इंडस्ट्री 4.0 साठी सज्ज होताना... (भाग 1)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    24-Jun-2020   
Total Views |
 
 
लेखमालेमध्ये आपण इंडस्ट्री 4.0 आणि IoT याविषयीचे तपशील जाणून घ्यायला सुरुवात केली आहे. डिसेंबर 2018 अंकात आपण इंडस्ट्री 4.0, त्याच्या तांत्रिक बाजू आणि त्यामधील प्रमुख अंग असलेले IoT यांची ओळख करून घेताना IoT चा गुणवत्ता तपासणीमध्ये होणारा वापर सोदाहरण समजून घेतला. या लेखात सर्वप्रथम आपण इंडस्ट्री 4.0 साठी अपेक्षित असणारी आपली सज्जता कशी मोजता येईल याविषयी जाणून घेणार आहोत, तर लेखाच्या पुढील महिन्यात येणाऱ्या भागात या पूर्वतयारीचे एक उदाहरण म्हणून प्लॅस्टिक मोल्डिंग उद्योगात ‘इमेज प्रोसेसिंग’ तंत्राचा वापर करून सद्यस्थितीतील प्रक्रिया अधिक ‘स्मार्ट’ कशी केली गेली, हे पाहणार आहोत.
 
इंडस्ट्री 4.0 साठीच्या सज्जतेचे मूल्यमापन
  
1. मूल्यमापनामागील पार्श्वभूमी
इंडस्ट्री 4.0 ही यांत्रिकी आणि पूरक उद्योगांत सर्वदूर आमूलाग्रपणे बदल घडवून आणणारी संकल्पना आहे. त्यात केवळ आधुनिक तंत्रांचा वापर करून उत्पादन प्रक्रिया सुधारणे अपेक्षित नाही, तर एखाद्या वस्तुच्या जीवनातील सर्व टप्प्यांमध्ये (लाइफ सायकल, अर्थात संकल्पनेपासून निर्मिती, उत्पादन, वितरण, ग्राहकांकडून होणारा वापर आणि अखेर यथायोग्य शेवट अशा प्रत्येक टप्प्यात) विविध आधुनिक तंत्रे आणि विशेषतः माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगाच्या संबंधित प्रत्येक घटकाचा सर्वांगीण कायापालट घडवून आणणे अपेक्षित आहे. इंडस्ट्री 4.0 नुसार संपूर्णपणे विकसित झालेल्या कोणत्याही यांत्रिकी उद्योगाच्या एकूण कार्यक्षमतेत सुमारे 30 ते 35% वाढ दिसून येईल, तर त्याच्या उत्पादन खर्चात सुमारे 25% पर्यंत बचत होईल, यातून त्या उद्योगाच्या उलाढालीमध्ये 30% पर्यंत वाढ दिसून येईल, असा विेशास आहे. 2011 साली जर्मनीत 4 थ्या औद्योगिक क्रांतीची संकल्पना आणि कृती आराखडा मांडला गेला खरा, मात्र तरीही खुद्द जर्मनीतील बहुसंख्य लघु, मध्यम आणि अगदी मोठ्या उद्योगांतही या संकल्पनेबद्दल थोडा संभ्रम, साशंकता आणि भीती होतीच. 4 थ्या क्रांतीच्या दिशेने होऊ घातलेल्या प्रवासात आपण नक्की कोणत्या टप्प्यात आहोत आणि जगातील बाकी उद्योग, विशेषतः आपले स्पर्धक किती मागे-पुढे आहेत, हा एक ठळक प्रश्न स्वाभाविकपणेच सर्वांसमोर होता. या सुधारणांच्या प्रवासात कोणाची किती सज्जता आहे, हे सुस्पष्टपणे समजत नव्हते.
 
