हिंद क्रँकशाफ्टचे प्रॉडक्शन मॅनेजर सुर्वेसाहेब इंटरकॉमवर कुणाशीतरी बोलत होते, परंतु समोर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या स्वीय सहायकाला प्रत्यक्ष आलेले पाहून त्यांनी फोनवरचे संभाषण संपविले.
“अरे, तुम्ही? फोन करायचा ना”, सुर्वे म्हणाले.
“सर तुमचा फोन चालू होता, ईडी साहेबांनी ताबडतोब बोलावलय.” पीएने सांगितले.
“चला आलोच” म्हणून सुर्वे उठले. असा बुलावा येणार याची कल्पना त्यांना होतीच. कारण, गेले दहा दिवस सहा सिलेंडर क्रँकशाफ्टची लाइन, मोठ्या प्रमाणावर रिजेक्शन आल्यामुळे ठप्प झाली होती. ईडीच्या ऑफिसमध्ये ते आणि क्वालिटी कंट्रोल मॅनेजर देशपांडे दोघेही थांबले होते. सुर्वे बसल्याक्षणी ईडींचा तोफखाना सुरू झाला.
“सुर्वे, देशपांडे... ही रिजेक्शनची काय भानगड आहे? आपण सहा सिलेंडर क्रँकशाफ्टचा एवढा मोठा प्रोजेक्ट राबविला. तुम्हाला सेपरेट लाइन पाहिजे होती, त्यासाठी आपण मोठी गुंतवणूक केली. सिंगल पीस फ्लो मशिनिंग लाइन हवी होती, तीही टाकली. प्रॉडक्शन लाइनवरच तुम्हाला डेडिकेटेड सी.एम.एम.पाहिजे होते, तेही लागले. मग आता एवढे रिजेक्शन कसे होते? प्रोसेस नीट सेट झाली नाही का? ‘एम रिव्ह्यू’मध्ये क्वालिटी ॲट सोर्सला एवढे चांगले रेटिंग आहे, मग रिजेक्शन का? 100% ओके जॉब कधीपासून मिळणार ते सांगा. नाहीतर मला वेगळी ॲरेंजमेंट बघावी लागेल.” शेवटच्या वाक्याचा गर्भितार्थ सगळ्यांनाच माहिती होता. प्रकरण खूपच तापले होते.
सुर्वेंनी एक दीर्घ श्वास घेतला. “सर गेले दोन आठवडे आम्ही दोघेही केवळ याच एका प्रश्नावर काम करीत आहोत. आपली ग्राइंडिंग प्रक्रिया एकदम बरोबर आहे. तिन्ही ग्राइंडिंगवरील जॉब अतिशय बिनचूक यायला हवेत. आम्ही सर्व प्रोसेस पॅरामीटर तपासून खात्री केली आहे.अल्फा टेस्टिंगच्यावेळीच आपण पूर्णपणे दोषविरहित ग्राइंडिंगची व्यवस्था केली आहे. सरफेस फिनिश, फिलेट रेडियस, डायमेन्शन, थ्रस्ट फेसचे ग्राइंडिंग हे सगळे महत्त्वाचे पॅरामीटर एकदम मर्यादेत आहेत. एवढे परिपूर्ण आणि अचूक उत्पादन आजवर एकाही लाइनमध्ये आपण करू शकलेलो नाही. सध्याचा प्रश्न फक्त क्रँकशाफ्टच्या पिन अँगलचा आहे. हा अँगल आपल्या अल्फा ट्रायलमध्ये ओके दिसला होता. परंतु, प्रॉडक्शन लॉटला रिजेक्शन आहे. आम्ही ते शोधत आहोत. त्यात अँगलमध्ये दिसणाऱ्या चूकीमध्ये सातत्य नाही. दरवेळी निराळीच रीडिंग येत आहेत. त्यातही फक्त एक नंबरच्या पिनला अडचण दिसते आहे. कोणताही क्रँकशाफ्ट एक नंबरची पिन सोडून इतर कुठल्याही पिन अँगलसाठी रिजेक्ट झाला नाही. त्यामुळे प्रक्रियेमध्ये काय दोष आहे हे लवकर लक्षात येत नाहीये.”
सुर्वे काही वेळ थांबले, मग देशपांडेंकडे वळून म्हणाले, “आपण लाइनवर नवीन सी.एम.एम. बसविल्यानंतर हे रिजेक्शन वाढलेले दिसते. तुम्ही यात काही अभ्यास केला काय?”
