ड्रिलिंग जिग फिक्श्चर : 5

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    09-May-2019   
Total Views |
एप्रिल 2019 अंकातील लेखामध्ये आपण पॉट टाइप जिगचा अभ्यास केला. या लेखात आपण एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर फिरविल्या जाणाऱ्या म्हणजेच टर्नओव्हर फिक्श्चरचा अभ्यास करणार आहोत.
 
समजा कार्यवस्तूमध्ये 4 मिमी. आणि 6 मिमी. व्यासाची दोन भोके X आणि Y दोन दिशांनी करावयाची आहेत. कार्यवस्तुचा D व्यास H7 टॉलरन्समध्ये नियंत्रित केलेला आहे. त्यामुळे याच व्यासावर कार्यवस्तू लोकेट केलेली आहे. कार्यवस्तुचा आकार लहान असल्यामुळे हे फिक्श्चरसुद्धा लहान आहे. तसेच मोठया भोकाचा व्यास 6 मिमी. असल्यामुळे हे जिग हाताने पकडून यंत्रण करता येते. त्यामुळे जिग क्लॅम्पिंगची आवश्यकता लागत नाही.
Turnover type fixtures
 
चित्र क्र. 1 मध्ये टर्नओव्हर प्रकारचे फिक्श्चर दाखविले असून त्यामधील विविध भागांचे कार्य आणि त्यांची गरज काय ते आपण पाहू. आरेखन करताना कुठलाही भाग अथवा रेघ अनावश्यक नसते/नसावी.
 
1. लोकेटर
 
चित्र क्र. 1 मध्ये लोकेटर दिसत असून, हा लोकेटर आणि कार्यवस्तुचा फिट H7/g6 आहे. यालाच आपण गाइड फिट असे संबोधतो. हा लोकेटर, केस हार्ड आणि ग्राइंडिंग केलेला असतो. याचा कठीणपणा (हार्डनेस) साधारणपणे 60+/-2 HRC ठेवावा. यासाठी केस हार्ड होणारे मटेरियल (20MnCr5 किंवा 16MnCr5) वापरावे. हा केस हार्ड का बरे केला असेल? जर हा पूर्ण कठीण केला तर,
 
1. दोन्ही बाजूला असलेले आटे (थ्रेड) कठीण होतील. त्यामुळे आटे क्रॅक होण्याची (भेगा, तडे जाण्याची) शक्यता असते. अशा भेगा, तडे गेल्यास आपल्याला कळणार नाही. म्हणून थ्रेडिंग असलेले भाग कठीण करायचे असल्यास केस हार्ड किंवा फ्लेम हार्ड करावे. फ्लेम हार्ड करताना ज्या भागात हार्डनिंग पाहिजे तेवढाच भाग कठीण करावा. आटे असलेला भाग फ्लेम हार्ड न करता तो मऊ (सॉफ्ट) ठेवावा.
 
2. कठीण आट्यांमुळे क्लॅम्पिंग नटची झीज जास्त होते. त्यामुळे आटे मऊ ठेवले जातात. ज्यावेळी आटे करायचे असतील त्यावेळी तो भाग केस हार्ड करावा असा संकेत (थम्ब रुल) आहे.

Commodities 
 
कार्यवस्तू D व्यासावर बसविल्यामुळे लोकेटरचा व्यास नियंत्रित (g6) केला आहे. यामुळे 4 आणि 6 मिमी. व्यासाची भोके D व्यासाशी (चित्र क्र. 2) समकेंद्रित तयार होतील. तसेच कार्यवस्तुचा पृष्ठभाग लोकेटरच्या X1 पृष्ठभागावर टेकवून क्लॅम्प केल्यामुळे 40.00 +/-0.05 मिमी. माप अचूक मिळेल. व्यास d1 आणि D हे दोन्ही समकेंद्रित आणि प्रतल X ला लंबरूप आहेत.

