यांत्रिकी क्षेत्र आणि ‘ती’...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    10-Mar-2020
Total Views |

1_1  H x W: 0 x
 
 
मुलगी ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ बनू शकते का? ... का नाही? निश्चित बनू शकते. या लेखाची सुरुवात या विशिष्ट प्रश्नाने मुद्दामच केली आहे. 8 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने नेटवर माहिती शोधत असताना ‘Can a girl become a Mechanical Engineer?’ असा गंमतीचा पण विचित्र प्रश्न संगणकाच्या पडद्यावर आला. वास्तविक पाहता आज असे एकही क्षेत्र नाही की जिथे स्त्री काम करीत नाही. अमूक एक स्त्रीचे काम आणि अमूक एक पुरुषाचे काम यामधील दरी जवळपास मिटत असताना, ‘त्या’ च्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात आता ‘ती’ चे स्थानही बळकट होताना दिसत आहे. त्यामुळेच संगणकाच्या पडद्यावर आलेल्या या प्रश्नाने विचार करायला भाग पाडले.
 
अंतराळ, विमान, बँकिंग, शिक्षण, शेतीपासून ते बांधकाम व्यवसायासारख्या अनेक उत्पादक आणि सेवा क्षेत्रांमध्ये बहुसंख्य महिला काम करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रात ‘ती’ ने आपले कर्तृत्व सिद्ध केले असून ‘ती’ धडाडीने कार्यरत आहे, यश संपादन करीत आहे. आपापल्या क्षेत्रात प्रत्येक जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या प्रत्येकीला ‘उद्यम’ परिवारातर्फे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 
 
मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्र म्हणजे केवळ पुरुषांची मक्तेदारी असा समज होता. मोठमोठ्या मशिन आणि महिलांची शारीरिक क्षमता लक्षात घेता हे क्षेत्र महिलांसाठी तितकेसे अनुकूल नाही किंवा ते काम ‘ती’ ला जमेल का? पुरुषांच्या बरोबरीने ‘ती’ काम करू शकेल का? ‘ती’ने काम करण्याची ही जागा नव्हे, असे अनेकविध प्रश्न काही वर्षांपूर्वी उपस्थित केले जात होते. मात्र, ते मोडीत काढत आज अनेक महिला अभियंत्या शॉप फ्लोअरवर काम करताना दिसत आहेत. 
 
आपल्याकडील निर्मिती क्षेत्रामधील विविध अग्रणी ऑटोमोबाइल कंपन्यांमध्ये जॉब हँडलिंग, मशिन ऑपरेटर, डिझाइनिंग, मेजरमेंट विभाग, टेस्टिंग विभाग, सॉफ्टवेअर, ऑटोमेशन, ऑपरेशन, संशोधन आणि विकास, विक्री अशा सर्व विभागांमध्ये व्यवस्थापक, मुख्य अधिकारी, शॉपवरील कर्मचारी अशा विविध रुपांमध्ये ‘ती’चे अस्तित्व दिवसेंदिवस विस्तारत आहे. लिंग गुणोत्तर कायम ठेवण्याची गरज आणि त्याला पूरक धोरणांमुळे अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महिला अभियंत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. महिलांचा कामातील काटेकोरपणा, एकाग्रता, सातत्य, मल्टीटास्किंग कौशल्य, आव्हाने पेलण्याची क्षमता यामुळे अनेक कंपन्या महिला कामगारांना कामाची संधी देत आहेत. महिलाही पुढे येऊन सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे स्वीकारत आहेत. 
 
