ताळेबंदातील विभागणी भाग-2

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    11-Oct-2021   
Total Views |
मागील लेखामध्ये ताळेबंद नमुन्याचा समावेश केला होता. त्यामध्ये आपण पाहिले की, देणी आणि मालमत्ता या दोन्ही भागांमध्ये दाखविण्यात आलेल्या विविध लेजर अकाउंटची मांडणी त्यांचे ग्रुप बनवून विशिष्ट सदरांच्या अंतर्गत एका फॉरमॅटमध्ये केलेली आहे. ज्या सदराखाली आणि ज्या संकल्पनांच्या आधारे ही मांडणी केली गेली आहे, त्याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
 
सूचना : ताळेबंदाचे तक्ते पाहण्यासाठी धातुकामचा सप्टेंबर 2021 चा अंक पाहणे.
 
या बाबतीत ठळकपणे लक्षात येणारी पहिली गोष्ट म्हणजे, देणी आणि मालमत्ता. या दोन्हींच्या बाबतीत, त्यांचे धंद्यामधील अस्तित्व किती काळासाठी असणार आहे हा प्रमुख निकष लावून ताळेबंदामध्ये लेजर अकाउंटची मांडणी केलेली आहे. या निकषाप्रमाणे देण्यांसाठीच्या पहिल्या उभ्या भागात दीर्घ मुदतीसाठी म्हणून जे पैसे देण्याच्या स्वरूपात धंद्याला मिळाले आहेत ते सर्वप्रथम दाखविले आहेत. त्यानंतर थोड्या काळाकरिता वापरण्यासाठी म्हणून जे पैसे धंद्याला देणी स्वरूपात मिळाले आहेत ते चालू देणी या सदराखाली घेतले गेले आहेत. अगदी त्याचप्रमाणे मालमत्तांसाठीच्या दुसऱ्या उभ्या भागात दीर्घ मुदतीसाठी धंद्यामध्ये ज्या मालमत्ता राहणार आहेत त्या प्रथम दाखविण्यात आल्या आहेत. त्यानंतर थोड्या काळाकरिता ज्या मालमत्तांमध्ये धंद्यांकडून गुंतवणूक झाली आहे अशा सर्व मालमत्ता चालू मालमत्ता या सदराखाली दाखविण्यात आल्या आहेत. अर्थात देणी असोत किंवा मालमत्ता, किती काळासाठी या गोष्टी धंद्यामध्ये असणार आहेत हा ताळेबंदाच्या मांडणीमधला प्रमुख निकष आहे. या निकषाच्या आधारे सर्वात जास्त काळासाठी जे देणे धंद्यामध्ये असणार आहे असे देणे देण्याच्या भागात प्रथम क्रमांकावर दाखविले जाते. त्यानंतर कालावधीच्या उतरत्या क्रमाने इतर सर्व देणी दाखविली जातात.
 
