कार्यक्षम गेजिंगसाठी स्वदेशी उपकरणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    04-Jan-2021   
Total Views |
1_1  H x W: 0 x
 
व्हर्सा कंट्रोल्स ही आमची कंपनी डायमेन्शनल गेजिंगमध्ये कार्यरत आहे. यंत्रभागाचे यंत्रण झाल्यानंतर त्याच्या ड्रॉइंगप्रमाणे त्याची मापे टॉलरन्स मर्यादेमध्ये आहेत का, तो यंत्रभाग OK आहे की NOT OK आहे, हे तपासण्याची इलेक्ट्रॉनिक उपकरणे (इन्स्ट्रुमेंट) आमची कंपनी गेल्या 18 वर्षांपासून तयार करीत आहे. यंत्रभाग मोजमापाकरीता आम्ही 'Ecogauge' हा उत्पाद नव्याने तयार केला आहे.
या उत्पादाची पार्श्वभूमी अशी आहे की, 2018 साली आमच्या PneuGage या उपकरणाला पारखे पुरस्कार मिळाला. EcoGauge हे त्याच मालिकेतील नवीन उत्पाद आहे. हे उपकरण सादर करण्याचे कारण असे होते की, PneuGage या उत्पाद श्रेणीला सर्वत्र खूप मान्यता आहे. खासकरून मध्यम आकाराच्या ज्या आमच्या ग्राहक कंपन्या आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले की, त्यांना एवढ्या उच्च श्रेणीची (हाय एंड) उत्पादने नको होती. त्यांची अशी मागणी होती की, जी साधने, पारंपरिक (कन्व्हेन्शनल) डायलसारखी वापरली जातील, (ज्याला आपण लो एंड किंवा बेसिक इन्स्ट्रुमेंट म्हणतो) त्याच्यापेक्षा जास्त वैशिष्ट्ये (फीचर) परंतु PneuGage पेक्षा कमी अशी दोन्हीची वैशिष्ट्ये एकत्र करून काही नवीन गेज आम्हाला उपलब्ध करून द्यावीत. पारंपरिक उपकरणे आणि PneuGage यांच्यातील दरी भरण्यासाठी आम्ही EcoGauge उत्पाद बाजारात नव्याने सादर केला.
गेजिंग आणि मोजमापन 
या उत्पादाची माहिती घेण्यापूर्वी आपण प्रथम गेजिंग आणि मोजमापन (मेजरमेंट) यातील फरक समजावून घेऊ. जेव्हा आपण मोजमापन म्हणतो, तेव्हा ते प्रत्यक्ष मापे (अॅब्सोल्युट मेजरमेंट) दर्शविते. उदाहरणार्थ, एखाद्या टेबलचा आकार 1 मीटर X 1.5 मीटर आहे. तर ही त्याची प्रत्यक्ष मोजमापे असतात. गेजिंगमध्ये ते एक संदर्भ धरून त्यानुसार असलेले विचलन (रिलेटिव्ह मेजरमेंट) दर्शविते. उदाहरणार्थ, ड्रॉइंगनुसार यंत्रभागाचा आकार 58 मिमी. आहे, त्याला 15 मायक्रॉन प्लस आणि 10 मायक्रॉन मायनस असा टॉलरन्स आहे. गेजिंगमध्ये नेहमी मास्टरला गृहीत धरून त्या संदर्भानुसार (रेफरन्स) मापे मोजली जातात. उपकरण, अॅनालॉग असो किंवा डिजिटल असो, गेजिंगमध्ये त्याची मूल्ये (व्हॅल्यू) मास्टरला प्रीसेट केली जातात. अपेक्षित असलेल्या 50 किंवा 100 मायक्रॉनच्या मर्यादेमध्ये ही सर्व मोजमापे घेतली जातात.
