स्वच्छ ब्रोचिंग साठी नीट कटिंग ओईल बदलले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    27-Nov-2020   
Total Views |


अजित आज भलताच खुश होता, कारणच तसे होते. त्याच्या टीमला कंपनीच्या कायझन स्पर्धेमध्ये पहिले बक्षीस मिळाले होते. त्यासाठी कायझन केलेल्या टीमबरोबर सेलिब्रेशन करण्याचेसुद्धा निश्चित झाले होते. त्यामुळे अजित आनंदातच त्याच्या कारकडे निघाला होता. विशेष म्हणजे अजितला नवीन कंपनीत रुजू होऊन नुकतेच सहा महिने झाले होते आणि त्यातही अॅप्रिसिएशन म्हणजे पार्टी तो बनती है!
अजित पार्किंगकडे निघाला असताना त्याला सहा महिन्यांपूर्वीची सकाळ आठवली आणि अंगावर काटा आला. त्यादिवशी कंपनीत 5S ऑडिट होते. अजित रुजू झाल्यानंतरचा पहिलाच महिना होता. सकाळीच अजित आणि त्याची टीम ऑडिटसाठी सज्ज झाली होती. शॉपफ्लोअरवर राऊंड मारून अजित केबिनमध्ये आला. केबिनमध्ये येताक्षणीच त्याला संपूर्ण केबिनमध्ये ऑइलचे पाय दिसले, त्यामुळे क्षणात त्याच्या डोक्यात संतापाची एक लहर आली.
''अरे काय हे? कालच सगळ्यांना नीट समजावून सांगितलं होतं, त्या ब्रोचिंग मशीनच्या ऑपरेटरला दहा वेळा सांगितलं होतं की, त्याची जागा सोडून कुठेही फिरायचं नाही. तरी हा केबिनमध्ये कसा आला?''


2_1  H x W: 0 x
 
ब्रोचिंग मशीनचे ऑपरेटर कुठेही फिरले तर ऑइलचे पाय घेऊनच फिरत होते. सगळा शॉपफ्लोअर घाण होण्याचे मुख्य कारण म्हणजे ब्रोचिंग मशीनचे ऑपरेटर आणि त्यांच्या पायाला लागलेले ऑइल हेच होते. पूर्ण शॉपफ्लोअरमध्ये एकच ब्रोचिंग मशीन असे होते की, ज्यावर 'नीट कटिंग ऑइल' वापरले जात होते. नीट कटिंग ऑइल म्हटलं की त्याचे नको असलेले साईड इफेक्ट आलेच. शॉपफ्लोअर घाण होणे, ऑपरेटरच्या तक्रारी, ऑइलमुळे चिकट होणारा परिसर, चिप वेगळ्या ठेवायला लागणे अशा अनेक गोष्टी आल्या. परंतु, या सर्व गोष्टी बाजूला ठेवत अजितने पटापट ऑइलचे डाग स्वच्छ करून तो थोडासा नाखुशीने ऑडिटला सज्ज झाला. मात्र, ऑडिट संपल्यावर तातडीची बैठक घेऊन ब्रोचिंग मशीनच्या ऑइलचा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच हे त्याने मनाशी ठामपणे ठरविले.
मीटिंगदरम्यान, "अहो साहेब, काहीतरीच काय? गेले वीस वर्ष आपण आपल्या ब्रोचिंग मशीनवर हेच ऑइल वापरतोय. सगळ्या मशीनचे ऑइल बदलले, पण त्या ब्रोचिंग मशीनचा विचारसुद्धा मनात आला नाही. तुम्ही नवीन आहात, उगाच भलतासलता प्रोजेक्ट सुरू करू नका." निवृत्तीला दोन वर्षे शिल्लक राहिलेले वरिष्ठ ऑपरेटर कदम म्हणाले.
"वीस वर्षांपूर्वी जेव्हा हे ब्रोचिंग मशीन कंपनीत आले तेव्हा पहिल्या वर्षी आम्हाला काय त्रास झाला तो आम्हालाच माहिती. ब्रोच तुटणे, रिजेक्शन, ब्रोच जाम होणे अशा अनेक अडचणी आमच्या टीमने पाहिल्या आहेत. अनेक ट्रायल देऊन हाय व्हिस्कॉसिटी आणि सल्फर कंटेंट असलेल्या या ऑइलची आम्ही निवड केली होती. तेव्हापासून हे मशीन सुतासारखे सरळ चालतंय", कदम म्हणाले.
 

