योग्य मशिनची निवड करताना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    20-Feb-2020   
Total Views |

1_1  H x W: 0 x 
 
 
मशिनची निवड आणि त्यासंबंधी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर पुढील घटक कसे परिणाम करतात, हे आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर 2019 महिन्यात प्रकाशित झालेल्या लेखात बघितले.
 
1. गुंतवणुकीवरील परतावा आणि भांडवली अंदाजपत्रक
2. मशिन खरेदी करण्याचा उद्देश
3. प्रक्रिया सुसंगतता (कॉम्पॅटिबिलिटी) आणि मशिनकडून असलेली कार्यक्षमतेची अपेक्षा.
मशिनची निवड आणि खरेदी यांच्या निर्णयावर परिणाम करणारे, हे कदाचित सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहेत. तथापि मशिनच्या निवडीला अंतिम रूप देण्यापूर्वी ज्यांचा आपण विचार केला पाहिजे, असे अजून काही घटक आहेत.
 
मशिन चालविण्यासाठी आणि देखभालीसाठी लागणारी संसाधने
 
माणूस, मशिन, मटेरियल आणि मेथड हे 4M एकत्रित केल्यावर उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) होते, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. जेव्हा आपण ‘मशिन चालविण्यासाठी आणि देखभालीसाठी लागणारी संसाधने’ असे म्हणतो, तेव्हा उत्पादनामधील ‘माणूस’ या घटकाविषयी बोलत असतो. कधीकधी आधी नमूद केलेल्या तीन प्रमुख घटकांचा नीट विचार करून आणि योग्य विश्लेषणासह खूप चांगल्या मशिनची निवड केली जाते. तथापि होते असे की, मशिनला सेट करण्यासाठी किंवा त्याच्या देखभालीसाठी काही विशिष्ट कौशल्ये, ज्ञान आणि अनुभव आवश्यक असू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या मशिन शॉपमध्ये प्रामुख्याने सी.एन.सी. टर्निंग प्रक्रिया हाताळली जात आहे आणि आता एच.एम. सी. किंवा व्ही.एम.सी.मध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. सध्याचा कार्यगट सी.एन.सी. टर्निंगसाठी जरी अत्यंत कुशल आणि पारंगत असला, तरीही त्यांच्याजवळ एच.एम.सी. किंवा व्ही.एम. सी. हाताळण्याचा अनुभव नसेल. अशा परिस्थितीत माणूस या घटकाचा विचार करणे खूप महत्त्वाचे ठरते. जेव्हा मशिन शॉपमध्ये मशिन हाताळण्याचा अनुभव आणि ते चालविण्याची संपूर्ण माहिती नसते, तेव्हा त्यांच्यासमोर पुढील पर्याय असतात.
अ. मशिन हाताळण्यासाठी नवीन अनुभवी मनुष्यबळाची भरती करणे.
ब. मशिन हाताळण्यासाठी सध्याचेच मनुष्यबळ प्रशिक्षित करणे.
 
पर्याय ब हा अनेक वेळा योग्य ठरू शकतो, कारण सध्याचे मनुष्यबळ जरी नवीन मशिनसाठी प्रशिक्षित नसले, तरी ते सक्षम, पात्र आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्यास उत्सुक असतात. अशा परिस्थितीत मशिन खरेदी करणार्‍याने, ते चालविण्यासाठी आणि त्याच्या देखरेखीसाठी उपलब्ध कर्मचार्‍यांना मशिन उत्पादक प्रशिक्षण देऊ शकेल का, ते पाहिले पाहिजे. नवीन मशिन खरेदीचा विचार करताना हे नक्कीच शक्य असते.
 
दुसर्‍या दृष्टीने पाहता, जर मशिन निवडीच्या पहिल्या तीनही निकषांवर एखादी चांगली सेकंड हँड मशिन योग्य दरात मिळत असेल आणि जर प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता नसेल, तर ही निवड चांगली म्हणता येणार नाही. जर कोणाला सेकंड हँड मशिन घ्यायचेच असेल, तर त्याच्यासाठी पर्याय अ अधिक योग्य आहे.
 

2_1  H x W: 0 x 
 
भारतात मशिनची निर्मिती करणारे बहुतेक मशिन उत्पादक त्यांच्या कारखान्यातच काही ठराविक लोकांना प्रशिक्षण देण्याची सोय करतात. हल्लीच्या काळात, परदेशी उत्पादकांकडेदेखील ऑपरेशन आणि देखभाल यांचे भारतात प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज अशा उत्तम प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असतात. मशिन खरेदीचा अंतिम निर्णय घेताना, खरेदी करारामध्ये प्रशिक्षण व्यवस्थेचा अंतर्भाव केला जाऊ शकतो.
 