भारतातील ऑटोमोबाइल कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंगसह इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ‘ती’ च्यावर सोपविल्या जात आहेत. या क्षेत्रातील अग्रणी असलेल्या टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर, हिरो मोटर कॉर्प अशा अनेक कंपन्यांच्या शॉप फ्लोवरवर महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ‘टाटा’ मध्ये 2025 अखेरीपर्यंत शॉप फ्लोअरवर एकूण कामगारांपैकी महिलांची संख्या 10 टक्क्यांनी वाढविली जाणार आहे. तांत्रिक/मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण मिळाले, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना खात्री दिली, विविध संधी उपलब्ध करून दिल्या तर हा आकडा निश्चित वाढू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून महिला शॉप फ्लोअरवर काम करीत असल्या तरी त्या जनरल शिफ्टमध्ये काम करतात. त्यामध्ये बदल करीत इतर शिफ्टमध्ये महिलांचा समावेश करण्यासाठी टाटा कंपनी प्रयत्नशील आहे. सध्या टाटामध्ये 52 महिला विविध शिफ्टमध्ये काम करीत आहेत. महिंद्रा अँड महिंद्राने 2016 मध्ये 23 महिलांद्वारे सुरुवात केली होती. तो आकडा आता जवळपास 650 च्या पुढे गेलेला आहे. आयशर मोटरच्या रॉयल एन्फिल्ड या टू व्हीलर विभागामध्ये 140 महिला संपूर्ण इंजिन अॅसेम्ब्ली लाइन हाताळतात. हिरो मोटर कॉर्पने शॉप फ्लोअरवर महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी तेजस्विनी प्रकल्प आखला होता. त्याअंतर्गत अॅसेम्ब्ली ऑपरेशनमध्ये विविध पातळीवर 160 पेक्षाही अधिक महिला काम करीत आहेत. बजाज ऑटोच्या चाकण आणि पंतनगर येथील प्लँटमध्ये ‘वुमन ओन्ली’ अॅसेम्ब्ली लाइन पहायला मिळेल. जवळपास 400 पेक्षा जास्त महिला येथे काम करीत आहेत. अशा मोठ्या कंपन्यांबरोबरच सातारा येथील खुटाळे इंजिनिअरिंग किंवा पुण्यातील केटीए स्पिंडल टूलिंग्जसारख्या लघु, मध्यम उद्योगांमध्ये तसेच स्पायसर इंडियासारख्या मल्टी नॅशनल कंपन्यांमध्येही मोठ्या संख्येत महिला शॉप फ्लोअरवर काम करताना दिसतात. प्रगति ऑटोमेशनच्या बंगळुरू, बेळगाव आणि कोल्हापूरच्या कारखान्यांमध्येही तपासणी, अॅसेम्ब्ली, पॅकिंग अशा विभागात महिला काम करीत आहेत. 
 
परंपरेच्या बंधनात न अडकता आणि यांत्रिकी क्षेत्रातील करिअरविषयीच्या तर्कवितर्कांना न जुमानता शॉप फ्लोअरवर काम करणाऱ्या महिलासुद्धा सुरुवातीला मशिनवर काम करण्याबद्दल साशंक होत्या. परंतु या क्षेत्रातील शिक्षण घेतले असल्याने आपण हे काम करण्यास सक्षम आहोत असा विचार करून त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि कामास सुरुवात केली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, एक अशिक्षित महिला योग्य प्रशिक्षण घेऊन आज एका कारखान्यातील उत्पादनाची अंतिम तपासणी करण्याचे काम समर्थपणे सांभाळत आहे. योग्य प्रशिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर ‘ती’ आपले क्षेत्र आणि आपल्या भविष्याबद्दल अधिक जागरूकपणे सक्रिय झाली आहे. 
 
विविध प्रकाराच्या कामांसाठी आजची ‘ती’ अधिकाधिक सक्षम होण्यासाठी, कंपन्यांमध्ये तिला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पातळ्यांवर सुरुवात झाली आहे. ‘What's good for woman is good for society and what's good for society is good for business’ असे वाक्य मध्यंतरी वाचनात आले होते. याचा अर्थ असा की, ‘ती च्यासाठी जे चांगले ते समाजासाठी चांगले आणि समाजासाठी जे चांगले ते व्यवसायासाठी चांगले.’ शॉप फ्लोअरवर महिलांचा सहभाग अधिकाधिक वाढविल्याने तेथील कामाच्या संस्कृतीमध्ये निश्चितच सुधारणा होते, असे मत ज्यांच्या कारखान्यात महिला मशिन ऑपरेटर आहेत अशा उद्योजकांनी व्यक्त केले आहे. 
 
आपण कुठे आहोत आणि नेमके काय केले पाहिजे याची जाणीव प्रत्येकीला असेल तर ‘ती’ च्या प्रगतीची घौडदौड कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी ‘ती’ने आत्मविश्वासाने स्वतः सुरुवात करून वेगळ्या दिशेने विचार करायला हवा. इच्छा तिथे मार्ग आहे, फक्त तयारी हवी. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने ही जाणीव जरी प्रत्येकीच्या मनात निर्माण झाली तरी या दिनाचा हेतू सफल होईल. 

2_1  H x W: 0 x 
पद्मश्री लीला पूनावाला
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथील पहिल्या काही महिला यांत्रिकी अभियंत्यांपैकी असलेल्या लीला पूनावाला यांनी 1966 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात रस्टन कंपनीमध्ये शॉप फ्लोअरवर काम करून केली. त्या सांगतात की, ‘ज्यावेळी तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक आणि एकाग्र असता त्यावेळी खरेतर स्त्री-पुरुष भेद संपतो. कोणत्याही क्षेत्रात काम करताना प्रत्येक महिलेने मी एक महिला आहे, हा विचार न करता आपण 'प्रोफेशनल' आहोत आणि मी माझे काम करण्यासाठी कंपनीमध्ये येते या दृष्टिकोनातून कामाकडे पहावे. मी महिला आहे म्हणून मला वेगळी वागणूक मिळावी ही अपेक्षा सोडून द्यावी. कोणतेही काम करताना ते पूर्ण करण्याचे ध्येय पाहिजे आणि मी जे करेन ते चांगलेच करेन असा विश्वासही हवा. भारताप्रमाणेच परदेशातही उच्च पदावरील महिलांचे प्रमाण कमी आहे, कारण अजूनही त्यांना कुटुंबातील जबाबदाऱ्यांना पहिले प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे बाहेरच्या गावी बदली होणे, अतिरिक्त वेळ कंपनीला देणे यावर मर्यादा येतात. कंपनीच्या सर्वोच्च पदावर काम करताना मी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही कंपनी परिवारात सामावून घेतल्याने आम्हाला खूपच उपयोग झाला होता. हा दृष्टिकोन एक महिला असल्यानेच माझ्यात आला असे मी समजते.’ 
 
