मागील लेखात आपण टेम्प्लेट, टेम्प्लेट जिग, प्लेट टाईप जिग, ड्रिलिंग टेम्प्लेट आणि जिगविषयी माहिती घेतली. या लेखात आपण अँगल प्लेट टाईप जिगविषयी माहिती घेणार आहोत. त्यासाठी प्रथम एक साधे जिग पाहू. चित्र क्र.1 मध्ये एक अँगल प्लेट टाईप जिग दाखविले आहे.
चित्र क्र.1 मध्ये वेगवेगळे भाग दाखविले असून, ते पुढे नमूद केले आहेत.
1. जिग (मुख्य) बॉडी
2. लोकेटिंग पिन (लोकेटर)
3. ‘C’ वॉशर
4. क्लॅम्पिंग नट
5. लायनर बुश
6. स्लिप बुश - ड्रिलसाठी
7. स्लिप बुश - रीमरसाठी
8. रीटेनिंग स्क्रू (हा स्क्रू बुशला धरून ठेवतो.)
9. कार्यवस्तू
आता आपण प्रत्येक भागाचे कार्य काय आहे ते समजून घेऊ. (चित्र क्र. 2) कार्यवस्तुचा ‘H’ व्यास H7 दर्जाचा आणि बाहेरचा व्यास) फिनिश केलेला आहे. तसेच दोन्ही बाजूंचे पृष्ठभागसुद्धा फिनिश केलेले आहेत. कार्यवस्तू ‘H’ व्यासामध्ये लोकेट केलेली आहे.
जिग (मुख्य) बॉडी
हा फिक्श्चरचा मुख्य सांगाडा असून त्यावर बाकीचे भाग बसविलेले असतात आणि यावरच फिक्श्चरची मजबूती अवलंबून असते. हा भाग ओतीव लोखंडाचासुद्धा (कास्ट आयर्न) बनविता येतो. मात्र, त्यासाठी त्याच्या आकाराचे प्रमाणीकरण करणे महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक आरेखन करणाऱ्याने जर त्याला लागेल त्या मापाचे सांगाडे बनविले, तर तेवढ्या प्रकारचे सांगाडे बनतील आणि त्या सगळ्यांचे पॅटर्न सांभाळणे ही वेगळीच डोकेदुखी होईल. त्यामुळे बहुतांशी ही फिक्श्चर एकतर वेल्डिंग करून बनवितात किंवा बिल्टअप करून बनवितात. बिल्टअप म्हणजे फिक्श्चरचे वेगवेगळे भाग बनवून नंतर ते जोडले जातात आणि गरज पडेल तिथे स्क्रूबरोबर डॉवेलचादेखील वापर केला जातो. जेव्हा वेल्डिंग केलेले असते, तेव्हा मात्र स्ट्रेस रिलीव्हिंग करणे आवश्यक आहे. हा सांगाडा बनविण्यासाठी माईल्ड स्टीलचा (M.S.) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
लोकेटिंग पिन (लोकेटर)
कार्यवस्तू अचूकपणे लोकेट करणे हे याचे प्रमुख कार्य आहे. हा भाग अंतर्बाह्य हार्ड किंवा केस हार्ड करतात आणि त्याचा व्यास, टेकणारा पृष्ठभाग गरजेप्रमाणे ग्राइंड केलेला असतो. लोकेटरचा फिक्श्चरमध्ये बसविलेला व्यास आणि कार्यवस्तूमध्ये बसणारा व्यास समकेंद्रित असलेच पाहिजेत. कार्यवस्तू ज्या बाजूने बसते त्या लोकेटरच्या बाजूला चॅम्फर दिल्याने कार्यवस्तुची काढघाल सुलभतेने होते. चित्र क्र. 2 मध्ये कार्यवस्तू दिसत आहे. आता लोकेटरमुळे कार्यवस्तुची हालचाल कशी नियंत्रणात राहते ते पाहू. पहिल्या लेखामध्ये आपण ‘12 डिग्रीज ऑफ फ्रीडम’ म्हणजे काय ते पाहिले. या लेखात ते कसे काम करते ते जाणून घेऊ.