देशपांडे क्षणभर घुटमळले. हातातली फाइल त्यांनी बाजूला ठेवली अन् विचारमग्न अवस्थेतून बाहेर येत ते म्हणाले, “आपण लाइनवर सी.एम.एम. बसविल्यानंतर क्रँकशाफ्ट लोड कसे करायचे याच्या चाचण्या दोन दिवस झाल्या. आपल्याला चार मिनिटांत एक क्रँकशाफ्ट तपासून हवा आहे. एवढ्या कमी वेळेत तो मशिनवर लोड करणे, तपासणे आणि परत पॅलेटमध्ये ठेवणे होणार नाही हे आपल्याला आधीच माहिती होते. म्हणून एक ओव्हरहेड क्रेन आणि सरकती ट्रॉली आपण बसविली. या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपला खूप वेळ गेला. त्यामुळे पुढे मशिनच्या पूर्ण चाचण्या आपण घेऊ शकलो नाही आणि प्रॉडक्शन चेक चालू झाले.”
“हो... पण त्याचा आत्ताच्या रिजेक्शनशी काय संबंध आहे?” ईडींचा पारा अजून खाली उतरला नव्हता. “तुम्हाला दोघांनाही सी.एम.एम.बाबत शंका असतील तर त्यांच्या इंजिनिअरला बोलावून घ्या. हे ‘अभिनव’ चे सी.एम.एम. आहे ना?”
“हो सर. आपल्याकडे खूप पूर्वीचे एक परदेशी सी.एम.एम. आहे. त्यानंतरची सर्व सी.एम.एम. ‘अभिनव’चीच म्हणजे भारतीय सी.एम.एम. आहेत. त्यांचेही दोन इंजिनियर आठ-आठ दिवस येऊन गेले. सर्व इन्स्पेक्शन प्रोग्रॅम, मास्टर प्रोबच्या चाचण्या, प्रोटोटाइपवर रिपिटॅबिलिटी चाचण्या वगैरे करून झाल्या. सर्व क्रँकशाफ्टची इतर रिडिंग बरोबर मिळतात, पण अँगल मोजमापनांमध्ये क्रँकशाफ्ट रिजेक्ट होत आहेत. त्यात क्रँकशाफ्टमधील एररही रँडम दिसते. एका ठराविक बाजूला मशिनिंग शिफ्ट झाले आहे असे दिसत नाही.” देशपांडेंनी त्यांची बाजू विशद केली.
“अस्सं!” म्हणून ईडींनी इंटरकॉमची बेल वाजविली. “अभिनवच्या विजय देशमुखांना लाइनवर घ्या!” ते म्हणाले.
थोड्याच वेळात अभिनव इंजिनिअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांचा ईडींना फोन आला.
“सर, देशमुख बोलतो. काय सेवा करू?”
“विजयराव, आमच्या क्रँकशाफ्टची केस तुमच्या कानावर आलीच असेल. तुमचे दोन इंजिनिअर आतापर्यंत येऊन गेले आहेत. पण हा प्रश्न आमच्या हाताबाहेर जाऊन चालणार नाही. मला चार दिवसांत नक्की काय समस्या आहे ती कळली पाहिजे आणि पुढच्या दोन दिवसांत आम्ही आणि तुम्ही मिळून ती सोडविली पाहिजे.” ईडी ठामपणे म्हणाले.
“सर आम्ही सर्वजण 100% तुमच्या बरोबर आहोत. उद्या सकाळी आमच्या कस्टमर इंजिनिअरिंग हेडला तुमच्याकडे पाठवितो. काल संध्याकाळी आमच्या इंटर्नल मिटिंगमध्ये आमच्या इंजिनिअरचे रिपोर्ट चर्चेला होते. त्यामुळे त्यांना सगळी पार्श्वभूमी माहिती आहे”, विजय देशमुख म्हणाले. भारतीय बनावटीच्या सी.एम.एम. उद्योगाचा देशमुखांनी त्यांच्या दूरदर्शीपणाने आणि टीमवर्कच्या जोरावर भक्कम पाया रोवला होता. त्यामुळे आपण या प्रकरणात मदत करू शकू हा त्यांना विेश्वास होता.
-------------------------------
दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता ‘अभिनव’चा कस्टमर इंजिनियरिंग हेड मोहन ‘हिंद क्रँकशाफ्ट’मध्ये पोहोचला. आधी ईडी आणि सुर्वे साहेबांना भेटून देशपांडे साहेबांबरोबर तो सी.एम.एम.च्या स्टेशनपाशी उभा राहिला. देशपांडेंनी त्याला क्रँकशाफ्ट मोजमापनाची एकूण व्यवस्था दाखविली.
