ड्रिलिंग फिक्‍श्र्चर / जिग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prkashan Marathi    11-Feb-2020   
Total Views |
 
आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारची ड्रिलिंग जिग पाहिली आणि ती कशी काम करतात याची माहिती घेतली. ऑक्टोबर 2019 च्या लेखात आपण एक वेगळ्याच प्रकारचे ड्रिलिंग जिग बघितले. खासकरून जिथे भोक अर्धवट फुटते, अशा कार्यवस्तुसाठी जिग कसे बनविता येते ते समजावून घेतले. या लेखामध्ये आपण लीफ/लॅच टाइप जिग कसे कार्य करते याबद्दल माहिती घेऊ. अशा प्रकारच्या जिगची गरज का आणि कधी निर्माण होते ते बघणे निश्चितच उत्कंठावर्धक ठरेल.
 

1_1  H x W: 0 x 
 
लीफ/लॅच टाइप जिगमधील महत्त्वाचे मुद्दे
1 हिंज प्लेट (लीफ) एका केंद्राभोवती फिरविली जाते. यामुळे कार्यवस्तुची जिगमध्ये काढघाल करणे सुलभ होते.
2 ड्रिल बुश आणि क्लॅम्पिंग स्क्रू जिग प्लेटमध्ये बसविले जातात.
3 जिग प्लेट जिग बॉडीवर अशा प्रकारे टेकविली जाते की जेणेकरून ती मशिन टेबलच्या पृष्ठभागाला समांतर स्थितीत राहील. म्हणजेच जिग बुशची केंद्र रेषा टेबलच्या पृष्ठभागाला लंबरूप असेल.
4 जिग प्लेट स्विंग बोल्टच्या साहाय्याने क्लॅम्प केली जाते.
5 कार्यवस्तू खास बनविलेल्या स्क्रूच्या साहाय्याने हाताच्या बलानेच क्लॅम्प केली जाते.
6 जिग प्लेट आणि कार्यवस्तू यांचे क्लॅम्पिंग अतिशय जलद होते.
 
लीफ/लॅच टाइप जिगचे दोन प्रकार
अ. कार्यवस्तू जिग बॉडीवर ठेवणे आणि जिग प्लेटमधून क्लॅम्पिंग करणे.
ब. कार्यवस्तुचे स्थान आणि क्लॅम्पिंगची सोय जिग प्लेटवरच करणे. या लेखामध्ये आपण ‘अ’ प्रकारचे जिग (चित्र क्र. 2) कसे कार्य करते ते पाहू.
 

2_1  H x W: 0 x 
 
मुख्य बॉडी (सांगाडा)
 
हा सांगाडा बेस प्लेटवर बसविला आहे. जिगचे सर्व भाग या सांगाड्यावरच बसविले आहेत. या आरेखनात सांगाडा वेल्डिंग करून बनविलेला असल्यामुळे हा सांगाडा ताणविरहित (स्ट्रेस रीलीव्ह) करणे आवश्यक आहे. जर ताण कमी केला नाही तर कालांतराने जिगची महत्त्वाची नियंत्रित मापे बदलतात आणि त्यात बनविलेल्या कार्यवस्तू नाकारल्या (रिजेक्ट) जातात. हा सांगाडा बेस प्लेटवर स्क्रू आणि डॉवेलच्या साहाय्याने बसविला आहे. जेव्हा वेगवेगळे भाग एकत्र बसवून मापे नियंत्रित केलेली असतात तेव्हा डॉवेलिंग करावेच लागते. कारण जर स्क्रू ढिले करून पुन्हा घट्ट केले तर नियंत्रित माप बदलू शकते. प्रथम बेस प्लेटमध्ये लोकेटर बसविण्यासाठी असलेले ØD1H7 भोक करून घेतले जाते. चित्र क्र. 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे स्विंग बोल्टच्या बाजूला आणि पायाला समांतर असलेले कठीण (हार्ड) पॅड 1 आणि 2 अशा प्रकारे ग्राइंड केली जातात की, जेव्हा जिग प्लेटवरील कठीण पॅड 2 सांगाड्यावर असलेल्या कठीण पॅड 1 वर टेकविले जाते, तेव्हा जिग प्लेट भूपृष्ठाला म्हणजेच ‘अ’ पृष्ठभागाला 0.02 मिमी.मध्ये समांतर राहील. आता आपल्याला असे दिसते की, सांगाड्याच्या डाव्या बाजूला कठीण हिंज पिन बसविली आहे. प्रत्येक कार्यवस्तूचे यंत्रण करताना या जिग प्लेटची दोनदा हालचाल होते आणि त्यामुळे हिंज पिन सांगाड्यामध्ये फिरताना सांगाड्यामधील भोक झिजून मोठे होऊ नये यासाठी ØD2H7 छिद्रामध्ये दोन कठीण बुश (क्र. 6) बसविले आहेत. सांगाड्यामधील कठीण बुश क्र. 6 आणि जिग प्लेटवर बसविलेली कठीण पॅड क्र. 5 हे दोन्ही भाग ग्राइंड करून सांगाडा आणि जिग प्लेट या दोन्हीमधील डाव्या बाजूचा फिट H7/g6 मध्ये नियंत्रित केलेला आहे.
 