12 डिग्रीज ऑफ फ्रीडम
चित्र क्र. 3 मध्ये ‘12 डिग्रीज ऑफ फ्रीडम’ दाखविलेल्या आहेत. कार्यवस्तू व्यास ‘ड’ मध्ये लोकेट केलेली आहे. कार्यवस्तुचा अक्ष ‘अ’-‘ब’ दिशेत आहे, असे मानले तर ती या दिशेने 1-2 मागे पुढे होऊ शकेल. तसेच ती 3-4 या दिशेने स्वतःभोवती वर्तुळाकार फिरू शकेल. म्हणजेच 4 दिशांमध्ये तिची हालचाल अनियंत्रित आहे. याचा अर्थ 12 पैकी 8 दिशांनी कार्यवस्तुची होणारी हालचाल फक्त एका लोकेटरने नियंत्रित झाली आहे.
या उरलेल्या 4 दिशांमध्ये होणारी हालचाल नियंत्रित करण्यासाठी ती नटच्या (भाग क्र. 4) साहाय्याने घट्ट पकडल्यामुळे ती लोकेटरच्या सपाट पृष्ठभागावर (कॉलरवर) जाऊन टेकते. त्यामुळे ती 1 ते 2 या दिशेत हलत नाही, तसेच ती घट्ट पकडल्याने 3 ते 4 या दिशेने स्वतःभोवती वर्तुळाकारदेखील फिरू शकत नाही. अशाप्रकारे सर्व ‘12 डिग्रीज ऑफ फ्रीडम’ नियंत्रित झाले आहेत. कार्यवस्तू फिक्श्चरमध्ये वारंवार एकाच प्रकारे बसविल्यामुळे उत्पादनात सातत्य मिळते.
लोकेटरवर ‘S’ खाच केलेली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, कुठलेही आरपार भोक करताना ड्रिल पृष्ठभागाच्या बाहेर यावे लागते. म्हणून लोकेटरमध्ये काहीवेळा आरपार भोक दिलेले आहे. चित्र क्र. 4 मध्ये बर कशी तयार होते हे आपल्या लक्षात येईल. ही बर त्या लोकेटरच्या भोकात जाऊन कार्यवस्तू फिक्श्चरमधून बाहेर काढताना लोकेटरवर अडकते आणि म्हणून ही खाच शेवटपर्यंत दिलेली आहे हे लक्षात घ्यावे. अशाप्रकारचे छोटे छोटे बारकावे लक्षात घेणे गरजेचे आहे.
‘C’ वॉशर आणि क्लॅम्पिंग नट
वॉशरचा आकार इंग्रजी ‘C’ अक्षरासारखा असल्यामुळे त्याला हे नाव पडले (चित्र क्र. 5) आहे. क्लॅम्पिंग नट (भाग क्र. 4) हा कार्यवस्तुच्या व्यास ‘ड’ पेक्षा लहान असल्यामुळे मध्यभागी जाड आणि मोठ्या व्यासाचा वॉशर टाकावा लागेल. परंतु, केवळ गोल भोक असलेला वॉशर टाकला तर कार्यवस्तू काढताना नट फिरवून तो संपूर्ण बाहेर काढावा लागेल. त्यानंतरच वॉशर आणि कार्यवस्तू निघू शकेल. कार्यवस्तू घालताना नट पूर्ण फिरवून बसवावा लागेल. यामध्ये खूप वेळ आणि श्रम वाया जातील. पण ‘C’ वॉशर वापरल्यामुळे त्याला असलेल्या खाचेमुळे तो सरकवून बाहेर काढता येईल. मात्र, नटचा आकार हा व्यास ‘ड’ पेक्षा लहान असला पाहिजे. ‘C’ वॉशर फ्लेम हार्ड किंवा टफन केले जातात. त्याच्या बाहेरच्या व्यासावर डायमंड नर्लिंग केलेले असते. त्यामुळे ‘C’ वॉशर चांगल्याप्रकारे पकडला जातो.
चित्र क्र. 6 मध्ये क्विक ॲक्टिंग नट दाखविला आहे. हा नट वापरल्यास ‘C’ वॉशरची गरज पडत नाही. हा नट अतिशय जलद काम करतो. फक्त तो खास बनवावा लागतो. ‘C’ वॉशर आणि नट मात्र प्रमाणित आहेत. आणि ते खराब झाले तर स्टोअरमधून घेऊन वापरता येतात. याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, नेहमी प्रमाणित भाग वापरण्यासच प्राधान्य द्यावे. यावरून आपल्या लक्षात आले असेलच की, आरेखन करणाऱ्याला किती विविध कल्पनांचा साकल्याने विचार करावा लागतो.