डायमेन्शनल गेजिंग ही एक कृती (अॅक्टिव्हिटी) आहे, ज्याच्यामध्ये मशीनमधून ग्राइंडिंग होऊन किंवा फिनिश होऊन आलेला यंत्रभाग एका मेकॅनिकल गेजमध्ये ठेवला जातो. त्यापूर्वी तो गेज एका कॅलिब्रेशन केलेल्या मास्टरला सेट केलेला असतो. ते सेटिंग झाल्यानंतर तयार झालेला प्रत्येक यंत्रभाग त्या संदर्भाशी सेट करून त्याचे मूल्य दिलेल्या टॉलरन्समध्ये आहे की नाही हे उपकरण सांगत असते. डिजिटल उपकरणे थेट मूल्य दाखवितात, उदाहरणार्थ, 58.008 किंवा 57.995 मिमी. विविध रंगांमधूनदेखील तो यंत्रभाग स्वीकारार्ह आहे की अस्वीकृत आहे ते दर्शविले जाते. जर यंत्रभागाचे पॅरामीटर टॉलरन्स मर्यादेच्या आत असतील, तर हिरव्या रंगाने दर्शविले जाते. टॉलरन्सच्या बाहेर मूल्य गेलेले असेल, तर यंत्रभाग अस्वीकृत असतो. तो लाल रंगाने दर्शविला जातो. तसेच कंट्रोल बँड अशीदेखील एक संकल्पना आहे. तुम्ही टॉलरन्सच्या दिशेने गेलेले आहात, पण टॉलरन्सच्या बाहेर गेलेले नाही आहात. अशा वेळी पिवळ्या रंगाची सूचना मिळते. आलेल्या फरकानुसार यंत्रण प्रक्रियेत आवश्यक बदल करण्याची ती सूचना असते. या पद्धतीने गेज काम करीत असते. त्यामध्ये प्रत्येक यंत्रभागाकरिता अनुकूल असे इलेक्ट्रॉनिक सेन्सर आणि मेकॅनिकल गेज असते. उदाहरणार्थ, पिस्टनच्या गेजसाठी व्यासाच्या पॅरामीटरप्रमाणे वेगळे वेगळे फिक्श्चर केलेले असतात. कनेक्टिंग रॉडकरिता वेगळे फिक्श्चर, इंजिन व्हॉल्व्हसाठी वेगळे फिक्श्चर असते. इलेक्ट्रॉनिक साधने मात्र सगळीकडे समान वापरली जातात. त्यासाठी यंत्रभाग विशिष्ट प्रकारचा असावा अशी अट नसते.
एका परदेशी उत्पादासाठी स्वदेशी पर्याय (इम्पोर्ट सब्स्टिट्यूट) म्हणून आम्ही PneuGage हा उत्पाद विकसित केलेला होता. हिरो मोटर्समध्ये किंवा कमिन्समध्ये अशी उपकरणे वापरली जात होती. त्यामधूनच आम्हाला अशी मागणी करण्यात आली की, याच पद्धतीचे भारतीय उपकरण आपण तयार करू शकतो का? 2016 च्या आसपास बाजारात आणलेले हे उपकरण आता सर्वत्र वापरले जाते. PneuGage मध्ये 6 पॅरामीटरपर्यंत आकार मोजणीचे रेकॉर्डिंग एकाच उपकरणामध्ये केले जाऊ शकते. मग त्यामध्ये 3 व्यास असतील, 3 व्यास आणि टेपर असेल, 2 अंतर्गत व्यास (ID), 2 बाह्यव्यास (OD) असे विविध 6 पॅरामीटर एकाच उपकरणामध्ये मोजले जातात. मोजमापन एअर गेजिंग किंवा LVDT सारखा काँटॅक्ट सेन्सर वापरूनदेखील करता येते. 
