस्तूवर टेकते. त्यानंतर फिरविल्यामुळे क्लॅम्पिंग स्क्रू खाली येतो आणि तो तीनही सरकत्या पिन बाहेर ढकलतो. या पिन कार्यवस्तुच्या Ø36 H7 या व्यासावर घट्ट बसतात. तसेच हा क्लॅम्पिंग स्क्रू उलटा फिरविल्यामुळे लोकेटर, कार्यवस्तूमधून बाहेर काढता येतो.
 
डॉग पॉइंटसह क्लॅम्पिंग स्क्रू

3_1  H x W: 0 x 
 
या स्क्रूचा पुढच्या टोकाचा व्यास थ्रेडिंगच्या मापापेक्षा कमी केलेला असतो. कुठल्याही स्क्रूचा आकार असा बनविला असेल, तर त्याला डॉग पॉइंट स्क्रू (चित्र क्र. 3) असे म्हणतात. याच्या सततच्या वापरामुळे तो पृष्ठभाग फुलतो म्हणजेच मोठा होतो. म्हणूनच स्क्रूचा डॉग पॉइंट असलेला भाग फ्लेम हार्ड केलेला आहे. क्लॅम्पिंग स्क्रू आणि सरकती पिन यामध्ये हार्ड बॉल बसविल्यामुळे, क्लॅम्पिंग स्क्रू वर खाली केला की सरकत्या पिनसुद्धा आत बाहेर होतात. त्यामुळे क्लॅम्पिंग आणि डीक्लॅम्पिंग सहजतेने आणि त्वरित होते.
सरकती पिन
या पिनला पुढच्या बाजूला मोठा चॅम्फर दिलेला आहे. ही पिन फ्लेम हार्ड केलेली आहे. तीनही पिन एकदम आणि एकसारख्या बाहेर येत असल्यामुळे कार्यवस्तुचा व्यास आणि लोकेटरचा व्यास समकेंद्रित होतात. सरकत्या पिनची होणारी हालचाल चित्र क्र. 2 मध्ये लाल रंगाच्या बाणांनी दर्शविली आहे.
 
अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पना आपल्याला प्रत्यक्षात करता आल्या पाहिजेत. स्वानुभवानेच या गोष्टी आपल्याला जमू लागतात. म्हणूनच म्हणतात की स्वानुभव हाच सगळ्यात महान गुरु आहे.
 
 
 
<="" div="" style="float: left; margin: -25px 20px 20px 0px;">  
 
अजित देशपांडे यांना जिग्ज आणि फिक्श्चर्समधील जवळपास 36 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर, ग्रीव्हज् लोम्बार्डिनी लि., टाटा मोटर्स अशा विविध कंपन्यांत काम केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ते अतिथी प्राध्यापक आहेत.
@@AUTHORINFO_V1@@