“क्रँकशाफ्टच्या एका बॅचमध्ये 12 क्रँकशाफ्ट असतात. एका पॅलेटवर चार, असे तीन पॅलेट एकावर एक रचून इथे क्रेनने आणले जातात. क्रँकशाफ्ट वजनदार असल्यामुळे या स्टेशनवर एक छोटी जिब क्रेन बसविली आहे. त्याने क्रँकशाफ्ट उचलून सी.एम.एम.च्या समोर ट्रॉलीवर ठेवला जातो. या ट्रॉलीला एक आणि सात नंबरच्या मेन जर्नलसाठी, रोलर स्टँड लावलेले आहेत. त्यामुळे त्यावर क्रँकशाफ्ट व्यवस्थित बसतो. रोलरवर क्रँकशाफ्ट एकाच पद्धतीने बसावा यासाठी चार नंबर पिनखाली एक स्टँड दिला आहे. पिन त्यावर टेकली की क्रँकशाफ्ट बरोबर असा बसतो की, एक आणि सहा नंबरच्या पिन जर्नलबरोबर टॉप पोझिशनला येतात. क्रँकशाफ्ट वजनदार असल्यामुळे ही ट्रॉली हायड्रॉलिक व्यवस्थेवर चालणारी ठेवली आहे. ऑपरेटरने बटण दाबले की ती आतमध्ये सरकून प्लास्टिकच्या पडद्यापलीकडे सी.एम.एम.च्या आर्मजवळ जाऊन थांबते. थांबण्यासाठी समोर रबरी स्टॉपर दिलेले आहेत. ट्रॉली स्टॉपरवर जाऊन थांबली की लगेचच सी.एम.एम.च्या मोजमापनास सुरुवात होते. मेन आणि पिन जर्नलवर वरील बाजूंनी प्रत्येकी तीन रीडिंग प्रोबद्वारा घेतली जातात. त्यामुळे आधी क्रँकशाफ्टची मध्यरेषा (सेंटरलाईन) आणि नंतर 1, 6, 2, 5, 4 आणि 3 या पिन जर्नलची अंशात्मक स्थिती काढली जाते. पिनमधला अँगल 1200 +/- 20” यामध्ये हवा.
तुम्हाला इथे काय पाहिजे ती माहिती आमचा सी.एम.एम. ऑपरेटर देईल, तुम्ही त्याला कितीही प्रश्न विचारले तरी हरकत नाही. पण आपण हा काय गुंता आहे हे शोधायला पाहिजे. मला बारा वाजता एक मीटिंग आहे, चालेल ना?” देशपांडे म्हणाले.
“सर मी आता इथेच थांबतो, मला काही लागले तर तुमच्याकडे येईनच. पण आधी प्रत्यक्ष मोजमापे बघतो आणि अभ्यास करतो.” मोहन म्हणाला. ऑपरेटरला योग्य त्या सूचना देऊन देशपांडे मीटिंगसाठी गेले.
पुढचे दीड तास मोहनने त्या ऑपरेटरबरोबर क्रँकशाफ्टचे मोजमापन पाहिले. 20 क्रँकशाफ्टपैकी पुन्हा 6 रिजेक्ट झाले. या सर्व क्रँकशाफ्टना अँगलमध्ये फक्त एक नंबरच्या पिनलाच अडचण येत होती. तो अँगल कधी जास्त, तर कधी कमी दिसत होता. एकूण सक्षम मशिनिंग प्रक्रियेमध्ये असे होणे दुर्मिळच, असा विचार मोहनच्या मनात आला. परंतु, त्या चार मिनिटांच्या आवर्तनामध्ये त्याला काही शंकाही दिसेना. या एकूण मोजमापनामध्ये काहीतरी ‘मिसिंग लिंक’ आहे आणि ती आपण शोधायला हवी एवढे मात्र त्याच्या मनाने घेतले.
दुपारी दीडच्या सुमारास ऑपरेटर मोहनला म्हणाला, “साहेब दोनला शिफ्ट बदलणार आहे, मी आवरायला जातो. पुढच्या शिफ्टचा ऑपरेटर येईलच. त्याची ड्युटी दोन वाजता सुरू होते. तुमची काही हरकत नाही ना?”
