पार्टिंग टूल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    15-Oct-2021   
Total Views |
जेव्हा लेथवर लांब बारमधून लहान यंत्रभाग तयार केले जातात, तेव्हा विविध दंडगोलाकार फॉर्मचे टर्निंग करण्याव्यतिरिक्त बारमधून तो यंत्रभाग कापून वेगळा करणे, हे एक महत्त्वाचे काम असते. यासाठी 'पार्टिंग टूल' या विशेष प्रकारे बनविलेल्या कटिंग टूलची आवश्यकता असते. पार्टिंग टूलच्या तपशिलात जाण्यापूर्वी पार्टिंग प्रक्रिया समजून घेणे फायदेशीर ठरेल. पार्टिंग टूल इतर टर्निंग टूलपेक्षा वेगळे का आहे, हे त्यातून स्पष्ट होईल.
 
Parting tools_1 &nbs  
 

टर्निंग कामासाठी विविध प्रकारचे लेथ वापरून विस्तृत श्रेणीमधील यंत्रणाची कामे करता येतात. सिंगल स्पिंडल आणि मल्टीस्पिंडल ऑटोमॅटिक लेथ, व्हर्टिकल लेथ, स्लाइडिंग हेडस्टॉक लेथ अशा पारंपरिक आणि सी.एन.सी. दोन्ही प्रकारचे लेथ जगभरात वापरले जातात. या मशीनवर केलेल्या यंत्रणाला सामान्यतः टर्निंग असे संबोधले जाते. अशा लेथवर रफ आणि फिनिश असे दोन्ही प्रकारचे यंत्रण केले जाते. टर्निंगद्वारे सामान्यपणे स्टेप टर्निंग, टेपर टर्निंग, फेसिंग, कंटूर टर्निंग, थ्रेड कटिंग, नर्लिंग, ड्रिलिंग, रीमिंग, बोअरिंग, टॅपिंग, ग्रूव्हिंग आणि पार्टिंग इत्यादी यंत्रण प्रक्रिया केल्या जातात.

जेव्हा लेथवर लांब बारमधून लहान यंत्रभाग तयार केले जातात, तेव्हा विविध दंडगोलाकार फॉर्मचे टर्निंग करण्याव्यतिरिक्त बारमधून तो यंत्रभाग कापून वेगळा करणे, हे एक महत्त्वाचे काम असते. यासाठी 'पार्टिंग टूल' या विशेष प्रकारे बनविलेल्या कटिंग टूलची आवश्यकता असते. पार्टिंग टूलच्या तपशिलात जाण्यापूर्वी पार्टिंग प्रक्रिया समजून घेणे फायदेशीर ठरेल. पार्टिंग टूल इतर टर्निंग टूलपेक्षा वेगळे का आहे, हे त्यातून स्पष्ट होईल.

 

Parting tools_1 &nbs 
तयार यंत्रभागाला बारपासून वेगळे करण्यासाठी एक लहान, तीक्ष्ण आणि पातळ टूल वापरून अरीय (रेडियल) दिशेने मटेरियलच्या आत प्रवेश केला जातो. याचा अर्थ टूल मटेरियलच्या बाह्य व्यासापासून मध्यभागापर्यंत जाते. जसजसे टूल आतल्या दिशेने सरकते, तसतसे ते मटेरियल बाहेर काढता काढता पार्टिंगच्या स्थानावर एक लहान खाच (ग्रूव्ह) बनवित जाते आणि एकदा टूल मध्यभागी पोहोचले की, यंत्रभाग कापून वेगळा होतो आणि बाजूला पडतो.
ग्रूव्हिंग आणि पार्टिंग या दोन्ही प्रक्रियांमधून तयार होणाऱ्या चिप बाहेर काढण्याचा एकच मार्ग असतो आणि तो टूलच्या वरच्या (रेक) पृष्ठभागावरून वरच्या दिशेने असतो. चिप बाहेर निघण्यास बाजूने जागा नसते आणि त्यामुळे चिपचा प्रवाह आणि त्याची दिशा महत्त्वपूर्ण असते. जसजसे टूल अरीय दिशेने आत सरकते, तसतसे यंत्रण क्षेत्रात काम करणारे कर्तन बल कमी होते, परंतु टूलच्या बाजूंवरील घर्षण वाढते.
टूलची रुंदी जितकी लहान असेल, तितके पार्टिंग प्रक्रियेमध्ये मटेरियलचे नुकसान कमी होते. लहान रुंदी, कमी चिप क्लिअरन्स, रेक आणि क्लिअरन्स कोन (अँगल) मोठा असल्याने कमकुवत कर्तन धार, वेज कोन 90 अंशापेक्षा कमी इत्यादी काही घटक पार्टिंग टूल तुटण्यासाठी कारणीभूत असतात. म्हणून एका बाजूला टूलची रुंदी, रेक कोन, तर दुसऱ्या बाजूला प्रक्रियेला लागणार वेळ, खर्च आणि टूलची ताकद यांच्यातील सुवर्णमध्य गाठावा लागतो.
 