सर्वेक्षण
यासाठी VDMA (जर्मनीतील यांत्रिकी आणि उत्पादन उद्योगांचे संघटन) संस्थेने 2015 साली जर्मनीतील आखेन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल मॅनेजमेंट आणि कोलोनमधील इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक रिसर्च यांच्या मदतीने एक विस्तृत सर्वेक्षण केले. यात जर्मनीतील सुमारे 600 लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांकडून प्रतिसाद मिळविले गेले. यात अगदी 20 च्या आसपास कर्मचारी असणाऱ्या नट, बोल्टसारखे सुटे भाग बनविणाऱ्या एखाद्या लघु उद्योगापासून ते अगदी काही हजार कर्मचारी आणि विविध ठिकाणी उत्पादन शाखा असणाऱ्या मशिन उत्पादकांपर्यंत सर्वांचा समावेश होता. या सर्वेक्षणातून ऑक्टोबर 2015 च्या सुमारास एक दीर्घ अहवाल प्रकाशित झाला. त्या अहवालाचा अभ्यास करणे आपल्यासाठी नक्कीच उद्बोधक आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक उद्योगाचे पुढील 6 निकषांवर मूल्यमापन करण्यात आले.
• कारखान्यातील आधुनिकता (स्मार्ट फॅक्टरी).
• प्रक्रियेतील आधुनिकता (स्मार्ट ऑपरेशन).
• उत्पादित वस्तूंमधील आधुनिकता (स्मार्ट प्रॉडक्ट).
• धोरण आणि संघटन (स्ट्रॅटेजी आणि ऑर्गनायझेशन).
• मनुष्यबळ (एम्प्लॉई).
• माहिती आधारित सेवा (डाटा ड्रिव्हन सर्व्हिस).

3_2  H x W: 0 x 
 
यातील पहिले तीन निकष मुख्यत्वे तांत्रिक बाजूंचे सर्वेक्षण करतात, तर पुढील तीन निकष उद्योगांमधील सर्व मशिन तंत्रांचा समन्वय साधणाऱ्या मानवी आणि संगणकीय घटकांचे मूल्यमापन करतात. (चित्र क्र. 1)
 
सर्वेक्षण केल्या गेलेल्या प्रत्येक उद्योगाच्या सज्जतेची तुलनात्मक कल्पना येण्यासाठी 6 सज्जता पातळ्या मानण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
• दूरस्थ (आऊटसाइडर)
• प्राथमिक (बिगिनर)
• मध्यम (इंटरमिजिएट)
• अनुभवी (एक्सपिरिअन्स्ड्)
• निष्णात (एक्स्पर्ट)
• सर्वाधिक कार्यक्षम (टॉप परफॉर्मर)
 
सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या प्रत्येक उद्योगाचे या 6 निकषांवर स्वतंत्रपणे मूल्यमापन करून त्याची त्या त्या निकषाबाबतची सज्जता पातळी (चित्र क्र. 2) ठरविली गेली. उद्योगांच्या मूल्यमापनाचे चित्र आणि ठळक निरीक्षणे समजून घेण्यापूर्वी आपण हे निकष आणि सज्जता पातळ्या थोडक्यात समजून घेऊ.

3_3  H x W: 0 x 
 
सज्जता मूल्यमापनाचे निकष
1. कारखान्यातील आधुनिकता (स्मार्ट फॅक्टरी) : यात वस्तूंचे प्रत्यक्ष उत्पादन अधिकाधिक स्वयंचलित आणि लवचीक स्वरुपात (ग्राहकाला हवी तशी आणि तितकीच गुणवैशिष्ट्ये हव्या त्या प्रमाणात) करणे अपेक्षित आहे. यासाठी पायाभूत उत्पादन यंत्रणा अद्ययावत करणे, फॅक्टरीमध्ये IT यंत्रणा उभारणे, तयार होणाऱ्या माहितीचा पुरेपूर वापर करणे आणि शक्य तिथे उत्पादन प्रक्रियेच्या डिजिटल प्रारुपांतून उत्पादन अधिक कार्यक्षम कसे होईल याचा अंदाज घेणे आवश्यक होईल.
 