लायनर बुश
चित्र क्र. 7 मध्ये लायनर बुश दाखविले असून हेडसह किंवा हेडविरहित असे त्याचे दोन प्रकार असतात. हे बुश हार्ड आणि ग्राइंड केलेले असतात. लायनर बुशचा बाहेरचा व्यास प्रेस फिट (m6 किंवा n6) असतो, तर आतील व्यास H7 मध्ये नियंत्रित केला जातो. कुठलाही प्रमाणित लायनर बघितला तर आपल्या लक्षात येईल की, बाहेरचा व्यास आणि आतील व्यास हे समकेंद्रित असणे आवश्यक आहे. जिग प्लेटचे मटेरियल माईल्ड स्टील असल्यामुळे स्लिप बुशची वारंवार काढघाल केल्याने झीज होऊन जिग प्लेटचे भोक खराब होते. जिग खराब झाल्यानंतर पुन्हा नव्याने जिग प्लेट बनवावी लागते. म्हणून लायनरचा वापर करणे सयुक्तिक आहे. लायनर बुश हे दाबून (प्रेस फिट) बसविले जाते. ते व्यवस्थित बसावे यासाठी त्याला 150 चा चॅम्फर दिलेला असतो. हे लायनर बुशला लंबरूप बसविण्यासाठी कौशल्याची गरज असते.
स्लिप बुश - ड्रिलसाठी
चित्र क्र. 7 मध्ये स्लिप बुशची ॲसेम्ब्ली दाखविली आहे. बुशमुळे ड्रिलचा मार्ग निश्चित केला जातो. कार्यवस्तुचा पृष्ठभाग आणि बुश यामध्ये साधारणपणे ड्रिलच्या व्यासाएवढे किंवा दीडपट अंतर ठेवतात. त्यामुळे ड्रिल इकडे तिकडे न भरकटता व्यवस्थित गाईड केले जाते. कार्यवस्तुचा पृष्ठभाग आणि बुश यामध्ये अंतर कमी ठेवल्याने यंत्रण चालू असताना तयार होणाऱ्या चिप बुशमधून व्यवस्थित बाहेर पडतात. चिप बाहेर पडताना त्या बुशच्या आतील व्यासावर घासतात. त्यामुळे बुश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरू नये म्हणून रिटेनिंग स्क्रू दिलेला असतो. त्यासाठी बुशला खाच दिलेली आहे. (चित्र क्र. 7) त्याचप्रमाणे या चिप वर येताना घर्षणामुळे बुश वर ढकलले जाते. बुश जिग प्लेटमधून बाहेर येऊ नये म्हणून बुशचा थोडा भाग या स्क्रूच्या खाली राहील अशी स्टेप ‘A’ आणि ‘B’ दिलेली असते. बुश बाहेर काढताना उलट्या दिशेने फिरवून बाहेर काढावे लागते. हा स्क्रू बऱ्याच वेळेला चिपच्या घर्षणामुळे येणाऱ्या बलामुळे तुटू शकतो. जर स्क्रू तुटला असेल तर बुश गोल गोल फिरते, प्रसंगी वर निघूनही येते. बऱ्याच वेळेला स्क्रू तुटलेले असले तरीसुद्धा फिक्श्चर तसेच वापरले जाते. त्यामुळे बुशबरोबर लायनरसुद्धा गोल गोल फिरू लागतात आणि जिग प्लेटमधील लायनरबरोबर भोक खराब होते आणि जिग प्लेट बदलावी लागते. त्यामुळे हे स्क्रू तुटल्यास किंवा खराब झाल्यास ताबडतोब बदलावेत. सहसा हे स्क्रू आट्यांजवळच तुटतात.
असे होऊ नये यासाठी चित्र क्र. 8 आणि 9 मध्ये दाखविल्याप्रमाणे एक क्लॅम्प बनवून चित्र क्र. 8 मध्ये दाखविल्याप्रमाणे तो बसविल्यास रिटेनिंग स्क्रू तुटण्याची (चित्र क्र. 10) समस्या येणार नाही. हे क्लॅम्प प्रमाणित करून वरील समस्येवर मात करता येईल. चित्र क्र. 7 मध्ये हेडसह लायनर दाखविला आहे. तशीच जुळणी हेडविरहित लायनरसाठीसुद्धा करता येते.
हेडसह किंवा हेडविरहित लायनर कधी वापरायचे हे आरेखन करणारा ठरवितो. स्लिप बुशची लांबी, जिग प्लेटची जाडी, ड्रिलची लांबी, ड्रिलचे टोक आणि कार्यवस्तू यातील अंतर इत्यादी बाबींवर हे ठरवावे लागते. वरील बाबींचा सर्वांगाने विचार करून फिक्श्चर केल्यास चांगल्या प्रतीचे फिक्श्चर बनविता येते.
