गुणवत्तेचे भविष्यातील निकष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    07-Nov-2020
Total Views |
 
‘गुणवत्तेचे भविष्यातील निकष काय असतील’ यावर अॅक्युरेट गेजिंगचे संचालक विक्रम साळुंखे आणि सुंदरम क्लेटन कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जोशी यांनी त्यांच्या ग्राहकांच्या गुणवत्तेच्या निकषांवरील अपेक्षा आणि अनुभव यावर ‘उद्यम’ प्रकाशनतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘यंत्रगप्पा’ या वेबिनारमध्ये सखोल मार्गदर्शन केले. त्याचा आढावा घेणारा लेख.

उद्यम प्रकाशनतर्फे सप्टेंबर 2020 महिन्यापासून 'यंत्रगप्पा' या वेबिनार सत्राचे आयोजन सुरू केले आहे. यंत्रगप्पाच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये अॅक्युरेट गेजिंगचे संचालक विक्रम साळुंखे आणि सुंदरम क्लेटन या कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जोशी सहभागी झाले होते. धातुकाम मासिकाचे संपादक दीपक देवधर यांनी या दोन तज्ज्ञांशी 'गुणवत्तेचे भविष्यातील निकष काय असतील' या विषयावर संवाद साधला. हा प्रश्नोत्तर रुपातील संवाद धातुकामच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.

1_1  H x W: 0 x

दीपक देवधर : जोशी सर, तुमच्या परदेशी आणि स्थानिक ग्राहकांकडून तुमच्याकडे गुणवत्तेसंदर्भात कशा आणि कोणत्या प्रकारच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत? तुम्हाला त्या अपेक्षांमध्ये काय बदल दिसून येतो?

विवेक जोशी : माझ्यासाठी हा जो पहिला प्रश्न तुम्ही विचारला, त्या प्रश्नाच्या उत्तरावर येण्यापूर्वी गुणवत्ता म्हणजे काय, यावर प्रथम चर्चा करावी असे मला वाटते. प्रत्येकाच्या दृष्टीने गुणवत्तेचे प्रमाण हे वेगवेगळे असते. जसजसा ग्राहक बदलतो तसतसे गुणवत्तेचे निकषही बदलतात. एखाद्या ग्राहकाने जे निकष ठरविले आहेत, त्यानुसार जर तुमचा उत्पाद असेल तर त्या ग्राहकाच्या दृष्टीने तो उत्पाद योग्य गुणवत्तेचा असतो. दुसऱ्या ग्राहकाच्या मते, ज्या एका अमूक कामासाठी (फंक्शन) उत्पादन होते आहे, ते काम जर पूर्ण होत असेल तर गुणवत्ता योग्य आहे. या दोन व्याख्यांच्या पुढे जाऊन मी असे म्हणेन की, तुमचा उत्पाद ग्राहकाने दिलेल्या वैशिष्ट्यांनाच केवळ पात्र न ठरता, तो ग्राहकाला आनंद देईल, दिलासा देईल, ग्राहकाचे संपूर्ण समाधान करेल अशा प्रकारचा उत्पाद असावा अशी अपेक्षा असते.
काळानुसार ग्राहकांच्या अपेक्षा कशा बदलत गेल्या याचा विचार आता आपण करू. गुणवत्तेचा प्रवास पाहिला तर, कार मॅन्युफॅक्चरिंगच्या उत्पादनात सुरुवातीला एक व्यक्ती त्या कारचे संपूर्ण इंजिन जोडायची (अॅसेम्बल) किंवा 1-2 जणांची टीम संपूर्ण कारची अॅसेम्ब्ली करायची आणि त्या कारवर स्वतःचे नाव अतिशय अभिमानाने कोरायची. म्हणजे त्याकाळी त्यांचे स्वतःचे नाव ही त्यांच्या गुणवत्तेची ओळख असायची. कालांतराने अॅसेम्ब्ली लाइन आली. अनेक लोक एकत्र येऊन त्या गाडीचा एक एक भाग तयार करायला लागले. त्यामुळे त्या सर्व ठिकाणी गुणवत्तेची तपासणी करणे हा संपूर्ण अॅसेम्ब्लीचा एक भाग झाला. जे लोक पार्टचा पुरवठा करीत होते, ते सुरुवातीलाच कोणता पार्ट चांगला आहे, कोणता चांगला नाही यानुसार पार्टचे वर्गीकरण (सॉर्टिंग) करून द्यायचे. त्याच्यानंतर त्यातील दोष मोजले जायचे. या दोषाचे प्रमाणदेखील 2 टक्के, 5 टक्के, 10 टक्के असे गणले जायचे. हळूहळू ग्राहकाने हे प्रमाण टक्क्यांमध्ये नको तर PPM मध्ये सांगा अशी अपेक्षा व्यक्त केली. म्हणजे 10 लाखांपैकी किती भाग ग्राहकाकडे सदोष आले त्याचे मोजमाप केले जाई आणि त्या मूल्यांकनावरून ग्राहक निर्मात्याला गुणवत्तेचे रेटिंग देणार. डॅमलर, व्हॉल्व्होसारख्या कंपन्यांच्या दृष्टिकोनातून गुणवत्ता म्हणजे, त्यांना निर्दोष पार्टचा (झीरो डीफेक्ट) पुरवठा. आताच्या ग्राहकाची केवळ 'झीरो डीफेक्ट' नाही, तर त्याचबरोबर 'झीरो इफेक्ट टू द एन्व्हायर्नमेंट' म्हणजे पर्यावरणपूरक हीदेखील अपेक्षा अधिक प्रकर्षाने व्यक्त होताना दिसते. अशा पद्धतीच्या ग्राहकाच्या अपेक्षा येथून पुढील काळात वाढत जाणार आहेत.