“अजिबात नाही”, मोहन हसून म्हणाला. एव्हाना दोघांची चांगली ओळख झाली होती. “मी जरा रीडींग तपासत इथेच बसतो.”
थोड्याच वेळात दुसऱ्या पाळीचा ऑपरेटर आला. त्याला पहिल्याने थोडी कल्पना दिली होतीच. त्याला मोहनने लगेच ओळखले. “अरे, आपण ट्रेनिंग सेशनला भेटलो होतो का?” मोहनने विचारले. “होय साहेब, मी दानवे. मागच्या वर्षी मी तुमच्या आठ दिवसांच्या ट्रेनिंगला आलो होतो. खूप छान शिकविले तुम्ही. त्यामुळेच मला मागच्या महिन्यात इथे नोकरी मिळाली.” दानवे बोलका आणि खूशही दिसला. बरोब्बर दोन वाजता त्याने कामाला सुरुवात केली. पुढच्या तासाभरात एकमेकांशी बोलता बोलता 15 क्रँकशाफ्ट तपासले गेले. त्यात पुन्हा 3 रिजेक्ट झाले. “मला याच्यामध्ये काहीतरी खुपतंय, पण काय ते अजून लक्षात येत नाही. एक नंबरलाच का प्रॉब्लेम येतो?” मोहन स्वतःशीच मोठ्याने बोलला.
“सर, मला पण हे काय बरोबर वाटत नाही. पण इथे दुसरं काही तरी शोधायचं म्हणजे सायकल टाइम खराब होणार, वेळ वाया गेला की बोलणी बसणार.” दानवे म्हणाला.
“हे बघ, आपण जरा 10 मिनिटे सगळं शांतपणे पाहू. 2-3 क्रँकशाफ्ट आज कमी झाले तरी चालतील. मी सुर्वे साहेबांना सांगतो. आपण जरा परत ट्रायल घेऊया.” असे म्हणून मोहनने रिजेक्ट झालेला क्रँकशाफ्ट पॅलेटवरून काढून पुन्हा ट्रॉलीवर चढवायला सांगितला. तो पुन्हा रिजेक्ट झाला, पण त्याचे रीडिंग आधीपेक्षा वेगळे होते. “असे का होत आहे?” मोहनने विचारले, “रिजेक्शन व्हायला नकोय.”
“सर, तुम्हाला सांगू का? कधीकधी मी पण या रिजेक्शनला कंटाळतो. मग एखाद्या वेळी क्रँकशाफ्ट बाहेर काढायच्या आधी दोन मिनिटे तसाच थांबतो आणि पुन्हा सगळे रीडिंग घेतो. मग तो क्रँकशाफ्ट पास होतो”, दानवे म्हणाला.
“काय?” मोहनने चमकून विचारले. “आपण आता एक नवीन क्रँकशाफ्ट लावूया. मी क्रँकशाफ्टसोबत या प्लास्टिकच्या पडद्यापलीकडे मान घालून नीट पहात राहतो. तू सायकल सुरू कर.”
“ओके सर, पण जरा काळजी घ्या. डोक्याला वगैरे काही लागायला नको”, असे म्हणून दानवेने नवीन सायकल सुरू केली. क्रँकशाफ्ट ठेवलेली ट्रॉली पुढे सरकताना मोहनने वाकून तशीच मान पुढेपुढे नेत निरीक्षण केले. ट्रॉली समोर रबरी स्टॉपरवर जाऊन टेकली, तसा सी.एम.एम.चा आर्म प्रोबला घेऊन खाली आला. एक नंबर मेन जर्नल, एक नंबर पिन आणि दोन नंबर मेन जर्नल, पुन्हा दोन नंबर पिन असे करत करत, प्रत्येकी तीन रीडिंग घेत तो प्रोब शेवटपर्यंत गेला.
“रिझल्ट?” मोहनने आत मान ठेवूनच विचारले. “रिजेक्ट” दानवे म्हणाला.
“पुन्हा फक्त सी.एम.एम. रीडिंग सोड. ट्रॉलीला धक्कापण लावू नकोस”, मोहनने सांगितले.
दानवेने रीडिंग सायकल सुरू केली. “ओके” तो ओरडला.
“लक्षात आले!” मोहनही मान आतच ठेवून ओरडला. “चला आपण लाइनवरचा चहा घेऊन हे सेलिब्रेट करू या.” एव्हाना शॉपवर चहाचा राउंड सुरू झाला होता.