चित्र क्र. 11 मध्ये आणखी एक अँगल प्लेट प्रकारचे फिक्श्चर दिसत आहे. या फिक्श्चरमध्ये कार्यवस्तू, लोकेटर आणि डायमंड पिनमध्ये लोकेट केलेली आहे. कार्यवस्तू नुसत्या लोकेटरवर लोकेट केली तर ती स्वतःभोवती फिरू शकेल. ती फिरू नये म्हणून डायमंड पिन दिलेली आहे. लोकेटरचा आणि डायमंड पिनचा केंद्रबिंदू जोडणाऱ्या सेंटर लाईनला (लाल रेषा) डायमंड पिन लंबरूप बसविली आहे. यामुळे कार्यवस्तू अचूकपणे बसते आणि काढघाल करणे सुलभ होते.
याठिकाणी केवळ एकाच मापाचे ड्रिल वापरायचे आहे. त्यामुळे फिक्स बुश किंवा स्लिप रिन्यूएबल बुश वापरले तरी चालेल. जेव्हा वारंवार वापरामुळे हे बुश खराब होते तेव्हा ते बदलले जाते, यालाच स्लिप रिन्युएबल बुश म्हणतात. फिक्स बुश हे लायनरप्रमाणेच दिसते. त्याचा आतील व्यास F7 मध्ये नियंत्रित केलेला असतो. स्लिप बुश आणि स्लिप रिन्युएबल बुशचे कार्य (चित्र क्र.12) एकच बुश करते. आपण लॉक स्क्रू कुठे वापरतो त्यावरच त्याचा प्रकार ठरतो. जर स्क्रू, खाच ‘A’ च्या ठिकाणी बसविला तर त्याला स्लिप रिन्युएबल बुश म्हणतात, पण स्क्रू, (तुटक रेषेमध्ये दाखविलेला) खाच ‘B’ च्या ठिकाणी बसविला तर त्याला स्लिप बुश असे म्हणतात. ज्याप्रमाणे चित्र क्र.1 मध्ये दाखविलेल्या फिक्श्चरच्या विविध भागांचे कार्य आपण पाहिले त्याचप्रमाणे या फिक्श्चरच्या विविध भागांचे कार्य कसे होते ते पहावे. तसेच आपल्या शॉपमध्ये असलेल्या अशा प्रकारच्या फिक्श्चरचे निरीक्षण करावे. सर्व भागांचे कार्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे जिग आणि फिक्श्चरविषयी खूप काही जाणून घेता येईल. आपल्याला माहितच आहे की, ‘स्वयं अभ्यास हाच खरा उत्तम गुरू’. काही शंका असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधावा. आपले शंका समाधान करण्यास आम्हाला निश्चितच आवडेल. पुढील लेखात आपण अजून काही वेगवेगळ्या प्रकारची जिग पाहणार आहोत.
सारांश
1. ‘C’ वॉशर वापरण्याचे फायदे लक्षात घ्यावेत.
2. रिटेनिंग स्क्रू तुटण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी क्लॅम्पचा वापर करता येतो.
3. रिटेनिंग स्क्रूचे कार्य महत्त्वाचे आहे.
4. स्लिप बुश आणि स्लिप रिन्युएबल बुश यामध्ये काय फरक आहे याची नोंद घ्यावी.
5. चित्र क्र. 1 मध्ये लोकेटरमुळे डिग्रीज ऑफ फ्रीडम कशा नियंत्रित होतात हे समजून घ्यावे.
6. भोक करताना बरमुळे येणाऱ्या समस्येसाठी काय काळजी घेतली आहे ते पहावे.
7. लोकेटर वर खाच ‘S’ चे कार्य काय आहे ते पहावे.
8. ‘C’ वॉशरच्या बाहेरच्या व्यासावर डायमंड नर्लिंगचे महत्त्व समजून घ्यावे.
<="" div="" style="float: left; margin: -25px 20px 20px 0px;">
अजित देशपांडे
अतिथी प्राध्यापक, ARAI
9011018388
अजित देशपांडे यांना जिग्ज आणि फिक्श्चर्समधील जवळपास 36 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर, ग्रीव्हज् लोम्बार्डिनी लि., टाटा मोटर्स अशा विविध कंपन्यांत काम केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ते अतिथी प्राध्यापक आहेत.
="">