विक्रम साळुंखे : मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या व्यवसायात येऊन मला 30 वर्षे झाली. ज्यावेळी मी या व्यवसायात आलो तेव्हाच्या काळात जर्मनीमध्ये निर्मिती केलेला उत्पाद हा जगामध्ये सर्वात चांगला उत्पाद म्हणून त्याची गणना होत होती. त्यावेळी जपानमधील उत्पादाची गणना जर्मनीनंतर व्हायची. जसजसा काळ बदलत गेला तसतशी जपानमधील उत्पादांची गणना अग्रणी उत्पादांमध्ये होऊ लागली. विवेक जोशी सरांनी नमूद केल्याप्रमाणे ग्राहकाच्या अपेक्षांचा योग्य आणि बारकाईने अभ्यास करून गुणवत्तेबरोबरच ग्राहकाला समाधान देणाऱ्या बाबींवर कसा जोर द्यायचा हे आपण जपानी उत्पादांमध्ये पाहतो. मला असे वाटते की, गुणवत्तेचा हा एक निरंतर प्रवास आहे. प्रत्येक देशामध्ये या प्रवासाचे अनेक माइलस्टोन असतात. आपल्या देशामध्ये वाहन उद्योगात 'मारुती'चे येणे हा एक मोठा माइलस्टोन होता. त्यानंतर आपल्या देशातील गुणवत्तेचे निकष अतिशय मोठ्या प्रमाणात बदलले गेले.
गुणवत्तेबाबत सर्वांची मते भिन्न असतात. प्रत्येकासाठी गुणवत्तेचे निकष वेगवेगळे असतात. गेल्या 20-25 वर्षांमध्ये वाहन उद्योगामध्ये गुणवत्तेचे निकष किती मोठ्या प्रमाणात बदलले गेले, हे आपण सर्वांनीच पाहिले. या सर्व प्रवासात इक्विपमेंट सप्लायर म्हणून आम्हीदेखील खूप बदलांचे साक्षीदार आहोत. सुरुवातीच्या काळात उद्योजकांकडून एखादे मेजरिंग इक्विपमेंट अंतिम तपासणीच्यावेळी सर्व गुणवत्तेच्या तपासणीसाठी अतिशय काळजीपूर्वक वापरून, अंतिम वर्गीकरण करून त्या पार्टचा पुरवठा केला जात असे. आता त्या पद्धतीमध्ये बदल झाला आहे. जो उत्पादाची प्रत्यक्ष निर्मिती करतो, गुणवत्ता ही त्याची जबाबदारी झाली आहे. त्यासाठीची सर्व पूरक साधने आजकाल त्या मशीनवरच ऑपरेटरला उपलब्ध करून दिलेली असतात. गुणवत्तेचे नियंत्रण, गुणवत्तेची खात्री या सगळ्याच्या व्याख्या काळानुरूप बदलत गेल्या. त्याचबरोबर आपल्या देशातील सर्व पुरवठादारांच्या बाजारपेठादेखील बदललेल्या आहेत.

