प्रचलित कार्यसंस्कृतीमध्ये उत्पादनाचा अत्युच्च दर्जा, जास्तीतजास्त वेग आणि कमीतकमी किंमत या गोष्टींबरोबरच सुरक्षिततेलाही महत्त्व देणे गरजेचे बनले आहे. कारखान्यात प्रत्यक्ष घडलेल्या काही घटनांच्या आधारे या लेखमालेमध्ये कारखान्यातील सुरक्षिततेबाबत चर्चा केली आहे
फाउंड्रीची दुसरी पाळी संध्याकाळी बरोबर चार वाजता सुरू झाली. कार्ड पंचिंग करून अप्पा पठारे खालमानेने सावकाश चालत शॉपमधे शिरला. स्लीपरचा चटकपटक आवाज करत तो मोल्डिंग शॉपच्या मागच्या बाजूस वळला. वेगवेगळे मोल्ड, टूल, फुटके तुकडे, कुठल्या कुठल्या जाळ्या अशा अनेक प्रकारच्या वस्तू इतरत्र पसरल्या होत्या. त्यातून आपल्या पायाला इजा होणार नाही याची काळजी घेता घेता वेडेवाकडे चालत तो सँड मिक्सरपर्यंत पोहोचला. मोल्डिंग शॉपला अपेक्षित मिश्रणाची मिश्रित वाळू (मिक्स सँड) पुरविणारा हा विभाग मोल्डिंग शॉपच्या मागच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात सुमारे दहा फूट उंच प्लॅटफॉर्मवर उभा केला होता. सँड मिक्सरमधून बाहेर पडणारी वाळू तीन फूट खाली असलेल्या एका कन्व्हेअर बेल्टने विविध ठिकाणी वाहून नेली जात होती. प्लॅटफॉर्मवर चढायला एक शिडी होती, तिच्या पायऱ्यांना कसेबसे धरून अप्पा वर चढला. आजचा कामाचा भार पाहून कंट्रोल पॅनलवरील बटने दाबून त्याने मिक्सर चालू केला.
संध्याकाळी बरोबर सात वाजता जेवणाची सुट्टी झाली. मिक्सर बंद करून तो बाहेर जेवायला गेला आणि साडेसात वाजता परत आला तो थोडासा डुलतच. शिफ्ट सुरू झाली.
आठ वाजता मिक्सरचा कन्व्हेअर बंद पडला. दोन कामगार आपसात म्हणाले, "आज बुधवार. अप्पा जेवायच्या आधी पिऊन आला वाटतं!"
एक कामगार अप्पाला हाळी देत त्या अंधाऱ्या कोपऱ्यात आला. त्याला अप्पा कोठे दिसेना. परत हाका मारल्यावर त्याला क्षीण कण्हण्याचा आवाज आला, तसे तो जवळ आला. अप्पाचा डावा पाय मिक्सरच्या खालच्या कन्व्हेअर बेल्ट आणि मोटरच्यामध्ये अडकला होता. त्यामुळे कन्व्हेअर बंद पडला होता. पाहता पाहता इतर कामगार जमा झाले. त्यांनी अप्पाला कसेबसे सोडवून बाहेर काढले. त्याचा डावा पाय पट्ट्यात अडकून मोडला होता. त्याला तत्परतेने जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
हा अपघात घडण्याची कारणे
1.शॉपवर असलेल्या सुमारे दहा फूट उंच प्लॅटफॉर्मवर संरक्षक कठडा नव्हता ही बाब धक्कादायक आणि धोकादायक आहे. उंचावर असलेल्या कामाच्या ठिकाणी असे संरक्षक कठडे आवश्यक असतात. याचबरोबर शिडीलादेखील चढताना आणि उतरताना आधारासाठी कठडा हवा. (फॅक्टरी अॅक्ट 1948, MF RULE 9)
2. मिक्सरच्या खालच्या कन्व्हेअर बेल्ट आणि मोटरच्या सर्व भागावर संरक्षक जाळी अत्यंत आवश्यक आहे. शॉपवर असलेल्या सर्व फिरत्या भागांवर कामगारांच्या सुरक्षिततेसाठी जाळी लावणे कायद्याने बंधनकारक आहे. (फॅक्टरी अॅक्ट 1948, MF 1963 सेक्शन 21-57)
3. सर्व कर्मचाऱ्यांना काम करताना सुरक्षितता उपकरणे घालण्याची सक्ती केली पाहिजे. स्लीपरसारखी पादत्राणे घालून पाय घसरू शकतो आणि अपघात होतात.
4. कामाच्या जागेवर योग्य प्रकाश योजना राखणे आवश्यक आहे. (फॅक्टरी अॅक्ट 1948, सेक्शन 17)
5. या एकूण व्यवस्थेमध्ये सुरक्षिततेविषयी उदासीनता आहे. उत्तम व्यवस्थापन आणि उत्तम सुरक्षितता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
6.संपूर्ण कारखान्याचे सुरक्षितताविषयक ऑडिट करून, सर्व संभाव्य धोके शोधून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हायला हवी. अशा जागी सुरक्षित कार्य करण्याच्या पद्धती (सेफ वर्क प्रॅक्टिस) निर्माण करून त्यांचे योग्य प्रशिक्षण सर्व संबंधितांना द्यायला हवे. सुरक्षिततेच्या सूचना, काय करावे आणि काय करू नये याचे फलक सर्वांना ठळकपणे दिसतील अशारीतीने शॉपवर लावावेत.
7कर्मचाऱ्यांची व्यसनाधीनता कमी करण्यासाठी संवेदनशील पद्धतीने मोहीम राबविली जायला हवी. परंतु, प्रत्यक्ष कामावर आल्यावर व्यसने करणे महागात पडते, हे सर्वांच्या मनावर बिंबविले पाहिजे. व्यवस्थापनाने यामध्ये खंबीर राहून पावले टाकायला हवीत.
(लेखन साहाय्य : अच्युत मेढेकर)
9822650043
[email protected]
उद्धव दहिवाळ यांना मेंटेनन्स आणि औद्योगिक सुरक्षितता या क्षेत्रातील सुमारे 35 वर्षांचा अनुभव आहे. ते सध्या विविध कारखान्यांना सुरक्षितता सल्लागार सेवा पुरवितात.