कुठले देणे धंद्यामध्ये सर्वात अधिक काळासाठी राहील याचे उत्तर अगदी सोपे आहे. धंदा ज्यांच्या मालकीचा आहे, त्यांनी धंद्यात गुंतविलेले पैसे अर्थात भांडवल, धंदा चालू असेपर्यंत धंद्यामधून परत केले जाणार नाही. याचे कारण, मालकांचीच गुंतवणूक जर धंद्यात राहिली नाही तर बाहेरचे लोक कोणाच्या भरवश्यावर कर्जाऊ स्वरूपात दिलेले पैसे धंद्यात ठेवतील? बाहेरील व्यक्ती आणि संस्था आपली देणी चुकती केल्याशिवाय मालकांना धंद्यातून भांडवल काढून घ्यायला प्रतिबंध करतील. कंपन्यांच्या बाबतीत तर कंपनी कायद्यांप्रमाणे इतर सर्व देणी भागविल्याशिवाय कंपनीला भागधारकांचे भांडवल काही अपवाद वगळता परत करताच येत नाही. अर्थात भांडवलाची परतफेड धंद्याला अगदी शेवटी करता येईल. एखादे जहाज बुडू लागले तर ज्याप्रमाणे त्या जहाजाचा कप्तान इतर सर्व प्रवासी आणि जहाजावरचे कर्मचारी 'लाईफबोट'मध्ये बसले आहेत याची खात्री करूनच मग स्वतः जहाज सोडून त्यात बसतो. त्याप्रमाणे व्यवसायाचा कप्तान अर्थात त्याचे मालक इतर सर्वांची देणी भागविल्याशिवाय आपले भांडवल धंद्याकडून परत मिळेल अशी अपेक्षा ठेवत नाहीत. अर्थात मालकांनी धंद्यात गुंतविलेल्या भांडवलापोटी जे देणे धंद्याला निर्माण होते ते धंद्यामध्ये सर्वात जास्त काळ राहते म्हणून ते ताळेबंदामध्ये देण्यांसाठीच्या उभ्या भागात सर्वात प्रथम दाखविले जाते. मालमत्तेच्या दुसऱ्या उभ्या भागातसुद्धा सर्वात जास्त काळासाठी जी मालमत्ता धंद्यात राहण्याची शक्यता आहे ती मालमत्ता प्रथम क्रमांकावर दाखविली जाते. त्यानंतर कालावधीच्या उतरत्या क्रमाने इतर सर्व मालमत्ता दाखविण्यात येतात. देण्याच्या बाबतीत मालकांचे भांडवल हे जसे सर्वात अधिक काळ राहणारे धंद्याचे देणे असते, तसेच मालमत्तांमध्ये रियल इस्टेट स्वरूपाच्या मालमत्ता जसे की जमीन, बांधकाम इत्यादी धंद्यात सर्वात अधिक काळ राहण्याची शक्यता असते. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या मालमत्तांमध्ये त्यांचे स्थान सर्वात प्रथम दाखविण्यात येते. धंद्यात राहण्याच्या कालावधीच्या निकषानुसार दीर्घ मुदतीची आणि कमी मुदतीची म्हणून चालू प्रकारची अशी मालमत्ता आणि देण्याची जी वर्गवारी केली जाते. ती करताना अकाउंटिंग शास्त्रानुसार एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी धंद्यामध्ये ज्या मालमत्ता आणि देणी राहणार असतील त्यांना दीर्घ मुदतीच्या वर्गात समाविष्ट करण्यात येते. त्यापेक्षा कमी कालावधीच्या मालमत्ता आणि देणी चालू वर्गात समाविष्ट होतात. ज्यावेळेला एखादी मालमत्ता धंद्यात येते किंवा एखादे देणे निर्माण होते त्यावेळी हा एक वर्षाचा निकष लावला जातो. म्हणजे एखादा पुरवठादार वर्षानुवर्षे जरी माल उधारीवर देत असेल, तरी त्याचे लेजर अकाउंट चालू देणी या सदराखालीच घेण्यात येते. त्याचे कारण असे की, त्याच्या अकाउंटमध्ये निर्माण झालेले प्रत्येक देणे त्याच्या बिलातून निर्माण झालेले असते आणि बिलाच्या तारखेपासून लवकरात लवकर त्याचे पेमेंट करणे धंद्याला भाग असते. अर्थात पुरवठादाराचे कोणतेही बिल एक वर्षापेक्षा अधिक काळ पेमेंटसाठी रखडले जात नाही आणि ताळेबंदाच्या दिवशी त्याच्या अकाउंटमध्ये जी रक्कम एकूण देणे म्हणून दिसेल त्याचे पेमेंट ताळेबंदाच्या तारखेपासून एक वर्षात होणे अपेक्षित असते. पुढच्या ताळेबंदाच्या तारखेला त्याची वेगळी बिले रखडल्यामुळे चालू देणी या सदराखाली दिसत राहतात. याचप्रकारे ग्राहक, मशीन, स्टाफ अॅडव्हान्स अशा इतर सर्व अकाउंटची वर्गवारी दीर्घ मुदतीची आणि चालू प्रकारची या गटांमध्ये केली जाते.
मालमत्तेच्या बाबतीत बोलायचे झाले तर, वरील निकषानुसार प्रामुख्याने तिचे दोन भाग होतात. एक म्हणजे धंद्यामध्ये दीर्घकाळासाठी उपयोगात येणारी स्थिर प्रकारची मालमत्ता म्हणजेच फिक्स्ड् अॅसेट (उदाहरणार्थ, जमीन, बांधकाम, मशीन पेटंट इत्यादी.) होय. नमुना ताळेबंदात या मालमत्ता संदर्भ क्रमांक 5 मध्ये दाखविण्यात आल्या आहेत. अशा दीर्घ मुदतीच्या मालमत्तेचा उपयोग करून धंद्याची उलाढाल होण्याकरीता म्हणून ज्या मालमत्ता धंद्यामध्ये आवश्यकच असतात अशा सर्व चालू प्रकारच्या मालमत्ता म्हणजेच करंट अॅसेट (जसे की, दैनंदिन खर्चासाठी लागणारी रोकड, कच्चा माल, उत्पादन प्रक्रियेमधील अपूर्ण माल, तयार माल, उधारीवर माल विकल्यामुळे ग्राहकांकडून वसूल करावयाच्या बिलांची रक्कम इत्यादी.) होय. नमुना ताळेबंदात या मालमत्ता संदर्भ क्रमांक 10 मध्ये दाखविण्यात आल्या आहेत. आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे ज्या मालमत्ता धंद्याला प्राप्त होतात त्या मिळविण्यासाठी धंद्याला तेवढ्याच रकमेची देणी मालक आणि इतरांप्रती निर्माण होतात. जसे की मशीन घेण्याकरीता टर्म लोन काढलेले असू शकते, पुरवठादाराकडून उधारीवर मालाची खरेदी केलेली असू शकते, तसेच ग्राहकांकडून, ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अॅडव्हान्स घेतलेला असू शकतो इत्यादी. तर या सर्व देण्यांचीही विभागणी दीर्घ मुदतीची आणि चालू प्रकारातली अशी केली जाते. नमुना ताळेबंदात भांडवल आणि इतर दीर्घ मुदतीची देणी संदर्भ क्रमांक 1 पासून 3 पर्यंत दाखविण्यात आली आहेत, तर संदर्भ क्रमांक 4 मध्ये चालू देणी समाविष्ट करण्यात आली आहेत.ताळेबंदात दीर्घ मुदतीची आणि चालू प्रकारची अशी विभागणी करण्यापाठीमागे प्रामुख्याने दोन कारणे असतात. एक म्हणजे चालू मालमत्ता, चालू देण्यांपेक्षा जास्त रकमेच्या असणे सर्वसाधारणपणे कोणत्याही धंद्यासाठी आवश्यक मानले जाते. या दोन्हींमधील जो फरक असतो त्यासाठीचा पैसा मालकांनी धंद्यामध्ये घातलेल्या भांडवलामधून पुरविला जाणे अपेक्षित असते. भांडवलाच्या या भागाला नक्त खेळते भांडवल अर्थात नेट वर्किंग कॅपिटल असे संबोधण्यात येते. ताळेबंदामधील या विभागणीमुळे धंद्यामध्ये मालकांनी खेळत्या भांडवलासाठी किती पैसे गुंतविले आहेत ते लक्षात येते.
 
