OEE : उपलब्धता व्यवस्थापन (भाग 1)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    25-Jun-2020   
Total Views |
 
2_1  H x W: 0 x

‘धातुकाम’ डिसेंबर 2018 अंकात आपण उत्पादकतेचे मूल्यांकन आणि त्याचे ‘ओव्हरऑल इक्विपमेंट इफेक्टिव्हनेस’द्वारे (OEE) मोजमापन कसे करावे, हे समजून घेतले. उपलब्धता, कार्यक्षमता आणि गुणवत्ता हे OEE चे तीन घटक आहेत. या लेखात आपण अनुपलब्धतेमुळे होणाऱ्या नुकसानावर परिणाम करणारे घटक आणि मशिन शॉपमधील नुकसान कमी करण्यासाठीचे उपाय याविषयी माहिती घेणार आहोत.
आपण उपलब्धतेच्या मोजमापनाची व्याख्या चौकटीत दिलेल्या सूत्राद्वारे केली आहे.

2_2  H x W: 0 x 
 
नियोजित प्रतिबंधात्मक देखभालीमुळे पुढील उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते.
1. जेव्हा ठरलेल्या नियोजनानुसार देखभाल केली जाते, तेव्हा व्यवसायातील नुकसान शून्य किंवा किमान ठेवता येणे शक्य असते.
2. नियोजित प्रतिबंधक देखभालीदरम्यान केल्या जाणाऱ्या कृती व्यवस्थित ठरलेल्या असल्यामुळे जे यंत्रभाग बदलण्याची गरज आहे, त्यांची वेळेपूर्वीच व्यवस्था करणे शक्य असते. त्यामुळे यंत्रभागांची प्रतीक्षा करावी लागत नाही आणि काम लवकर पूर्ण होते.
3. नियोजित वेळापत्रकांमध्ये, निदानात्मक चाचण्या करता येतात. या चाचण्यांमुळे भविष्यात नियोजन केलेल्या देखभालीच्या कामांसाठी महत्त्वपूर्ण माहिती तयार होते.
4. जेव्हा अशाप्रकारे मशिनचे एकंदर आरोग्य त्याच्या आदर्श स्थितीत कायम राखले जाते, तेव्हा मशिन बंद पडणे/नीट काम न करणे टाळले जाते. या गोष्टी अनेकदा खूप खर्चिक ठरतात. नियोजित देखभालीत वाया गेलेला वेळदेखील शेवटी वेळेचे नुकसानच असते. त्यामुळे OEE कमी होतो. याचा व्यवसायावर अनिष्ट परिणाम होणार नाही याची खात्री करणे, तसेच ही देखभाल कमीतकमी वेळात कशी होईल, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. ते कसे करता येईल, हे आपण आता पाहू.
 
प्रतिबंधात्मक देखभालीसाठी मशिन बंद ठेवण्याचे धोरण
प्रतिबंधक देखभालीचे वेळापत्रक हे मशिनची स्थिती, मशिनचा वापर आणि उत्पादनाची आवश्यकता यानुसार ठरविता येते. देखभालीमधील कामे ठरविणे आणि त्यांचे दैनिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक वेळापत्रकात वर्गीकरण करणे शक्य आहे. तक्ता क्र. 1 मध्ये कामांच्या प्रकारानुसार सामान्य मार्गदर्शक तत्वे आणि एका प्रातिनिधिक मशिन शॉपसाठीचे वेळापत्रक दिले आहे. परंतु, त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार काटेकोरपणे अभ्यास करून व्यवस्थापनाने हे वेळापत्रक ठरविले पाहिजे. काही जुन्या मशिनला मासिक किंवा साप्ताहिक वेळापत्रकाची गरज भासू शकते.

4_2  H x W: 0 x 
 
तक्ता क्र. 1 वरून लक्षात येईल की, उत्पादन गटाची प्रतिबंधक देखभालीत अतिशय मोठी भूमिका आहे. उत्पादन विभागाने ‘मी बनवितो, तू दुरुस्त कर’ असा दृष्टिकोन सोडून देऊन काम करण्याची गरज आहे. उत्पादन आणि देखभाल एकमेकांपासून वेगळे करता येणार नाहीत, अशी स्वायत्त देखभाल संकल्पना विकसित करणे, ही काळाची गरज आहे. परिणामकारकता आणि देखभालीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ही संकल्पना उपयुक्त ठरते, तसेच मशिन बंद पडल्यानंतर दुरुस्ती करावी लागल्यामुळे होणारे नुकसान कमी होते.
 