PneuGage मधील हवा बचतीचे तंत्र (एअर सेव्हिंग टेक्नॉलॉजी) या संशोधनामुळे त्याला सर्वात जास्त मागणी आहे. PneuGage हे कदाचित पहिलेच भारतीय उपकरण आहे, ज्याच्यामध्ये आम्ही हवेच्या बचतीचे तंत्र अंतर्भूत (इनबिल्ड) केलेले आहे. जेव्हा ऑपरेटर यंत्रभागाचे मोजमापन करीत असतो, फक्त तेवढ्याच वेळेपुरती हवा चालू केली जाते. ज्यावेळी मोजमापनाचे काम चालू नसते, त्यावेळी फक्त 2 ते 5% एवढीच हवा वापरली जाते. जर आपल्या उद्योगक्षेत्रातील स्टॅटिस्टिक्स काढले तर मोजमापनाचा वेळ हा साधारणतः प्रक्रिया वेळेच्या (प्रोसेसिंग टाइम) 10% इतकाच असतो. म्हणजे एखाद्या यंत्रभागाचे एका मिनिटाचे मशीन आवर्तन (सायकल) असेल, तर त्याच्या मोजमापनाला खरेतर 5 ते 6 सेकंदाच्या वर वेळ लागायला नको. पारंपरिक उपकरणांमध्ये 1 मिनिटांची जी हवा वाया जाते ती PneuGage मध्ये फक्त 6 सेकंद इतकीच वेळ जाते. या उपकरणामुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते. 
आमच्याकडील आणि आमच्या ग्राहकाकडील माहितीवरून (डेटा) असे दिसून येते की, PneuGage साधारण 11 महिन्यांमध्ये संपूर्ण गुंतवणुकीवरील परतावा (ROI) देते. 

2_1  H x W: 0 x
इतर वैशिष्ट्ये 
· या गेजमध्ये अंतर्गत (इंटर्नल) रेकॉर्डिंग करण्याची सुविधा आम्ही दिलेली आहे. मोजलेली सर्व मापे जतन (सेव्ह) करता येतात. इथरनेट किंवा सिरियल पोर्टवरून क्वालिटी कंट्रोल रूममधील सर्व्हरवर ती सर्व माहिती घेऊ शकता. त्याला ऑटो सेटिंग दिलेले आहेत. प्रत्येक शिफ्टनंतर किंवा दिवसाच्या अखेरीला यंत्रभागानुसार, ऑपरेटरनुसार, तारीख आणि वेळेनुसार, माहिती स्वयंचलितपणे जतन करता येते. नोंद केलेल्या माहितीनुसार RS232 सिरियल पोर्टवरून सी.एन.सी. मशीनला फीडबॅक दिला जातो. याला इंडस्ट्रीमध्ये मशीन कॉम्पेन्सेशन म्हणतात. मशीन कॉम्पेन्सेशन देऊन लगेच पुढील यंत्रभाग आवश्यक दुरुस्त्या करून बाहेर काढता येतो. वेळच्यावेळी मशीनला फीडबॅक देणे ही सुविधा या उपकरणामध्ये दिली आहे. 
· PneuGage मध्ये डिजिटल इनपुट आणि आउटपुट आहेत. बऱ्याच गेजिंग यंत्रणेमध्ये PLC वापरून काही गोष्टी कराव्या लागतात. उदाहरणार्थ, लाइट कर्टन, प्रॉक्सिमिटी सेन्सर किंवा सॉलेनाइडद्वारा काही पोझिशन पुढे मागे करावयाच्या असतात, अशा गोष्टींसाठी डिजिटल इनपुट आणि आउटपुट अंतर्भूत असल्यामुळे वेगळा PLC वापरावा लागत नाही. 40% कामांमध्ये आपण PLC टाळू शकतो.
