अर्थसाक्षर उद्याेजक - 1

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    11-Nov-2020   
Total Views |
 
 
 
धातुकाम मासिकात यापूर्वी प्रकाशित झालेल्या लेखांमध्ये आपण खेळत्या भांडवलाचे महत्त्व आणि त्याचे व्यवस्थापन याविषयी चर्चा केली आहे. या लेखामध्ये आर्थिक व्यवस्थापन, बॅलन्स शीट, टॅक्स रिटर्न आदींविषयी भाष्य करण्यात आले आहे. 

1_1  H x W: 0 x
धातुकाम मासिकात यापूर्वी प्रकाशित झालेल्या लेखांमध्ये आपण खेळत्या भांडवलाचे महत्त्व आणि त्याचे व्यवस्थापन याविषयी चर्चा केली आहे. आर्थिक व्यवस्थापन, बॅलन्स शीट, टॅक्स रिटर्न अकाउंट्स असे शब्द आले की बरेचसे छोटे आणि मध्यम उद्योजक त्या विषयांना टाळायला बघतात आणि आमचा सी. ए. बघून घेईल असे म्हणून जबाबदारीतून मोकळे होण्याचा प्रयत्न करतात, ते योग्य नाही. याचे कारण म्हणजे बहुतेक वेळेला या सल्लागारांचा उद्योजकांशी संबंध फक्त कराचे विवरण पत्र (टॅक्स रिटर्न) भरण्याच्या वेळी आणि ते काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने आलेला असतो. उद्योजकाच्या व्यवसायात घडणाऱ्या दैनंदिन स्वरूपाच्या आर्थिक घडामोडींची आणि त्यांच्या अनुषंगिक आर्थिक परिणामांची या सल्लागारांना कल्पना नसते. म्हणूनच त्यांच्याकडून उद्योजकांना मिळणारे मार्गदर्शन बऱ्याचदा मर्यादित स्वरूपाचे आणि तेसुद्धा बऱ्याचदा कृतीची वेळ निघून गेल्यावर मिळते. या अशा मार्गदर्शनाचा फारसा उपयोग उद्योजकांना चालू प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये अर्थात रियल टाइम बेसिसवरती आर्थिक निर्णय घेण्याकरिता होत नाही. ज्याप्रमाणे काठावर बसून पोहणे शिकता येत नाही, ज्याला पोहायचे आहे त्याने स्वतःच हातपाय मारायला शिकून घ्यावे लागते तरच त्याला पोहता येऊ शकते, त्याचप्रमाणे व्यवसाय यशस्वीपणे चालविण्यासाठी उद्योजकांमध्ये प्राथमिक स्वरूपाची का होईना, अर्थसाक्षरता असणे आवश्यक आहे.
म्हणूनच हिशोबरूप डॅशबोर्डची मूलभूत माहिती प्रत्येक उद्योजकाने करून घेणे गरजेचे आहे. म्हणजे या माहितीचा उपयोग करून रियल टाइम बेसिसवर धंद्यासाठीचे आवश्यक आर्थिक निर्णय उद्योजक वेळच्यावेळी घेऊ शकतील आणि व्यवसाय वाढवू शकतील. 'अ स्टिच इन टाइम सेव्हज नाईन' ही म्हण सर्वांना माहीत आहेच.
काही गैरसमज
वाणिज्य शाखा नसलेल्या बऱ्याच उद्योजकांना आपण 'नॉन फायनान्स' व्यक्ती आहोत असे वाटते. खरेतर उद्योजक कुठल्याही शाखेचा/बॅकग्राऊंडचा असो, धंद्यातील खरी फायनान्स व्यक्ती तीच असते. कारण धंद्याचा पैसा त्याच्या स्वतःच्या आणि त्याच्या कोअर टीमच्या प्रयत्नांमुळेच मिळत असतो आणि सामान्यतः ज्यांना फायनान्स व्यक्ती समजले जाते ती अकाउंटटसारखी मंडळी मात्र या पैसे मिळविणाऱ्या आणि खर्च करणाऱ्या, धंद्यातील मालक आणि इतरांच्या व्यवहारांचा फक्त हिशोब ठेवण्याचे काम करीत असतात. कुठल्याही खेळाचे उदाहरण घेतले तरी लक्षात येईल की, खेळाचा निकाल खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असतो, खेळाचा स्कोअर ठेवणाऱ्या स्कोअर कीपरच्या नाही. तसेच उद्योगाचे आर्थिक यश त्या उद्योगाच्या मुख्य (कोअर) टीमच्या कामगिरीवर (परफॉर्मन्स) अवलंबून असते. या अर्थाने बघितल्यास हे तथाकथित नॉन फायनान्स लोकच खरेतर धंद्यामधले फायनान्स व्यक्ती असतात. तेव्हा उद्योजकांनी आपण नॉन फायनान्स व्यक्ती आहोत या मोठ्या गैरसमजातून पहिले बाहेर पडले पाहिजे, कारण या गैरसमजातूनच त्यांचे आर्थिक व्यवस्थापनाबद्दल आणखी दोन मोठे गैरसमज तयार होतात. एक म्हणजे त्यांना अकाउंट्स, बॅलन्स शीट, विवरण पत्र, कॅश फ्लो, कॉस्टिंग इत्यादी विषय फार क्लिष्ट आणि किचकट आहेत असे वाटते आणि या सर्व गोष्टींमध्ये फार मोठी आकडेमोड करावी लागते आणि ती आपल्याला कितपत जमेल याची शंका वाटते. या चुकीच्या कल्पनांमुळे बऱ्याचशा उद्योजकांचा विचार असा राहतो की, या विषयामध्ये डोके घालण्यापेक्षा तोच वेळ आपण तांत्रिक आणि मार्केटिंग कामांमध्ये घालविल्यास अधिक विक्री आणि नफ्याच्या संधींचा फायदा घेऊ शकू. थोडक्यात हे किचकट काम बाहेरून (आउटसोर्स) करावयाला देऊन धंद्याच्या कोअर भागात लक्ष घालणे अधिक बरे असे त्यांना वाटत असते.
 
