संपादकीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    07-Nov-2020   
Total Views |




1_1  H x W: 0 x
 
लॉकडाउननंतर जगभरातील कंपन्यांच्या व्यवसायातील कामांसाठी प्रत्यक्ष मानवी व्यवहारांवर बंधने असल्यामुळे सर्वत्रच डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या कारखान्यातील प्रक्रियांचे डिजिटायझेशन करणे या दृष्टिकोनातून उद्योजकांना त्यांच्या व्यवसायातील पद्धतींची घडी पुन्हा नव्याने बसवायला लागली. यासाठी कोणकोणते मार्ग आहेत ते ओळखून, त्यावर अभ्यास करून, उत्पादकतेमध्ये सातत्य ठेवणे किंबहुना त्यामध्ये वाढ करणे यावर भर देण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. वेब होस्टिंगमध्ये काम करणाऱ्या  एन्ड्युरन्स इंटरनॅशनल ग्रुप या IT सर्व्हिसेस कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार लॉकडाउनच्या काळात 30% MSME नी वेबसाईट किंवा ई-कॉमर्सला प्राधान्य दिले, तर 50 टक्क्यांपेक्षाअधिक MSME नी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग साधने आणि व्हॉट्स अॅपद्वारे व्यवसायात सातत्य ठेवण्यावर भर दिला. अनलॉकनंतर उद्योगक्षेत्र पुन्हा सातत्यपूर्ण उत्पादकतेसाठी नवीन बदलांसह सज्ज झाल्याचे विविध उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले. टेक्निकल अपग्रेडेशन हे बहुतेक उद्योजकांच्या कामांच्या प्राधान्य यादीत होते. 
 
टेक्निकल अपग्रेडेशनसाठी वेळेवर मार्गदर्शन मिळणे ही एक महत्त्वाची बाब आहे, यात काही शंका नाही. भारत सरकारनेदेखील ideas. msme.gov.in हे MSME आयडियाज पोर्टल सुरू केले आहे. उद्योगांसाठीच्या विविध बँक योजना, कल्पना, इनोव्हेशन आणि संशोधन, या संदर्भातील माहिती कोणतीही व्यक्ती त्याच्यावर अपलोड करू शकते. तसेच हे पोर्टल व्हेंचर कॅपिटल आणि परदेशी सहयोगाबाबत (कोलॅबरेशन) मदत करते.
 
MSME क्षेत्राला अधिक उंचीवर नेण्यामध्ये स्टार्टअपची भूमिका महत्त्वाची ठरते. तंत्रज्ञानामध्ये कुशल असलेल्या स्टार्टअपमध्ये बाजारपेठेची गणिते बदलण्याची क्षमता असते. स्टार्टअप आणि MSME यांच्यातील सहयोगाकडे गेम-चेंजर म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिले जाऊ शकते. लघु मध्यम कारखान्यात प्रत्येक टप्प्यावर इनोव्हेशनचा अंतर्भाव करण्याची गरज आज प्रकर्षाने जाणवीत आहे. जसे की, कच्च्या मालाची खरेदी, मनुष्यबळाची निवड, उत्पादन प्रक्रिया आणि डिजिटल विपणन प्रक्रिया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन तंत्रज्ञान यासारख्या प्रगत साधनांचा प्रभावी वापर व्यवसाय करण्याची पद्धती सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. 
 
बहुतेक परदेशी कंपन्या भारतामध्ये त्यांचे कारखाने स्थापन करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे भारतीय MSME ना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक, सर्वोत्तम पद्धती आणि उत्पादनांची निर्मिती करण्याची गरज आहे. कौशल्य विकास साध्य करण्यासाठी आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इनोव्हेशनला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनण्याची उत्तम वेळ यापूर्वी कधी आली नव्हती.  
 
स्पर्धात्मक आणि सर्वमान्य उत्पादाची निर्मिती करून MSME उद्योजक जागतिक बाजारपेठेशी जोडला जावा यासाठी आवश्यक ते ज्ञान आणि माहिती देण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो. धातुकामच्या सुपर फिनिशिंग विषयीच्या या विशेष अंकात नवीन उत्पादने या विभागात पृष्ठीय फिनिशमधील सुधारणेसाठी CMTI ने अभ्यासपूर्ण विचार करून विकसित केलेले तंत्रज्ञान आणि AFFM-150D या मशीनविषयी सोदाहरण माहिती वाचावयास मिळेल. यंत्रण प्रक्रिया या विभागात सुपर फिनिशिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅटू होनिंग या यंत्रण प्रक्रियेच्या माहितीबरोबरच धातू कापण्यासारखी मूलभूत क्रिया अधिक सफाईदारपणे करणाऱ्या वॉटरजेट कटिंग या तंत्राचीही माहिती दिली आहे. टूलिंग विभागातील पृष्ठीय फिनिशिंग तंत्रातील रोलर बर्निशिंग प्रक्रियेचे फायदे आणि लाभ सखोलपणे सांगणाऱ्या लेखाबरोबरच कटिंग टूलवरील हेलिक्स कोनाचा यंत्रण प्रक्रियेवर होणारा परिणाम सविस्तरपणे मांडणारे लेखही आपल्याला उपयुक्त वाटतील. कल्पकता वापरून सरफेस ग्राइंडिंग मशीनवरील खर्चात कशी कपात करण्यात आली याविषयीची सुधारणा आपल्याला प्रक्रिया सुधारणा या विभागात वाचावयास मिळेल. धातुकाम परिवाराशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकासाठी आम्ही सप्टेंबर महिन्यापासून ‘यंत्रगप्पा’ या वेबिनारचे आयोजन सुरू केले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या वेबिनारचा संवादरुपी लेख आम्ही वाचकांसाठी देत आहोत. 
 
मागील वर्ष आपण सर्वांसाठीच अतीव त्रासाचे आणि चिंतेचे गेले आहे. जागतिक मंदी, कोव्हिड 19 विषाणूमुळे आपल्या एकूणच जीवनावर आलेले मळभ या दीपावलीतील दिव्यांचा प्रकाश नक्कीच दूर करेल. आमच्या सर्व वाचक, जाहिरातदार, लेखक आणि इतर मित्रांना दसरा आणि दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा!  
@@AUTHORINFO_V1@@