प्लॅटू हाेनिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    09-Nov-2020   
Total Views |

1_1  H x W: 0 x

भोकांच्या (बोअर) पृष्ठभागावार करण्यात येणाऱ्या होनिंग प्रक्रिया आणि यामुळे होणारे फायद्यांविषयी माहिती या लेखात वाचावयास मिळेल. 
होनिंग हे एक फिनिशिंग ऑपरेशन आहे. ते सर्वसाधारणपणे भोकांच्या (बोअर) पृष्ठभागावर करतात. परंतु काही वेळा गरज असेल तर शाफ्ट आणि बाह्यपृष्ठावरपण करतात. होनिंग हा शब्द हनी म्हणजे मध यापासून तयार झाला आहे. मधाच्या पोळ्यामध्ये पृष्ठीय ताणामुळे (सरफेस टेन्शन) मध साठविला जातो, मध खाली पडत नाही. होनिंगमध्ये चित्र क्र. 1 आणि 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे 'क्रिस-क्रॉस' खाचा तयार होतात आणि शंकरपाळीसारखा आकार तयार होतो. होनिंग करताना, होनिंग टूलधारकाची वर्तुळाकार आणि वर-खाली अशा दोन्ही दिशांनी हालचाल होत असते. या दोन हालचालींच्या संयोजनामुळे पृष्ठभागावर क्रॉस पॅटर्न मिळतो आणि 'शंकरपाळीसारखा' आकार विकसित होतो. त्यामध्ये वंगणासाठी (लुब्रिकेशन) ऑइल साठविण्याची क्षमता असते. 

1-2_1  H x W: 0
 
 

1-2_2  H x W: 0 
उंचवटा आणि खड्डयामधील ऑइल गॅलरीमध्ये ऑइल साठविले जाते. इंटर्नल ग्राइंडिंग करून तयार झालेल्या पृष्ठभागावर ऑइल साठविले जात नसल्यामुळे जिथे वंगण होणे गरजेचे असते अशा ठिकाणी होनिंग ऑपरेशनला पर्याय नाही.
बऱ्यापैकी सातत्य असलेल्या आर.पी.एम.वर चालणाऱ्या जनरेटरसारख्या स्थिर इंजिनांसाठी साधे होनिंग योग्य आहे. ऑटोमोटिव्ह इंजिनांसाठी, प्लॅटू होनिंग पुढे दिलेल्या दुसऱ्या समस्येचे निराकरण करते. 
 
साध्या होनिंगमुळे तयार झालेले उंचवटे वापर सुरू झाल्यावर कालांतराने झिजतात आणि त्यामुळे खड्ड्यांची खोली कमी होते आणि त्यात वंगण साठविण्याची क्षमता कमी होते. जर इंजिन उच्च आर.पी.एम.वर चालविले गेले असेल (वाहन वेगाने चालविताना) तर निर्माण झालेली जास्त उष्णता उंचवट्यावरील अणकुचीदार बिंदू वितळवू शकते आणि पिस्टन रिंग लाइनर जाम (सीझ) होऊन इंजिन निकामी होऊ शकते. हे टाळण्यासाठी वाहन निर्माता 'इंजिन रनिंग-इन' कालावधीसाठी अटी घालतात. याचा अर्थ वाहनाचे विशिष्ट (उदाहरणार्थ, 5000 किमी.) रनिंग पूर्ण झाल्याशिवाय प्रत्येक गिअरमध्ये मर्यादा घातलेला वेग वाहन ओलांडू शकत नाही. या 'रनिंग इन' कालावधीदरम्यान सपाट जागा (प्लॅटू) तयार होतात. जेव्हा प्लॅटू होनिंग करणे सुरू झाले तेव्हा वापरकर्त्यासाठी ही मर्यादा दूर केली गेली. 'रनिंग इन' कालावधीत जे घडते ते उत्पादन प्रक्रियेतच साध्य केले गेले आणि त्यायोगे वाहनचालकांना पहिल्या दिवसापासून पूर्ण वेगाने वाहन चालविण्याचे स्वातंत्र्य मिळाले.

