संपादकीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    10-Dec-2020   
Total Views |
 
4_1  H x W: 0 x
 
उद्योगक्षेत्रामध्ये मागील 2 महिन्यांत बऱ्याच सकारात्मक बाबी घडलेल्या दिसून आल्या. एक म्हणजे केंद्र सरकारकडे ऑक्टोबरमध्ये जमा झालेला जीएसटी कर प्रथमच 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला. गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत हे प्रमाण 10 टक्क्यांनी वाढले आहे. उत्पादन क्षेत्रातील आकडेवारीही या विधानाला पुष्टी देते. कारखान्यांतील उलाढाल ‘मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स’द्वारे मोजली जाते. ऑक्टोबरमध्ये हा निर्देशांक 58.9 होता. गेल्या दशकभरातील ही सर्वाधिक वाढ आहे. दुसरी बाब म्हणजे, भारत सरकारतर्फे जुलैमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘उद्यम नोंदणी’च्या नवीन ऑनलाइन प्रणालीवर 11 लाखांहून अधिक नव्या MSME उद्योगांची नोंदणी झाली असून, त्यात निर्मिती क्षेत्रामध्ये 3.72 लाख उद्योगांची नोंदणी झालेली आहे.
जेव्हा नवीन उद्योग उभारले जातात, तेव्हा बाजारपेठेचा अंदाज आणि भविष्यातील संधीचा विचार करून त्यात नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणे अपेक्षित असते. पुढील आर्थिक वाढ ही संपूर्णत: उच्च तंत्रज्ञानावर आधारित, भविष्यवेधी असणार आहे. त्यातच ‘झीरो डीफेक्ट झीरो इफेक्ट’ ही आता अपेक्षा नसून बाजारपेठेची गरज बनत चालली आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आपल्या कार्यपद्धतीमधील काही पारंपरिक गोष्टी बदलून आपल्या कार्यसंस्कृतीमध्ये बदल करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ, 'प्रेडिक्टेबल बिहेव्हियर' म्हणजे अंदाजात्मक वर्तणूक. ही संस्कृती आपल्या उद्योगांत अजूनतरी कमी प्रमाणात दिसते. जपान आणि जर्मनीच्या कार्यसंस्कृतीचा उल्लेख विविध पातळ्यांवर, विशेषतः उद्योगक्षेत्रात, वारंवार केला जातो. कारण एखादी बाब ठरलेल्या वेळेत होणारच आणि ती झालीच पाहिजे, अशी 100% मानसिकता तेथील लोकांच्या व्यवहारांमध्ये खोलवर रुजलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण भारतीय, माहितीचे जतन आणि संवर्धन यामध्ये खूप मागे आहोत. एखाद्या उत्पादाची निर्मिती झाल्यानंतर त्याच्याविषयीच्या सर्व माहितीचे दस्तावेजांचे जतन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे त्या संदर्भातील माहिती पुढच्या पिढीकडे जशीच्या तशी हस्तांतरित होत नाही. त्याउलट जपान आणि जर्मनीसारख्या देशात त्यांनी केलेले प्रयोग, निर्माण केलेली उत्पादने, त्यातील यशापयश या सर्वांच्या नोंदी वेळच्यावेळी आणि तपशीलवार केलेल्या असल्यामुळे जरी ती बनविणारी माणसे बदलली, तरी त्याचा उत्पादनावर फारसा काही फरक पडत नाही. कार्यसंस्कृतीमध्ये अशाप्रकारचे काही महत्त्वाचे बदल आपल्याकडे अपेक्षित आहेत.
 
धातुकामचा या महिन्याचा अंक गेजिंग आणि मेट्रॉलॉजीशी संबंधित आहे. वर म्हटल्याप्रमाणे, बाजारात 'झीरो डीफेक्ट झीरो इफेक्ट'ची गरज व्यक्त होत असल्याने उत्पादाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, त्याची तपासणी उपकरणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असली पाहिजेत. डिजिटल उपकरणांमधून मिळालेली माहिती व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने वापरली गेली, तर त्यातून होणारे फायदे हे फार वेगळ्या दर्जाचे असतात. गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून मोजमापन क्षेत्रातील नवीन उत्पादांची, नवीन तंत्राविषयीची माहिती या अंकातून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मारपॉस कंपनीने सादर केलेल्या iWave2 या यांत्रिकी बोअर गेजविषयी सोदाहरण माहिती दिली आहे. यंत्रभागांच्या 100% तपासणीऐवजी नमुना तपासणी करण्याला पूरक ठरण्याच्या विचाराने विकसित करण्यात आलेल्या ट्रायमॉसच्या एअर इलेक्ट्रॉनिक गेजिंग आणि ऑनलाइन SPC पद्धतीबद्दल उदाहरणासह सखोल भाष्य करणारा लेख आपणास उपयुक्त वाटेल. त्याचबरोबर QVI कंपनीने विकसित केलेल्या LFOV तंत्रावर आधारित मशीनविषयीचा लेख आणि व्हिडिओ/लेझर मापनांचे परिणाम एका स्वयंचलित पद्धतीद्वारा कसे एकत्र करता येतात याविषयी माहिती देणारे लेखही या अंकात समाविष्ट आहेत. ग्राहकांना त्याच्या आवश्यकतेनुसार स्पेशल गेजची निर्मिती करून देणाऱ्या कंपनीविषयीच्या लेखाबरोबरच अॅक्युरेट कंपनीच्या टॅक्टाइल स्कॅनिंग प्रोबच्या अचूकतेबाबत भाष्य करणाऱ्या लेखाचा समावेश या अंकात आहे. सी.एन.सी. विभागातील लेखात मिलटर्न संदर्भात मल्टीटास्किंग यंत्रण म्हणजे काय, त्याचे फायदे, आव्हानांसह इतर महत्त्वाच्या घटकांवर चर्चा करण्यात आली आहे. प्रक्रिया सुधारणा या विभागात अॅडॅप्टर इजेक्टर यंत्रणाचे पैलू उलगडून सांगणारा लेख आहे. यंत्रगप्पा वेबिनारमध्ये चर्चा केल्या गेलेल्या ‘स्पिंडल का बिघडतात’ या दुसऱ्या सत्राचा आढावा घेणारा लेखही धातुकामच्या वाचकांसाठी दिला आहे. त्याशिवाय GD&T, CMM, जिग्ज अँड फिक्श्चर, अर्थ नियोजन या नेहमीच्या लेखमाला आपल्याला रोजच्या कामात उपयुक्त वाटत असतील याची खात्री आहे.
आमच्या सर्व वाचक, लेखक आणि जाहिरातदारांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 
दीपक देवधर 
@@AUTHORINFO_V1@@