2 _1  H x W: 0  

"कोणी नवीन साहेब आला की आम्ही त्याला पहिली तंबी देतो की, त्या मशीनकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही, नाहीतर अपशकुन होतो. त्यात तुम्ही तर पहिलाच हा प्रोजेक्ट घेतलाय. जाऊ द्या साहेब, आता दोनच वर्षे राहिली आहेत माझी, कशाला कामाला लावताय. शांतपणे काम करू द्या" पुन्हा कदम बोलले.
अजितसुद्धा अठरा वर्षे प्रॉडक्शनमध्ये काम करून मुरलेला होता. या नवीन प्रोजेक्टसाठी कदमकाकांची भरपूर मदत होईल हे त्याला चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे त्याने उपस्थित सर्वांना "आपण सगळे मिळून काय ते ठरवू" असे आश्वासन देत, घाबरू नका, नीट अभ्यास करून बदल केले तर ते यशस्वी होतातच आणि तुमचा अनुभव आहेच मदतीला असे म्हणत अजितने एका वाक्यात अनेक बाण मारले.
दुसऱ्या दिवशीच्या सकाळी पार पडलेल्या कायझनच्या बैठकीमध्ये, "मला या ब्रोचिंग मशीनच्या तेलामुळे येणाऱ्या सर्व समस्या लवकरात लवकर बंद करायच्या आहेत. त्यासाठी मी चार लोकांची एक टीम निश्चित केली आहे. पुढच्या दोन महिन्यात या मशीनवर काम करा आणि ऑइलशी संबंधित सर्व समस्या मिटवून दाखवा" अजित म्हणाला. चार जणांच्या टीममध्ये वरिष्ठ ऑपरेटर कदम, त्यांच्याबरोबर देखभाल अभियंता रोहित, प्रॉडक्शन इंजिनियर सुदाम आणि ऑपरेटर दीपक अशा चार जणांची निवड त्याने केली होती.
टीमच्या पहिल्या ब्रेन स्टॉर्मिंग मीटिंगमध्ये पुढील चर्चा झाली.
"रोहित, सुरूवातीला कुठल्या समस्या आपल्याला सोडवावयाच्या आहेत त्याची यादी करू आणि त्याचे मूळ कारण (रूट कॉझ) शोधू." सुदाम म्हणाला.