· मशीन स्टॉप हे आणखी एक चांगले वैशिष्ट्य याच्यामध्ये आम्ही दिले आहे. PneuGage मध्ये असा एखादा पॅरामीटर विशिष्ट मूल्याला सेट करू शकता की, जर या मूल्यापेक्षा जास्त यंत्रभाग अस्वीकृत झाले तर, PneuGage च्या डिजिटल आउटपुटवरून मशीन थांबविता येते. समजा सकाळी 9 वाजलेपासून यंत्रभाग अस्वीकृत व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते दुपारी 1 वाजेपर्यंत होतच आहेत. दुपारी 2 वाजता ते समजते आहे आणि दुपारी 3 वाजता त्याचे रीपोर्टिंग होत आहे. सायंकाळी 4 वाजता त्याच्यावर कृती केली जाते. अशी परिस्थिती आपल्या उद्योगक्षेत्रामध्ये येऊ शकते. मशीन स्टॉप या वैशिष्ट्यामुळे ती परिस्थिती टाळता येणे शक्य आहे. समजा 8 वाजता शिफ्ट सुरू झाली आणि 8:30 वाजता अस्वीकृतीला सुरुवात झाली. सेट केल्यापेक्षा जास्त यंत्रभाग अस्वीकृत झाल्याबरोबर PneuGage, मशीन थांबविते. त्यानंतर सुपरवायझरला अॅडमिनिस्ट्रेटर लॉगिनने ते पुन्हा चालू करून बघावे लागते की नक्की काय समस्या आहे.
· त्याच्यामध्ये इनबिल्ड SPC आहे. साधारणपणे कारखान्यात मोजमापन उपकरणांमधून (मेजरिंग इन्स्ट्रुमेंट) मिळणारी सर्व माहिती घेतात आणि ती क्वालिटी रूमला जाते. तिथे त्याच्यावर विश्लेषण होते. मग त्यावरून काय करावयाचे ते ठरते. PneuGage ला बेसिक SPC, प्रोसेस कपॅबिलिटी Cp, Cpk, Ppk तपासण्याची सुविधा आहे. सुरवातीच्या पातळीवरच प्रक्रिया सुधारणा करता येईल असे पॅरामीटर ऑपरेटरला डिस्प्लेवरच बघायला मिळतात. या उपकरणाला 7 इंची कलर डिस्प्ले दिलेला आहे. त्यामुळे तिथल्या तिथे माहिती बघून त्यावर सुधारात्मक कृती करता येणे शक्य आहे. त्यासाठी ती माहिती क्वालिटी रूममध्ये नेऊन, सॉफ्टवेअरमध्ये लोड करून, त्यावर प्रक्रिया करून बघण्याचे कष्ट आणि वेळ आपण वाचवू शकतो. 
· PneuGage आणि इको गेजचे हे वैशिष्ट्य आहे की, जर ग्राहकाचे आधीचे गेज सुस्थितीत काम करीत असेल, त्याची गुणवत्ता चांगली असेल, तर सध्याच्या अस्तित्वात असलेल्या गेजबरोबरदेखील ते वापरणे शक्य आहे.

3_1  H x W: 0 x 

5_1  H x W: 0 x 
Ecogauge ची वैशिष्ट्ये 
· PneuGage 4 चॅनेल किंवा 6 चॅनेलचे होते. परंतु Ecogauge मध्ये 2 चॅनेल एअर आणि 2 चॅनेल LVDT असे कॉम्बिनेशन करता येऊ शकते. 
· Ecogauge मध्ये स्क्रीनचा आकार आम्ही थोडा लहान केलेला आहे, कारण हे उपकरण आकाराने लहान (200 मिमी. X 200 मिमी.) आहे. छोट्या टेबलवरदेखील ते सहज ठेवता येते. ते पोर्टेबल आहे. त्यामध्ये चॅनेलची संख्या कमी असल्यामुळे सिंगल ID, OD अशा सगळ्या मोजणीसाठी ते सहजपणे वापरता येते. 
· PneuGage ची इथरनेट, ISO ही वैशिष्ट्ये आम्ही तशीच Ecogauge मध्ये ठेवलेली आहेत. वायफाय आणि ब्लूटूथ ही अतिरिक्त वैशिष्ट्ये Ecogauge मध्ये दिलेली आहेत. PneuGage मध्ये वायफाय सुविधा होती, परंतु त्याच्यामध्ये ब्लूटूथ सुविधा नव्हती. 