दीपक देवधर : जोशी सर, जागतिक ग्राहकांना पुरवठादार म्हणून जेव्हा तुम्ही पुरवठा करता त्यावेळी आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला तर एक विशेष संस्थात्मक वर्तणूक (टिपिकल ऑर्गनायझेशनल बिहेव्हियर) आपल्याकडील कंपन्यांमध्ये असते. मागणीच्या दृष्टिकोनातून या संस्कृती तुम्ही कशा पद्धतीने अनुभवत आहात? ही वर्तणूक बदलण्याकरिता तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या पुरवठादाराच्या कंपनीमध्ये काही बदल अपेक्षित आहेत का? त्याला तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो, त्याविषयी सांगा.

विवेक जोशी : अतिशय सुयोग्य प्रश्न आहे. कारण जसजसे आपण जागतिकीकरणाकडे जात आहोत, तसतसे आपण वेगवेगळ्या देशांमध्ये आपले पार्ट, एक मुख्य पुरवठादार म्हणून देतो. अशावेळी आमच्या पुरवठादाराच्या गुणवत्तेचासुद्धा अंतिम उत्पादावर परिणाम होतो. त्यासाठी आपली पूर्ण मूल्य साखळी (व्हॅल्यू चेन) किंवा व्हॅल्यू सिस्टिम आपल्याला वेगळ्या तऱ्हेने बदलावी लागणार आहे. तुम्ही यासाठी 'संस्कृती' हा अतिशय छान शब्द वापरला. संस्कृती आणि संस्थात्मक वागणूक याची फार सुंदर सांगड आपल्याला घालता येऊ शकते, जी जपानने सुरुवातीपासूनच घातली आहे. कोणत्याही उद्योगाच्या सुरुवातीपासूनच त्यांची नैसर्गिक मूल्ये आणि संस्कृती यांचा प्रभाव त्यांच्या उत्पादनात किंवा प्रक्रियांवरसुद्धा आपणास दिसून येतो. प्रक्रिया (प्रोसेसिंग), उत्पाद यांच्या दृष्टिकोनातून आपल्यातील अद्वितीय किंवा वैशिष्ट्यपूर्ण काय असेल तर ते आहे व्हॅल्यू सिस्टिम, आपला धर्मावरचा विश्वास (रिलीजीयस फेथ), आपल्याकडे असणारी विविधता (डायव्हर्सिटी). या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण निर्मितीमध्ये करू शकतो.
आपल्याकडे पूर्वी पद्धत होती की, आपल्याला काहीतरी आधुनिक करायचे असल्यास आपण पाश्चिमात्य देशांकडे धाव घ्यायचो. जपान, युरोप किंवा अमेरिकेमधून त्या गोष्टी कॉपी करायचो. आता तो काळ गेला. आताच्या स्पर्धेच्या युगात उत्पादनाला 'कॉपी पेस्ट' चालत नाही. तंत्रज्ञान कॉपी करता येऊ शकते, त्यामध्ये पाहिजे तसे फेरबदल करणे शक्य असते, पण ज्या प्रणाली आहेत, त्या आपण कॉपी करू शकत नाही.
माझे निर्मितीक्षेत्रातील गुरू आहेत, सी. नरसिंहन. त्यांनी 'इंडियन प्रॉडक्शन सिस्टिम' हे स्वतःचे एक पुस्तकदेखील प्रकाशित केले आहे. त्यांच्यासोबत झालेल्या अनेक चर्चांमधून माझ्या असे लक्षात आले की, आपण भारतीय उत्पादन प्रणाली विकसित केली पाहिजे. साळुंखे सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने उत्पादाची निर्मिती करतानाच त्याची योग्य आणि पूर्ण तपासणी केली तर, त्यासाठी वेगळ्या गुणवत्ता नियंत्रणाची (क्वालिटी कंट्रोल), परत तपासणीची आवश्यकता भासणार नाही. या टप्प्यावर येण्यापूर्वी आपल्याला अनेक गोष्टींमध्ये बदल करावा लागेल. संस्थात्मक वर्तणुकीमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, आमच्यासारख्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांनी वेगवेगळ्या स्थानांनुसार, प्लँटनुसार युनिटची रचना, युनिटमध्ये लाइन, लाइनमध्ये सेल आणि सेलमध्ये मशीन असे वर्गीकरण केले पाहिजे. यामुळे अतिशय सूक्ष्म पातळीवर (मायक्रो लेव्हल) सर्व गोष्टींचे संनियंत्रण (मॉनिटर) करता येईल.