3_1  H x W: 0 x 
 
जर एखाद्या विशिष्ट उत्पादन कार्याच्या हेतूने मशिन घेतले असेल, तर ‘टूल्ड अप’ मशिनची मागणी करणे, हादेखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे खरेदी कार्यगटाचे प्रशिक्षण तर होतेच, शिवाय उत्पादकाचा अप्लिकेशन कार्यगट आणि खरेदीदाराचा उत्पादन कार्यगट एकत्र येऊन मशिन टूल्ड अप करून, मशिनची कामगिरी उत्पादकाकडेच सिद्ध करतात. टूल्ड अप मशिनच्या संदर्भात, उत्पादकांशी खर्चाशी निगडित अनेक पर्यायांवर चर्चा करून सर्वात चांगल्या निर्णयापर्यंत पोहोचता येते.
 
मानव संसाधनाव्यतिरिक्त, मशिनची उभारणी करण्यासाठी आणि ती चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर घटकांचादेखील विचार करणे गरजेचे आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल पॉवर आणि दाबयुक्त (कॉम्प्रेस्ड्) हवेची आवश्यकता, स्पेशल कटिंग फ्लुइडची आवश्यकता, पर्यावरणाची गरज (उदाहरणार्थ, मशिन चांगले चालण्यासाठी आवश्यक धूळमुक्त/तापमान नियंत्रित वातावरण), उत्पन्न होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावणे (उदाहरणार्थ, बारीक चिप आणि ग्राइंडिंग मशिनची धूळ) यांचा समावेश आहे. जर मशिन शॉपमध्ये फॅब्रिकेशनचे काम असेल, तर त्यामुळे विद्युत प्रणालीवर असंतुलित भार निर्माण होतो आणि त्याच्या परिणामस्वरूपे विद्युत भारात मोठे चढउतार आणि स्पाइक निर्माण होतात. अशा मशिन शॉपमध्ये सी.एन.सी. मशिन घ्यायचे असल्यास, खराब गुणवत्तेचा विद्युत पुरवठा रोखण्याच्या दृष्टीने मशिनसाठी आयसोलेशन ट्रान्स्फॉर्मर आणि व्होल्टेज स्टॅबिलायझर यांचा विचार करणे फायद्याचे ठरते. मशिनची योजना आखतेवेळीच, अशा उपाययोजनांसाठी गुंतवणुकीची तरतूद करणे आवश्यक असते. 
 
याशिवाय लक्ष देण्यासारखे संसाधनांचे आणखी एक क्षेत्र म्हणजे शॉप फ्लोअरवरील पायाभूत सुविधा. यात मशिनला लागणार्‍या जागेचा विचार केला पाहिजे. मशिनची एकूण लांबी, रुंदी, उंची तसेच मटेरियल, टूल ठेवण्यासाठी लागणारी जागा आणि कारखान्यातील उपलब्ध जागा यांचा एकत्रित विचार करणे फायदेशीर असते. प्रत्यक्ष मोजमापांशी सुसंगत (स्केल) असलेला एक फ्लोअर लेआउट ऑटोकॅडमध्ये तयार करून त्या लेआउटमध्ये मशिनच्या योग्य स्थानाचा विचार केला जावा, अशी शिफारस केली जाते. वरील सर्व बाबी मशिनची ऑर्डर देण्यापूर्वी केल्यास नंतर येणार्‍या अनेक समस्या टाळता येऊ शकतात.
 

4_1  H x W: 0 x 
 
वेळेची चौकट
 
मशिन खरेदी करण्यामागील प्रमुख उद्देश शॉप फ्लोअरची उलाढाल वाढविणे हा असतो. केवळ व्यवसायाच्या उलाढालीच्या दृष्टिकोनातूनच नव्हे, तर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातूनही मशिनचे डिलिव्हरी वेळापत्रक, हा एक प्रमुख निकष असू शकतो. नवीन मशिनवर उत्पादन सुरू करण्यासाठी वेळेची चौकट ठरविताना, पुरवठादाराने दिलेल्या शिपमेंटच्या तारखेव्यतिरिक्त पुढील बाबींचाही विचार करणे आवश्यक आहे.
अ. मशिन वाहतुकीस लागणारा वेळ
ब. मशिन उभारणी आणि चालू करण्यासाठी लागणारा वेळ
क. गुणवत्ता चाचण्यांमधून समाधानकारक उत्पादन मिळेपर्यंत लागणारा वेळ.
 
वरील बाबींचा विचार करून मशिन उत्पादकाला मशिन पाठविण्याची तारीख कळविली जावी. परंतु, कधीकधी मशिन शॉपमध्ये मशिनची त्वरित गरज असते, आणि त्यामुळे मशिन निवडीमध्ये तडजोड केली जाते. मात्र, असे करणे भविष्यात महागडे ठरते. त्यामुळे वेळेच्या दबावाखाली निकृष्ट दर्जाच्या मशिनची निवड करण्याऐवजी तात्पुरते आउटसोर्सिंग/भाड्याने काम करून घेणे असे काही अन्य अल्पकालीन उपाय शोधणे फायदेशीर ठरू शकते. एखाद्या उत्पादकाकडून जर प्रथमच एखादे मशिन खरेदी केले गेले असेल, तर उत्पादकाच्या जागेवर जाऊन तज्ज्ञ व्यक्तींनी मशिन तपासणी करावी अशीदेखील शिफारस केली जाते.
 