· यामध्ये ग्राहकाला संगणक सुविधेसह रिअल टाइम इन्स्पेक्शन अहवाल मिळतात. PneuGage मध्ये जतन केलेले अहवाल PDF स्वरुपात तिथल्यातिथे बघता येतात. Ecogauge मध्ये तुम्हाला अहवाल तिथल्यातिथे पाहता येत नाहीत, कारण डिस्प्लेचा आकार लहान आहे आणि त्याची क्षमतादेखील कमी झालेली आहे. त्यामुळे या उपकरणामध्ये आम्ही एक वेगळी संगणक सुविधा देणार आहोत, जिथे सगळी माहिती मध्यवर्ती ठिकाणी वायफायने जोडून तो मुख्य सर्व्हरला जोडता येणे शक्य आहे. त्यानंतर क्वालिटी रूममधील संगणकावर या सगळ्याचे एकत्रित अहवाल पाहता येतात. तसेच त्या त्या उपकरणावरदेखील हे अहवाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहेच.
· PneuGage मध्ये जवळजवळ 100 सेटअप (पॅरामीटर) जतन करता येणे शक्य आहे. उदाहरणार्थ, आज हे उपकरण एका 50 मिमी.च्या ID साठी वापरले, उद्या 28 मिमी. चा एक नवीन यंत्रभाग मोजमापासाठी येणार आहे, त्याच्यानंतर आणखीन 12 दिवसांनी 12 मिमी.चा यंत्रभाग आला... तर अशा विविध यंत्रभागांसाठी वेगवेगळे सेटअप PneuGage मध्ये करता येतात. तर Ecogauge मध्ये 40 पर्यंत सेटअप करता येणे शक्य आहे.
· आम्ही Ecogauge ला मोबाइल स्क्रीनसारख्या बटणांप्रमाणे बटणे दिलेली असून, ती सर्व टचस्क्रीन पद्धतीची आहेत. वापरकर्त्याला हे उपकरण कोणावरही अवलंबून न राहता वापरता आले पाहिजे, हा यामागील उद्देश आहे. 
चेन्नईला आमचा एक ग्राहक आहे, त्याने आमच्याकडे अशी मागणी केली की, त्याच्या उपकरणावरून सर्व रीडिंग ही थेट सर्व्हरला मिळाली पाहिजेत. जर विकसन टप्प्यावर असे काही इनपुट आले, तर त्याचा फायदाच होतो. आम्ही ते आव्हान स्वीकारले आणि त्याप्रमाणे मागील काही दिवसांमध्ये Ecogauge मध्ये तशी सुधारणा केली. 

4_1  H x W: 0 x

ग्राहकांचा प्रतिसाद 
EcoGauge च्या सुरुवातीच्या वापराचे अत्यंत सकारात्मक प्रतिसाद आम्हाला आमच्या ग्राहकांनी दिले आहेत. हे उपकरण वापरण्यास अतिशय सोपे असून, प्रत्येक शिफ्टला ऑपरेटर बदलला तरी, कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय नवीन ऑपरेटर हे उपकरण अतिशय सहजतेने वापरू शकतो, अशी प्रतिक्रिया आमच्या ग्राहकाने दिली आहे. तसेच मोबाईलसारख्या बटणांमुळे हे उपकरण वापरणे सोपे असल्याचे प्राथमिक मत आमच्या ग्राहकांनी आम्हाला दिले आहे. यातील हवा बचतीचे तंत्र सोपे असून ते अतिशय उपयोगी आहे. या वैशिष्ट्यामुळे खूप बचत होत असल्याचे ग्राहकाने सांगितले. 

6_1  H x W: 0 x
ग्राहकाला झालेले फायदे
जे लोक जुन्या डायल प्रकारचे युनिट वापरीत होते, त्यांना एक पर्याय उपलब्ध झाला आहे. डिजिटल रिडींगबरोबर सर्व माहिती सुरक्षितपणे सर्व्हरवर ठेवली जाणे शक्य आहे. हवा बचतीच्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक बचत झाली, वापरण्यास अतिशय सोपे आहे. त्यासाठी ग्राहकाला कोणतेही विशेष कौशल्य असण्याची गरज नाही. कमी किंमतीत ग्राहकांना डिजिटल दर्जाचा पर्याय पहिल्यांदाच उपलब्ध केला आहे. 
@@AUTHORINFO_V1@@