Parting tools_1 &nbs 

कार्यवस्तूचे मटेरियल, त्याचा कठीणपणा आणि त्याची रचना यांच्यावर टूलवरील बले (चित्र क्र. 2) अवलंबून असतात. सरकवेगदेखील सावधपणे निवडला जाणे आवश्यक आहे, कारण उच्च सरकवेग (चित्र क्र. 3) असला, तर कर्तन बल अधिक असेल, ज्याचा टूलच्या आयुर्मानावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. पार्टिंग आणि ग्रूव्हिंग हे यंत्रण कार्य दिसायला सोपे वाटत असले, तरी हे नेहमीच आव्हानात्मक असते. कारण यात असे अनेक घटक आहेत, ज्यांच्यामुळे यंत्रभागाची अस्वीकृती होऊ शकते.


पार्टिंग प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक


1. यंत्रभागाचे मटेरियल


यंत्रभाग विविध प्रकारच्या मटेरियलपासून बनविले जातात. नरम प्रकाराचे अॅल्युमिनिअम, पितळ, फॉस्फर ब्रॉन्झ यांच्यापासून ते कठीण श्रेणीच्या स्टीलपर्यंत अशा विविध मटेरियलची यंत्रणक्षमता वेगवेगळी असते. मटेरियलच्या कठीणपणामध्ये भिन्नता असल्यास सडपातळ विभागांचे ग्रूव्हिंग किंवा पार्टिंग करताना टूल सहज तुटू शकते. रेक कोनदेखील मटेरियलवर अवलंबून असतात.

 

Parting tools_1 &nbs 
 

2. यंत्रभागाची रचना

जर पार्टिंग ऑपरेशन चकपासून दूर अंतरावर किंवा दुसऱ्या शब्दात, यंत्रभागाच्या ओव्हरहँग असलेल्या भागावर असेल, तर ते टूलसाठी समस्या निर्माण करू शकते. विशेषत: पार्टिंगमध्ये, जेव्हा टूल केंद्राच्या जवळ येते, तेव्हा यंत्रभाग त्याच्या ओव्हरहँग/वजनामुळे तुटण्याची शक्यता असू शकते. यामुळे एक पिप किंवा लहान पोकळी तयार होऊ शकते, जिला काढण्यासाठी अतिरिक्त प्रक्रिया करावी लागते.

3. मशीनची स्थिती

पार्टिंग टूल काही प्रमाणात पातळ आणि नाजूक असतात. या यंत्रणाला खूप भक्कम आणि मजबूत सेटअप आवश्यक आहे. मशीनच्या स्पिंडल आणि स्लाइडमध्ये कंपने किंवा बॅक लॅश नसावेत, कारण त्यामुळे कटिंग टूलवर असामान्य शक्ती निर्माण होऊ शकते. हल्लीच्या हत्यारधारकांमध्ये त्यांच्यातूनच शीतकाचा पुरवठा करण्याची (थ्रू कूलंट) व्यवस्था असते. त्यासाठी लागणाऱ्या नलिका जोडण्याची योग्य सोय मशीनमध्ये असायला हवी. टूलचा ओव्हरहँग कमी करू शकणारे आणि चांगली पकड देणारे हत्यारधारक उपयुक्त असतात. मुळात, यंत्रण प्रक्रिया कंपन मुक्त असणे हे महत्त्वाचे असते. सामान्यतः पार्टिंग यंत्रणादरम्यान शीतक आवश्यक असते. हे यंत्रण ज्या मशीनवर करावयाचे असेल त्यावर शीतक पुरवठ्याची चांगली व्यवस्था तसेच शीतकाचा दाब आणि प्रवाह दर पुरेसे असणे आवश्यक आहे.