व्हॅल्यू अॅडेड आणि नॉन व्हॅल्यू अॅडेड याचे वर्गीकरण करून नॉन व्हॅल्यू अॅडेड कामे आपण कमी करीत गेलो तर आपल्या उत्पादाची गुणवत्ता आणि किंमत अशा दोन्ही बाबींवर निश्चित फरक पडेल. उत्पादनही वेळेमध्ये नियंत्रित करता येईल.
श्रम शक्तीची उपलब्धता, मानसिकता आणि वृत्ती या तिन्ही बाबींसदर्भात जगभरात भारताकडे सकारात्मकतेने पाहिले जाते. परंतु अंदाजानुसार वर्तनात (प्रेडिक्टेबल बिहेव्हियर) आपण भारतीय मागे पडतो, हा आपल्यातील सगळ्यात मोठा दोष इतर देश अधोरेखित करतात. म्हणजे एखादी गोष्ट वेळेवरच होईल, अमूक एव्हढीच संख्या असेल, अपेक्षित गुणवत्ताच मिळेल, त्याचबरोबर आपला माल अपेक्षित वेळेत पोहोचेल, अमूक एके दिवशी उत्पादन सुरू होईल, अशा बाबतीत आपण अंदाजबरहुकूम काम करण्यात मागे पडतो. आपल्याला आपले सातत्य, विश्वासार्हता आणि अंदाजात्मकता वाढवावी लागेल.
उत्पादन करताना अनेक समस्या येतात. त्या सोडविण्यासाठी डेटा अतिशय महत्त्वाचा ठरतो. मुळात आपण भारतीय 'डेटा ओरिएंटेड' आहोत का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. डेटा, स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यावर आपला भर असला पाहिजे. तर्कावर आधारित किंवा गृहीत धरून गोष्टी बदलू नयेत. आपल्याकडे जो कामगार वर्ग आहे, आपले जे टीम मेंबर आहेत, अभियंते आहेत, यांची कौशल्ये वाढविली पाहिजेत. त्याचबरोबर स्वयंचलन करून मशीन प्रोसेसिंगमधील कौशल्याची गरज कमी व्हायला पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून घेणे हे पुढच्या दृष्टीने योग्य राहील. सातत्याने सुधारणा करीत राहण्याची संस्कृती जोपासली गेली तर गुणवत्ता वाढत जाईल, किंमत कमी होत जाईल. आपल्या निर्मिती व्यवस्थेमध्ये असे अनेक सांस्कृतिक बदल, संस्थात्मक बदल आपल्याला आणता आले तर चांगल्या दर्जाचे उत्पादन करून जगातील नामांकित कंपन्यांशी आपण स्पर्धा करू शकतो आणि हे शक्य आहे.
जर आपल्यासमोर एखादी समस्या आली, तर साधारणतः मालकांची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया असते की, ही समस्या कोणामुळे तयार झाली. हा प्रश्न म्हणजे संस्कृतीचा भाग झाला. त्याऐवजी आपण 4W आणि 1H च्या आधारे, ही समस्या कशी आली, कुठे आली, केव्हा आली याचे विश्लेषण केले पाहिजे. कंपनीच्या गेटमध्ये येणारा कोणताही कामगार, मी आज कंपनीत काहीतरी बिघडवून जाईन, या विचाराने कधीच आत येत नाही. आज मी काहीतरी चांगले काम करेन असाच विचार तो करतो. प्रत्येक कामगाराचे काम चांगले होण्यासाठी त्यांना आवश्यक सिस्टिम पुरविणे हे आम्हा वरिष्ठांचे काम आहे. म्हणजे कामात काही समस्या आली, सदोष भाग तयार होत असतील, उत्पादन सातत्याने थांबत असेल तर त्यामागील कारण शोधण्यासाठी सिस्टिमचा उपयोग होणार आहे. या सिस्टिममुळे डेटा गोळा करणे सहज शक्य असते. जपानी लोकांनी यासाठी 'TEI म्हणजे टोटल एम्प्लॉई इन्व्हॉल्व्हमेंट' या कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे.