जिग प्लेट
 
जिग प्लेट साध्या (माइल्ड) स्टीलमधून बनविली जाते. त्यामुळे ती कठीण नसते आणि कठीण करताही येत नाही. म्हणून जिथे जिथे घर्षण असेल, त्या ठिकाणी कठीण लाइनर अथवा कठीण पॅडचा उपयोग करावा लागतो. जिग प्लेटच्या उजव्या बाजूला स्विंग बोल्ट आहे. स्विंग बोल्टच्या जवळ व्ह्यू ‘X’ मध्ये 3 आणि 4 क्रमांकाची कठीण पॅड दाखविली आहेत. ही पॅड ग्राइंडिंग करून सांगाडा आणि जिग प्लेट या दोन्हीमधील फिट H7/g6 मध्ये नियंत्रित केलेला आहे. H7/g6 या फिटमुळे जिग प्लेटची हालचाल सहज (गाइड फिट) आणि नियंत्रित होते. आता आपण जिग प्लेटच्या डाव्या बाजूचा विचार करू. डाव्या बाजूला बिजागरीचा केंद्रबिंदू आहे, ज्याच्याभोवती जिग प्लेट फिरविली जाते. हिंज पिन ग्रब स्क्रूच्या साहाय्याने जिग प्लेटवर घट्ट बसविली आहे. बुश क्र. 6 सांगाड्यामध्ये दिल्यामुळे हिंज पिन जास्तीतजास्त मोठ्या अंतरावर गाइड होते. त्यामुळे जिग प्लेटची हालचाल अतिशय अचूक होते. डावीकडील आणि उजवीकडील H7/g6 फिट एकाच केंद्ररेषेवर असणे आवश्यक आहे.
 
जिग प्लेट, स्विंग बोल्ट आणि विंग नटच्या साहाय्याने कठीण पॅड क्र. 1 वर घट्ट पकडता येते.
जिग प्लेट सांगाड्यावर व्यवस्थित बसविल्यावर, तसेच सांगाडा बेस प्लेटवर स्क्रू आणि डॉवेलच्या साहाय्याने बसविल्यावर जिग प्लेटवर जिग बुश बसविण्यासाठी लागणारी 3 भोके H7 मापात केली जातात. ही भोके बनविताना बेस प्लेटमधील ØD1H7 चा संदर्भ घेतला जातो. ØD1H7 भोक करताना दोन्ही बाजूला असलेल्या H7/g6 चा संदर्भ घ्यावा लागतो. दोन्ही बाजूला असलेले H7/g6 आणि ØD1H7 एकरेषीय असलेच पाहिजेत.
 
विशिष्ट क्लॅम्पिंग स्क्रू
 
या विशिष्ट स्क्रूच्या खाली फ्लोटिंग पॅड बसविले आहे. त्यासाठी स्क्रूच्या पुढच्या बाजूला विशिष्ट प्रकारचे यंत्रण केले आहे. अशी फ्लोटिंग पॅड प्रमाणित केलेली मिळतात. फ्लोटिंग पॅड आणि स्क्रूचा पुढचा भाग फ्लेम हार्ड केलेला असतो. स्क्रू टफन केलेला असतो. त्यासाठी 41Cr4 मटेरियल वापरले जाते. शक्यतो हे क्लँपिंग हातानेच करावे पाना वापरू नये. पाना वापरल्यास जिग प्लेट वाकू शकते.
 
आटे असलेला बुश
 
जिग प्लेट आणि विशिष्ट स्क्रूमध्ये घर्षण होत आल्यामुळे जिग प्लेटमध्ये आटे असलेले विशिष्ट बुश वापरले आहे. याची दोन कारणे आहेत.
 
1.स्क्रूचे मटेरियल 41Cr4 आहे आणि जिग प्लेटचे मटेरियल माइल्ड स्टील (M.S.) आहे. त्यामुळे माइल्ड स्टीलची जिग प्लेट खराब होईल. जिग प्लेट पुन्हा बनविणे खर्चिक तसेच वेळ घेणारे काम आहे. मात्र, त्यामानाने बुश बदलणे सोपे आहे.
2.आटे असलेल्या बुशचे मटेरियलसुद्धा 41Cr4 असल्यामुळे ते जास्त टिकेल. आटे असलेले बुश उलटे बसविण्याचे कारण म्हणजे जेव्हा आपण विशिष्ट स्क्रूने कार्यवस्तू पकडतो तेव्हा कार्यवस्तुची प्रतिक्रिया वरच्या दिशेने कार्य करते. म्हणून आटे असलेल्या बुशची कॉलर जर जिग प्लेटच्या वर असेल तर ते जिग प्लेटमधून बाहेर निघून येईल. जणू काही पुलरसारखेच कार्य करेल. म्हणून आटे असलेले बुश जिग प्लेटच्या खालून बसविले आहे. बुश फिरू नये म्हणून लहान डॉवेल बसविली आहे.
 