दुसरे म्हणजे दीर्घ मुदतीच्या मालमत्ता या दीर्घ मुदतीची देणी आणि भांडवल वापरून धंद्यात आल्या पाहिजेत अशीही अपेक्षा असते. अर्थात कॅश क्रेडिटची मर्यादा (लिमिट) वापरून जर मशीन खरेदी केली असेल, तर वर्षाअखेर जेव्हा हे क्रेडिट परत करायची वेळ येईल तेव्हा मशीनमधून मिळालेले एक वर्षाचे उत्पन्न तेवढी रक्कम उभारण्यास असमर्थ ठरेल आणि धंदा आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण होईल. तेव्हा ताळेबंदामधील या विभागणीवरून कोणत्या प्रकारची देणी, कोणत्या प्रकारच्या मालमत्ता मिळविण्यासाठी वापरली आहेत तेही लक्षात येते. ताळेबंदातल्या या ढोबळ विभागणीबद्दल जाणून घेतल्यानंतर त्यात येणाऱ्या प्रत्येक सदराविषयी अधिक माहिती पुढच्या लेखात जाणून घेऊ.
 
 
9822475611
 
मुकुंद अभ्यंकर चार्टर्ड अकाउंटंट असून, गेल्या 30 वर्षांपासून ते अनेक कंपन्यांसाठी लेखापरीक्षणाचे आणि आर्थिक घडामोडींच्या विश्लेषणाचे काम करीत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@