 

3_1  H x W: 0 x 
प्रा. सुहासिनी देसाई, (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) असोसिएट डीन, एमआयटी, पुणे 
 
‘मेकॅनिकल अभियांत्रिकी अध्यापन क्षेत्रात आजही महिलांचे प्रमाण नगण्य (केवळ 5-7%) आहे. स्त्रियांमध्ये निसर्गतःच चिकाटी आणि सहनशीलतेबरोबरच मल्टीटास्किंगची उच्च क्षमता असते. आज यंत्र अभियांत्रिकीबरोबरच इतर अनेक क्षेत्र उपलब्ध झाल्यामुळे मुलींचा नैसर्गिक कल प्रत्यक्ष शॉप फ्लोअरवर काम करण्यापेक्षा डिझाइन, रोबोटिक्स, संशोधन आणि विकास, संगणक अभियांत्रिकीकडे जास्त असतो. 
 
 

4_1  H x W: 0 x 
डॉ. माधुरी खांबेटे, संचालक, 
कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग.
 
‘फक्त मुलींसाठी असलेले पुण्यातील कमिन्स कॉलेज 1991 साली सुरू झाले असले तरी, 2007 पर्यंत आम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विचार केला नव्हता. कारण त्यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पुरुषांचे वर्चस्व असल्यामुळे कॉलेजमधील मुलींना नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील आणि या क्षेत्रात त्यांना सुरक्षित वातावरण असेल का? असे काही प्रश्न मनात होते. परंतु, 2007 मध्ये हा विभाग सुरू झाल्यानंतर आम्हाला मुलींचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या कॉलेजमध्ये इतर अभियांत्रिकी विभागांपेक्षा मेकॅनिकल विभागाचे ‘कट ऑफ’ ही खूप चांगले असतात. जवळपास 90 % मुलींना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नोकरी मिळते.’
 
 

5_1  H x W: 0 x 
 

6_1  H x W: 0 x 
प्रकाश कदम, 
व्यवस्थापकीय संचालक, प्रगति ट्रान्स्मिशन, बंगळुरू
 
'आमच्या कंपनीमध्ये शॉप फ्लोअरवर पॅकेजिंग आणि व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये महिला कर्मचारी आहेत. महिला दिलेला शब्द तंतोतंत पाळतात, आमच्याकडे पहिल्यापासून काम करणाऱ्या महिला आजही कार्यरत आहेत. संघभावनेने काम करणे, कष्टाळू आणि उत्तम उपस्थिती हे गुण महिलांमध्ये आढळतात. एकाच प्रकारच्या कामामध्ये आवश्यक असलेले एकाग्रतेतील सातत्य महिला कर्मचारीच जास्त प्रमाणात दाखवितात असा आमचा अनुभव आहे.' 
 
 

7_1  H x W: 0 x 
निधी चोपडा, 
उद्योजिका, केटीए स्पिंडल टूलिंग्स, पुणे
 
‘खरेतर आज यांत्रिकी क्षेत्रात पुरुषांच्याबरोबरीने महिलाही काम करत आहेत ही खूप अभिमानाची आणि सकारात्मक बाब आहे. माझ्या मते महिला आपल्या कामाबद्दल अधिक सतर्क असतात. त्या आपले काम अधिक जबाबदारीपूर्वक आणि जागरूकपणे करत असतात. आमच्या कंपनीमध्ये 40% महिला कर्मचारी आहेत. मला आवर्जून सांगावेसे वाटते की, आपण कुठल्या क्षेत्रात काम करत आहोत यापेक्षा आपण ते काम किती आत्मविश्वासाने करीत आहोत हे महत्त्वाचे आहे. एखादे काम पुरुषाचे आहे की महिलेचे आहे असे ‘लेबल’ न लावता प्रत्येकाने स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे.’ 
 
 
प्रियांका गुलदगड, सई वाबळे
साहाय्यक संपादक, धातुकाम 
9359104060
 
@@AUTHORINFO_V1@@