-------------------------------
काही वेळातच ईडी, सुर्वे, देशपांडे, मोहन, दानवे आणि इतर यांची कायझनच्या भाषेत ‘गेंबा मीटिंग’ म्हणजे प्रत्यक्ष कार्यस्थळावर उभ्यानेच मीटिंग सुरू झाली. मोहनने त्याची सर्व निरीक्षणे विशद केली.
“क्रँकशाफ्ट वजनदार असल्याने आणि सी.एम.एम.ला धक्का लागू नये म्हणून लोडिंगसाठी हायड्रॉलिक ट्रॉली केली आहे, ही कल्पना छान आहे. परंतु ट्रॉली आत जाताना वेग थोडा जास्त आहे असे मला वाटते. त्यामुळे ट्रॉलीचा बेस पुढे जाऊन रबरी स्टॉपवर धडकतो, त्याच क्षणी सी.एम.एम.चे मोजमापन सुरू होते. पहिली तीन रीडिंग (1 जर्नल, 1 पिन, 2 जर्नल) प्रत्येकी 5 सेकंदात पूर्ण होतात. ट्रॉली वर्तुळाकार बुशला धडकल्याने त्याठिकाणी ऑसिलेशन निर्माण होत असावीत आणि ती सुमारे 10-15 सेकंदात खूप कमी होत असावीत. या वेळेमध्येच एक नंबर क्रँकपिनचे रीडिंग झाल्यामुळे त्यात प्रत्यक्ष फरक पडतो आणि तो दरवेळी वेगवेगळा असल्यामुळे आपण बुचकळ्यात पडतो. पुढच्या रीडिंगपर्यंत प्रोब जाईपर्यंत ही कंपने जवळपास नष्ट होत असल्याने पुढच्या सर्व पिनचे अँगल बरोबरच मिळतात.” त्याने प्रात्यक्षिक करून दाखविले.
“तीन ॲक्शन घ्यायला पाहिजेत असे मला वाटते. ट्रॉलीचा वेग कमी करणे, सॉफ्ट रबरी स्टॉपरऐवजी पॉलियुरेथिनचे स्टॉपर बसवून क्लॅम्प करणे आणि ट्रॉली आत जाऊन टेकल्यावर रीडिंगसाठी सुमारे आठ ते दहा सेकंदाचा पॉज घेणे या तीन गोष्टी अंमलात आणल्यास ही समस्या सुटेल”, मोहनने सांगितले.
सर्वांनीच समाधान व्यक्त केले. “आपण या सेटअपवर ट्रायलला जास्त वेळ द्यायला पाहिजे होता.” ईडी म्हणाले.
“सर, आपण प्रोजेक्ट प्लॅनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंटसाठी योग्य तेवढा किंवा भरपूर वेळ ठेवतो,” देशपांडे आर्जवी परंतु ठाम शब्दांत म्हणाले, “पण क्वालिटी मेजरमेंटसाठी सगळे ‘यस्टर्डे बेसिस’वर असते. त्यासाठी योजनेमध्ये आधीपासून योग्य अवधी द्यायला पाहिजे. नुसती सी.एम.एम.ची ट्रायल घेऊन सर्व प्रोसेस ठीक होणार नाही, तर आपण ठरविलेली ऑपरेशन सायकलची पुनरावृत्ती आणि सक्षमता पूर्ण करायला थोडा वेळ आणि सपोर्ट मिळाला तर जास्त चांगले होईल”.
“ओके... ओके... मला कळाले तुम्हाला काय म्हणायचे आहे ते.” ईडी उठता उठता म्हणाले. “सर्व तपासण्या येत्या तीन दिवसांत पूर्ण करून लाइन चालू करा आणि मोहन, गुड जॉब, कीप इट अप. मी देशमुखांना वेगळा फोन करेनच. बाय द वे देशपांडे, आज मोहनची जरा खातिरदारी करा, काय?”
“येस सर” सुर्वे आणि देशपांडे मोहनकडे पहात एकदम उद्गारले.
(तांत्रिक तपशील : मोमिन ए. वाय, ॲप्लिकेशन अँड ट्रेनिंग हेड, ॲक्युरेट गेजिंग अँड इन्स्ट्रुमेंटस् प्रा. लि.)
9764955599
अच्युत मेढेकर यांत्रिकी अभियंते असून, त्यांना उत्पादन आणि दर्जा नियंत्रण क्षेत्रातील जवळपास 42 वर्षांचा अनुभव आहे.