2. पूरक प्रक्रियांमधील आधुनिकता (स्मार्ट ऑपरेशन) : उत्पादन कार्यक्षमता वाढविण्यासाठी कारखान्याबरोबरच इतर पूरक प्रक्रिया (उदाहरणार्थ, पुरवठा साखळी, व्यवस्थापन, गुणवत्ता तपासणी, वाहतूक आणि संदेशवहन इत्यादी) तितक्याच प्रमाणात आधुनिक असणे गरजेचे आहे. त्यासाठी या सर्व घटकांचे योग्य आणि जलद असे सुसूत्रीकरण करणे खूप महत्त्वाचे असेल. त्या अनुषंगाने क्लाऊड आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर, माहितीची सुरक्षितता, तिचे विविध घटकांमधील आदान प्रदान आणि त्याद्वारे प्रत्येक प्रक्रियेचे स्वयंचलन या गोष्टींचे येथे मूल्यमापन होईल.
3. उत्पादित वस्तूंमधील आधुनिकता (स्मार्ट प्रॉडक्ट) : स्मार्ट उत्पादन प्रक्रियांमधून तयार होणारी उत्पादित वस्तूसुद्धा तितकीच स्मार्ट असणे गरजेचे आहे. याचाच अर्थ त्या वस्तुचा वापर होतेवेळी तिच्याबद्दलची उपयुक्त अशी माहिती ग्राहक, उत्पादक आणि इतर संबंधित घटकांना लगोलग मिळणे अपेक्षित आहे. यासाठी त्या उत्पादित वस्तूमध्ये यथायोग्य असे संवेदक, माहितीचा प्रोसेसर आणि संदेशवहन प्रणाली अंतर्भूत करणे आणि त्याचबरोबर त्यातून प्रत्येक मिनिटागणिक तयार होणाऱ्या माहितीचे परीक्षण करण्यास सक्षम होणे गरजेचे आहे.
 
4. धोरण आणि संघटन (स्ट्रॅटेजी आणि ऑर्गनायझेशन): वरील तीनही निकष यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी हा निकष अतिशय महत्त्वाचा आहे. उद्योगाचे व्यवस्थापक आणि मालक यांना इंडस्ट्री 4.0 ची किती जाण आहे, याचेच मापन हा निकष करतो. आपल्या उद्योगाला सुसंगत असे इंडस्ट्री 4.0 साठीचे दीर्घकालीन धोरण आखणे, त्यासाठी आवश्यक अशा नाविन्यपूर्ण तंत्रांचे नियोजन करणे, त्यासाठी संसाधनांची पुरेशी गुंतवणूक करून ती योग्यवेळी उपलब्ध करून देणे आणि सर्व धोरणाची कटाक्षाने अंमलबजावणी करणे हे या निकषाद्वारे तपासले जाते.
 
5. मनुष्यबळ (एम्प्लॉई) : कोणताही उद्योग हा माणसांनी, माणसांच्या मदतीने, माणसांसाठी केलेला खटाटोप असतो. त्यामुळे कोणत्याही उद्योगात सहभागी असणाऱ्या व्यक्ती हा त्यासाठी अतिशय कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे इंडस्ट्री 4.0 साठी सज्ज होताना, वर्षागणिक बदलत्या वातावरणात त्या त्या उद्योगात सहभागी असणाऱ्या मनुष्यबळास (कर्मचारी आणि व्यवस्थापन या सर्वांनाच) कोणकोणते कौशल्य लागेल आणि ते मिळविण्यासाठी कोणते मार्ग चोखाळावे लागतील, त्याबरोबरच हे मनुष्यबळ पुरेसे सक्षम झाले आहे हे कशाप्रकारे ठरविता येईल हे या निकषांमध्ये मोजले जाते.
 