प्रतिबंधक देखभाल योजनेची व्याख्या केल्यावर, व्यवस्थापनाने प्रतिबंधक देखभालीसाठी मशिन बंद ठेवल्यामुळे वाया जाणाऱ्या दिवसांचे एक वार्षिक उद्दिष्ट ठरविले पाहिजे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्पादन आणि देखभाल गटाने एकत्रितपणे काम केले पाहिजे.
 
सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे, मशिन बंद ठेवल्यामुळे होणाऱ्या नुकसानीतला दुसरा घटक म्हणजे, ‘उत्पादन समायोजन नुकसान’. आता या नुकसानाबद्दल जाणून घेऊ.

4_1  H x W: 0 x 
 
उत्पादन समायोजन नुकसान
मशिन शॉपच्या भाषेत, उत्पादन समायोजन नुकसान म्हणजे, काम नसल्यामुळे मशिन बंद राहणे. या स्थितीसाठीची उदाहरणे आणि धोरणे पुढे दिली आहेत.
 
• मागणी कमी झाल्यामुळे, उत्पादन कमी करण्याचे नियोजन केले जाते, परिणामी मशिन पूर्ण वेळ चालत नाही. उत्पाद तयार करणाऱ्या कंपनीसाठी ही एक गंभीर व्यावसायिक समस्या आहे, कारण त्यामुळे त्या उत्पादनात सहभागी असलेली कित्येक मशिन बंद राहण्याची शक्यता असते. यासाठी स्मार्ट व्यावसायिक धोरण आखण्याची आणि स्पर्धात्मक बाजारपेठेत पुढे राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज आहे. जॉब वर्क करणाऱ्या मशिन शॉपच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी असू शकते. जर ते मशिन शॉप वेगवेगळ्या ग्राहकांसाठी अनेक उत्पादने तयार करत असेल, तर उत्पादनाचे नुकसान केवळ काही मशिनपुरतेच मर्यादित राहण्याची शक्यता असते. जर विक्रीचा अंदाज बरोबर असेल आणि पुरेसा व्यावसायिक अनुभव असेल, तर मशिन शॉपला कमी मागणीचे कालावधी शोधणे आणि या कालावधीत प्रतिबंधक देखभाल आणि सुधारणा यांच्याशी संबंधित अनेक कामे करण्याचे नियोजन करणे शक्य असते.
• एखाद्या उत्पादनाचे क्रमवार प्रक्रिया पद्धतीने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या यंत्रण विभागामध्ये, कधी कधी त्यातील मशिनचा आवर्तन काळ समान नसल्याची स्थिती असू शकते. त्यामुळे काही मशिनचा वापर कमी होतो. प्रक्रियेचा लेआऊट तयार करताना या समस्येचा विचार करण्याची गरज आहे. असंतुलित लाईनमुळे वेळ वाया जाणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
• दुसरी एक स्थिती अशी आहे की, लाईनमधील एखादे मशिन बंद पडल्यामुळे, पुढची कामे करणारी मशिन बंद राहतात. मशिनचा अधिक चांगला वापर होण्यासाठी उत्पादन-मशीन प्रणाली लवचिक असणे फायदेशीर आहे. असे असल्यास मागणी असलेल्या उत्पादनांचे उत्पादन करण्यासाठी रिकाम्या मशीनचा सेटअप लगेच वापरणे शक्य होईल.

rajesh_2  H x W
या अंकात आपण मशिन बंद ठेवल्यामुळे होणारे नुकसान कमी करण्याची धोरणे जाणून घेतली असून ‘धातूकाम’च्या पुढील अंकात मशिन बंद पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानीविषयी माहिती घेणार आहोत.

 
 
राजेश म्हारोळकर यांत्रिकी अभियंते असून, ते सल्लागार म्हणून काम करतात.
‘श्रीनिवास इंजिनिअरिंग ऑटो कंपोनंट्स प्रा. लि.’चे ते संचालक आहेत. ही कंपनी ट्रॅक्टरचे यंत्रभाग आणि ऑटोमोटिव्ह उद्योगांना आयर्न कास्टिंग आणि प्रिसिजन यंत्रणाची सेवा देते.
9359104060
 
@@AUTHORINFO_V1@@