दीपक देवधर : साळुंखे सर, मोठ्या आणि त्याचबरोबर छोट्या कंपन्यादेखील तुमचे ग्राहक आहेत. विवेक जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे कारखान्यात अशा प्रकारचा सांस्कृतिक बदल आणण्याकरिता छोट्या कंपन्यांचा प्रतिसाद कसा असतो. इक्विपमेंटच्या संदर्भात तुमच्याकडून छोट्या कंपन्या काही वेगळ्या अपेक्षा करतात का?

विक्रम साळुंखे : कोणतीही मोठी कंपनी असो किंवा छोटी कंपनी असो, तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये आता फारसा फरक राहिलेला नाही. 20 वर्षांपूर्वी जेव्हा सी.एन.सी. मशीन आली तेव्हा असे मानले जात होते की, फक्त मोठ्या कंपन्याच या सी.एन.सी. मशीन विकत घेतील. छोट्या कंपन्या मॅन्युअल लेथ किंवा मिलिंग मशीनवरच काम करतील. परंतु आज तशी परिस्थिती नाही. कोणताही लघु उद्योजक असेल किंवा एखादा स्टार्टअप जरी असला तरी त्याच्याकडे पहिले मशीन हे सी.एन.सी.च असते. विवेक जोशी यांनी सांगिल्याप्रमाणे मोठ्या कंपन्यांमध्ये बऱ्याचशा प्रणाली या डेटा ड्रिव्हन असतात. छोट्या कंपन्यांमध्ये अनुभवावर अधिक जोर असतो. कोव्हिडच्या काळात, आपल्या शॉपमधील सर्व प्रणालींकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची वेळ आली आहे. छोट्या कंपन्यांमध्ये आपल्याकडे ज्या मिसिंग लिंक आहेत, की छोट्या कंपन्यांमध्ये डेटा तयार होतो, परंतु त्याचा प्रभावी वापर केला जात नाही. बऱ्याचशा ठिकाणी पारंपरिक कॅलिपरऐवजी डिजिटल कॅलिपर वापरला जातो. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये CMM आहेत. या सगळ्या साधनांचा डेटा मोजून आहे त्याच स्टेशनवर न राहता तो पार्टबरोबर पुढच्या प्रक्रियेकडे पुढे गेला पाहिजे. सध्या छोट्या कारखान्यांमध्ये ते होताना दिसत नाही.
मध्यंतरी आमच्याकडे कल्याणी फोर्जचे चेअरमन आणि संचालक बाबासाहेब कल्याणी आले होते. त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये मिडीया ब्रेक्स ही फार सुंदर संज्ञा (टर्मिनॉलॉजी) वापरली होती. त्यांच्या अनुभवावरून ते म्हणाले की ''पार्ट आधी जातो आणि त्याच्यानंतर डेटाचा प्रवास (ट्रॅव्हल) होतो.'' खरेतर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डेटा हे सर्वात वेगवान प्रवास करणारे टूल आहे. पण या मिडीया ब्रेक्समुळे तो डेटा कोणत्यातरी मशीनवर, कोणत्यातरी वहीमध्ये, कोणत्यातरी रेकॉर्डमध्ये असतो. जेव्हा कधी कोणतीतरी समस्या येते तेव्हा आपल्या भारतीय पोलिस व्यवस्थेप्रमाणे आपल्याकडे त्याचा शोध घेतला जातो. पण त्याच डेटावर जर वेळेवर कृती केल्या, त्याच्या योग्य नोंदी ठेवल्या गेल्या तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.
वाहन उद्योगामध्ये आपण अनेकदा ऐकतो की, गाड्या परत बोलाविल्या जातात. अशावेळी आपल्या OEM साठी ट्रेसेबिलिटी फार महत्त्वाची असते. आता जे BS6 हे नवीन स्टँडर्ड आलेले आहेत, त्याच्या खूप रीक्वायरमेंट या ट्रेसेबिलिटीवर अवलंबून आहेत. यासाठी शॉप फ्लोअरवरचा वेगवेगळ्या प्रक्रियांचा डेटा कनेक्ट करणे, त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे, डेटा आधारित निर्णय घेणे, या प्रकारचे काम मोठ्या कंपन्यांमध्ये होते. तीच संस्कृती आता आपल्याकडे सर्व आकाराच्या कंपन्यांमध्ये रुजली गेली पाहिजे. यापुढे भारताला जगात वाहन निर्मिती क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान निर्माण करावयाचे असेल, चीनला एक पर्याय म्हणून आपल्याला जगात खंबीरपणे उभे रहावयाचे असेल तर, आपल्याला याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे.