6. माहिती आधारित सेवा (डाटा ड्रिव्हन सर्व्हिस) : जेव्हा उत्पादन प्रक्रिया आणि त्यातून तयार होणारी उत्पादने स्मार्ट असतील, तेव्हा उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील संबंध केवळ थेट खरेदी विक्रीचे न राहता त्यात कित्येक नवीन शक्यता तयार होतात. केवळ वस्तू ही विक्रीयोग्य नसून त्या वस्तूसंबंधित बाकी पूरक गोष्टी, सेवा, वैशिष्ट्ये अशी अनेक मूल्येही विक्रीयोग्य आहेत, हे लक्षात घेऊन त्यानुसार व्यवसायाचे नवीन, कालसुसंगत प्रारूप तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करून उलाढाल अधिकाधिक वाढविणे हे या निकषात तपासले जाते.
 
सज्जता पातळ्या
1. दूरस्थ (आऊटसाइडर) : वर नमूद केलेल्या कोणत्याही निकषाची किमान पूर्तताही न करणारे किंवा इंडस्ट्री 4.0 बद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असणारे उद्योग या पातळीमध्ये मोडतात.
 
2. प्राथमिक (बिगिनर) : या पातळीवरील उद्योगांना इंडस्ट्री 4.0 ची काहीशी कल्पना असते. त्यांनी काही प्रमाणात कुठे ना कुठे प्रायोगिक स्वरुपात आधुनिक तंत्रांचा वापर केलेला असतो. प्राथमिक दर्जाची IT यंत्रणा उभारलेली असते. मात्र, त्यापुढे विशेष मजल मारलेली नसते.
 
3. मध्यम (इंटरमिजिएट) : इंडस्ट्री 4.0 च्या अनुसार उत्पादन आणि उत्पादित वस्तू या दोन्हींसाठी धोरण, संशोधन आणि अंमलबजावणी या सर्वच आघाड्यांवर काही ना काही ठोस पावले उचलणाऱ्या उद्योगांचा हा गट आहे. केलेल्या उपाययोजनांची फळे अजून पूर्णपणे त्यांना मिळालेली नसतात, पण त्या दिशेने त्यांचे प्रयत्न नक्की चालू असतात.
 
4. अनुभवी (एक्सपिरिअन्स्ड्) : या प्रकारच्या उद्योगांचा गट इंडस्ट्री 4.0 साठीच्या उपाययोजना पूर्ण धोरणांनीशी राबवून त्यातून मिळणारे काही फायदे अनुभवत असतो. अर्थात या उद्योगांना अजूनही बऱ्याच सुधारणा करण्यास वाव असतो, ज्यातून त्यांना इतरही अधिक फायदे मिळू शकतात. (उदाहरणार्थ, उत्पादन कार्यक्षम करून खर्चात कपात केलेली असेल पण अजूनही वेगवेगळे विक्री पर्याय वापरून नवनवीन पद्धतीने नफा मिळविण्याच्या शक्यता अजमाविणे बाकी असेल.)
 
5. निष्णात (एक्स्पर्ट) : या पातळीवरील उद्योग इंडस्ट्री 4.0 साठीचे सहाही निकष पूर्ण करून काही ना काही प्रमाणात सर्व प्रकारचे लाभ मिळवित असतात.
 
6. उच्च कामगिरीकर्ते (टॉप परफॉर्मर) : नावाप्रमाणेच या पातळीवरील उद्योग केवळ निष्णात नसतात तर आपापल्या क्षेत्रात उच्चांकी कामगिरी करून इंडस्ट्री 4.0 चे शक्य ते सर्व लाभ पूर्णपणे मिळवित असतात. अर्थातच हे उद्योग बाकी उद्योगांसाठी मार्गदर्शक आणि आदर्शवत झालेले असतात. प्राथमिक आणि दूरस्थ अशा दोन्ही पातळीमधील उद्योग प्रवेशकर्ते या सदरात समजले जातात. मध्यम पातळीवरील उद्योग अभ्यासकर्ते या सदरात मोडतात, तर अनुभवी, निष्णात आणि उच्च कामगिरीकर्ते या तिन्ही पातळ्यांवरील उद्योग नेतृत्वकर्ते या सदरात गणले जातात. (चित्र क्र.1)
  
जर्मनीत केलेल्या या सर्वेक्षणाच्या अहवालातील सर्व निष्कर्ष येथे मांडणे प्रस्तुत नसले, तरी भारतीय उद्योगांनी लक्षात घेण्याजोगे 2 ठळक मुद्दे मांडणे योग्य राहील.
 
