संपादकीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    10-Oct-2021   
Total Views |

फोर्ड अमेरिकन कंपनीने चेन्नई (तमिळनाडू) आणि साणंदमधील (गुजरात) वाहन निर्मितीचे प्रकल्प बंद करणार असल्याची घोषणा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात केली. अमेरिकन वाहन कंपन्यांनी त्यांचे भारतातील कारखाने बंद करणे ही बाब नवी नाही. यापूर्वीही जनरल मोटर्स, हार्ले डेव्हिडसन आणि UM मोटरसायकल या कंपन्यांनी भारतातील निर्मिती थांबविली होती. मान या जर्मन कंपनीनेही आपला बोऱ्या बिस्तर आवरला. त्या यादीत आता फोर्डची भर पडली. याची कारणे काय असू शकतात? भारतीय बाजारपेठ समजून घेण्यामध्ये धोरणात्मक चूक, महागडी विक्री पश्चात सेवा, भारतीय ग्राहकाला आकर्षित करणारे नवीन मॉडेल आणण्यात अपयश, सुटे भाग सर्वत्र न मिळणे अशी काही कारणे वाहन उद्योग तज्ज्ञांनी मांडली आहेत. भारतीय उद्योग क्षेत्राचा विचार केला तर भारतात छोट्या गाड्यांची चलती आहे. याच आधारावर मारुती सुझुकी आणि ह्युंदाई भारतात मोठा व्यवसाय करीत आहेत. भारतात विकल्या जाणाऱ्या पहिल्या 10 गाड्यांमध्ये फक्त मारुती आणि ह्युंदाई या 2 कंपन्यांच्याच गाड्या आहेत. या बाजारपेठेवर ताबा मिळवू शकेल अशी कोणतीही गाडी फोर्ड आणू शकली नाही आणि येथेच फोर्डचे चुकले! ज्यावेळी किया मोटर्ससारख्या इतर वाहन कंपन्या भारतीय बाजारपेठेत 2-3 वर्षांमध्ये एक परवडणारे नवीन मॉडेल आणत होत्या, त्यावेळी फोर्ड मात्र 15 वर्ष जुन्या वाहनांवरच अवलंबून राहिली. बाजारपेठेच्या या प्रवाहाबरोबर जे गेले तेच तरले, बाकी कंपन्या गटांगळ्या खाऊ लागल्या. फोर्डचेही तेच झाले!

या कंपन्या बाहेर पडल्या याची कारणे अगदी सहजपणे आणि स्पष्टपणे मांडली गेली असली, तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम वाहन उद्योगावर अवलंबून असलेल्या लघु, मध्यम कारखान्यांच्या अर्थकारणावर होतात. व्यवसाय लहान असो अथवा मोठा, बाजारपेठेची निकड, बाजारपेठेचा कल, विक्री पश्चात सेवा, उत्पादांमध्ये सातत्याने सुधारणा या अतिशय मूलभूत परंतु आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांचा उद्योजकाने गंभीरपणे अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उद्योगांनी त्यांच्या प्रचलित कार्यपद्धतींमधील अकार्यक्षमतेला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना बाजूला सारत उत्पादन पुढे नेण्यासाठी इंडस्ट्री 4.0 सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे परिणामकारक ठरू शकते. प्रतिकूल परिस्थितीतही निर्माता, पुरवठादार आणि ग्राहक यांच्यातील सुसंवाद यामुळे योग्य होऊ शकतो. दुसरे उदाहरण म्हणजे, इंधनाचे वाढत असलेले दर लक्षात घेता, मागील 5-6 महिन्यांच्या कालावधीत इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती मिळताना दिसत आहे. बाजारपेठेचा हा कल वेळीच ओळखून उद्योजकांनी आपल्या व्यवसायाचे स्वरूप त्यानुसार बदलणे महत्त्वाचे आहे. व्यवसायातील हा बदल काही काळाने होणार असला तरी त्याचे आधीच नियोजन करून, त्या दिशेने व्यवसायाची रचना केल्यास नुकसानीचा धोका समोर येण्याची शक्यता कमी होऊ शकते. बाहेरच्या प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता आपल्याकडील उपलब्ध संसाधनांचा, क्षमतांचा पुरेपूर वापर करणे हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारतीय चमूने मिळविलेली पदके याची साक्ष आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सुयोग्य प्रयत्नांची जोड याच्या जिवावर आपल्या खेळाडूंना जागतिक विक्रम करणे शक्य झाले. करोनानंतरच्या काळात आता आपणही त्यांचा कित्ता गिरविणे आवश्यक आहे.

अशाच प्रयत्नांना तंत्रविषयक पूरक माहिती देण्याचे काम आम्ही ‘धातुकाम’ मासिकातून करीत आहोत. या अंकात प्रामुख्याने पार्टिंग ऑफ आणि ग्रूव्हिंग प्रक्रियेवर भर दिला आहे. पार्टिंग आणि ग्रूव्हिंग या प्रक्रिया थोड्याफार फरकाने समान असल्या तरी त्यांचे आपापले काही बारकावे आहेत. पार्टिंग ऑफ आणि ग्रूव्हिंग प्रक्रियेचे सविस्तर तपशील, उच्च दाबाचे शीतक वापरून केले जाणारे यंत्रण, पार्टिंग करताना CAM नियोजन, पार्टिंग टूलचे तांत्रिक तपशील अशा विविध प्रकारे या प्रक्रियेतील बारकावे समजून घेण्यासाठी धातुकामचा हा अंक आपणास उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर सुरक्षितता, कारखान्यातील किस्से, युक्त्या आणि क्लृप्त्या या लेखमालांतील लेख आपल्यास नक्कीच आवडतील.

तांत्रिक माहिती मातृभाषेत दिल्याने त्यातील संकल्पना अधिकाधिक स्पष्ट होतात. कौशल्य विकासासाठी उपयुक्त ठरतील यासाठी पूरक कार्यक्रमांचे आयोजन आम्ही नेहमीच करीत असतो. त्याचाच एक भाग म्हणून सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य मा. अनिल गोरे (मराठी काका) यांनी मातृभाषेत तांत्रिकी ज्ञानाची आवश्यकता यासंदर्भात मार्गदर्शन केले. अशा उपक्रमांमध्ये वाचकांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा आहे.

सई वाबळे
[email protected]

@@AUTHORINFO_V1@@