दीपक देवधर : या बदलांसाठी आपण व्यक्तिगत आणि संस्थात्मक वर्तणुकीसंदर्भात बोललो. मशीनवर काम करणारा कामगार हा त्या त्या भागाच्या गुणवत्तेसाठी 'अकाउंटेबल' असेल, तरच ती गुणवत्ता पुढे वाढत जाणार आहे. या परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून कंपनीने कसा विचार केला पाहिजे? आजच्या या परिस्थितीमध्ये MSME साठी आधुनिक उपकरणे ही बाब गरजेची बनली आहे का? याविषयी आपले काय मत आहे?

विवेक जोशी : मला असे वाटते की, झीरो डिफेक्ट... शून्य दोष ... निर्दोष उत्पाद ही आता ग्राहकाची मूलभूत अपेक्षा आहे. उत्पादाबरोबरच प्रक्रियेमध्येही कोणत्याही प्रकारचा डिफेक्ट असता कामा नये. जसजसा इंडस्ट्री 4.0 किंवा क्वालिटी 4.0 चा प्रवास पुढे जाईल, जसजसा माहिती तंत्रज्ञानाचा शिरकाव निर्मिती क्षेत्रामध्ये वाढेल, तेव्हा ती गरज बनलेली असेल. उलट मी तर म्हणेन की लघु मध्यम कारखान्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण मोठ्या कंपन्यांमध्ये 2000-3000 मशीन असतात त्यांना एकमेकांशी जोडावे लागते. त्याऐवजी छोट्या कारखान्यातील किंवा एखाद्या शॉप फ्लोअरवरील 10-12 मशीनचा सेटअप इंडस्ट्री 4.0 मध्ये रूपांतरित करण्यासाठी कमी वेळ लागेल आणि त्याची अंमलबजावणी त्वरित सुरू होईल. त्यासाठी भविष्यातील गुणवत्तेचे पुढील 7 निकष असायला पाहिजेत,
1. व्यक्तिगत गुणवत्ता (क्वालिटी ऑफ अ पर्सन) : स्वतःची, कामगारांची, अधिकाऱ्यांची गुणवत्ता. कौशल्य (स्किल), ज्ञान (नॉलेज) आणि दृष्टिकोन (अॅटिट्यूड) या तिन्ही निकषांवर गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून प्रत्येकासाठी काम केले गेले पाहिजे.
2. कंपनीमधील प्रणाली : गुणवत्तापूर्ण प्रणालीवर भर देणे. कच्चा माल आतमध्ये येऊन अंतिम उत्पादाचे पॅकेजिंग करून ते बाहेर जाईपर्यंत सर्वत्र दर्जेदार प्रणाली असणे आवश्यक आहे. प्रक्रिया कशा केल्या जातात, बॅच असो किंवा मास प्रॉडक्शन असो किंवा उत्पाद ग्राहकाला दिल्यानंतर आफ्टर सर्व्हिस असो, या सर्वांची गुणवत्ता दर्जेदार असणे महत्त्वाचे आहे.
3. मशीनची गुणवत्ता (क्वालिटी ऑफ मशीन) : मशीन कितीही जुने असो किंवा नवीन असो, कोणत्याही बनावटीचे असो, आज त्या सर्व मशीनला जोडता येऊ शकणारे किंमतीने स्वस्त आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे वेगवेगळे संवेदक बाजारात येत आहेत. त्याला जोडता येऊ शकणारे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरदेखील आज उपलब्ध आहेत. डेटा गोळा करून सॉफ्टवेअरद्वारे त्यावर प्रक्रिया करून मशीनचा डेटा पूर्णपणे जवळ ठेवता येणे शक्य आहे. यामुळे ब्रेकडाउन मेंटेनन्सऐवजी प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स करणे सोपे जाते. त्याच्याही पुढे जाऊन डिस्क्रिप्टिव्ह मेंटेनन्स हा प्रकार सध्या प्रचलित आहे, ज्यामध्ये मशीनच स्वतः कुठे समस्या येणार आहे ते सांगते. जिथे समस्या येणार आहे, तिथे कोणता बदल करावयाचा याची सर्व माहिती स्क्रीनवर येते. सूचनांनुसार मेंटेनन्स तंत्रज्ञ तो ते बदल करू शकेल. ही सगळी माहिती मशीन स्वतःच घेते, अलार्म देते की आता अमूक अमूक बदल करावयाचे आहेत.