3_1  H x W: 0 x
साधे होनिंग केलेल्या सिलिंडरमध्ये नंतर असे लक्षात आले की, उंचवट्याच्या टोकदार कोपऱ्यांवर (शार्प कॉर्नर) पिस्टन रिंगचा दाब पडल्यामुळे तो कोपरा तुटतो आणि तो चित्र क्र. 3 मध्ये दाखविल्याप्रमाणे शेजारी असलेल्या गॅलरीमध्ये जाऊन पडतो किंवा सदर कोपरा न तुटता शेजारी असलेल्या गॅलरीमध्ये वाकतो. वरील प्रक्रियेमुळे ऑइल साठविण्यासाठीची जागा (गॅलरी) भरल्यामुळे, ऑइल साठविले जात नाही आणि पिस्टन रिंगचे आयुष्य कमी होते.

4_1  H x W: 0 x
 
वरील अडचणींमुळे होनिंग ऑपरेशनमध्ये सुधारणा झाली.यामध्ये योग्य असा (चित्र क्र. 4) होनिंग टूल होल्डर वापरून होनिंग करीत असताना अथवा होनिंग झाल्यावर दोन्ही टूल होल्डरमध्ये सेरीजमध्ये नायलॉन फिलॅमेंट असलेला, एक स्पेशल होनिंग टूल होल्डर वापरला जातो. सामान्य होनिंग आणि प्लॅटू होनिंगमध्ये हाच फरक आहे. तथापि प्लॅटू होनिंग कसे करावे यासाठी अनेक मार्ग आणि साधने आहेत, ज्यात सिलिकॉन कार्बाइड वापरलेले/भरलेले असते, त्यामुळे उंचवटे नाहीसे करून तेथे सपाटीकरण (चित्र क्र. 5) केले जाते.

5_1  H x W: 0 x
चित्र क्र. 3 मधील दाखविलेली अडचण नाहीशी होऊन ऑइल साठवणूक होते आणि पिस्टन रिंगचे आयुष्य वाढते. हे करीत असताना पृष्ठीय फिनिशमध्येपण सुधारणा होते. आता ऑटोमोबाइलमध्ये जवळजवळ सर्व इंजिनमध्ये लायनरचे होनिंग करताना प्लॅटू होनिंग पद्धत वापरतात.
इंजिन सिलिंडरच्या सामान्य होनिंग प्रक्रियेत सामान्यतः रफ होनिंग आणि फिनिश होनिंग असे टप्पे असतात तर, प्लॅटू होनिंग 3 टप्प्यात होते. रफ, फिनिशआणि प्लॅटू.

6_1  H x W: 0 x
प्लॅटू होनिंग ऑपरेशन चित्र क्र. 6 मध्ये दाखविलेल्या पारंपरिक होनिंग मशीनवर केले जाते, ज्यामध्ये होनिंग होल्डर किंवा प्लॅटू होनिंग होल्डरची वर्तुळाकार आणि वर-खाली अशा दोन्ही दिशांनी हालचाल होत असते. सर्वसाधारणपणे होनिंग मशीनवरच रफ होनिंग, फिनिश होनिंग आणि प्लॅटू होनिंग अशी तीन ऑपरेशन होतात, त्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे 1 किंवा वेगवेगळे होनिंग होल्डर (चित्र क्र. 7) वापरतात. होनिंग मशीन, होनिंग टूल होल्डर आणि प्लॅटू होनिंग होल्डरचे अनेक प्रकार, डिझाइन असतात आणि त्यांची निवड गरजेप्रमाणे करतात. या तीन ऑपरेशनला लागणारे अॅब्रेजिव्ह आणि फिनिश, तक्ता क्र. 1 मध्ये दिल्याप्रमाणे असतात.

7_1  H x W: 0 x

t1_1  H x W: 0  
एका शिफ्टमध्ये पाहिजे असलेल्या उत्पादनानुसार एका होनिंग मशीनवर तक्ता क्र. 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे तीन कामे करतात किंवा वेगवेगळ्या तीन होनिंग मशीनवर तीच तीन कामे विभागून केली जातात.
 
ramch_1  H x W:
 रामचंद्र जोशी
 प्रमुख (ट्रेनिंग सेंटर), AMTC
 9822324248
 रामचंद्र जोशी यांत्रिकी अभियंते आहेत. त्यांना मशीन टूल, जिग्ज, फिक्श्चर, एस.पी.एम. टूलिंग, प्रॉडक्ट डिझाइन,   डेव्हलपमेंट, क्वालिटी सिस्टिम आदी क्षेत्रातील कामाचा सुमारे 45 वर्षांचा अनुभव आहे. ते सध्या युनिटी समूहातील अॅडव्हान्स मेजरिंग सिस्टिम्स येथे ट्रेनिंग सेंटर विभागाचे प्रमुख आहेत.
@@AUTHORINFO_V1@@