साधारणपणे, पार्टिंग टूल पुढच्या कर्तन कडेवर तुटते. हे लहान चिपिंगच्या स्वरूपात असू शकते किंवा संपूर्ण टूल ब्लेड मोडू शकते. जर टूल योग्य प्रकारे सेंटर केले नसेल आणि ते केंद्र रेषेच्या खूप खाली असेल, तर ते यंत्रभागाला उचलू शकते आणि या प्रक्रियेत टूल तुटू शकते किंवा यंत्रभाग खराब होऊ शकतो.

 

Parting tools_1 &nbs 
 
ग्रूव्हिंग टूलची निवड पूर्णपणे खाचेचा आकार आणि फॉर्मवर आधारित असते. यामुळे, निवडीसाठी खूप कमी वाव आहे. पार्टिंग प्रक्रियेसाठी एक पर्याय असू शकतो, जो टूलच्या इच्छित रुंदीवर अवलंबून असतो. रुंदी जितकी कमी, तितके पार्टिंग करताना मटेरियलचे नुकसान कमी. साहजिकच मटेरियलची किंमत विचारात घेतली पाहिजे. पार्टिंग होताना यंत्रभागाचे मटेरियल, मशीनची स्थिती आणि ओव्हरहँग हे सगळे विचारात घेतले गेले पाहिजेत. यात कोणतेही काटेकोर नियम नाहीत, परंतु हल्ली उपलब्ध असणाऱ्या कार्बाइड इन्सर्टमधून (चित्र क्र. 4) निवड करण्यासाठी विस्तृत वाव आहे.
 
 

Parting tools_1 &nbs 
 
अनेक टूल उत्पादकांनी पार्टिंग ऑफ आणि खोल ग्रूव्हिंगसाठी विविध प्रकारच्या मटेरियलसाठी विविध भूमिती असलेले समर्पित इन्सर्ट विकसित केले आहेत. त्यात आवश्यक तिथे चिप ब्रेकिंग आणि उत्तम पृष्ठीय फिनिशसाठी वायपर कटिंग एजचा समावेश आहे. ज्यातून शीतक पुरवठा होऊ शकेल असे हत्यारधारक विस्तृत श्रेणीमध्ये उपलब्ध असतात.
त्यामुळे चिपवर उत्तम नियंत्रण मिळू शकते आणि चिप कार्यक्षम पद्धतीने दूर नेता येतात. काही इन्सर्टच्या भूमितीमध्येच एक विशेष चॅनेल विकसित केलेला असतो. यामुळे शीतक कर्तन कडेवर आणि जिथे चिप निर्माण होते त्या भागावर योग्य प्रकारे पोहोचते. विशेष लेपन (कोटिंग) केलेले इन्सर्टदेखील उपलब्ध असतात.
 
इतर टर्निंग टूलप्रमाणेच, पार्टिंग टूलसुद्धा अशाप्रकारे बसवावे लागते की, पुढील कर्तन कड अचूकपणे यंत्रभागाच्या फिरणाऱ्या केंद्रावर असेल. सध्याच्या सी.एन.सी. मशीनमध्ये असे सेंटरिंग सुनिश्चित करण्याची तरतूद असते. परंतु, मॅन्युअल मशीनमध्ये टूल अचूकपणे बसविण्यासाठी ऑपरेटरचे कौशल्य आवश्यक असते. जर टूल योग्यरित्या सेंटर केलेले नसेल, तर पार्टिंग केलेल्या भागाच्या मध्यभागी किंवा मशीनवरील कच्च्या मालाच्या बारवर पिप तयार होण्याचा धोका असतो.
तक्ता क्र. 1 मध्ये लेथवरील पार्टिंगच्या कामांसाठी शिफारस केलेले कर्तनवेग आणि सरकवेग दर्शविले आहेत. तथापि, वापरकर्त्याने टूल उत्पादकांच्या शिफारसींचा संदर्भ घ्यावा आणि इच्छित यंत्रभागासाठी सर्वात योग्य कर्तनवेग आणि सरकवेग ठरवावा.

 

9860871070
[email protected]
श्याम वैद्य यांनी कमिन्स इंडिया लि. मध्ये सुमारे 32 वर्षे काम केले आहे. त्यांना कॅपिटल इक्विपमेंटच्या नियोजन आणि खरेदीसाठीच्या उत्पादन अभियांत्रिकीमधील 20 वर्षांचा अनुभव आहे. ते सध्या मशीन टूल्स आणि उत्पादन क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करतात.
 
@@AUTHORINFO_V1@@