2. C वॉशर
 
C वॉशरचे कार्य आपण या आधीच्या लेखात जाणून घेतले आहेच. याचा मोठा व्यास, फिक्श्चर/जिग बॉडीच्या आतील व्यासापेक्षा लहान असणे आवश्यक आहे. नट थोडा सैल केला की, वॉशर निघून येतो आणि कार्यवस्तू सहजपणे काढता येते.
 
3. हेक्स नट
 
या ठिकाणी आपण हेक्स नट किंवा पाम ग्रिप वापरू शकतो. नटमुळे कार्यवस्तू घट्ट पकडली जाते. पण या कार्यवस्तूमध्ये भोकांचा व्यास 4 आणि 6 मिमी. असल्यामुळे पाम ग्रिप वापरली तर जास्त सयुक्तिक ठरेल. कारण भोक करताना कमी बल लागते त्यामुळे पाना वापरणे टाळू शकू.

4. ओरिएंटेशन पिन
 
स्पेशल बुश एका ठराविक दिशेत बसावे यासाठी ही पिन दिलेली असून, ती जिग बॉडीमध्ये दाबून (प्रेसफिट) बसविलेली असते. त्याचप्रमाणे पिनच्या व्यासावर F7 टॉलरन्स ठेवलेला असतो. आता हा टॉलरन्स F7 का? हे तुमच्या सहज लक्षात येईल. या ठिकाणी आपण प्रमाणित डॉवेल वापरू शकतो.
 
5. स्पेशल बुश
 
कार्यवस्तूमध्ये 4 आणि 6 मिमी. व्यासाची भोके एवढ्या जवळ आहेत की, दोन वेगळी बुश बसविणे केवळ अशक्यच आहे. म्हणूनच एकाच बुशमध्ये दोन्ही भोके करून घेतली. हे स्पेशल बुश (चित्र क्र. 3) जिगमध्ये बसविल्यावर दोन भोके लोकेटरच्या अक्षाला समांतर येण्यासाठी बुशला कॉलरवर स्लॉट दिलेला आहे.
 
Special Bush
 
हे बुश हार्ड आणि ग्राइंडिंग केलेले आहे. स्क्रूच्या साहाय्याने बुश जिग बॉडीमध्ये बसविले असून, दोन भोकांपैकी कोणतेही एक भोक खराब झाल्यास बुश बदलावे लागते. अशा प्रकारे वारंवार बुश बदलून, जिग बॉडीमधील बुशसाठी केलेले भोक खराब होऊ नये म्हणून लायनरचा वापर केला जातो. बुशमधील 4 आणि 6 मिमी. व्यासाचा टॉलरन्स G7 आहे.
 
6. स्क्रू
 
स्पेशल बुश जिग बॉडीमध्ये बसविण्यासाठी स्क्रूचा वापर केला असून हे बुश खराब झाल्यावर बदलता यावे यासाठी लायनरमध्ये स्लाइड फिट (H7/g6) बसविले जाते.
 
7. फिक्श्चर बॉडी
 
हा भाग या जिगचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हेदेखील केस हार्ड होणारे मटेरिअल (20MnCr5 किंवा 16MnCr5) वापरूनच तयार केलेले असून याची कारणे पुढे नमूद केली आहेत.
 
अ. पृष्ठभाग B1, B2, A1, A2 हार्डनिंग करून नंतर ग्राइंडिंग केलेले आहेत.
 
ब. व्यास d1 आणि लायनरसाठी केलेली भोके जर हार्डनिंगच्या आधी केली तर ती उष्णता प्रक्रियेनंतर वेडीवाकडी होतील.
 
क. जिग बॉडीमध्ये स्क्रूसाठी आणि ओरिएंटेशन पिनसाठी केलेली भोके हार्डनिंग आणि ग्राइंडिंग केल्यानंतरच करावी लागतात. त्यामुळे ते भाग मऊ ठेवावे लागतात. यापैकी ओरिएंटेशन पिनसाठी केलेले भोक जास्त अचूक लागते.
 