वास्तव
आता नीट बघितले तर लक्षात येईल की, प्रत्येक धंद्याचे कोअर काम इतरांपेक्षा बाह्यतः वेगळेच दिसते, कारण प्रत्येक धंदा वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या क्षमतेच्या आधारे, वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात आणि इतर अनेक प्रकारे वेगवेगळ्या परिस्थितीत काम करीत असतो. परंतु या कोअरचाही कोअर बघितल्यास असे दिसून येईल की, कुठल्याही धंद्याचा मूळ हेतू पैसे कमावणे हाच असतो. '(पैसा) आया कितना गया कितना' हा मंत्रच मुळी सर्व व्यवहारांच्या पाठीमागे कार्य करीत असतो आणि हाच विचार खरेतर धंद्याचा मुख्य भाग असतो. त्यामुळे धंद्याचा मूळ गाभा असलेले काम बाहेरून करण्याचा विचार सोडून देणे उद्योजकांसाठी अतिशय आवश्यक आहे.
अकाउंट्स, फायनान्स, बॅलन्स शीट, M.I.S., कर विवरण पत्रे क्लिष्ट आणि किचकट असतात. या गैरसमजाविषयी बोलावयाचे झाले तर या नोंदी आणि स्टेटमेंट क्लिष्ट नसतात तर त्यांचा एक फॉरमॅट असतो, मांडण्याची एक पद्धत असते आणि काही मूलभूत संकल्पनांचा त्यामध्ये वापर केलेला असतो. तांत्रिक भाषेत बोलावयाचे तर या सर्वांचा एक 'टेक्निकल जार्गन' बनलेला असतो आणि त्यामुळे त्या गोष्टी क्लिष्ट वाटायला लागतात. तसे पाहता कारमधल्या डॅशबोर्डचासुद्धा एक फॉरमॅट असतो आणि त्यामध्ये सोप्या का असेना पण काही शास्त्रीय संकल्पना वापरलेल्या असतात. कुठल्याही ड्रायव्हरला थोडे लक्ष घालून डॅशबोर्ड समजून घ्यावाच लागतो. पण एकदा का त्यामध्ये थोडा वेळ घालवला तर नंतर प्रत्येक वेळी त्या डॅशबोर्डचा अभ्यास करावा लागत नाही तर त्यातील मिळणाऱ्या उपयुक्त माहितीचा गाडी चालविताना सहजतेने फायदा करून घेता येतो.
दुसरे म्हणजे आर्थिक अहवाल आणि अकाउंट्स मिळविण्यासाठी फार मोठी आकडेमोड करावी लागेल हासुद्धा गैरसमजच आहे कारण आज आपण संगणकाच्या (कंप्युटर) युगात आहोत आणि घरोघरी संगणक आहेत. सर्व आकडेमोड सॉफ्टवेअरच करतात आणि अहवाल तयार ताटामध्ये जेवण यावे तसे आपल्यासमोर आणून ठेवतात. उद्योजकाचे काम फक्त हे अहवाल समजण्यासाठी त्यांचा फॉरमॅट माहीत करून घेण्याचे आणि ज्या संकल्पनांवर हे अहवाल आधारलेले असतात ते समजून घेण्याचे असते. यालाच तर आपण उद्योजकांची अर्थसाक्षरता असे म्हणतो आणि त्यासाठीच तर आपली ही लेखमाला आहे.
अर्थसाक्षरता
असो. एवढ्या प्रास्ताविकानंतर आजच्या विषयाबद्दल सुरुवात करायला हरकत नाही. तर बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रक हे दोन अहवाल या हिशोबरूपी डॅशबोर्डच्या संबंधातील अर्थसाक्षरतेमधील फार महत्त्वाचे भाग आहेत. धंद्याची कुठल्याही तारखेची आर्थिक स्थिती (मालमत्ता आणि देणी किती आहेत) बॅलन्स शीट दाखविते तर ही स्थिती येण्यासाठी मागील काळात झालेला किती नफा किंवा नुकसान कारणीभूत ठरले हे चित्र नफा तोटा पत्रक दाखविते. बॅलन्स शीट एकाक्षणी घेतलेल्या फोटोसारखे (स्नॅप शॉट) असते तर नफा-तोटा पत्रक हे जणू एखाद्या व्हिडिओप्रमाणे नफ्या तोट्याला कारणीभूत ठरलेल्या गोष्टींचा प्रवाह दाखवीत असते.
 