• पहिला मुद्दा म्हणजे, 2015 सालाखेरीपर्यंत तब्बल 89% उद्योग ‘प्रवेशकर्ते’ सदरात तर फक्त 2% उद्योग ‘नेतृत्वकर्ते’ सदरात होते.
• दुसरा चिंतनीय मुद्दा म्हणजे, उद्योगांचा आकार जसा मोठा होत जातो, तशी त्यांची इंडस्ट्री 4.0 साठी सज्ज होण्याची क्षमतादेखील लक्षणीयपणे वाढताना दिसते.
 
या मांडणीनुसार भारतीय उत्पादन उद्योगाची विभागणी जरी उपलब्ध नसली, तरी दर्जेदार अशा पायाभूत सुविधांचा अभाव, सरकारी आणि आर्थिक यंत्रणांकडून निर्माण होणारे अडसर, एकीकडे पूर्ण प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा आणि दुसरीकडे लाखोंच्या संख्येत शहरांकडे वळणाऱ्या अप्रशिक्षित / अर्धप्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता असे काहीसे विरोधाभासी चित्र भारतीय उत्पादन उद्योगांसमोर आहे हे निश्चित. सध्या बहुसंख्य भारतीय उद्योग दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रांतीच्या कसोटीवर जेमतेम उतरू शकतात. (चित्र क्र. 3) अशा स्थितीत माहिती तंत्रज्ञानाधारित उत्पादनप्रक्रिया आणि व्यवसाय प्रारुपांचा विचार करणे नक्कीच अवघड आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी भारतीय उद्योगांना स्वतःची अशी खास आव्हाने पेलावी लागतील. सज्जतेच्या प्रत्येक निकषाला खास भारतीय अशी उत्तरे शोधावी लागतील. त्यासाठी पुढील मुद्द्यांचा विचार करावा लागेल.

3_1  H x W: 0 x 
 
1. स्वतःच्या स्पर्धक उद्योगांच्या आणि पूरक उद्योगांच्या सज्जतेचा पारदर्शकपणे अभ्यास करणे.
2. आपली सज्जता वाढविण्यासाठी आपला उद्योग आणि भोवतालची परिस्थिती यांच्याशी सुसंगत अशा तात्कालिक आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे.
 
या दोन गोष्टी कटाक्षाने आणि सजगपणे राबविल्या गेल्या पाहिजेत.
 
‘इंडस्ट्री 4.0 आणि IoT’ या लेखमालेतील प्रत्येक लेख दोन भागांत विभागलेला असेल. लेखाच्या पहिल्या भागात नवीन तांत्रिक माहिती, तर दुसऱ्या भागात त्यासंबंधित प्रत्यक्ष राबविलेले उदाहरण पाहणार आहोत.
 
 
<="" div="" style="float: left; margin: -25px 20px 20px 0px;">
barve_1  H x W: 
हृषीकेश बर्वे
भागीदार, कॉन-व्हिवा टेक्नॉलॉजिज
7875393889
 
हृषीकेश बर्वे यांनी आय.आय.टी. मुंबई येथून इंस्ट्रुमेंटेशन, सिस्टिम आणि कंट्रोलमधून एम.टेक. केले आहे. त्यांना कंट्रोल सिस्टिम, ऑटोमेशन, मॅन्युफॅक्चरिंग सिस्टिम तसेच ऊर्जा व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित संशोधन आणि निर्मिती कामाचा 10 वर्षांचा अनुभव आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@