X दिशेने लायनर बसविण्यासाठी असलेले भोक A1 प्रतलाशी लंबरूप असणे आवश्यक आहे. कारण जेव्हा X दिशेने ड्रिलिंग केले जाते तेव्हा आपण कार्यवस्तू A प्रतलावर टेकवून यंत्रण करतो. त्यामुळे 4 आणि 6 मिमी.ची भोके X1 प्रतलाशी समांतर मिळतील. जर भोक तिरके असेल तर यंत्रण करताना ड्रिल तुटू शकते. याचप्रमाणे Y दिशेने लायनर बसविण्यासाठी असलेले भोक A2 प्रतलाशी लंबरूप असणे आवश्यक आहे. d1 व्यास X2 प्रतलाशी लंबरूप केला पाहिजे. त्यामुळे D व्याससुद्धा X2 प्रतलाशी लंबरूप राहील. कारण d1 व्यास आणि D व्यास हे दोन्ही समकेंद्रित आहेत.
 
जिग बॉडीमध्ये ओरिएंटेशन पिन प्रेसफिट करण्यासाठी भोक दिलेले आहे. जर ही पिन तुटली तर ती काढणे सोपे जावे यासाठी शक्यतो हे भोक आरपार दिले जाते. आपल्याला असे दिसते की, जिग बॉडीवर सगळ्या बाहेरच्या कोपऱ्यांवर गोलाई दिलेली आहे, कारण जर टोकदार कोपरे असतील तर कर्मचाऱ्याच्या हाताला इजा होऊ शकते. जिग/फिक्श्चर आरेखन करतानासुद्धा सुरक्षेची काळजी कशी घेता येते हे आपल्या ध्यानात येईल आणि हे अतिशय महत्त्वाचे आहे.
 
8. वॉशर, हेक्स लॉक नट
 
लोकेटर जिग बॉडीमध्ये बसविण्यासाठी वॉशर आणि हेक्स लॉक नट याचा वापर केलेला आहे. आपण लोकेटरची कॉलर कॅप स्क्रूच्या साहाय्यानेसुद्धा बसवू शकतो. पण असे केल्यास लोकेटर आणि जिगचा आकार मोठा होईल, तसेच बुश आणि कार्यवस्तूमधील अंतर (L) वाढेल.
 
4 मिमी.चे ड्रिल, अंतर वाढल्यामुळे वेडेवाकडे झाल्याने तुटण्याची शक्यता आहे, कारण आपण कार्यवस्तुच्या गोलाकार भागावर ड्रिलिंग करीत आहोत.
 
9. लायनर
 
हा हेडलेस प्रकारचा लायनर असून पूर्णपणे कठीण केलेला असतो. हा लायनर जिग बॉडीमध्ये प्रेसफिट बसविलेला असतो. या कार्यवस्तूमध्ये 4 आणि 6 मिमी. भोके फक्त X आणि Y दिशेने आहेत. जर ही भोके 6 दिशेने असतील तर षट्कोनी जिग बॉडीचा वापर करता येईल. जिग बॉडी सगळ्या 6 पृष्ठभागावर टेकवावी लागत असल्याने, सर्व बुशचा डोक्याचा पृष्ठभाग जिग बॉडीच्या पृष्ठभागाच्या आत असला पाहिजे. पुढील लेखात आपण अजून काही वेगळ्या प्रकारची ड्रिलिंग फिक्श्चर/जिग पाहणार आहोत.
 
 
0 9011018388
अजित देशपांडे यांना जिग्ज आणि फिक्श्चर्समधील जवळपास 36 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर, ग्रीव्हज् लोम्बार्डिनी लि., टाटा मोटर्स अशा विविध कंपन्यांत काम केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ते अतिथी प्राध्यापक आहेत.
@@AUTHORINFO_V1@@