4. प्रक्रियेची गुणवत्ता (प्रोसेस क्वालिटी) : प्रक्रिया डेटा ओरिएंटेड असली पाहिजे. मॅन, मेथड, मशीन, मटेरीयल आणि टूल या 4M आणि 1T प्रकाराची काळजी प्रक्रियेमध्ये घेतली पाहिजे.
5. तपासणीची गुणवत्ता (क्वालिटी ऑफ इन्स्पेक्शन) : प्रक्रिया झीरो डिफेक्ट कशी असेल त्यावर काम केले पाहिजे. ते करण्यापूर्वी ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्याला त्यांची 100 टक्के तपासणी वेळेत करता आली पाहिजे. भारतात सर्वात प्रथम अॅक्युरेट कंपनीने ऑटो गेज तयार केले. 40-45 सेकंदामध्ये जवळपास 150-170 पॅरामीटर तपासले जायचे. त्याचे निकालही एका मायक्रॉनच्या आत मिळतात. त्या इक्विपमेंटची विश्वासार्हता 100% असून 100 % ऑनलाइन काम करून 'झीरो पर्सेंट पीपीएम टू कस्टमर' असे उत्पादन मिळविता येते. अशा प्रकारचा गुणवत्तेमधील दर्जा वाढला पाहिजे. पुढे जाऊन पार्टच्या ट्रेसेबिलिटीसाठी योग्य ती माहिती जमा करून जतन करणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे.
6. उत्पादाची गुणवत्ता (क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट) : ऑनलाइन गेजिंग, मशीनला थेट फीडबॅक, ऑनलाइन SPC आणि प्रेडिक्टॅबिलिटी.
7. पॅकेजिंगची गुणवत्ता (क्वालिटी ऑफ पॅकेजिंग) : हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे अनेकवेळा विचारात घेतला जात नाही. आपण जो उत्पाद बनवितो त्याचे पॅकेजिंग हे योग्यच असले पाहिजे याच्यावर आपण सर्व उद्योजकांनी खोलवर विचार करणे आवश्यक आहे.
हे 7 निकष आपल्यासाठी भविष्यातील गुणवत्ता ठरवू शकतात. MSME उद्योजकांना माझी विनंती आहे की या बाबी तंत्रज्ञानामुळे आजच्या जगात सहज उपलब्ध आहेत. त्याचा योग्य वापर करून वेळेच्या आत, योग्य व्यक्तीकडून, योग्य गुणवत्तेमध्ये आणि योग्य किंमतीमध्ये तुम्ही उत्पादाची निर्मिती करू शकता. मोठ्या कंपन्यांचे पुरवठादार होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला खूप संधी उपलब्ध आहेत असे मला वाटते.

दीपक देवधर : साळुंखे सर, ग्राहकाच्या सर्व गरजा लक्षात घेऊन तुम्ही जी काही साधने तयार करता त्यामध्ये MSME उद्योजकालासुद्धा आकर्षक वाटतील अशा इन्स्ट्रुमेंटची निर्मिती तुम्ही केली आहे का किंवा करणार आहात का? हा उद्योजक CMM कदाचित आज विकत घेऊ शकत नसेल, तर त्याला आपण काही पर्याय देऊ शकतो का, अशा अर्थाने तुमचा काही विचार चालू आहे का?