स्थान (लोकेशन)
 
जेव्हा आपण ‘स्थान’ या गोष्टीचा विचार करतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की, ज्या ठिकाणी मशिनची उभारणी केली जाणार आहे, ते भौगोलिक स्थान आणि निर्मात्याच्या सर्व्हिस सेटअपचे स्थान यांचा विचार करणे गरजेचे आहे. कारण, विक्रीपश्चात सेवेच्या कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून या गोष्टीचा विचार महत्त्वपूर्ण आहे. काही उत्पादक कंपन्यांचा सर्व्हिस सेटअप काही भागांमध्ये मजबूत असतो, तर इतरांचा अन्य ठिकाणी असू शकतो. हा मुद्दा पहिल्यांदा खरेदी करणार्‍यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यासाठी मशिन उत्पादकाला मशिनची ऑर्डर देण्यापूर्वी त्यांनी तुमच्या भागात यापूर्वी किती मशिनची उभारणी केली आहे आणि त्यांचा सर्व्हिस सेटअप कोठे आहे याबाबत विचारणा करणे महत्त्वाचे असते. कारण पहिल्यांदाच मशिन खरेदी करणार्‍यांसाठी, सेवा कार्यगट मशिन असलेल्या जागेच्या जवळ असणे नेहमीच उपयुक्त ठरते. मशिन चालविणारा आणि देखभाल करणारा कार्यगट मशिनबरोबर योग्यपणे रुळेपर्यंत मशिन उत्पादकाकडील सेवा आणि अप्लिकेशन कार्यगटांचे मार्गदर्शन आवश्यक असते. हमी कालावधीदरम्यान खरेदीदारास स्थान समस्येचा त्रास होत नाही. तथापि हमी कालावधी संपल्यानंतर सेवेची आवश्यकता असताना, सेवा अभियंत्याला लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो, तेव्हा किंमत वाढते. सेवा अभियंत्याला संबंधित कंपनीत येण्यासाठी लागलेला वेळ, मशिनचा अनुत्पादक वेळ वाढवितो. त्यामुळे मशिन ऑर्डर करण्यापूर्वी वरील बाबींचे पुनरावलोकन करणे आवश्यक असते.
 


5_1  H x W: 0 x 
 
बाजारपेठेतील पर्यायांचे मूल्यांकन
 
‘बाजारपेठेत कोणते पर्याय उपलब्ध आहेत?’ या प्रश्नाने प्रत्येक निवड प्रक्रियेची सुरुवात होते. माझ्या मते पर्यायांचा शोध घेताना खुल्या मनाने विचार करावा. एखादा ब्रँड महागडा (किंवा स्वस्त) आहे, हे जरी सर्वश्रुत असले, तरी त्या कारणास्तव त्याचा अस्वीकार करू नये. सर्वच मशिन उत्पादक त्यांची उत्पादने निरंतरपणे अधिकाधिक चांगली बनविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, तरीदेखील प्रथम मशिन खरेदी वेळी किमान 3 ते 4 मशिन विक्रेत्यांचे प्रस्ताव विचारात घेणे हितकर असते.
 
आपल्याकडे आलेल्या तांत्रिक, आर्थिक प्रस्तावाच्या आधारे विचाराधीन असलेल्या सर्व ब्रँडच्या (त्यांच्या उपसाधनांसहित) वैशिष्ट्यांचे एक तुलनात्मक कोष्टक/ विवरण (तक्ता क्र. 1 आणि 2) तयार केले पाहिजे. आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या सर्व निकषांवर प्रत्येक पर्यायाची कसून छाननी केली पाहिजे आणि प्रत्येक ब्रँड निरनिराळ्या निकषांवर कितपत संतोषजनक आहे, त्यासंबंधी एक टिप्पणी तयार केली पाहिजे. अशा तपशीलवार विश्लेषणानंतर, दीर्घ कालावधीपर्यंत चांगला आर्थिक परतावा देऊ शकेल असा पर्याय निवडण्याचा माहिती आधारित निर्णय आपल्याला घेता येईल.
 
 
 
rajesh_1  H x W
राजेश म्हारोळकर
स्वतंत्र सल्लागार 
9359104060
 
राजेश म्हारोळकर यांत्रिकी अभियंते असून इंडस्ट्रीमधील कामाचा त्यांना 30 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते सल्लागार म्हणून काम करतात.
 
@@AUTHORINFO_V1@@