समस्यांची यादी
1. मशीनभोवतालचा सगळा परिसर चिकट होणे.
2. ऑपरेटर ब्रोचिंग मशीनवर काम करायला नाखूश असणे.
3. ब्रोचिंग मशीनसाठी वेगळ्या ऑइलची साठवणूक करावयाला लागणे.
4. ऑपरेटरच्या बुटांना ऑइल लागून सारा परिसर घाण होणे.
5. मशीनवरून काढलेल्या कार्यवस्तू ऑइलने भरलेल्या असणे.
6. चिप तेलकट असणे. त्यामुळे ऑइल वाया जाणे, इत्यादी.
जेव्हा या समस्यांवर चर्चा केली तेव्हा बऱ्याच समस्यांसाठी ब्रोचिंग मशीनवर वापरले जाणारे 'नीट कटिंग ऑइल' जबाबदार आहे असे वाटत होते.
''मी नेहमी विचार करतो, या एकाच मशीनवर नीट कटिंग ऑइलच का वापरतात? कदाचित कदम आपल्याला नीट सांगू शकतील.'' सुदाम.
त्यावर दीपक म्हणाला, ''खरंच या ऑइलचा खूप त्रास होतो. घरी गेल्यावरही अंगाचा वास जात नाही. पंधरा पंधरा मिनिटं आंघोळीला लागतात.''
रोहित : ''काय कदम, आम्हाला सांगा की या ऑइलचे सिक्रेट.''
कदम : ''अहो त्यात काय सिक्रेट, दुसर कोणतं ऑइल चालतच नाही. आता ब्रोचिंग म्हटलं की गरमीच एवढी तयार होते, परत लोडसुद्धा खूप येतो मशीनवर. लुब्रिसिटी नसेल तर ब्रोचला लाईफसुद्धा मिळत नाही, ब्रोच बदलायला वेळ लागतो तो वेगळा. थोडक्यात काय नीट कटिंग ऑइल वापरलं की या कुठल्याच अडचणी येत नाहीत. वॉटर सोल्युबल ऑइल या मशीनवर चालत नाही.''
''कारण काय?'' पुन्हा रोहित.
कदम यांनी स्पष्टीकरण दिले,
1. वॉटर सोल्युबल ऑइल खूप पातळ असते, त्यामुळे ब्रोचवर त्याची फिल्म रहात नाही.
2. वॉटर सोल्युबल ऑइलचे कॉन्सन्ट्रेशन नेहमीप्रमाणे 5% ठेवले तर ब्रोचचे हवे तेवढे आयुष्य मिळत नाही.
3. वॉटर सोल्युबल ऑइलची हाताळणी थोडी किचकट असते. टॉपअप करतांना कॉन्सन्ट्रेशन राखले गेले नाही तर सगळाच विचका होतो.मग सगळेच विचार करतात "विषाची परीक्षा का घ्यायची?"
थोडक्यात काय, यावर एकच रामबाण उपाय नीट कटिंग ऑइल आणि जास्त लुब्रिसिटीसाठी सल्फर.
सुदाम : "मी ऐकलंय की सल्फर हानिकारक आहे आणि बऱ्याच देशात ते बंदसुद्धा आहे. खरंतर हे ऑइलच विष आहे. अजून काय परीक्षा घेणार? जास्त लुब्रिसिटीसाठी आता वॉटर सोल्युबल ऑइलसुद्धा चांगली आली आहेत."
रोहित म्हणाला, "थोडक्यात काय आपल्याला जास्त लुब्रिसिटी असणारे आणि उष्णता वाहून नेणारे, कमी चिकट म्हणजेच वॉटर सोल्युबल ऑइलची आवश्यकता आहे." "आणि सुरक्षित सुद्धा." सुदाम पुटपुटला. यानंतर सगळी टीम असे ऑइल शोधावयाच्या कामाला लागली.
थोडी शोधाशोध केल्यावर टीमला हा शोध लागला की, आता व्हेजिटेबल ऑइलयुक्त चांगल्या प्रतीची वॉटर सोल्युबल ऑइल बाजारात आहेत. हे ऑइल नेहमीपेक्षा म्हणजे 5% ते 6% पेक्षा जास्त म्हणजे 10% ते 15% कॉन्सन्ट्रेशनने ब्रोचिंगसारख्या कामाला वापरता येते. त्यावर अजितच्या टीमने या ऑइलची ट्रायल घ्यायची ठरविली. मनात थोडी धाकधूक होती पण रिस्क तर घ्यावीच लागणार होती.
दीपक आणि त्याच्या टीमने मशीनचे नीट ऑइल काढून मशीन स्वच्छ करून ठेवले. आता मशीन ट्रायलसाठी तयार होती. टीमने सुरुवातीला ऑइलचे कॉन्सन्ट्रेशन 15% ठेवायचे ठरविले. जर काही अडचण आली नाही तर एक एक टक्का कमी करून दहा टक्क्यांपर्यंत घ्यावयाचे ठरविले.
'गणपती बाप्पा मोरया' म्हणत कदमांनी मशीन सुरू केले.
पहिला जॉब निघताक्षणीच कदम काकांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ही ट्रायल यशस्वी होणार असे कदम म्हणाले. त्यावर ''ये तो अभी शुरुवात है, ब्रोच बाद होईपर्यंत ट्रायल घेऊ आणि मग ठरवू", रोहित म्हणाला.
आता जवळपास तीन महिने होत आले होते. मशीन व्यवस्थित चालू होते. यंत्रणसुद्धा पूर्वीप्रमाणेच होत होते.प्रॉब्लेम पूर्णपणे निघून गेले होते. तीन महिन्यांनंतर टीमने ट्रायल संपविली.

टीमला पुढील गोष्टी दिसल्या.

1. कार्यवस्तूच्या मोजमापात आणि दर्जामध्ये काहीही नकारात्मक बदल आढळले नाहीत.
2. ऑइलचे कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्याने भाग गंजले नाहीत.
3. ब्रोचच्या आयुष्यात काहीही नकारात्मक बदल दिसले नाहीत.
4. नेहमीपेक्षा फार कमी उष्णता तयार होत होती.
5. मशीनभोवतालच्या वातावरणात खूप सकारात्मक बदल झालेले आढळले.
6. ऑपरेटर आनंदी दिसले कारण आधीच्या ऑइलमुळे येणाऱ्या समस्या दूर झाल्या.
7. ऑइल खर्चात 20% बचत झाली.
या बदलामुळे टीमने कंपनीचे बरेच पैसे वाचविले. गचाळ शॉपफ्लोअरपासून सुटका झाली ती वेगळीच.
 

३ _1  H x W: 0  
  मंदार गोकर्ण
  संचालक,
  संजय टूल्स अँड अधेझिव्हज्
  9822028518
 [email protected]
यांत्रिकी अभियंते असलेल्या मंदार गोकर्ण यांनी अनेक वर्षे सँडविकचे टूल वितरक म्हणून काम पाहिले आहे. नुकतेच त्यांनी मशीन साफ करण्याकरिता उपयुक्त असलेले उत्पादन बाजारात आणले आहे.
@@AUTHORINFO_V1@@