विक्रम साळुंखे : इक्विपमेंट सॉफिस्टिकेटेड असणे हे परफॉर्मन्सच्या दृष्टीने नुसता एक दिखावा नाही तर आता गरज आहे. उदाहरणार्थ, साधा कॅलिपरसुद्धा डायमेन्शन तपासतो आणि तीच डायमेन्शन आपण डिजिटल कॅलिपरनेदेखील तपासतो. दोन्ही कॅलिपर सारखेच काम करीत असले, तरीही दोन्हीच्या किंमतीमध्ये फरक का असा प्रश्न मला जर कोणी विचारला तर अशा परिस्थितीमध्ये डिजिटल कॅलिपरला न्याय देणे अवघड आहे. परंतु डिजिटल कॅलिपरमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याद्वारे मिळणारा डेटा पुढच्या प्रक्रियेमध्ये वापरला गेला आणि त्याच्या आधारे काही निर्णय घेतले गेले तर त्या कॅलिपरच्या किंमतीपेक्षा त्याचे मूल्य अधिक असेल.
डिजिटल इक्विपमेंटमधून येणाऱ्या डेटाचे विश्लेषण आपल्याला करता आले पाहिजे. त्याचा वापर करून घेता आला पाहिजे. त्याच्यातून प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स करता आला पाहिजे, किंमत कमी करता येऊ शकते. या सर्वांसाठी डेटाचे विश्लेषण हा खूप महत्त्वाचा भाग आहे.
येणाऱ्या काळामध्ये आपल्या मानवी कौशल्यांमध्ये बरीच आव्हाने असणार आहेत. आपल्याला डेटासोबत काम करण्याची फारशी सवय नाही. आपली बरीचशी शक्ती सध्या डेटा आणण्यामध्येच खर्च होते. त्यानंतर त्याची नीट व्यवस्था लावणे, यामध्येच वेळ जातो आणि वेळेनंतर हाती आलेल्या विश्लेषणामधून फारसे काही साध्य होत नाही. तंत्रज्ञानामुळे डेटा तुमच्या हातात त्वरित मिळू शकतो. पण तो तुम्हाला वापरता आला पाहिजे.
जेव्हा फोक्सवॅगन कंपनीचा चाकणला कारखाना सुरू झाला, तेव्हा तिथे सर्वात आधी क्वालिटी रूम सेटअप झाली होती. त्यांच्या तत्कालीन सीईओचे ऑफिस प्लँटच्या सुरुवातीच्या काळामध्ये मेजरमेंट खोलीत होते. शॉप फ्लोअरवरून कोणतीही समस्या आली की ते कधीही त्यावर लगेच प्रतिक्रिया देत नसत. प्रथम ते स्वतः प्रत्यक्षात CMM अहवाल तपासत आणि विश्लेषण करीत आणि त्यानंतर पुढील कृती ठरविल्या जात. उच्च पदावरील माणूस जेव्हा डेटावर अधिक भर देतो, तेव्हा वेगळ्या पद्धतीची संस्कृती त्या कंपनीमध्ये तयार होत असते हे नक्की!

दीपक देवधर : गुणवत्तेचे भविष्यातील निकष काय असतील आणि त्या निकषांच्या संदर्भात आपल्या उत्पादांचा दर्जा त्याला अनुकूल होण्यासाठी काय करावे लागेल याविषयीची सविस्तर चर्चा आपल्यापुढे आली आहे. उद्यम प्रकाशन 'यंत्रगप्पा'च्या माध्यमातून अशाप्रकारचे अनेक जिव्हाळ्याचे विषय त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना या व्यासपीठावर बोलवून आपल्या वाचकांसाठी उलगडणार आहे. यासाठी अर्थातच आपला सहभाग आणि या गप्पा अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी आपल्या सूचना यांचे स्वागतच आहे.

(शब्दांकन : सई वाबळे, साहाय्यक संपादक, उद्यम प्रकाशन प्रा. लि.)
@@AUTHORINFO_V1@@