लोकेटर
 
कार्यवस्तुच्या लोकेशनचा व्यास H7 मध्ये नियंत्रित केलेला आहे. त्यामुळे लोकेटरचा व्यास g6 मध्ये नियंत्रित केला आहे. लोकेटर पूर्ण कठीण करून ग्राइंड केलेला आहे. लोकेटरचा ØD1 g6 आणि कार्यवस्तू लोकेटरच्या ज्या व्यासावर बसते, तो व्यास समकेंद्रित असणे आवश्यक आहे.
 
विशिष्ट पिन
 
बर्‍याच वेळेस अशा प्रकारच्या पिनचा उपयोग केला जातो. कार्यवस्तूवर पहिले भोक केल्यावर त्या भोकात पिन टाकून बाकीची उरलेली भोके केली जातात. ही पिन भोकात टाकल्यामुळे इतर भोकांचे ड्रिलिंग करताना कार्यवस्तू हलत नाही. त्यामुळे भोकांचा परस्परसंबंध अचूक मिळतो. ही पिन जिग बुशमध्ये गाइड होते आणि कार्यवस्तुच्या भोकात लोकेट होते.
 
फूलप्रूफिंग पिन
 
या जिगमध्ये फूलप्रूफिंग पिन दिलेली आहे. अर्थात वेगवेगळ्या प्रकारे फूलप्रूफिंग केले जाते. याचा योग्य उपयोग केल्यास कार्यवस्तू चुकीच्या पद्धतीने जिगमध्ये (चित्र क्र. 3) बसूच शकत नाही. थोडक्यात ज्याला जिगची अजिबात माहिती नाही तोसुद्धा कार्यवस्तू योग्य प्रकारे जिगमध्ये बसवितो. आपल्या जिगमध्ये कार्यवस्तू उलटी बसूच शकत नाही. 
 

3_1  H x W: 0 x 
 
या जिगमध्ये जिग प्लेट स्टॉपरवर टेकविलेली असते. त्यामुळे कार्यवस्तू सहजपणे जिगमध्ये योग्य प्रकारे ठेवली जाते. नंतर जिग प्लेट फिरवून रेस्ट पॅड 1 वर टेकविली जाते. आता स्विंग बोल्ट जिग प्लेटवर आणून विंग नटच्या साहाय्याने जिग प्लेट क्लॅम्प केली जाते आणि नंतर विशिष्ट क्लॅम्पिंग स्क्रूच्या साहाय्याने कार्यवस्तू क्लॅम्प केली जाते. नंतर कार्यवस्तूवर पहिले भोक केले जाते. त्यामध्ये विशिष्ट पिन टाकून बाकीची भोके केली जातात. त्यानंतर पिन बाहेर काढून घेतली जाते. विशिष्ट क्लॅम्पिंग स्क्रू ढिला केला जातो. यामुळे विंग नट ढिला करणे सोपे जाते. जिग प्लेट फिरवून स्टॉपरवर टेकविली जाते. आता कार्यवस्तू सहजपणे बाहेर काढता येते. या जिगमध्ये क्लॅम्पिंग करण्यासाठी पान्याची गरज पडत नाही. कार्यवस्तू बाहेर काढल्यानंतर जिगमध्ये पडलेल्या चिप ब्रशने काढल्या पाहिजेत. या जिगमध्ये कार्यवस्तूचे लोकेशन जिग बॉडीवर ठेवले आहे आणि क्लॅम्पिंग जिग प्लेटमधून केले आहे. पुढील लेखात आप दुसर्‍या प्रकारचे जिग ज्यामध्ये कार्यवस्तूचे लोकेशन आणि क्लॅम्पिंगची सोय जिग प्लेटवरच करून जिग कसे कार्य करते ते पाहणार आहोत.
 
 

ajit deshpande_1 &nb 
अजित देशपांडे
अतिथी प्राध्यापक, ARAI, SAE 
9011018388
 
अजित देशपांडे यांना जिग्ज आणि फिक्श्चर्समधील जवळपास 36 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर, ग्रीव्हज् लोम्बार्डिनी लि., टाटा मोटर्स अशा विविध कंपन्यांत काम केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ते अतिथी प्राध्यापक आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@