धंद्यातील नफा आणि नुकसान तसेच धंद्याच्या मालमत्ता आणि देणी यांची कालानुरूप स्थिती ठराविक अंतराने समजून यावी म्हणून हिशोब ठेवण्यासाठीचे असे एक आर्थिक वर्ष निश्चित केले जाते. उद्योगधंद्यांचे हिशोब डबल एंट्री अकाउंटिंग व्यवस्थेनुसार आणि मर्कंटाईल पद्धतीने ठेवले जातात. प्रत्येक आर्थिक वर्षांमध्ये या दोन गोष्टींच्या आधारे धंद्याचे हिशोब ठेवले जातात आणि त्यांच्याआधारे वर्षाअखेरीस नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद ही दोन अतिशय महत्त्वाची आर्थिक पत्रके बनविली जातात. आपल्या देशात एप्रिल ते मार्च हे सरकारचे आर्थिक वर्ष आहे तेच वर्ष आयकर, जी.एस.टी सारख्या करांचा भरणा करण्यासाठी अवलंबिणे उद्योग धंद्यांसाठी सक्तीचे आहे. त्यामुळे बहुतेक उद्योग व्यवसायांचे आर्थिक वर्ष दरवर्षी 31 मार्चला संपते आणि त्या तारखेला संपलेल्या वर्षांमध्ये धंद्यात किती नफा किंवा नुकसान झाले हे समजण्यासाठी त्या वर्षाचे नफा तोटा पत्रक (प्रॉफिट अँड लॉस अकाउंट) तयार केले जाते आणि वर्षाअखेरीस धंद्याच्या मालमत्ता आणि देणी यांची स्थिती कशी राहिली होती हे समजून घेण्यासाठी 31 मार्च या तारखेचा बॅलन्स शीट अर्थात ताळेबंदसुद्धा तयार केला जातो. ही दोन्ही पत्रके मिळून 31 मार्चला संपलेल्या वर्षाची आर्थिक स्थिती कशी होती याबद्दल संपूर्ण माहिती देतात. त्यामुळे ही दोन्ही पत्रके कशी बनविली जातात, ही पत्रके समजून घेण्यासाठी कुठल्या संकल्पना माहिती असणे गरजेचे आहे, या पत्रकांच्या आधारे मागील आर्थिक वर्षाच्या संदर्भात तसेच बाजारातील इतर स्पर्धकांच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास कसा केला जातो इत्यादी गोष्टींविषयी पुढील भागात आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. वर्षाअखेरीस मिळणाऱ्या या दोन पत्रकांशिवाय वर्षभर वेळोवेळी कुठले मॅनेजमेंट अहवाल उद्योजकाला धंद्याच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती होण्यासाठी आवश्यक असतात याबद्दलही पुढील भागात माहिती असणार आहे.
 
वरील उल्लेख केलेल्या सर्व आर्थिक अहवालांचा विचार करताना मला नेहमीच सिंहावलोकन या शब्दाची आठवण येते. या शब्दाचे मूळ, जंगलामध्ये फिरत असताना थोडे अंतर चालून गेल्यावर मागे वळून पाहण्याची सिंहाला जी सवय असते त्यामध्ये आहे. असे करण्यामागे जसा सिंहाचा हेतू मागून काही धोका नाही ना हे पाहण्याचा असतो तसेच मागे गेलेल्या मार्गात नवीन काही संधी तर दवडलेल्या नाहीत ना हे तपासण्याचा प्रयत्न असतो. अगदी त्याचप्रमाणे उद्योजकसुद्धा घडून गेलेल्या अर्थविषयक व्यवहाराचा या सर्व आर्थिक पत्रकांद्वारे सतत आढावा घेत असतो आणि त्याआधारे येणाऱ्या काळात आवश्यक ते आर्थिक निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत राहतो.

2_1  H x W: 0 x
मुकुंद अभ्यंकर
चार्टर्ड अकाउंटंट
9822475611
मुकुंद अभ्यंकर चार्टर्ड अकाउंटंट असून, गेल्या 30 वर्षांपासून ते अनेक कंपन्यांसाठी लेखापरीक्षणाचे आणि आर्थिक घडामोडींच्या विश्लेषणाचे काम करीत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@